विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?

Submitted by शशिकांत ओक on 21 February, 2012 - 13:55

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो,
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहेत? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.
भूमिका

मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835

अर्थ – मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याप्रमाणे एकटी (अध्यात्मज्ञानाची) दृष्टी नसेल तर इतर (पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची) दृष्टी असून काय उपयोग? (ते लोक आंधळेच असतात)
काही महत्वाचे संदर्भ –
“सारख्याच दिसणाऱ्या समान तीन बालकांच्या मुर्तींप्रमाणेच शास्त्रज्ञांचेही तीन वर्ग पडतात. एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात. दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे; आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे. हा ग्रंथ शेवटच्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.
या ग्रंथाची भूमिका शुद्ध विज्ञानवादी आहे. (शुद्ध विज्ञान म्हणजे कुठलीही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान)शुद्ध विज्ञानात दैवी शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्यांची नैसर्गिक (natural)उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जडवादी तत्वज्ञानावर ही प्रहार करते. आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून ते या शुद्ध विज्ञानरुपी शस्त्राच्या दुसऱ्या ‘धारे’कडे नेहमी व पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात. ती धार जणु अस्तित्वातच नाही असे ते समजतात – नव्हे ते त्यांचे गृहितकृत्य असून त्या गृहितकृत्यावरच त्यांचे तथाकथित ‘विज्ञान’ उभे आहे. याविज्ञानाला आत्मवंचक - अर्थात डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे व म्हणून ‘खोटे विज्ञान’ म्हणता येईल. या आत्मवंचक व खोट्या विज्ञानाला उघडे पाडणे , त्याचे खरे स्वरूप वाचकांपुढे ठेवणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.”
“ अशा अनेक नैसर्गिक घटना आहेत ज्यांचा कार्यकारणभाव मानवाला माहित झालेला नाही. प्रश्न असा आहे की अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे ‘चमत्कार’ म्हणून पुजा करायची का? की त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ? की अशा घटना घडतच नाहीत, घडणे शक्य नाही असे म्हणून शत्रूला पाहून वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगाची भूमिका स्वीकारायची? दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ अशी भुमिका स्वीकारताना दिसून येतात.ही भूमिका आत्मवंचक, अवैज्ञानिक व म्हणून त्याज्य होय, हे या याग्रंथात वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.”

  • या ग्रंथाच्या मथळ्याविषयी थोडेसे .... व अन्य मजकूर
  • .... शिवाय
  • सादर अर्पण
  • अनुक्रमणिका
  • मुखपृष्ठावरील चित्र
  • प्रकाशक

माहिती 'ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे' या ब्लॉगवर
येथे वाचा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गूढ विद्यांच्या शक्यतांना कुणीच आव्हान देत नाही. फक्त त्या शक्यता आहेत इथपर्यंतच आपली चर्चा मर्यादीत असेल तर ! विज्ञान म्हणून मान्यता मिळण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्या वेगवेगळ्या थ्रेडवर आम्ही लिहीलय ते आपण समजून घेतलंय असं दिसत नाही. ( आपल्याला अपेक्षित असणारे बुद्धीवादी किंवा शास्त्रज्ञ आम्ही नाहीत हे आपल्यालाही माहीत आहे). आम्ही म्हणतोय कि विज्ञान काहीच नाकारत नाही. फक्त एखाद्या गोष्टीला विज्ञान म्हणून मान्यता मिळण्यासाठी जे काही निकष असतात त्याची पूर्तता व्हायला हवी. न्यूटनला आपले नियम वैज्ञानिक कम्युनिटीपुढे मांडावे लागले, त्याचा गणिती पडताळा आल्यानंतर वैज्ञानिक कम्युनिटीला ते पटले. आईनस्टाईनने पुढे त्यात काय चूक आहे ते दाखवून दिले. त्यासाठी पुन्हा त्याने वैज्ञानिक कम्युनिटीला ते दाखवून दिले. नाहीतर आईनस्टाईन कोण ते आपल्याला आज माहीतही नसतं. आज एखादा वैज्ञानिक टाईम मशीनची संकल्पना मांडतो , वॉर्महोलची कल्पना मांडतो त्यालाही जगप्रसिद्ध सहा पॅराडोक्सच्या तर्काच्या आधारे आव्हान दिलं जातं. यातला निर्विवाद आहे तो भूतकाळात जाऊन व्यक्ती स्वतःचाच खून करतो हा. स्वतःचाच खून केल्यानंतर भविष्यात त्याचे अस्तित्वच राहत नाही. थोडक्यात वॉर्महोल किंवा इतर शक्यतेद्वारे टाईम ट्रॅव्हल ही कल्पना वैज्ञानिक संज्ञा म्हणून स्विकारण्यासाठी ही पॅराडॉक्सेस आडवी येतात. याचाच अर्थ संकल्पना मांडणा-यांनी अधिक मेहनत घेऊन ही पॅराडॉक्सेस क्वालिफाय होतील असे संशोधन करणे किंवा अधिक तार्किक विवेचन समोर ठेवणे हे दोनच पर्याय राहतात !

आपल्या ज्ञानतपस्वींनी इथे गळे काढण्याऐवजी सायन्स किंवा नेचर अशा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकात शोधनिबंध सादर केल्यास त्यांना त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी संधी मिळेल. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेपुढे ते आपले संशोधन सादर करू शकल्यास आणि प्रस्थापित सो कॉल्ड वैज्ञानिक कम्युनिटीच्या समजांना धका देऊ शकेल असे संशोधन सादर करू शकल्यास ज्ञानाची आणखी एक शाखा समृद्ध होईल.

ज्ञानतपस्वींना हे अवघड नसावे.

राहता राहिला भानामतीचा प्रकार :
भानामती झाली आहे असा ज्याचा दावा आहे त्याने भानामती कशी असते हे सिद्ध करायचं असतं. अडाणी लोकांना ती दिसत नाही म्हटल्यावर ते नाहीच म्हणणार. पण बुद्धीवादी, ज्ञानी, तपस्वी लोकांना तिचे अस्तित्व आहे हे ठामपणे माहीत असल्यावर त्यांनी भानामतीचे प्रयोग करून दाखवल्यास निर्विवादपणे निकाल लागू शकतो.
आपल्या कडेगावच्या प्रकरणात त्या मुलींनीच काम सांगू नये म्हणून खडे डोळ्यातून काढले होते हे सिद्ध झालेले आहे. नाराज लोकांच्या मुलाखती १९८८ नंतर आता २०११-१२ साली घेऊन त्यातून काय मिळवलं जातंय कुणास ठाऊक !
मिसळपाव वर विचारलेल्या सहा प्रश्नांना ज्ञानतपस्वींनी जे उत्तर दिलंय ते फाटे फोडू नका इतकंच आहे. हे समाधानकारक उत्तर आहे असा ज्ञानतपस्वी आणि त्यांच्या माध्यमाचा दावा असेल तर बिनशर्त माफी मागून मी या सर्वामधून आपली रजा घेतो. जय भानामती

( टीआरपी चा उल्लेख कुणी तरी केला होता. सहमत आहे )

चौथा वर्ग-

वरील तीन वर्गांव्यतिरिक्त एक चौथा वर्गही असतो. या वर्गाला स्वतःच्या अंधश्रद्धा तर जोपासायच्या असतात, पण त्याला विज्ञानाचा टेकूही द्यायचा असतो. निखळ अंधश्रद्ध लोक परवडले, कारण सत्याशी परिचय होताच त्यांचे डोळे खाडकन उघडतात. पण हे स्यूडो-विज्ञानावगुंठित अंधश्रद्ध मात्र मुळात स्वतःला न कळलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा आधार घेत अपप्रचार करत फिरतात, आणि जे श्रद्धा-बुद्धिप्रामाण्याच्या 'कुंपणावर' बसलेले असतात, त्यांना दुहेरी समाधान देत प्रभावित करतात. कॉस्मिक रेज, पॉझिटीव्ह-निगेटिव्ह एनर्जी, बर्मुडा त्रिकोण, फेंगशुई, वास्तूवाल्यांपासून सायंटॉलॉजीपर्यंत अशांचा पसारा पसरलेला असतो. (विकुंची कल्टमालिका आठवली पटकन.)
असो.

अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे ‘चमत्कार’ म्हणून पुजा करायची का? की त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा?

ज्ञानतपस्वी गळतगेंनी अशा कुठल्या चमत्काराचा 'शास्त्रशुद्ध' मागोवा घेत कार्यकारणभाव शोधून काढला आहे, हे ओकांनी सांगावे. (कडेगावचा अनुभव घेऊन झाला आहे, त्यामुळे पुस्तक विकत घेण्याची तयारी नाही. ;))

एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात.
----- चमत्कार काय असतो?
एखादी गोष्ट समजली नाही, व्यावस्थित समजावुन घेतली नाही किंवा समजण्यात मर्यादा आल्या तर चमत्कार म्हणुन सोडणे सोईचे आहे.

अगदी अपवादानेच काही घटना घडत असतील तर त्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. २ + २ जगात सर्व दुर तुम्हाला ४ च उत्तर मिळेल किंवा जगांत कुठेही गेलांत तर १०० से. (हवेचा दाब समान आहे असे समजले तर) लाच पाणि उकळणार. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण केली तर तुम्हाला अपेक्षीत उत्तर मिळायलाच हवे. डोळ्यातुन खडे येणे या घटना जगांत कुठेच घडलेल्या एकल्या नाही, मग कडेगांवातल्या मुलींच्याच डोळ्यामधुन खडे कसे निघाले? येथे शुद्ध हात-चलाखी आहे. तुम्ही हाच प्रयोग प्रत्येक गावांत दाखवा, जग मान्य करेल. पण तसे होत नाही. जगा ७०० कोटी मानव आहेत तर एका कुठल्याशा गावांतच डोळ्यांतुन खडे पडण्याच्या घटना कशा घडल्या? त्याची पुनरावृत्ती कधिच कशी झाली नाही?
मनुष्याच्या डोळ्यां मधुन पाणी बाहेर येते हे माहित आहे, आता पाण्यालाच खडे हे संबोधले असेल तर प्रश्नच मिटला.

दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे;
------ चमत्कार कशाला म्हणायचे. कुठलाही शास्त्रज्ञाला चमत्कारच मान्य नाहीत. एखादी गोष्ट शास्त्रज्ञांना कळत नसेल किंवा त्यांच्या तत्कालिन उपलब्द ज्ञानाच्या आवाक्याबाहेर असेल, पण जर प्रयोगाचे उत्तर सतत आणि सतत एक सारखे मिळत असेल तर तो निकाल मान्य करतो. मग पुढे तोच किंवा आणखी दुसरा कुणी त्यावर अधिक प्रकार टाकतो आणि निकाल उलगडण्याची प्रक्रिया पुर्ण होते... पण एखादे उत्तर अगदी अपवादाने क्वचितच मिळाले असेल, नंतर त्या प्रयोगाची आणि निकालांची पुनरावृत्ती करताही नाही आली तर असा प्रयोग आणि त्यातुन निघणारे निष्कर्ष शास्त्रज्ञांचा समुह मान्य करणारच नाही.

आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे.
----- जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहेत, म्हणजे साधारणत: १४०० कोटी डोळे. आता या १४०० कोटी डोळ्यांपैकी किती डोळ्यांतुन दगडे बाहेर पडलित?

किरण, ज्ञानेश, उदय..
मायबोलीने एक धोरण ठरवून, अशा प्रकारचे लेखन इथे प्रकाशित होऊ नये, असे
आव्हान करावेसे वाटतेय. तूमचे मत सांगा.
===
श्री. शशिकांत ओक (इथे या आयडीने त्याच व्यक्तीने लिहिले आहे असे गृहित धरतो. मायबोलीवर अशी शक्यता नेहमीच असते नाही का ?) हे असे लेखन करुन नेमके काय साधू पाहतात ?
मायबोलीवरचे बहुतांश सभासद हे तंत्रविज्ञात शाखेत उच्चशिक्षण घेतलेले आहेत. त्या
सर्वांनी हे शिक्षण घेण्यासाठी, काय कष्ट केले आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे.
अशा व्यक्तींना, उगाच ते शिक्षण घेतले, त्यापेक्षा भानामती शिकलो असतो (आणि असे
काही प्रचारक शोधले असते ) तर आयूष्याची ददात मिटली असती, असे तर वाटायला नको आहे ना ?

===
जर हि व्यक्ती, खरेच त्या गळतगेच्या आहारी गेली असेल, तर भानामती नाही, पण
वैचारीक संमोहन होऊ शकते, यावर विश्वास बसलाय !

===
मला खरेच इथे लिहायचे नव्हते, पण याचा अतिरेक होत चाललाय, तेव्हा माझ्या पहिल्या सुचनेवर तूमचा प्रतिसाद कळवा.

अर्थातच हे.मा.शे.पो.

वैचारीक संमोहन
चांगला शब्द आहे हा दिनेशदा. तुमचा प्रश्न पाहिला. तुमची प्रामाणिक कळकळ पोहोचली. थोडासा वेळ घेऊन लिहीतो यावर Happy

दिनेशदा

मला पण हा विचार आवडला होता. योग्यच आहे. यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. पण हा हेतू लक्षात न घेता ( किंवा जाणूनबुजून) मग मायबोलीवर गळचेपी होते असं अरण्यरूदन होण्याचा धोका यात आहे. मायबोली हे संकेतस्थळ खुल्या मनाने नवं स्विकारत नाही अशी हाकाटी पिटली जाईल. म्हणूनच पटो वा ना पटो त्यांचं म्हणणं सुरूवातीला ऐकणं क्रमप्राप्त आहे. एक दोघांना उत्तरं दिली, त्यांच्या विचारांचं खंडण अथवा स्विकार यापैकी एक काही घडलं म्हणजे तो प्रश्न आपोआपच निकालात निघतो. पुढे आणखी असेच कुणी येत राहीले तर अशा प्रत्येकाला उत्तर दिलं नाही तरी चालेल.फक्त कुणी तरी आधीच्या या प्रकरणाची लिंक दिली कि झालं. माझा विचार चुकीचा असू शकेल कदाचित. काय वाटतं याबद्दल ?

किरण्यके - उभे राहून जोरदार टाळ्या तुमच्या वाक्यावाक्याला...

दिनेशदा - वैचारिक संमोहन...अगदी अगदी पटले...पण किरण्यके यांचाही मुद्दा विचार करण्याजोगा आहे...

मित्रानो,
तुम्ही हाच प्रयोग प्रत्येक गावांत दाखवा, जग मान्य करेल. पण तसे होत नाही. जगा ७०० कोटी मानव आहेत तर एका कुठल्याशा गावांतच डोळ्यांतुन खडे पडण्याच्या घटना कशा घडल्या? त्याची पुनरावृत्ती कधिच कशी झाली नाही?
प्रा. गळतगे आणि मी आम्ही गावोगावी प्रयोग करून दाखवतो असा दावा करत नाही असे . अशा घटना दुर्मिळ असतात. पण त्या पुनरावृत्ती होत नाहीच असे नाही. कारण पाकिस्तानात अशीच घटना झाल्याची नोंद एका मित्राने युट्युबची लिंक देऊन केली. हवी तर ती इथे देता येईल. त्यात तेथील लोकांनी मिलिटरी हॉस्पिटलमधे नेऊन, शोध घेतल्याचे प्रयत्न झाले असे म्हटले आहे. त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारे
खडे 'जिन्न' ची करामात असावी असे रिपोर्टरने गावकऱ्यांचे मत नोंदवले गेले होते.

मनुष्याच्या डोळ्यां मधुन पाणी बाहेर येते हे माहित आहे, आता पाण्यालाच खडे हे संबोधले असेल तर प्रश्नच मिटला.

आपण मला किंवा गळतगेंना असे म्हणून काही उपयोग नाही. हे गूढ आपणा सुशिक्षितांपासून सामान्यांनी आपापल्या परीने शोधायचे आहे. अंनिस तिच्यातऱ्हेने शोधते. गळतगे त्यांच्या. आता एकमेकांनी त्या शोधकार्यातील त्रुटी दाखवून व बाजूला करून नवा रस्ता शोधावा हे जास्त बरोबर असेल ना?
प्रा गळतगे यांची तशी अपेक्षा आहे.

मायबोलीवरचे बहुतांश सभासद हे तंत्रविज्ञात शाखेत उच्चशिक्षण घेतलेले आहेत. त्या
सर्वांनी हे शिक्षण घेण्यासाठी, काय कष्ट केले आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे.
अशा व्यक्तींना, उगाच ते शिक्षण घेतले, त्यापेक्षा भानामती शिकलो असतो (आणि असे
काही प्रचारक शोधले असते)

भानामतीने सर्व प्रश्न सोडवले जातील असे गळतगे सुचवीत नाहीत हे आपल्यामनातील रंजन आहे. असे म्हणावे लागेल.

मायबोलीवर गळचेपी होते असं अरण्यरूदन होण्याचा धोका यात आहे. मायबोली हे संकेतस्थळ खुल्या मनाने नवं स्विकारत नाही अशी हाकाटी पिटली जाईल. म्हणूनच पटो वा ना पटो त्यांचं म्हणणं सुरूवातीला ऐकणं क्रमप्राप्त आहे.

गळतगे काय म्हणतात ते प्रथम मान्य होणार नाही. पण खुल्या मनाने वाचावे. मग वाटले तर स्वीकारावे. अशा चर्चा चालू राहतात.

मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835

मोराच्या पिसावरले डोळे परवडले. त्यातनं खडे बाहेर येत नाहीत. Happy

ओकसाहेब, प्राण्यानापण भानामती होते का?

गळतगे काय म्हणतात ते प्रथम मान्य होणार नाही.

गळतगे काय म्हणतात तेच कुणाला माहीत नाही. एकच प्रकरण दिलं कडेगावचं ते पण वादग्रस्त. मिसळपाव वर उत्तर म्हणून भानामतीचे अनुभव लिहा असा धागा काढला, तो पुरावा म्हणून सादर केला. तिथंच ज्यांना भानामतीचा आजवर एकही अनुभव आला नाही अशा लोकांनी इथं लिहा असा धागा काढला असता तर काय झालं असतं ? ९९ टक्के लोकांना अनुभव येत नाहीत. बेंबीतून कापूस येणं हा भानामतीचा प्रकार नाहीच. सुती बनियन वापरलं तर काहींच्या बाबतीत हे होतं. आता अनुभव देणारा जरा जास्तच सांगतोय कि खरं सांगतोय हे कसं ठरवणार ?

आपण व्यवहारात गळतगेंच्या म्हणण्याप्रमाणे शुद्ध विज्ञान वापरू शकत नाही. भारतिय हवाई दलात शुद्ध विज्ञान वापरून उडणारी विमानं वापरता येतील का ही शंका मला आहे. या प्रश्नाचं उत्तर इथं कोण देऊ शकेल ? म्हणजे असं विज्ञान कि ज्याचा १ टक्के लोकांना पडताळा आलेला आहे पन ९९ टक्के लोकांना नाही.. अशा पकारचं तंत्रज्ञान वापरून बनवलेली विमानं जर हवाई दलात घेतली जात असतील तर प्रश्नच मिटले नाही का ?

तसं करता येत नसेल तर १०० टक्के लोकांना येणारी अनुभूती ...या व्याख्येच्या पाठीमागे काही खोल विचार असेल हे गळतगेंना समजावून सांगा. शुद्ध विज्ञानाच्या नावाखाली सरमिसळ करू नका. भानामती हे सायन्स कसं आहे हे सिद्ध केल्ञाशिवाय आता काहीही सांगू नये ही नम्र विनंती. चला शुद्ध विज्ञान तर शुद्ध विज्ञान ! ते नीट समजावून सांगा !

लहान मुलांकडे लक्ष दिले गेले नाही तर ते काही तरी उपद्व्याप करतात जेणे करुन आपल्याकडे सर्वांचे लक्ष आकर्षावे. ओकसाहेबांनी खालील ३ लिंक वाचाव्यात अशी विनंती. तज्ञ डॉ. च्या पथकाने ८ दिवस मेहेनत करुन हे निष्कर्ष काढले आहेत.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-08-31/india/27798679_1_...

http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-08-30/india/27787805_1_...

http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-09-06/delhi/27826929_1_...

गुगलल्यावर २-३ व्हिडीओ दिसत आहेत. दुर्दैवाने प्रत्येक ठिकाणी AIIMS सारखा पाठपुरावा झालेला नाही.

मुख्य म्हणजे हे सर्व प्रकार शिक्षणांत मागे असलेल्या भागांत झालेले दिसत आहेत. पुण्यांत किंवा मुंबई किंवा न्युरॉर्क का नाही - कारण तेथे डाळ शिजणारच नाही.

तुम्ही स्वत: पाहिले आहे कां? स्वत: खात्री केलेली आहे कां? वरिल प्रकारांत अत्यंत अद्ययावत शास्त्रिय उपकरणे किंवा डॉ. असायलाच हवे असेही नाही. (प्रत्येक वेळी AIIMS लाच जायची जरुर नाही - त्यांना बरेच कामे आहेत).

ओकसाहेब, प्राण्यानापण भानामती होते का? >>>>>

नक्किच होत असावी.
जगात एवढे खडक, पहाड निर्माण झाले ते डायनोसोरना भानामती झाल्यामुळे आले असावेत असे असु शकेल. मला वाटते हा फार मोठ्या संशोधनाचा विषय आहे.

मोरांना भानामती झाली तर पिसांतुनही खडे येतील का ? ह्यावरही संशोधनाची गरज आहे.
तसेच अमिबाला भानामती झाली तर खडे कोठुन येतील ? यावरहि जाणकारांनी प्रकाश टाकावा.

ओकसर उत्तर देताना शेलका माल उचलतात

आपल्या ज्ञानतपस्वींनी इथे गळे काढण्याऐवजी सायन्स किंवा नेचर अशा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकात शोधनिबंध सादर केल्यास त्यांना त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी संधी मिळेल. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेपुढे ते आपले संशोधन सादर करू शकल्यास आणि प्रस्थापित सो कॉल्ड वैज्ञानिक कम्युनिटीच्या समजांना धका देऊ शकेल असे संशोधन सादर करू शकल्यास ज्ञानाची आणखी एक शाखा समृद्ध होईल.

हा माल उचललाच नाही....!

दिनेशदांनी अचूक ओळखलेली दिसतेय रास !!

फक्त किरणला पाठींबा देण्यासाठी हे पोस्ट आहे. मित्रहो या हाकेत मी मला तरी
धरत नाही, कारण अशी मैत्री मी करतच नाही. (फक्त लिंगनिरपेक्ष मैत्री करतो.) ...

तेव्हा किरण, तूझा उत्साह कायम राहो. सामनेवाले यांना अशाच वैचारीक हल्ल्याने रोखता येईल.

प्राण्यांवर भानामती नाही तर संमोहन होते. वाघ, घुबड असे करतात असे चितमपल्ली
यांनी लिहून ठेवलेय. काय गंमत आहे ना, चितमपल्ली काय कि भागवत आज्जी काय,
आयूष्यभर त्यांनी कसली बिरुदं मिरवली नाही, नावामागे.

शुद्ध विज्ञान ते काय असते रे किरणभाऊ ? ( मला शुद्ध शाकाहारी, म्हणजे काय ते
जेमतेमच कळते !!)

अंधश्रद्धा पसरवणे किंवा त्याला खतपाणी घालणे हा भारतात कायद्याने गुन्हा आहे असे मी वाचलेले आहे. कायदेतज्ञांचे मत वाचायला आवडेल.

ओक साहेबांचे मी दिलेल्या लिंक वर मत हवे आहे. तसेच हा संदेश ज्ञानतपस्वींपर्यंत पोहोचवाल का? त्यांना हे सर्व थोतांड आहे व ते तज्ञ पथकाने सिद्ध केलेले आहे याची माहिती आहे कां?

ओकसाहेब्,मी स्वतः एम डी डॉक्टर आहे.
मी भल्या भल्या भानामती दररोज दूर करते. . काल रात्रीही दोन भानमत्यांना अ‍ॅडमीट करून ठेवलंय. एकीला बघता बघता डोळे लाल होतात आणि एकीने म्हणे मागच्या सात वर्षांत काह्हीच खाल्लेल नाही.काही खाता क्षणीच उलटी करते म्हणे. आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.
अशिक्षित आणि मुख्यत्वे स्त्रिया या मार्गाने आपले सायकीक डिसीजेस मॅनीफेस्ट करतात हे सुशिक्षितांना का कळू नये?आजच्या जगात कोणी भानामतीचे इतक्या हिरिरीने समर्थन कसे करू शकते?

माबोवर असे काहि आहेत का अजुन धागे टाइमपाससाठी ?>>>आहेतना,खाली दिला आहे बघा जरा.

कादंबरी...सावट-- भाग..२....लेखक>>>बेफ़िकीर

बेफ़िकीर | 10 May, 2011 - 06:56
पण बेफी एक प्रश्न असा पडलाय की हे सगळे कोण करतेय आणि काय घटना घडतायत हे उघड पण दाखवून त्यातला गूढपणा कमी झाल्यासारखा वाटतोय...
म्हणजे, रहस्य वगैरे...अर्थात तुमच्या डोक्यात कथा कशी फिरेल याचा अंदाज करता येत नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव..त्यामुळे अजून खतरनाक प्रसंगांची वाट पहात आहे>>>

आशू, हे प्रकार कोण करत आहे ते 'माझे ठरलेले' आहे. बघू, कधी लिहिले जाते त्याबद्दल!

=================

अजून एक म्हणजे..भयकथा ही बिभत्सच असली पाहीजे असे नाही...इव्हिल डेडचे सुरूवातीचे भाग निसंशय भयपटाला साजेसे होते पण त्याच्या सिक्वेलमध्ये बिभत्सपणा फारच अंगावर येऊ लागला आणि तो प्रकार कंटाळवाणा झाला...
तुटके हातपाय, वाहणारे रक्त, मुंडकी आदी प्रकार पहिल्यांदा धक्का देतात, पण त्याचा अतिरेक झाला की त्याची किळस येऊ लागते.
तसे काही या कथेबद्दल होऊ नये असे वाटते>>>

बीभत्सता मला स्वतःला जाणवली नाही. मृत्यूनंतर भूत अस्तित्वात येऊ शकते हे गृहीत धरलेले असले तर मृत्यूसमयी शरीराचे काय झालेले असेल त्यावर काय होणार ते अवलंबून असणार!

आपल्या माहितीसाठी:

गर्भवती सुवासिनीचा डावा हात कापून घेणारी व्यक्ती आमच्या (आमच्या म्हणजे माझ्या व माझ्या चुइलतभावांच्या) आजोबांची जवळची मित्र होती. त्यांच्या अंगात १६ विभुती यायच्या. या सर्व विभुती आमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करायच्या. त्यातील माताजी ही आठशे वर्षांपुर्वीची म्हातारी आमची माता समजली गेली. त्याव्यतिरिक्त भवन्नास महाराज, नवचंडी महाराज हे दास, तसेच महेश म्हणजे शंकर व या शिवाय आणखीन अनेक विभुति यायच्या. त्या विठ्ठलरावांची खास पूजा केली जायची. या विभुतींना आमंत्रण देण्यासाठी! मी स्वतः त्या पूजा पाहिलेल्या आहेत. माझ्या वडिलांना (ते एकंदर ७ भाऊ व २ बहिणी) व त्यांच्या सर्व भावा बहिणींना चांगले अनुभव स्वतःला आलेले आहेत. हे शेजवाडकर कारवारपासच्या शेजवाडमध्ये होते. तेथे आजही माझ्या आजोबांनी बांधलेले जगदंबेचे देऊळ आहे. गेले पन्नास वर्षे तेथे रामनवमीचा उत्सव असतो. अजूनहीमाझे ७९ वर्षांचे वडील दर उत्सवाला जातात.

तर हे जे विठ्ठलराव शेजवाडकर होते त्यांनी चांगल्या सिद्धी मिळवण्यासाठी अनेक अघोरी प्रकार केले होते. गर्भवती सुवासिनीचा हात त्यांना हवा होता व तो मिळणार अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा ते माझ्या आजोबांना, म्हणजे बालाजी वासुदेव कटककर यांना सोबत घेऊन स्मशानात गेलेले होते. तसा हात त्यांनी मिळवलाही.

मात्र या माणसाने प्रत्येक शक्ती क्वळ आणि केवळ चांगल्यासाहीच वापरली. त्यांचे शेकदो अनुभव आमच्या व अनेक कुटुंबांनी घेतलेले आहेत. अनेकांच्या बाधा गेलेल्या आहेत. प्रकृती बरी ह झालेली आहे.

त्या अनुभवांचा साठा, काहीशी कल्पना शक्ती वगैरे वापरून मी हे सर्व लिहीत आहे. विठ्ठलरावांनी केलेला तो प्रकारही, जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असला तर, चांगल्यासाठिच केलेला होता व त्या सुवासिनीच्या घरच्यांची परवानगीही घेतलेली होती.

आपल्या प्रतिसादाबद्द्ल खूप आभार!

-'बेफिकीर'!

प्रतिसाद बेफ़िकीर | 10 May, 2011 - 07:00
बाय द वे, कुणी कधी कारवारला गेले तर शेजवाड (कारवारपासून ७ किलोमीटर) येथे सज्जेश्वरच्या मंदिरासमोर आमचे जगदंबेचे मंदिर आहे. अत्यंत छन जागा व देऊळ आहे. ग्रामीण विभाग असल्याने हवा उत्तम आहे. तेथे माझी ओळख सांगीतल्यास शालिनी म्हणून एक आहेत त्या देऊळ दाखवतील आणि मुख्य म्हणजे विठ्ठलराव शेजवाडकरांच्या अनेक अद्भुत कथा सांगतील. या कथा खर्‍या आहेत. माझे वडील आजही या कथा सांगतात. आणि खोटे बोलण्याची गरजच नाही. विठ्ठलराव ही 'विभुती अंगात येणे' व 'समाजाहे भले करणे' याबाबत खरोखर महान व्यक्ती होती.

-'बेफिकीर'!

धन्यवाद मकरंद. पहिला धन्यवाद संयमीत लिहिल्याबद्दल! आत्ता विंग कमांडर वाटता!

आणी दुसरा धन्यवाद टाइमपास बद्दल.

साती व अन्य मित्रांनो,

साती...ओकसाहेब्, मी स्वतः एम डी डॉक्टर आहे.
मी भल्या भल्या भानामती दररोज दूर करते. काल रात्रीही दोन भानमत्यांना अ‍ॅडमीट करून ठेवलंय. एकीला बघता बघता डोळे लाल होतात आणि एकीने म्हणे मागच्या सात वर्षांत काह्हीच खाल्लेल नाही.काही खाता क्षणीच उलटी करते म्हणे. आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.

आता जर आपणच म्हणताय की मी दररोज भानामतीच्या केसेस हाताळते, दूर करते... मग तर फार चांगले झाले. कारण इथे लोक भानामती नावाचे अनाकलनीय काही घडतच नाही असा पवित्रा घेतात. आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.
म्हणजे ज्या केसेस -उपहासाने म्हणत नसाल तर - भानामतीच्या म्हणून एडमिट होतात त्यांच्या पीडित मानसिक अवस्थांचा तो भाग असतो व त्यावर त्यांना उपचार करून, तो दुरुस्त केला की त्या ठीक होतात. म्हणजे ते कार्य आपणहून करत नाहीत पण त्यांच्या मार्फत पीडित त्या काळापुरते होते, असे जाणवते. आपण दिलेल्या उदाहरणातील, डोळे लाल होणे-करणे किंवा बराच काळ -सात वर्षे- भूक न लागणे, अन्न न ग्रहण करणे वगैरे शारिरीक अवस्था आहेत. त्या मानसिक शक्तीने आपणहून मुद्दाम करू म्हटले तरी त्या सामान्यपणे घडणार नाहीत तरीही त्या घडतात असे जाणवते. आपण उदाहरण म्हणून आजकालच्या घडलेल्या सहज दिलेल्या या केसेस, मग आपण त्याआधीच्या शेकड्याने हाताळलेल्या केसेसमधे तर याहीपेक्षा भीषण घटनांची नोंद आपणास एक आधुनिक वैद्कशास्त्रतज्ज्ञ म्हणून आपल्या निदर्शनास आल्या असतील.
शिवाय त्या गोष्टी ज्या भानामतीच्या म्हणून आपण हाताळता म्हणून विचारतो की असे म्हणतात की त्या प्रत्यक्ष घडताना कधीच दिसत नाहीत पण त्याचा परिमाण मात्र शरीरावर वा त्यांच्या सानिध्याने घडतो असे दिसतो. त्या व्यक्तींच्या वागणुकीला भानामती म्हटले जात असावे असे आपल्याकथनातून वाटते.
अंनिस आदींच्या मते भानामतीच्या पीडित केसेस आपणहून त्या शारीरिक घटना घडवतात. उदा. शाळकरी मुली आपल्या डोळयात आधी खडे घालून घेतात नंतर ते डोळ्यातून काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. इतरत्र केसेसमधे त्यांच्या सानिध्याने इतरांचे नुकसान होईल अशा घटना घडवल्या जातात. कपडे पेटतात, वगैरै वगैरे या घटना त्या व्यक्ती तसे मानसिक आजाराच्या पीडेतून घडवतात.
प्राचार्य अद्वयानंद गळतगे परामानसशास्त्राचे संशोधक आहेत. त्यामुळे यांचे कथन ही आपल्याच मार्गाने पुढे जाते. त्यांच्या मते त्या पीडित व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुबळ्या असतात म्हणून बळी पडतात. त्या एका अर्थाने हा त्या व्यक्तींचा मानसिक आजार आहेच. त्या घटना वा चाळे एरव्ही आपणहून करत नाहीत. प्राचार्य अद्वयानंद गळतगे पुढे निरीक्षण करताना म्हणतात, पण त्या विविध अनाकलनीय घटना करायला किंवा घडायला मध्यवर्ती म्हणून जरूर सहभागी असतात. पण त्या दुबळ्या मानसिकतेमुळे जबाबदार नसतात. मग हे घडत असताना प्रत्यक्ष जाऊन वा अनेक पुरावे गोळाकरून मग हे कोण करते याचा शोध घेत घेत ते विविध पर्याय सादर करतात.
त्यात ते एके ठिकाणी म्हणतात, आपण सध्या त्रिमितीच्या जगात वावरतो. असे समजा की तसेच द्विमितीचे एक वेगळे जग आहे. त्यात वावरणाऱ्या व्यक्तींना त्रिमितीच्या जगात वास करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की त्रिमिती नावाची आणखी एक मिती आमच्या जगात अस्तित्वात आहे. द्विमितीतील व्यक्तींना ते मान्य होणार नाही. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचे द्विमितीच्या नियमांनी बांधलेले जग हेच काय ते सत्य असा त्यांचा ठाम विश्वास असणार. पण त्रिमितीतल्या जगातील लोकांच्या दृष्टीने द्विमिती ही सत्यता द्विमितीत जगणाऱ्यांच्यापुरती जरी अगदी 100टक्के खरी असली तरी ज्यांनी त्रिमितीच्या जगाचा अनुभव घेतला आहे त्यांना त्यातला अपुरेपणा लक्षात येईल.
मग जर हे आर्ग्युमेंट द्विमितीच्यासाठी मान्य असेत तर तसेच त्रिमितीच्या जगात वावरणाऱया आपल्याला यापेक्षा अलग मग त्याला चौमिती म्हणा किंवा आणखी काही नाव द्या. त्या चौमितीत वावरणाऱ्र्या जगातील नियम आपण मानतो त्याच्यापेक्षा आणखी वेगळे असू शकतात असे आपणास तर्काने मान्य करावे लागते. नव्हे तसे ते असतात. त्याचा अभ्यास देखील प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी केला व आपले विचार मांडले. त्यात ते म्हणतात की चमत्कार असे काही नसते. फक्त आपल्याला अज्ञात असे काही निसर्ग नियम आहेत त्याची आपणास कल्पना नाही म्हणून आपण फक्त आपल्याला ज्ञात असलेल्या नियमांच्या फुटपट्ट्या वापरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि अन्य काही कारण सापडत नाही म्हणून त्या मानसिक व्यथेने पीडित व्यक्तींना ती ती कामे कऱणारे म्हणून जबाबदार धरतो. खरोखरच अशी चौमिती किंवा बहुमितीचे जग आहे आहे काय? असेल तर त्याचा पुरावा काय? याची सविस्तर चर्चा ते विज्ञान आणि चमत्कार नामक 660 पानी ग्रंथात करतात. अभ्यासकांनी ती वाचावी.

फक्त आपल्याला अज्ञात असे काही निसर्ग नियम आहेत त्याची आपणास कल्पना नाही

कै च्या कै ! वैज्ञानिक शोध लागायच्या आधी असेच सगळे नियम आपल्याला अज्ञातच होते. फळ खाली का पडते, पृथ्वी चपटी आहे.. पृथ्वी गोल आहे हे ज्यांनी सिद्ध करून दाखवले, त्यासाठी प्राण दिले अशी काही मेहनत गळतगे घेत आहेत का ? कि फक्त इतकीच बडबड त्या सहाशे पानांच्या पुस्तकात आहे ? गूढ कथा, कादंब-या यातून अनेकांनी हे तर्कशास्त्र मांडलेलं आहे आणि ते ही एक प्रकारचं बुद्दिजीवी मनोरंजन किंवा तत्वज्ञान म्हणूनच. विज्ञानाशी भांडण मांडलं नाही. गळतगे यांनी नवं असं काहीच मांडलेलं नाही असं दिसतंय. जे मांडलंय ते वैयक्तिक अनुभूति या पातळीवर.. अशी अनुभूति ब-याच लोकांना आलेली असली तरीही त्याला विज्ञान म्हणू नये हा सारासार विवेक अशा व्यक्तींकडे असतो तो गळतगे यांच्याकडे नसावा असं दिसतं. गळतगे यांच्या ग्रंथाबद्दल तुम्ही जे काही पोहोचवलंय, जो काही प्रचार इथं केलाय त्यामुळं त्यांची बदनामीच जास्त झालीय असं माझं प्रामाणिक मत आहे. कालच मिपावर विवेक खोत यांचा थ्रेड वाचत होतो. तिथंही बरीच हुर्यो उडवलेली दिसतेय. भानामती डिश, भानामती रेसिपी आणि काय काय... खर्पूस करमणूक !

विज्ञानाला जी शिस्त अभिप्रेत आहे त्या शिस्तीत नियमांत बसणारे अनुभव कितीही खरे वाटले तरी एकदा का विज्ञानाचे नियम स्विकारले तर त्यात न बसणा-या अनुभवांना विज्ञान म्हणू नये, तसा आग्रह धरू नये हा विवेक पाळला तर असे निरर्थक वाद उद्भवणार नाहीत.

रस्त्यावर पार्किंग करताना वाहन कडेला रस्त्याला समांतर लावावं असं सगळे समजतात. आता एखाद्याला त्रिमिती जगाचा अनुभव आलेल असल्याने त्याला रस्त्याच्या मध्यभागी आडवे वाहन लावणे योग्य आहे असं वाटत असेल तर इतर द्विमिती जगातल्या अडाणी लोकांना तो आगाऊपणा वाटण्याची शक्यता आहे. तेव्हां अडाणी लोकांच्या या जगात वावरताना ज्ञानाने भारलेल्या तपस्वी, रथी, महारथी, अतिरथी लोकांनी इतरांचा विचार केलेला बरा..
---------------------------------------------------------------------------

तुम्हाला माहीत आहे का ? मला जादूच्या चपला सापडलेल्या आहेत. ज्याच्यावर मी उभा राहीलो कि त्या उडतात. मी उडत असताना इतरांना दिसत नाही. ज्या अर्थी मला हा अनुभव आलेला आहे त्या अर्ती हे खरं आहे, तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. नसेल ठेवायचा तर मी उडू शकत नाही हे विज्ञानाने सिद्ध करा.

ही मा़झी शेवटची पोस्ट आहे. वरील उदाहरणतून काही समजलं तर ठीकच. शब्दशः अर्थ घेणार असाल तर हार्दीक शुभेच्छा !! तुमचं काही सांगता येत नाही. मायबोलीवर एकाला आलेला उडण्याचा अनुभव म्हणून मूळ हेतूलाच हरताळ फासून इतरत्र ते कोटही कराल.

अंनिस आदींच्या मते भानामतीच्या पीडित केसेस आपणहून त्या शारीरिक घटना घडवतात. उदा. शाळकरी मुली आपल्या डोळयात आधी खडे घालून घेतात नंतर ते डोळ्यातून काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
---- अनिसला थोडावेळ बाजूला ठेवा.... वर TOI च्या लिंक मधे आलेल्या बातमी बद्दल तुमचे काय मत आहे? याआधी घडलेल्या घटना व त्या मधील एका घटनेचे स्पष्टीकरण AIIMS च्या तज्ञ पथकाने परिश्रम पुर्वक, नेटाने अभ्यास करुन दिलेले आहे.

त्या घटना वा चाळे एरव्ही आपणहून करत नाहीत. प्राचार्य अद्वयानंद गळतगे पुढे निरीक्षण करताना म्हणतात, पण त्या विविध अनाकलनीय घटना करायला किंवा घडायला मध्यवर्ती म्हणून जरूर सहभागी असतात.
---- तुम्ही किती खोटा प्रचार चालवलेला आहे. अनाकलनीय हे म्ह्णायचे धाडस कसे करत आहात? जर तज्ञांनी त्याचे संपुर्ण विश्लेषण केलेले आहे आणि हा निव्वळ मानसिक आजारच आहे हे माहित आहे, असे काही प्रकारच घडत नसतात ते पुराव्यानिशी सिद्ध केलेले असतांना तुम्ही अनाकलनीय म्हणुन कसे संबोधता?

पण त्या दुबळ्या मानसिकतेमुळे जबाबदार नसतात.
-----तुम्ही दोन टोकाचे मत प्रकट करत आहात (गळतगेंचे निरीक्षण अशी सुरवात करुन).

प्राचार्य अद्वयानंद गळतगे परामानसशास्त्राचे संशोधक आहेत. त्यामुळे यांचे कथन ही आपल्याच मार्गाने पुढे जाते. त्यांच्या मते त्या पीडित व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुबळ्या असतात म्हणून बळी पडतात.
----- पिडीत व्यक्ती मानसिक दृष्टीने सशक्त असेल, संतुलीत आणि प्रमाणिक असेल तर असे प्रकारच होणार नाहीत. बस्स... विषय येथेच संपायला हवा.

त्या एका अर्थाने हा त्या व्यक्तींचा मानसिक आजार आहेच. त्या घटना वा चाळे एरव्ही आपणहून करत नाहीत. प्राचार्य अद्वयानंद गळतगे पुढे निरीक्षण करताना म्हणतात, पण त्या विविध अनाकलनीय घटना करायला किंवा घडायला मध्यवर्ती म्हणून जरूर सहभागी असतात. पण त्या दुबळ्या मानसिकतेमुळे जबाबदार नसतात.
------- किती विरोधाभास आणि टोकाची मते... आधी लिहीत आहात हा त्या व्यक्तीचा मानसिक आजार आहे आणि पुढे लिहीत आहात दुबळी मानसिकता जबाबदार नसते. लवकर बरे व्हा.... शुभेच्छा.

आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.
----- त्यांचे हॉस्पिटल शहरात असेल वा ग्रामिण भागांत त्याने काय फरक पडतो? भानामतीच्या नावाने केसेस येतात म्हणजे पिडीतांना भानामती झालेली असते असे नाही किंवा भानामती हा प्रकार अस्तित्वात आहे याला तो पुरावा ठरु शकत नाही. भानामती असे काही अस्तित्वातच नाही आहे.

मित्र हो,
डॉ. साती यांच्या प्रतिसादाची वाट पाहिली. खरे तर त्यांनीच आपल्यासारख्या भानामती वगैरे काही घडत नाही म्हणणाऱ्यांना उत्तर द्यावे कारण की भानामतीच्या म्हणून केसेस त्यांच्या कडे येतात. त्याची उकल त्यांच्या किंवा एम्स नवी दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या ज्ञानाच्या तऱहेने करतात.
काही काळापुर्वी एका तरुण मुलीला घेऊन एक विद्याविभूषित बाई लखनौ किंवा अशाच भागातून एम्स मधे आल्या व त्यांच्या मुलीच्या डोळ्यातून अचानक रक्ताची धार लागल्याची केस दाखवून त्याची शास्त्रीय तपासणी करून त्याची कारण मिमांसा करावी म्हणून आपणहून अनेक दिवस राहिल्या होत्या. त्यावर डिस्कव्हरी किंवा नॅ. जियॉ. ची एक फिल्म ही पहाण्यात आली. त्यात अनेक रितीने त्या मुलीची कित्येक तास पहाणी करूनही नक्की काही कळेना असे त्याच वेळी परदेशातून आलेल्या ज्या एका डॉक्टरने ही केस हाताळली, त्याचे मत पडले. त्याला ही त्याचे गूढ कळले नाही. त्याने आणखी काही दिवस ह्या केसची परत तपासणी करायला हवी असे मोघम म्हणून नक्की काय असेल यावर सांगायची आपली असमर्थता दर्शवत त्या डॉक्युमेंट्रीचा शेवट झाला होता.
त्यानंतर अन्य चॅनेलवरून हा इशू बऱ्याच चर्चांत घोळवत दाखवला गेला. त्या मुलीला वेगळे करून अनेक प्रश्न विचारून व आईला तुम्हीच मुलीला असे करायला प्रवृत्त करत नाही काय? असे सतत विचारून त्यांची मानसिक अवस्था अशी केली की त्यांनी म्हटले की भारतीय डॉ. नी सरळ सरळ त्या मुलीला, आईला व घरच्यांना काही कट करून हे सनसनी फैलावण्याचे उद्योग म्हणून त्यांना खोटे ठरवले होते.
त्याबाईंनी व मुलींने आम्ही एम्स मधे येऊन चूक केली. मुलीला भानामती झाली आहे असे म्हणणारे मांत्रिक ही असेच वाऱ्यावरसोडून गेले त्यांत व या डॉ मधे काय फरक असे जाहीर वक्तव्य मीडिमधे केल्याचे ऐकले होते.
मला कोणाची बाजू घ्यायची नाही.
काही केसेसमधे कोणी माणसे काही उद्देशाने खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती असतीलही. पण सरसकट सर्वांना एका मापाने तोलणे योग्य नाही असे गळतगे म्हणतात. याच्यावर ही विचार व्हावा.
ही मा़झी शेवटची पोस्ट आहे. वरील उदाहरणतून काही समजलं तर ठीकच.
मित्रा,
आपल्याला कंटाळा आला तर आला. म्हणून मी काही विचार मांडूच नयेत असे नाही. वेळोवेळी असे काही लिखाण वाचून ही त्यातून चर्चा घडत राहतील.
ग्रंथाचे नाव 'अंधश्रद्धा आणि विज्ञान निर्मूलन' असे हवे .
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा.

प्रा. गळतगे यांचे विविध प्रकरणातील विचार वाचले तर विज्ञानाशी मुळीच वाकडे नाही तेही रॅशनॅलिस्ट आहेत पण कृतीशील आहेत असे वाटेल.
विज्ञानाला योग्य मान-सन्मान मिळण्याबाबत तेही आग्रही आहेत.
म्हणून परामानसशास्त्राला लाथाडता येणार नाही असे ते निक्षुन प्रतिपादन करतात म्हणून आपल्यासारख्यांना ते थोडे विज्ञानाला कमी मानतात असे वाटेल.

Pages