कुत्रेकुई, पळता भुई, झोप जाई!!

Submitted by निमिष_सोनार on 26 March, 2012 - 07:55

एका बातमीनुसार हायकोर्टाने म्हटल्याचे आठवते की झोप हा माणसाचा मुलभूत हक्क आहे.
म्हणून रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी केली आहे.
पण, रस्तोरस्ती भटकणाऱ्या कुत्र्यांबद्दल कोर्टाची आणि महानागरपालीकांची भूमिका काय आहे?
रात्री कामावरून घरी परत येणारया नागरिकांना, लहान मुलांना चावणे, त्यांचेवर भुंकणे, त्यांच्या वाहनामागे पळणे, तसेच रात्रभर कुत्र्यांचा घोळका एकत्र येवून कर्कश्य आवाजात मोठ्ठ्याने भुंकणे असे प्रकार अनेक शहरातील वेगवेगळ्या परिसरात वाढले आहेत.
त्यामुळे नागरिकांची झोप हैराण झाली आहे.
या भटक्या कुत्र्यांना काही गेटच्या आत राहून भुंकणारी पाळीव कुत्रीही साथ देत असतात.
पाळीव कुत्र्यांचे मालक कुत्र्यांना बाहेरच्या गेटजवळ बांधून स्वतः गाढ झोपतात आणि ती कुत्री इतर लोकांवर भुंकून त्यांची रात्र खराब करतात.
तसेच पाळीव कुत्र्यांचे सुशिक्षित मालक त्यांना सकाळी रस्त्यावर फिरायला नेतात आणि त्यामुळे कुत्रे रस्ते खराब करतात.
त्यांना समाजीक जाणीव का नाही?
प्राणी दया एवढी महत्त्वाची आहे काय की त्यापुढे एखाद्या नागरिकाचा प्राण, रोजची रात्रीची झोप आणि शहरांची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची नाही???
या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास कोठे करता येईल?
कुणाला माहीत असल्यास कळवावे.

गुलमोहर: 

निमिष,
तुम्ही खरोखरच एका फार महत्वाच्या विषयाबद्दल लिहिले आहे. त्यामुळे माझे याबद्दलचे विचार मांडायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
गावचे रस्ते म्हणजे मोकाट कुत्र्यांची जणु अभयारण्येच! अशी परिस्थिती आहे.
मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी खर्च करण्यात पालिका अधिक रस घेतांना दिसतात. भटक्या कुत्र्यांच्या पराक्रमांबद्दल नेहमीच बातम्या येत असतात. प्रभातकाळी रस्तॊरस्ती श्वानकृपेने दिसणाऱ्या सुगंधी सजावटीही आपल्याला परिचित आहेत. भटक्या कुत्र्यांना मारा म्हटले की श्वानप्रेमींना अगदी उचंबळून येते. त्यांच्या मदतीला कुठलासा कायदाही आहे म्हणे ! सर्वच गावांमध्ये मोकाट कुत्र्यांनी आणि श्वानप्रेमींनी लोकांचा छळवाद मांडला आहे.
मध्यंतरी भटक्या कुत्र्यांसाठी श्वानगृहे काढावीत असे कोर्टाने सुचवल्याचे वाचले होते. कुत्र्यांनाही ते समजले असावे, कारण आपल्याला असे काही मिळणार म्हणून त्यानीही जास्तच जोमाने लोकसंख्या वाढवल्याचे रस्त्यावर जाणवते.
एकिकडे वाघांना उपलब्ध असलेले क्षेत्र आक्रसत चालल्याने अन्नसमस्येवर मात करण्यासाठी तो गावात येतो असे सांगितले जाते. आता आपल्याला वाघ जगवायचा आहे, श्वानप्रेमींना व कायद्याला (लोकांना त्रास झाला तरी) भटकी कुत्री जगवायची आहेत व आपल्यालाही सुखाने जगण्याची इच्छा आहेच !
आता यावर माझा तोडगा पटतो का पहा.
आता साक्षात वाघाला द्यायला आपल्याकडे जागा नाही. उद्या भटकी गुरे, गाढवे, डुकरे आदींसाठी देखील आश्रयगृहांची तरतूद करावी लागेल. तेव्हां आत्ताच वाघ आणि भटकी कुत्री यांना एकाच अभयारण्यात भागवायला सांगायचे ! आता रस्त्यांवर वाघांचे पुनर्वसन करणे अशक्य ! तेव्हां भटक्या कुत्र्यांचेच जंगलात स्थलांतर करण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे? सध्याचा कायदा मारू देत नाही पण पुनर्वसन तर करू देईल? भटकी कुत्री पकडायची. श्वानप्रेमींना पुळका येईलच! त्यांना घरी पाळणार असतील तर परवाना काढायला लावून, कायदेशीर जबाबदारी घ्यायला लावायची. नुसता तोंडी पुळका नको. त्यांची तयारी नसेल तर भटकी कुत्री जंगलखात्याच्या मदतीने गर्द जंगलात सोडून द्यायची. तीही नव्या परिस्थितीतही जगण्याची धडपड करतीलच. भटक्या कुत्र्यांना जगण्याची एक संधि मिळेल व वाघालाही भक्ष्य मिळवायला शहरात यायला नको. वाघच कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणील. ज्या कुत्र्यांची नसबंदी श्वानप्रेमींकडून अद्याप झालेली नाही अशाना जंगलात जाण्याचा अग्रहक्क द्यावा.
नागरिकांनी पालिकांना दिलेला कर शहरातील आवश्यक नागरी सुविधा उत्तम स्थितीत ठेवाव्यात यासाठी दिलेला असतांना पालिकांनी कुत्र्यांच्या नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी खर्च काय म्हणून करावेत? यात कोणाचे हितसंबंध आहेत?

>>वाघालाही भक्ष्य मिळवायला शहरात यायला नको. वाघच कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणील.<<
अहो दामोदसुत, कुत्रा हे वाघाच अन्न नाही, किंव्हा वाघ खाण्यासाठी कुत्र्यांची शिकार करत नाही. तर शिकारीत आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून वाघ कुत्र्यांना ठार मारतो.

विजय,
मी तसे लिहिण्याचे कारण असे :
शहरात बिबटे आल्याच्या घटना मधून मधून घडतच असतात. अशावेळी ते शहरांमध्ये येण्याचे एक कारण तज्ञांकडून असे सांगितले जाते की जंगलांमध्ये भक्ष मिळणे कठीण झाले की वाघ कमजोर अशा कुत्र्यांना आणि जमले तर माणसांना खाण्यास प्रवृत्त होतो. आणि म्हणून तो शहरांपर्यंत पोचतो. अशा वेळि त्याची पहिली भेट कुत्र्यांशी होत असेल.

विजय_आंग्रे,

>> तर शिकारीत आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून वाघ कुत्र्यांना ठार मारतो.

अहो, तसं असेल तर फारंच छान! वाघोबा भूक नसली तरी कुत्र्यांना मारत सुटतील! Happy

आ.न.,
-गा.पै.

पैलवान साहेब,
वाघोबा भूक नसली तरी कुत्र्यांना मारत सुटतील!<< अस झालतर ठीकच, नाहीतर या सोडलेल्या कुत्र्यांमुळे वाघावरच उपाशी मरायची पाळी येईल.

सोडलेल्या कुत्र्यांमुळे वाघावरच उपाशी मरायची पाळी येईल.>>>> Lol
विषारी पेढे खायला घालुन नगरपालिकेनं बरीच कुत्री मारली होती आमच्याकडे जवळ जवळ २५ तरी नंतर सहा सात वर्षे निवांत झाला होता प्रभाग, ( बाकी जंगलाला कुत्री नकोच हे स्वगत )

विषारी पेढे खायला घालुन नगरपालिकेनं बरीच कुत्री मारली होती आमच्याकडे<<
अरेव्वा तुमच्याकडची कुत्री नशिबवान आहेत म्हणजे, पेढे ते पण विषारी! आमच्याकडे बिच्चार्‍यांना विषारी पावच (तो पण शिळा) खाऊन मरावे लागते. Sad

>>शिकारीत आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून वाघ कुत्र्यांना ठार मारतो<<
विजय,
गावठी कुत्री शिकारीत वाघाची प्रतिस्पर्धी होऊ शकतील? तसे होऊ शकणार नाही. त्यामुळे गावठी कुत्र्यांमुळे वाघाला उपाशी मरायची भीति वाटायचे कारण नाही. उलट इतर भक्ष मिळाले नाही तर भुकेला वाघ 'खाईन तर तुपाशी' असे करणार नाही. 'बुभुक्षितः किं न करोति पापम!' तो या कुत्र्यांनाच पोटात घालून सद्गति देईल.
वाघ संतुष्ट! कुत्र्यांना सद्गगति! आणि आपल्याला या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांपासून मुक्ति!
'थ्री इन वन!' साधेल.

>>या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास कोठे करता येईल?<<
दादाश्रींचा अनुभव लक्षात घेता यासाठी पालिकेला प्रसन्न करून घेणे हा एक मार्ग दिसतो.
पण निमिष,
इतक्या महत्वाच्या विषयाला तुम्ही इथे उपस्थित केलेत तरी किति थोड्या लोकांनी यावर कांही प्रतिसाद दिला. याचा अर्थ असा तर नव्हे कि मायबोलीकरांपैकी बहुतेक लोक श्वानप्रेमी आहेत? किंवा आपल्याला वाटतो तसा त्रास त्यांच्या वाट्याला येत नाही? आपण अल्पसंख्य आहोत हेच खरे!

कोणी काहीही करेल असे वाटत नाही. तेंव्हा आपण स्वत: खर्च करुन साउंड प्रुफ काचा बसवुन घ्याव्या आणि निवांत झोपावे... Proud