कधी रे येशील तू...

Submitted by तात्या अभ्यंकर on 20 March, 2012 - 11:01

कधी रे येशील तू... (येथे ऐका)

ओघवती प्रवाही चाल - मुखडा आणि पहिला अंतरा यमन मध्ये..

दुसरा अंतरा - 'शारद शोभा..' केदार मध्ये, परंतु हा अंतरा पूर्ण करताना 'अंतरीचे हेतू..' या शब्दावरून उकारान्ती तान घेऊन पुन्हा यमनमध्ये बेमालूम प्रवेश....

'हेमन्ती तर नुरली हिरवळ,
शिशीर करी या शरीरा दुर्बळ..'

अद्भुत सोहोनी आणि त्यानंतर शिशिरात ठेवलेला कोमल धैवत..!

'पुन्हा वसंती डोलू लागे..' मधून डोकावणारा बसंत..
आणि 'प्रेमांकित केतू..' वरून पुन्हा अगदी सहज पकडलेला यमनचा मुखडा..!

'पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली... - ग्रीष्मातल्या त्या काहिलीला
शांत करायला आलेला मल्हार..!
'पुनश्च वर्षा लागे अमृत..'- हा अगदी सार्‍या आसमंतात बरसणारा मल्हार..
आणि पुन्हा 'विरहावर ओतू..' मधून राजश्री राजमान्य यमन..!

देवा...! किती कठीण गाणं बांधून ठेवलंय बाबूजींनी..
परंतु ऐकायला मात्र तितकंच गोड आणि अवीट..

ध्वनिमुद्रण सुरू असताना खुद्द बाबूजी उपस्थित आहेत..
परंतु आशा भोसले नावाच्या बहाद्दर बयेने 'कसं येत नाय ते बघतेच..!'
असं म्हणून अगदी पदर खोचून बाबूजींचं ते अवघड शिवधनुष्य
लीलया पेललं आहे..! आणि गाणं संपल्यानंतरचं बाबूजींच्या
चेहेर्‍यावरील समाधान आणि कौतुक..! Happy

याला म्हणतात गाणं, याला म्हणतात प्रतिभा..!

-- तात्या अभ्यंकर.

गुलमोहर: 

Happy

बाबूजींचं ते अवघड शिवधनुष्य
लीलया पेललं आहे..! >> अगदी!
माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक Happy

छान

तात्या, धन्यवाद!

मला यातीलच "हृदयी प्रीत जागते..." हे जास्त आवडते, पण हे गाणे सुंदर आहेच. "धरेस भिजवून गेल्या धारा, फुलूनी जाईचा सुके फुलोरा..." वगैरे कडव्यांची सुरूवातच पकड घेते एकदम. पूर्ण वर्षाचे वर्णन नायिका वाट बघत असताना गदिमांनी मस्त रचले आहे.

लहानपणीपासून असंख्य वेळा ऐकलेली गाणी आहेत ही, अजूनही गोडी तशीच आहे!

ही मूळ गाण्याची लिंक, वरच्या लिन्क्मधले ही चांगले असले तरी मूळ ऐकण्याची मजा वेगळीच आहे.
http://www.youtube.com/watch?v=00eMksT4tPQ&feature=related

गदिमांनी "नभधरणीसी जोडून गेले, सप्तरंग सेतू" असे जे वर्णन केले आहे, ते इंद्रधनुष्याबद्दल असेल ना? जबरी शब्दरचना आहे.

माझ्या अति आवडत्या गाण्यापैकी एक! कितीवेळा ऐकले तरी समाधान होत नाही.
<<<येथे ऐका वर टीचकी मारून जे यू ट्यूब वर गेले ते तासभर तिथेच होते>>> अवनी अगदि अगदि...........

सर्व प्रतिसादी रसिकांचे मनापासून आभार.. आणि सर्व माबोकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.. Happy

तात्या.

सुंदर ओळख, आशाने त्या काळात अशी अनेक शिवधनुष्यं पेलली होती.

कंठातच रुतल्या ताना..
दे कंठ कोकीळे मला..
पैठणी बिलगून म्हणते मला..
देव नाही झोपलेला..
सखी गं मुरली मोहन..
कोकीळा गा..
आज कुणीतरी यावे..
बाई गं माझ्या पायाला बांधलाय भोवरा..
येणार नाथ आता..