घरखुळ (भाग ३: चलो पुणे)

Submitted by योग on 20 May, 2008 - 18:00

बार बार हा.. बोलो यार हा...
अपनी जीत हो... उनकी हार हो...

गाडीत लगान ची गाणी बरेच दिवसानी लागली होती. लगान च्या या गाण्याच्या तालावर रेहमानच्या बीट शी स्पर्धा लागल्यागत आमची गाडी सुसाट मुम्बई-पुणे एक्सप्रेसवे वरून जात होती. या गाण्याच्या शेवटच्या दोन ओळी मात्र मला
कोई हमसे जीत ना पावे "पुणे चलो पुणे चलो"
एका बढता ही जाये "पुणे चलो पुणे चलो"
अशा ऐकू येत होत्या.. त्या धुन्दीत खर तर पुणे कधी आले हे कळले नसते पण या खेपेला गाडी जशी पुण्या जवळ येवू लागली तस तसे सृष्टीतील अनेक बदल प्रकर्शाने जाणवत होते.

पूर्वी चिंचवड, पिम्परी पासून पुणे येईपर्यन्त काही भाग कसा नेमेची येतो ओसाडा असल्यागत खिन्न असयाचा त्याच्या जागी आता या भल्या मोठ्या इमारती. इथेही गगन भरार्‍या घेणार्‍या सन्कुलान्ची आपापसात स्पर्धा दिसत होती. पुढे जे भाग अजूनही वैराण होते तिथे मात्र अक्षरशा प्रत्त्येक इन्चा इन्चावर नविन सन्कुलान्च्या मोठ मोठ्या पाट्या: 2bhk, 3bhk Luxury homes, Row houses, Penthouses, shopping arcade, mall, अत्त्याधुनिक सोयी, सुविधा, टॉवर्स..
गम्मत म्हणजे प्रत्त्येक पाटीखाली हिरवेगार शेतजमिनी...जवळ जवळ प्रत्त्येक पाटीवर वेग वेगळ्या बिल्डर्स ची नावे (बरीचशी आजतागायत न ऐकलेली)..
अशा बार्‍याच पाट्यान्खाली गायी, म्हशी, शेवटची इच्छा पुरवल्यागत भरा भरा चरून घेत होत्या. डोक्यावर Seven Heavens ची भली मोठी पाटी, बाजूला बिल्डरने बान्धलेल कुम्पण, पायाखाली उरली सुरली हिरवी जमिन अन त्यावर डोळ्यात प्राण आणून चरणारी म्हैस.. मला वाटत हा नजारा या पुण्यनगरीच्या पुढच्या आधुनिकीकरणाची साक्ष देत होता.
Row Houses, अलिशान बन्गलोस, या अशा पाट्या पुणे यायच्या फार फार आधीच येवून गेल्या अन जस जस शहर जवळ आल तस तस फक्त X, Y,Z Towers च्या पाट्या दिसू लागल्या. एकन्दरीत पुढे काय वाढून ठेवले आहे याची थोडी कल्पना आलीच होती. इथे उमेश बरोबर नव्हता अन जीवाची ही घर-घर मला एकट्यानेच सोसायची होती.
गाडी एक्सप्रेसवे वरून चान्दणी चौकातून गावात येवू लागली अन सायकल रिक्शा याना "चुकवत" अन खास पुण्यातल्या trafic signals ना चकवत छोटे मोठे वळसे घेत डहाणूकर मधिल गल्ली क्रमान्क xx च्या तोन्डाशी येवून थाम्बली.

"का रे आत घे ना गेट्पर्यंत" मी ड्रायवर ला म्हटले.. नाई वो जायची नाही ना पुढे, ते बघा SUV कशी उभी केलीये, रस्ताच नाही जायला.

तिकडे गावात भटान्च्या बोळात, मुन्जाबाच्या बोळात अशा SUV अडकून पडल्याच बहिणीकडून आधी ऐकल होत..तेव्हा फार आश्चर्य वाटल होत. कारण मुम्बईत अडकून पडते ती फक्त लोकल ट्रेन तेही पावसात पाणी तुम्बले किव्वा ओव्हररहेड वायर तुटली वगैरे अशा कारणाने.
तेव्हा नसती झंजट नको म्हणून म्हटल "जाऊदे, इथच बाजूला लाव", अन एक ब्याग हातात धरून सरळ तीच्या गेटाचा रस्ता धरला.

वेड्या बहिणीची वेडी माया.. त्यातूनही बहीण सध्ध्या पुण्यात असली तरी मूळची मुम्बईची..मग मस्त यथेच्च छान पाहुणचार घेवून एक डुलकी काढली. मग तीने मि येणार आहे म्हटल्यावर ओळखीच्या दोन इस्टेट एजन्ट चे नम्बर घेवून ठेवले होते, शिवाय काही जागाही विचारून घेतल्या होत्या त्याची माहिती दिली.
" हे बघ "तुला आवडतील" अशी घर, सन्कुल इथे तरी कमी आहेत.. बावधन, बाणेर, अशी "ब"कारार्थी नावे तीने पुढे केल्यावर मग मी शक्य तितक्या नम्रतेने तिला विचारले "पुण्याचा map आहे का"?
त्यावर पहिल्यान्दा तीने मला खास पुणेरी कटाक्श अन उत्तर दिले.. मी गूपचूप नेट वर बसून map काढला आणि "ब" पासून माझी बेअरिन्ग्स तपासून बघू लागलो.

"बापरे! केव्हडे पसरलेय आता पुणे" या माझ्या अतीउत्सुकतापूर्ण वाक्यावर तीने "उद्या बघशीलच"! असा फक्त एकच बंजी जम्पीन्ग सारखा भर्रकन खाली आणणारा उसासा सोडला.. त्यातला उपरोध कळण्याइतका मि पुणेकर अजून झालो नव्हतो.
उद्या किती वाजता बोलावू धान्डे बाईन्ना? त्या आमच्या ओळखीच्या एजंट आहेत.. त्या तुला घेवून जातील जागा बघायला.
बरोब्बर सकाळी आठ ला बोलाव म्हणजे दिवसभर फिरता येईल्..मि म्हटले. (मला घाई होती अन दिवस कमी होते..)
"नऊला बोलावते, येतील त्या, आठ खूप लवकर होईल".. पुन्हा एकदा बहिणीने एक पुणेरी सूचनावजा सल्ला दिला.

ठीके म्हणून मि सकाळ, अन दुसर्‍या एका वर्तमान पत्रात जागेसंबन्धी जाहिराती वाचू लागलो.. मुख्ख्य पेपरपेक्षा नविन जागा, सन्कुलान्सम्बन्धी जाहिराती असलेल्या पुरवण्या अधिक. एक एक जाहिराती बघून हे "घरखुळ", अन टॉवर चे लोण इथेही पसरले आहे याची पूरेपूर खात्री पटली. मला अपेक्षित असलेल्या बंगल्यान्च्या जाहिराती मात्र फारच कमी होत्या. असेना का म्हटले उद्या सुरुवात तर करुया..
काही काही बिल्डर्सची नावे बघून तिकडे जायचे धाडस होईना.. "दरोडे-क्ष", "दरोडे-वाय".
तर काहीन्ची नावे मुद्दामून वाचत होतो: जोशी, परान्जपे, बाळ...
थोडक्यात या पुण्यनगरीत स्पर्धा आपल्याच लोकान्मधे आहे हे कळत होते.
गम्मत म्हणजे डहाणूकरच्याच बारा गल्ल्यान्मधील किमान बारा घरे/जागा विकणे आहे च्या जाहिराती मिळाल्या अन किमती पण फार नव्हत्या म्हणजे प्रशस्त ३,४/BHK अगदी २० पासून ते ४० लाख पर्यन्त उपलब्ध होते. इतरही नविन घरान्च्या जाहिराती बघितल्या त्यावरून मुम्बई, पुण्याच्या किमतीत अजूनही खूप मोठा फरक आहे हे जाणवले.

रात्री धान्डे बाईन्ना फोन केला. उद्या नऊला या म्हटल. त्यावर एका typical मराठमोळ्या aacent मधे "होss होss.. येते कीss.. गेटाशी आले की मिस्स्ड कॉल देतेss" म्हणून त्यान्नी फोन ठेवला.
हे मिस्स्ड कॉल प्रकरण भारी आवडल. फुकटात पहिल्याच झटक्यात हमखास सन्देश पोचवणार!! बिचारे बाजीप्रभू, छत्रपती गडावर पोचले तरी एकवीस मिस्स्ड कॉल झडेपर्यंत लढत राहीले..
अरे बारामतीच्या आहेत त्या..बहिणीने माहिती पुरवली.

मि सकाळी मस्त चहा नाश्ता करून आवरून बसलो.. साडे नऊ झाले तरी काही पत्ता नाही फोन नाही.. म्हटले बाईमाणूस आहे, घरचं आवरून यायला वेळ लागेल, अजून पाच मिनिटे थाम्बू. दहा वाजायला आले तशी माझी चरफड वाढली. अरे वेळेच काही भान आहे की नाही..?

"अरे बाबा हे पुणे आहे"... मुम्बई नव्हे..." बहिणीचे नाटकात अजूनही वाजते तशी warning bells वाजवणे चालूच होते.

सव्वादहाला फोन वाजला.. "हा कोन जोशी नाsss जरा उशीर झालाय निघायला.. ते धान्डे साहेबss (म्हणजे यान्चे मिस्टर) आत्ताच पूजा करून निघलेत..(त्याचा इथे काय सम्बन्ध? मी मनात) आता मी आवरून निघतेयss.. खाली आले गेटाशी की मिस्स्ड कॉल देतेss..
ok, bye, भेटूया वगैरे काही नाही, मोजून शब्द टाईप केल्यासारख फोन थेट बन्द!

शेवटी अकराच्या सुमारास आमची गेट-भेट झाली. sorry हा जराss (?) उशीर झाला..ते रोजची पूजा केल्याशिवाय साहेब निघतच नाहीत घरातून..पन तुमी काळजी करू नकाss, तस इथ अकराss शिवाय साईट वर येतच नाही कुनी..
ऑ! (मि)
बर या मागनंss..म्हणत बदकाने तळ्यात पाय मारावेत तसे ती बजाज डुगूडुगू पुढे घेत त्या निघाल्या सुद्धा..
धान्डे बाई पुढ बजाजवर अन मागं मि रीक्षातून.. अस पुढ बजाज ला बान्धून टो केल्यागत रीक्षा चालवायच त्या रीक्षाचालकाला काही खास आवडल नव्हत हे त्याच्या व रीक्षाच्या एकन्दर वागण्यावरून लक्षात येत होत. अशी आमची वरात निघाली.
एका इमारतीपाशी थाम्बलो तेव्हा अजून चार जोडपी उभी होती. "पार्टी आलेली आहेss" बाइन्नी मोबाईलवरून सन्देश दिला अन आम्हा सर्वाना घेवून गेल्या. हे अस गटागटाने जागा बघायच म्हणजे मला शालेय शैक्षणीक सहलीची आठवण झाली. बाईन्च्या मागं मागं एका दालनातून दुसर्‍या दालनात्..इतकी माणस एकाच खोलीत उभी राहिल्यावर जागेचा अन्दाज येणार कसा..?
एकन्दरीत पहिल्या दोन तीन ठिकाणी हे अस झाल्यावर मग मात्र बाईन्नी त्यान्च्या बजाज ला बदकीक मारायच्या आधीच मि सान्गून टाकल.. "हे बघा मला एकट्याला जरा चान्गल्या जागा दाखवा ना.. मि चारच दिवस इथे आहे"
"बरं..मग फिक्स करूनच जाणार न?" बाइन्नी एक मिल्लियन डॉलर प्रश्ण टाकला..
"नाही म्हणजे तुम्हाला एकट्याला फिरवायचss तर बाकी कश्टमर ना सोडून द्याव लागत ना..ss" अगदी थेट डोळ्यात डोळे घालून त्यानी म्हटल.
इश्श!(मि मनात...)
"हो हो फिक्स करूनच जाणार.." मि.
(मागे फार वर्षापुर्वी एकदा एका स्थळे पहात असलेल्या वधू-मुलीच्या आईने विचारल होत.."आलाच आहात तिकडून तर लग्न करूनच जाणार न?".. मुलगी अजून कांदे पोहे घेवून बाहेर देखिल आली नव्हती!! त्यावेळी पुणेकरांच्या अशा "थेट चौकशीचा" पहिला अनुभव घेतला होता. आज बरेच वर्षानी पुन्हा त्याची आठवण झाली.)
एकन्दरीत दाखवलेली सन्कुले मला काही आवडलेली नाहीत हे त्यान्च्या लक्षात आल.
"कशा प्रकारच बघायचय तुम्हालाss..? 2BHK/३BHK? कितीपर्यंत बजेट आहे.ss? जरा हायर क्लास च चालेल का...?" बाईन्नी आता मुद्द्याला हात घातला.
"तू NRI वगैरे काही बोलू नकोस रे.. मुंबईतच असतो सांग, नाहीतर जास्ती कमिशन काढायच बघतील्"..बहिणीने आधीच कानमंत्र दिला होता. पण माझ्या requirements सांगण भाग होत..
अस बघा, जरा महाग चालेल्..पण एकदम टापटीप, सर्व आधुनिक सोयी हव्यात.. चान्गला नावाचा बिल्डर हवा अन टॉवर असेल तर वरचाच मजला हवा".. मि शक्य तितकी माझी हुकुमाची पानं लपवत पत्ते मान्डले.
मग पुन्हा एकदा आमची अत्त्याधुनिक टॉवर सन्कुलान्ची फेरी सुरू झाली..

पुण्यात एकन्दरीत लक्षात आलेल्या गोष्टी अन अनुभाव फार वेगळे होते:
१. बिल्डर च नाव अन इमारत कितीही मोठी असली तरी बरेच वेळा साईट ऑफिस म्हणजे फार तर गुरख्याला बान्धून दिलेली, व्यवस्थित चुना रंग लावलेली जागा होती.
२. मागितल्याशिवाय brochurs/pamphlates द्यायची नाहीत अशी एक "हुकूमावरून" पाटी असल्यागत व्यवहार होत होता..
३. मुम्बईहून आलो आहे हे सान्गितल्यावर किमान माठातले पाणी, बसायला खुर्ची अन बरोबरीने एक साईट इन्जीनीयर दिला जात होता, अन्यथा एखादा म्हाताराबुवा घर उघडून देई अन "आता तुमच तुम्ही बघा" म्हणून पसार होत असे. पुन्हा यापेक्षा त्या दुसर्‍या ईमारतीतील मोठ घर दाखवा म्हटल तर "आता परत हाफिसातून चावी आणायला पाहिजे म्हणून गुल होत असत्..अन चावी घेवून मग दुसराच कोण तरी बारक्या उगवत असे.
४. एकन्दरीत customer service च्या नावाने भयानक उदासिनता.. इमारतीचे बान्धकाम, मटेरीयल, बद्दल आवर्जून माहिती देणारे अगदी दहात एक. घरान्ना भरपूर मागणी, भरपूर कस्टमर अन बिल्डर्सची चलती असल्याने असे होते का हाच स्थाई स्वभाव, याच नेमक उत्तर सापडत नव्हत.
५. काही बाबतीत मुम्बैपेक्षा जास्त options मिळत होते. जसे जवळ जवळ प्रत्त्येक ठिकाणी (अजूनही) सिलिंग फॅन्स.. लिवींग रूम, बेडरूम सर्वाला लागून हमखास बाल्कनी.. मोठे किचन (हे अगदी फक्त पुण्यात पहायला मिळाल).. "चोवीस तास पाणी अन ईन्वर्टर" हे सगळिकडे आवर्जून सान्गितल जात होत.
६. तर काही बाबतीत अगदीच चालढकल, जसे amenities, club room, gardens याचि अपूरी सोय, सेक्युरिटी चा अभाव वगैरे..

एव्हाना वाहतुक, वर्दळ, बाजूची अस्वच्छता असे इतर मुद्दे मी कधीच बाजूला ठेवले होते..कारण कुठेही गेलो तरी ते सम्पणार नव्हते.
तरिही इथेही मनासारखे काही जमेना.. जिथे साईट इन्जिनियर भेटायची मारामार तिथे मेन बिल्डर्-मालकाशी भेटून काय बोलणी करणार? पुन्हा काही जास्त टेक्निकल वा इतर प्रश्ण असतील तर, "हे साहेबान्चे कार्ड घ्या, फोन करून ऑफिस मधे विचारू शकता" इतक सुकी भेळ तोन्डाला पुसल्यागत उत्तर!

बाईन्नी मला क्ष्-पाटील, य-पाटील अशा बर्‍याच त्यान्च्या "खास" ओळखीच्या बिल्डर्स साईट वर नेल. इथे पुण्यातही जवळ जवळ सर्व नविन घरे, बान्धकामे आधीच बूक झालेली होती..एक दोन वर्षानन्तर पझेशन मिळेल अशा जागा शिल्लक होत्या.

पण मि काय म्हनतेsss... तुम्हाला टेरेस फ्लॅटच का हवाss... तिसर्‍या चौथ्या मजल्यावर नाही का चालणारss...?

यावर तस तान्त्रिक उत्तर माझ्याकडे नव्हत.. प्रत्त्येक शहराचा अन तेथिल माणसान्चा असा एक दृष्टीकोन असतो, मुंबईत तरी चौथ्या मजल्यावरून टॉवर मधे जाणे हा दॄष्टीकोन आहे. अन अर्थातच मुम्बईतील गर्दी अन टॉवर्सची गिचमीड बघता, भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा पाहिजे तर वरचे दोन मजले किव्वा टेरेस फ्लॅट शिवाय पर्याय नाही. कदाचित पुण्यात वाड्यातून सन्कुलात जाणे हा दृष्टीकोन असावा असे मला वाटले.

"तस काही नाही, पण टॉवर ची मजा वरच्या मजल्यान्वर नाही का..?" असे मि उलट त्याना ऐकवले.

दुपारचे चार वाजले तशी धान्डे बाईन्नी pack-up चा मिस्स्ड कॉल दिला.."इथ चार नन्तर कुणी भेटत नाही साईटवर. हे बघाss मला तुमची आवड लक्षात आलीयेss
आज रात्री साहेबान्शी (मिस्टर धान्डे) बोलून घेते...पाहिजे तर उद्या ते येतील" असा मला गेट वर सोडताना त्यानी निरोप घेतला.
बाकी काही म्हणा बाई या व्यवसायात चांगल्याच मुरल्या होत्या हे पहिल्याच दिवशी जाणवल. प्रत्त्येक बिल्डरच्या साईट वर त्यान्ना Open Access होता त्यात त्यान्च्या "लक्षणीय" पोशाखाचा मोठा वाटा होता. शिवाय ते गोड गोल बोलत, थेट काळाजाला हात घालणार्‍या नजरेतून, "तेव्हडा फ्लॅट दाखवा कीss" अशी साईट वरल्या पोरापासून म्हातार्‍यापर्यंत विनंती करण, एकीकडे मला घर दाखवताना दुसरीकडे "अत्ता एका पार्टीबरोबर आहे.. उद्या तुमची पार्टी घेवून या.. कालच्या पार्टीला बूक करायचाय.. साहेबान्शी (बिल्डर्-मालक) सकाळीच आम्चे साहेब (मिस्टर धान्डे) बोललेत.." अस फोन वरून बाकी इतर कश्ट्मर मॅनेज करण चालू होत..

"काय कशी वाट्ली घर?"... बहिणीने रात्री जेवताना अख्ख्या दिवसाची कहाणी ऐकून घेतली.
"उद्या त्या साने एजन्ट ला बोलवून बघू.. जरा आपल्यातले बिल्डर्स दाखवले तर बरे होईल..." मि एक अन्धारातही सूर्यकिरणे शोधत होतो.

साने महाशय तर अशक्य निघाले. सकाळी नऊ ला येतो सान्गून दहा ला हजर. मला लुनावर मागे बसवून निघाले तेव्हा "पेट्रोल संपत आले आहे" याची जाणीव झाली..मग अर्धा तास पेट्रोल च्या रान्गेत.. पुढे अर्धा दिवस जागा कमी अन पुणे दर्शन जास्त झाले. एकतर सर्व जागान्चे नीत पत्ते माहीत नाहीत्..त्यात पानवाल्याला विचारल की "ते काय तिथ शिवाजी पुतळ्यापाशी.. किव्वा ते काय जवळच यशवन्त नाट्यगृहाच्या मागे..किव्वा ते काय तिथच वनाज च्या जवळ्..किव्वा हे इथ नळ स्टॉप च्या मागे..किव्वा महात्मा मधे दहावी इमारत..किव्वा मेहेन्दळे गॅरेज च्या जवळ विचारा कुणिपण सान्गेल..किव्वा किर्लोसकरच्या मागे.. किव्वा जंगली महाराजवर.. किव्वा भिडे ब्लड बॅंन्केच्या लागून दुसर्‍या गल्लीत..." अशा खास पुणेरी डायरेक्शन्स मिळाल्यावर आत्ता "इथ जवळ" वाटणारं "मग तिथ होत" अस करत करत मला त्या लुनावरून डहाणूकर पासून, कोथरूड, महात्मा, वनाज, सदाशिव, वैकुन्ठ, वनाज, पर्वती अशी एक पुणे दर्शन सहल सान्यान्नी घडवली. एका ठिकाणी तर चक्क चढावर लुना आम्हाला घेवून चढेना म्हणून साने पुढ लुनावर अन मि मागून फारतर लन्गडणार्‍या पि टी ऊषागत धावत अशा जागा आम्ही पालथ्या घातल्या..
पहिल्या वेळी अशी चढावर लुना नुसतीच वाळूत अडकल्यागत गुरगुरत राहिली तेव्हा सान्यानी अगदी गयवाया करून मला विनंन्ती केली.." प्लिज जरा उतरता का?" तेव्हड्यावर नाही चालल तर "sorry ह पण जरा धक्का मारावा लागेल"..पुढे पुढे तर केवळ चढावर कसरत नको म्हणून दोन तीन घरान्च्या जवळ जावून मी सान्यान्ना लुना परत फिरवायला लावली. त्यात पुन्हा माझ्या requirements ना अनुसरून जेमतेम दोन घरे बघितली.

दिवसभर काहीच मनासारखे न बघायला मिळाल्याने अन नुसतीच लुनापीट झाल्याने मी कावलो होतो...अन माझ्ञा बहिणीचे चान्गल्या ओळखीचे अन त्यातून मुम्बईहून आलेले तरी कश्ट्मर नाराज आहे हे पाहून साने अगदीच हिरमुसलेले..
"sorry ह..मलाच वाईत वाटतय.. तुमचा खूप वेळ गेला.. पण मी डहाणुकर अन कोथरूड पेक्षा जास्त बाहेर् जातच नाही हो त्यामूळे जागा शोधण्यात फार गोन्धळ झाला.. उद्या मि इथलीच घरान्ची माहिती घेवून येवू का..? नविन बान्धकाम नसले तरी डहाणुकर मधेच तुम्हाला बरेच resale चे मिळतील.. अगदी पाच दहा लाख टाकून छान रिनोवेशन केलत तर तुमच्या मनात आहे तस घर होवून जाईल.." सान्यान्नी माफी, विनन्ती, धन्दा, श्रम, घाम आणि कळकळ सार एकाच दमात अस माझ्यापूढे बदाबदा ओतल.. एव्हाना मला अजीर्ण झाल होत.
खर तर त्यान्च्या पहिल्याच वाक्यापासून प्रत्त्येक मुद्द्यावर त्यान्ना दातोठ खात चिरावे अशी इच्छा होत होती पण एकन्दरीत दिवसभराची भटकन्ती, बहीणिशी त्यान्ची ओळख, अन मनासारख होत नसल्याने आलेल फ्रस्ट्रेशन या सर्वामूळे मी काहीच बोलायच्या स्थितीत नव्हतो.
"जाऊ दे हो.. खूप प्रयत्न केले आपण" अस म्हणून चहा चिवड्यावर त्यान्ची पाठवण केली..

एक मात्र नक्की, धान्डे बाईन्मागे रिक्षाने अन सान्यान्बरोबर लुनावर पुणे पालथे घालताना एकन्दरीत भाग, विभाग, रहाणीमान, कुठे काय चान्गले वाईट आहे, काय काय जवळ available आहे याचा एक चान्गला आराखडा मनात पक्का बसला.

आता नक्की काय हवे आहे, कुठे हवे आहे, कसे मिळणार आहे, अन कितपत किमतीत याचा चान्गला अन्दाज आला होता. म्हणजे गडावर जायच्या बर्‍याच वाटा दिसल्या होत्या, माहित झाल्या होत्या, एक चढाई काय ती शिल्लक होती. माझ्या या धान्दलीत दिनदर्शिका अन घड्याळ वेगाने पळत होते याचा विसर पडला.. हाती फक्त दोन दिवस उरले होते अन अजून बरच काही करायच शिल्लक होत.

(क्रमशा:)

गुलमोहर: 

योग, जबरी म्हणजे जबरी लिहितोयस. प्रचंड आवडून गेलय हे 'घरखुळ', नावापासूनच सुरूवात आहे...! पुढल्या भागाची वाट बघते.

नक्की! जमेल तस लवकर पूरं करतो..मोठ रामायण आहे..:)

छान आहे. या सगळ्यातून एकदा गेल्यामूळे मजा येतीये वाचायला. 'घरखूळ' नाव सुद्धा छान आहे.

पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.. (यातच सगळं आलं ना?? :))

अरे, हे आख्यान फर्मासच लावलं आहेस.

  • *** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***

योग, सुरेख लिहितो आहेस... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत..

अरे हे काय्.......अजूनही क्रमशःच....... मज्जा येतीये वाचायला.......लवकर लिहून पूर्ण कर तु़झं हे नवं खूळ Wink

मझा आ रहा है यार. मस्त लिखेला है.. Happy
- अनिलभाई

सुंदर, मस्तच चाललय. वाट बघतेय पुढच्या भागांची. घरखुळ अगदी बरोब्बर नाव सुचलय खरं.

चांगल सुरु आहे लिखाण.
वाचतोय मी. Happy
बदकीक, घरखुळ, लुना पीट Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

मस्त लिहीतोयस. मीही असाच २००४ मध्ये पाच दिवसात घर घेउन आलो तिकडुन. ती सर्व पिटपिट आठवली.

मला ना जयावीच्या उलट वाटतय, की हे संपूच नये.. कसलं मस्त लिहीलय !! मनासारखी जागा मिळणं खरच दिव्य आहे.. आम्हाला नशिबाने अगदी २ दिवसात मस्त फ्लॅट मिळाला होता, पण नवर्याची त्याआधी चाललेली अशीच गडबड आठवली.. लवकर लवकर लिहा!

(नाव, आणि काही उपमा अल्टीमेट आहेत!!)