कसल्या दु:खाने सुचते हे गाणे

Submitted by सई केसकर on 26 March, 2012 - 15:08

दु:खाचे महाकवी ग्रेस यांचं नुकतंच निधन झालं. ही बातमी ऐकल्यावर माझं मन थेट 'ग्रेस' वाटेवर गेलं.
पहिल्यांदा ग्रेसचे शब्द कानावर पडले तेव्हा मी सहा वर्षांची होते. बाबाला निवडुंग या चित्रपटानी वेड लावलं होतं. त्यामुळे आमच्या घरात कायम 'तू तेव्हा तशी' नाहीतर 'घर थकलेले संन्यासी' ऐकू यायचं. ग्रेस माझ्या मोठं होण्याचा एक छोटासा भाग बनले.
अर्थात याचं पाहिलं श्रेय बाबाला आणि नंतर हृदयनाथ मंगेशकरांना. त्यांच्या चालींविना ग्रेस इतक्या लवकर माझ्या वाचण्यात आले नसते. आणि कदाचित या दोन व्यक्तींच्या अप्रत्यक्ष सहभागाविना कधीच आले नसते.
ग्रेसच्या कवितेतील मला लक्षात आलेलं पाहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्या कवितांमध्ये एखाद्या तरल भावनेचा सूर लावून वातावरण निर्माण करायची प्रचंड ताकद आहे. अर्थात जेव्हा अशा कवितांना हृदयनाथ शोभेशी चाल लावतात तेव्हा ऐकणार्‍यांचं काम कमी होतं.
जशी त्यांची 'वार्‍याने हलते रान' कविता.
त्यात एक ओळ आहे --

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ
दिव्यांची नगरी

त्या कवितेचं संपूर्ण सूरच ओढाळ आहे. ती ऐकल्यावर एखाद्या प्रचंड मोठ्या मळ्यात, तिन्ही सांजेला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली एकटं बसल्याची भावना मनात निर्माण होते. ग्रेसच्या कवितांनी मला फार लहान वयात वैराग्यातील सौंदर्‍याचा परिचय करून दिला. एकटेपणाचा, अलिप्तपणाचा आणि विरक्तीचा एक अतिशय मुलायम सूर असू शकतो याची जाणीव मला ग्रेसच्या सगळ्याच साहित्याने करून दिली. माझ्या बालपणीचं दुसरं दैवत म्हणजे पु.ल. देशपांडे. त्यांच्या लेखनात ग्रेसच्या लेखनात सापडणारे हे असे कमळाच्या पानावरील थेंबासारखे भाव, नेहमीच्या आयुष्यातून शोधून काढण्याची कला होती. पुलंचा नंदा प्रधान ग्रेसच्या कवितेतून बाहेर आलेल्या एखाद्या शापित गंधर्वासारखा भासतो. पण या दोन्ही कलाकारांची कला एकाच काळात वाचता आल्याबद्दल मला कुणाचे आभार मानावे असा प्रश्न पडतो कधी कधी.
बरेच वर्षं काहीही न समजता या कविता मी वाचल्या. आणि काही वर्षांपूर्वी अचानक एक एक कविता उमगू लागली. काही तशाच राहिल्या.
पण कवितेच्या अर्थापेक्षा सुंदरही कवितेत काय असू शकतं याची ओळख ग्रेसच्या काही कवितांमध्ये होते.

ही माझी प्रीत निराळी, संध्येचे श्यामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला, डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया, ओंजळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो, रतिरंगातील नि:संग
शपथेवर मज आवडती, गायींचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही, असणार कुठेतरी मूळ
आकाशभाकिते माझी, नक्षत्रकुळही दंग
देठास तोडतानाही, रडले न फुलाचे अंग!

ही सगळी कविता मला कशी पाठ झाली, का पाठ झाली आणि त्यातून मला काय अर्थबोध होतो हे मला अजूनही समजलेलं नाही. पण त्यांच्या कवितेतला प्रत्येक शब्द स्वत:चा कणा घेऊन येतो. त्याच्या अस्तित्वाला कवितेच्या आशयाची गरज नसते. आणि कधीतरी अचानक दोन विचारांच्या मधल्या रिकाम्या जागेत, कवितेला अर्थ फुटला, तरी तिची दिमाखदार शब्दसंपत्ती त्या अर्थापासून अलिप्त राहू शकते. ग्रेसची कविता अर्थासाठी नाहीच मुळी. आणि ती समजावून घेण्याचा आग्रहदेखील करत नाही. एखाद्या टपोर्‍या तजेलदार चांदणीसारखी ती स्वत:च्या शब्द सौंदर्‍यात मग्न आहे. तिच्याकडे आकर्षित होणारे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण तिच्यातून चांदण्यासारखे पसरलेले अगणिक अर्थ त्यांना अगदी लहान करून टाकतात. कदाचित तिच्या प्रेमात पडणार्‍या प्रत्येकाला ती वेगळी समजते. आणि मग त्यांच्या कवितेलाच जणू, "तू तेव्हा तशी" म्हणावसं वाटतं. कधी आपल्या आनंदी मनाचा ठाव घेत ती ऐल राधा बनते नाहीतर कधी चौफेर पसरलेल्या पाचोळ्यातून चालणारी पैल संध्या होते.

कधी कधी ती इतकी नाठाळ होते की ती ज्या वाटेवरून जाते तोच तिचा मार्ग हे मान्य करून शरणागती पत्करावी लागते. "नको ऐकूस बाई! तुला काय करायचंय ते कर" असं म्हणून सोडून दिलं तरी पुन्हा तिच्या मागून जावसं वाटतं. आणि असा बरोबर प्रवास केल्यावर कधीतरी, आपण हिच्याबरोबर चुकलोय की काय अशी भीती वाटू लागते. पण ती ज्या वाटेवर नेते, त्या वाटेवर हरवून जाण्यातदेखील खूप काही सापडल्याची भावना आहे.

अनुभवांच्या तोडमोडीला भिऊन, तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यासाठी पठडीचा आश्रय
मग प्रेषितांच्या व्याथासुत्रांचे काय?
शरणमंत्रांनी आणि मुल्ला मौलवींच्या पहाट गजरांनी आवाजाची दुनिया घटकाभर स्तब्ध होत असेल
पण ती हादरून जात नाही.
मंत्रांमागचे प्रेषितांचे अनुभव हेच खरे मार्गदर्शक असतात
पठडीबाज गुरूंच्या अश्रायानी मार्ग तर सापडत नाहीच, उलट दिशाभूल होत राहते
अशी दिशाभूल नाकारणे वा स्वीकारणे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न!
पण नाकारल्याशिवाय अस्तित्वाला हादरे बसत नाहीत, आणि हादरे बसल्याशिवाय काही नवनिर्माण होऊच शकत नाही
ही दु:खवैभवाची संपन्नता!

गौतम बुद्धाच्या प्रवासाचं वर्णन करणारी जरी ही कविता असली तरी ग्रेसच्या कवितेचाही प्रवास बुद्धाच्या प्रवासासारखाच होता. कुणा दुसर्‍याच्या अनुभवानी सिद्ध झालेल्या मार्गावरून ती गेली नाही. तिने स्वत:चा तयार केलेला मार्ग हा फक्त आणि फक्त ग्रेसच्या अनुभवांशी प्रामाणिक आहे. हा प्रामाणिकपणा त्यांच्या कवितेला एक वेगळंच लावण्य बहाल करतो.
ग्रेसच्या कवितेतून शिकायला मिळालेली अजून एक गोष्ट म्हणजे एखाद्या मानवी भावनेकडे चारी बाजूंनी बघायची तिची सवय. ग्रेसच्या काही कविता वाचून असं वाटतं की या कवितेच्या मूळ भावनेला पुन्हा पुन्हा उकळून तिचा अर्क काढला असावा. आणी मग तो अर्क असा लीलया इकडे तिकडे सुगंधासारखा विखरून टाकला असावा. मत्सरावर बोट ठेवणारी ही कविता माझ्या खजिन्यात कायमची कैद झाली आहे :

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफडाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्णकळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीकप्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी --राधा
हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

पुलंच्या गोष्टी वाचताना नेहमी असं वाटायचं की या अशा तरल भावना मला समजाव्यात म्हणून अंतू बर्वा नाहीतर नाथा कामत बनून आल्या आहेत. एखाद्या दिवशी देवानी सुट्टी घेऊन माणसाच्या रूपात यावं तसं पुलंचं साहित्य हसवता हसवता अचानक अंतर्मुख करून जायचं. पण ग्रेसची कविता समजण्यासाठी मात्र स्वत:च्या जडदेहातून थोडावेळ बाहेर पडून देवांच्या दुनियेत जावं लागायचं. अर्थात ते करण्यासाठी कष्ट करावे लागायचे यात वादच नाही. पण ग्रेस म्हणतात तसच:

काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळे.

त्यांच्या कवितेच्या चांदण्यात उजळून निघायचं असेल, तर जीवाला जाळणे अपरिहार्य आहे.

सखीच्या मुलीला कसे काय द्यावे
उन्हांतील हे भव्य शब्दांगण?
इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो
स्वतः सावलीचा मुका साजण...

त्यांची कविता कितीही गूढ असली, अगम्य असली तरी आपल्या सगळ्यांना ग्रेसनी त्यांचं हे भव्य शब्दांगण देऊ केलं आहे.
माझ्या मनाची कित्येक दारं उघडून दिल्याबद्दल मी ग्रेसची कायम ऋणी राहीन.

गुलमोहर: 

सई -
'हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे'- ह्या सुन्न करणाऱ्या क्षणात मन आक्रंदले.
पुलंचा नंदा प्रधान ग्रेसच्या कवितेतून बाहेर आलेल्या एखाद्या शापित गंधर्वासारखा भासतो.
हे मत आपण असे शब्द बद्ध केले आहे कि ग्रेस मानवी मनाचे दुखः किती ग्रेसफुली उलगडत याची अनुभूती येते.
सुन्न पणात खेचून नेणारी आदरांजली.

खूप छान लिहिलं आहेस सई. पं हृदयनाथांनी ग्रेस यांच्या कविता संगीतबद्ध केल्यामुळे त्या सर्व रसिकांपर्यंत पोहोचल्या. नाहीतर प्रस्थापितांनी त्यांच्या कवितांवर दुर्बोधतेचा शिक्का मारून टाकला होता!
त्यांच्या कवितांबद्दल खुद्द त्यांच्याकडून ऐकावं..असं वाटायचं नेहमी. पण आता...
''गेले घ्यायचे राहुनी'' असं म्हणायची वेळ आली! Sad

अतिशय सुंदर लिहिलं आहेस!

रेसच्या कवितांनी मला फार लहान वयात वैराग्यातील सौंदर्‍याचा परिचय करून दिला

ही सगळी कविता मला कशी पाठ झाली, का पाठ झाली आणी त्यातून मला काय अर्थबोध होतो हे मला अजूनही समजलेलं नाही. पण त्यांच्या कवितेतला प्रत्येक शब्द स्वत:चा कणा घेऊन येतो. त्याच्या अस्तित्वाला कवितेच्या आशयाची गरज नसते. आणी कधीतरी अचानक दोन विचारांच्या मधल्या रिकाम्या जागेत, कवितेला अर्थ फुटला, तरी तिची दिमाखदार शब्दसंपत्ती त्या अर्थापासून अलिप्त राहू शकते.

या वाक्यांशी पूर्णपणे सहमत!
इन फॅक्ट, त्या परिच्छेदाशीच सहमत...

ती सत्यभामेची कविता कित्त्ती सुंदर आहे!!

फार छान!

पुलं - पं. हृदयनाथांबद्दलचंही एकदम पटलं! काय कविता, आणि काय सुरेख चाली दिल्या आहेत हृदयनाथ मंगेशकरांनी!

सई, खालच्या ओळी आरती प्रभूंच्या आहेत, ग्रेस ह्यांच्या नव्हेत.
तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची'

बाकी लेख आवडला. Happy

>>आणि मग त्यांच्या कवितेलाच जणू, "तू तेव्हा तशी" म्हणावसं वाटतं

अगदी... ग्रेस "कळला नाही" असे आवर्जून म्हणणारे अनेक भेटले. ग्रेस "अनुभवला" असे म्हणणारा मात्र अजून भेटला नाहीये. आता त्यांच्या पश्चात "त्यांची ग्रेस" अनुभवली असे म्हणणारा तरी भेटेल ?

शैलजा +१

तू तेंव्हा तशी ही आरती प्रभुंची... बाकी लेख उत्तम! राजपुत्र आणि डार्लींग माझे सगळ्यात जास्त जवळाचे...

त्याच्या आयुश्य संदर्भातून आलेले त्याचे प्रत्येक शब्द. पहिल्यांदा त्या आयुश्य संदर्भांना शोधायचा अट्टाहास, कोडे सोड्वण्यासाठी कवीता समोर मांडुन केलेले प्रयत्न आणि मग थकून माझ्या आयुश्यावर तेच शब्द ओढुन घेताना नकळत पणे ते शब्द झेलायला उभे राहिलेले माझ्या अयुश्याचे संदर्भ... ह्या प्रावासात पुन्हा पुन्हा भेटली ती ग्रेसची कवीता ... आता ती त्याची उरली नव्हती माझ्याशी माझ्या अभिव्यक्तीची ती प्रेरणा स्त्रोत झाली होती.

मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल...

ह्या मागच्या व्यथासुत्रांवर पावले टाकत जीवदमवणारा प्रवास कधी सुरु झाला हे समजले देखील नाही.
तो गेला आणि मला का कुणास ठावूक खालच्या ओळी आठवल्या...

बाहुलीचे न्हाण कधी खरे मानु नये...
साडि चोळी आपली ग सांभाळावी बये...

अंबारीचा हत्ती नसे अंबारीचा स्वामी
लक्श्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी...

सई किती छान व्यक्त झाली आहेस तू !
मला पुन्हा ते घर थकले संन्यासी चे दिवस आठवले ! ग्रेस ने वेडावून टाकलेले. तेव्हा अस वाटल नव्हत कि छोटीशी मुलगी पुढे ग्रेस ची एवढी चाहती होईल. मला खर आश्चर्य वाट्ल होत जेव्हा तू दहावी बारावी मधे ' चंद्र माधवीच्या प्रदेशात' मन लावून वाचल होतस. या वयात तूझी हि आवड खरच थक्क करणारी होती.

तू ग्रेस ना वाहिलेल्या आदरांजलीतून त्यांच्या बद्दल तुला वाटणारे प्रेम्,आदर व तूझ्या आयुष्यात आणलेले शब्दांपलिकडचे तरल क्षण ,भावभावनांचे कल्लोळ प्रतित होतात.

सई ग्रेसनी दु:खाला देखील ख-या अर्थाने 'ग्रेस'फूल केल.
सुख सगळेच जगतात पण ग्रेस नी आपल्याला दु:ख देखील जगायला शिकवल.

जात जाता तुझ्या आदरांजलीत अनअवधानाने आरती प्रभू डोकावले पण खर तर दोघांच्या कवितांची जातकूळी
सारखीच आहे.दु:खाचा तरलतेने घेतलेला शोध हे दोघांचही वैशिष्ठ्य होत.

शैलजा, पेशवा

धन्यवाद दाखवून दिल्याबद्द्ल. माझा नेहमी ग्रेस आणि आरती प्रभूंमध्ये घोळ होतो.
चूक दुरुस्त केली आहे.

धन्यवाद!

सई, तुझी विषयातली समज दिसते या लेखातून..उत्कृष्ट मांडणी...पु.ल.देशपांडेंचा उल्लेख पण आवडला.....(कदाचित ते आवडतात म्हणूनही असेल)
ग्रेस हा शब्दही न कळलेल्यातली मी असेन पण निवडुंगमधली गाणी ऐकल्यानंतर या कवीचं वेगळेपण अर्थातच जाणवलं होतं...इतक्यात त्यांचं काही ऐकायला सुरूवात केली होती आणि ही बातमी त्यामुळे जरा थोडं कानकोंडं की काय......

अवांतर...आता सगळे "आणि" तपासलेस का???....:)

Pages