Muriwai Beach, Gannet Colony ( मुरीवाई बीच, गॅनेट पक्षी, ऑकलंड )

Submitted by दिनेश. on 20 February, 2012 - 00:26

बीच म्हणालो कि निदान माझ्याडोळ्यासमोर तरी एक ठराविक दृष्य येते. निळाशार
समुद्र, पांढरी वाळू, सुरुचे बन, खारा वारा. आणि काहिही म्हणा, मला बीचवर जायला
तितकेसे आवडत नाही. एकतर तो उष्ण वारा मला सहन होत नाही आणि खार्‍या
पाण्याने मला रॅश येते.

ऑकलंडला असताना एक संध्याकाळ जरा मोकळी होती. आणि जवळजवळ ४
वाजल्यानंतर माझा मित्र, कार्ल याने बीचवर जायची टुम काढली.

तिथे या दिवसात रात्री साडेआठनंतर सूर्य मावळतो. त्यामूळे चार वाजता हवा तशी
गरमच होती. त्याने खुपच आग्रह केला तेव्हा मी तयार झालो. बीचवर जेवण करायचे
असे ठरले. घरूनच सगळे न्यायचे होते. गरम कपडे घे, बीचवर थंडी असेल असे त्याने
सांगितले. पण मी थंड रक्ताचा प्राणी असल्याने ते मनावर घेतले नाही, मी.

तर जेवणाची तयारी करुन आम्ही निघालो. कार्लची तीन मुले, शेल्डन, जेकब आणि
थिओ सोबत होती. बीचवर जायचे म्हणून फार चेकाळली होती. गाडीत एकमेकांशी
आणि माझ्याशीही, यथेच्छ मस्ती चालली होती.

आपल्याकडे बीचकडे निघालो कि एक वेगळेच वातावरण जाणवू लागते. द्राक्षबागा
आणि वाईनरीज, यांचा मेळ काही केल्या माझ्या डोक्यात, बीचशी होणार नाही. (ते
माझ्या डोक्यात जूळलंय नाशिक, नारायणगाव, फलटणशी ) पण वाटेत
वाईनरीज लागल्या. शिवाय दोन्ही बाजूंनी हिरवे डोंगर, जंगल होतेच.

आणि शेवटी बीचवर पोहोचलोच. दोन्ही बाजूचे डोंगर तसेव. तिथे सगळीकडे असणारा
पोहोतुकावा पण होताच. सूर्य अजून चांगलाच वर असल्याने, पाण्यावर नजर ठरत
नव्हती. तो होता मुरीवाई बीच.

बीचवर जायचे काही माझ्या डोक्यातच नसल्याने मी या बीचबद्दल काहीच माहिती
काढलेली नव्हती. (काढली असती तर मीच कार्लला आग्रह केला असता.)

आम्ही बीचकडे निघालो तर उजव्या हाताला खूप मोठा समुद्रकिनारा दिसला. पाणी
निळे असले तरी वाळू मात्र काळसर होती. (तिथल्या वाळूत लोहाचे प्रमाण जास्त
आहे.) तिकडे न जाता मला कार्ल, डाव्या बाजूच्या डोंगराकडे घेऊन गेला. समोर
सपाट खडक होते, पण तो भाग धोकादायक वाटत होता.

आणि त्या डोंगरावर जायला सुबक लाकडी पायर्‍या दिसल्या. आता वयोमानानुसार
मला डोंगरावर चढायची हौस राहिलेली नाही. पण त्या सुबक पायर्‍या बघून मात्र
मला खुप उत्साह आला. (अश्या सुबक पायर्‍या असल्या तर मी एव्हरेस्ट्ही चढेन.
सर एडमंड हिलरीच्या देशात जाऊन आल्यावर, एवढी फुशारकी मी मारणारच ना ?
आधी पायर्‍या तर होऊ द्या.)

आम्ही पायर्‍या चढून पहिल्या सज्ज्यात गेलो. तिथून क्षितिजापर्यंत समुद्र तर दिसत
होताच, पण दूरवर एका खडकावर, पक्ष्याची लगबग दिसत होती. ते सी गल्स नक्कीच
नव्हते.

आणि आणखी काही पायर्‍या चढून गेल्यावर माझ्यासमोर अभूतपूर्व नजारा आला.
आजवर हे दृष्य मी केवळ, अटेंबरोंच्या फिल्म्स मधेच बघितले होते. मी अशा एखाद्या
ठिकाणाला, आयूष्यात कधी भेट देऊ शकेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

ती होती गॅनेट्स या पक्ष्यांची ब्रिडींग कॉलनी. मी तर तिथे हरखूनच गेलो.

या गॅनेट्स पक्ष्यांबद्दल थोडेसे.

यांच्या दोन प्रजाती आहेत. उत्तरेकडे जास्त करुन स्कॉटलंड मधे त्यांची वस्ती आहे.
हि दक्षिणेकडची म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडमधली प्रजाती आहे.
हि त्यामानाने आकाराने छोटी प्रजाती असते. यांच्या पंखांचा विस्तार ३ फूटापर्यंत
असतो. काळ्या रेघा आणि शुभ्र अंग असे यांचे रुप. चेहरा मात्र पिवळा असतो.

हे माश्यांची शिकार करतात आणि त्यासाठी खूप उंचावरुन समुद्रात सूर मारतात.
(त्यांची ही शिकार किनार्‍यापासून दूरवर होते, त्यामूळे प्रत्यक्ष बघता आली नाही.)
त्यासाठी त्यांच्या शरीराची ठेवण खास असते. इतर पक्ष्यांच्या शरीरातील हवेच्या
पिशव्या, मध्यभागात असतात तर यांच्या चेहर्‍याजवळ, गळ्यात आणि छातीमधे
असतात. त्यामूळे ते अतिवेगात पाण्यात सूर मारु शकतात.

यांचे डोळे बरेच पुढे असतात, त्यामूळे त्यांना समोरचे छान दिसते. पाण्याखाली
ते बराच वेळ राहू शकतात. त्यांचे पोटही मोठे असते. (स्कॉटलंडमधे खादाड
माणसाला, यांची उपमा देतात.)

यांचा जोडीदार आयूष्यभरासाठी असतो. या ठिकाणी ते जोडीदाराची निवड करतात.
मादी केवळ एकच अंडे देते. ४५ दिवस दोघे मिळून ते ऊबवतात. पिल्लू मात्र रंगाने
काळे असते.

दोघात मिळून एकाच पिल्लाला भरवायचे असले तरी, काही जोड्या त्यात कमी
पडतात. त्यामूळे अनेक पिल्ले दगावतात. पुर्वी अशी मेलेली पिल्ले फार दिसायची
असे कार्ल म्हणाला.

पण खास प्रयत्न केल्याने आता त्यांची तिथली संख्या वाढते आहे. पिल्लात पुरेशी
ताकद येईपर्यंत ते पक्षी तिथेच राहतात. पिल्लू पुरेसे मोठे झाले कि ते पहिले उड्डाण
करतात, आणि ते पहिलेच उड्डाण असते तब्बल २,००० किमीचे.

हा त्रिकोणी भाग आपल्यापासून केवळ ५० फूट खाली असेल. पण ते पक्षी
तिथे बिनघोर वावरत असतात. साध्या डोळ्यांनीही त्यांचे सहज निरिक्षण करता
येते. (मला कौतुक वाटले कि इतर वेळ एवढी मस्ती करणारे ते तिघे, त्या ठिकाणी
मात्र अत्यंत जबाबदारीने वागत होते. त्या पक्ष्यांना दगड मार, किंवा पायर्‍या सोडून
बाहेर जा, असे त्यांनी अजिबात केले नाही. असे करु नका, असे त्यांना एकदाही
सांगवे लागले नाही.)

मग खाली उतरून आम्ही त्या खडकावर गेलो. तिथे मात्र त्यांना मस्ती करायला
मुभा होती.
मग आम्ही तिथे जेवण करुन परत फिरलो, तरीही सूर्य अजून बराच वर होता.
तिथे खेळायची पण सोय होतीच. (फक्त भेळेच्या गाड्या, फुगेवाले, तेलमालिशवाले
वगैरे वगैरे नव्हते. )
ती आमची यावेळची शेवटची भेट होती. त्यामूळे तिघांचे चेहरे रडवेले झाले होते.
मला मिठ्या मारुन रडणे, वगैरे सगळे प्रकार करुन झाले. लवकरच परत येईन असे
म्हणत, मी निरोप घेतला.

तर या बीचची हि सचित्र ओळख. ( त्यावेळी सूर्य बराच वर असल्याने थोडीफार ग्लेअर
आहेच शिवाय ते टिपीकर बीचवरचे सूर्यास्ताचे फोटो नाही काढता आले. )

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

बाकिचे माझ्या फेसबुक पेज वर आहेत. (Dinesh Shinde )

गुलमोहर: 

यो, तूम्हा दोघांचाही असा कुणीतरी चोरुन काढलेला फोटो, इथे डकवायला मिळावा, अशी फार इच्छा आहे.

अनिताताई, मलाही अगदी हेच वाटले !!

मस्त .. २० नी २२ खुपच आवड्ले .. २८ Happy इकड्च्या मॅरीड लोकानां कुठेपन फोटो काढायची होस.. Griffth Observatory आहे इथे लॉस एजंल्स मधे तिथे होतं एक कपल पण समोर हॉलीवुड लिहिलेला डोंगर आहे पण एकही फोटो नाही घेतला तिकडे !!

यो, तूम्हा दोघांचाही असा कुणीतरी चोरुन काढलेला फोटो, इथे डकवायला मिळावा, अशी फार इच्छा आहे. >> मलाही अशा जागी उडी मारुन फोटो काढून घेण्याची फार इच्छा आहे.. Lol

मस्त!!!

हो नितीन, विवर आहे पण फार खोल नाही. ओमानमधल्या सलालाहच्या किनार्‍यावर अशी खोल विवरे आहेत, त्यातून दर लाटेला, खुप मोठे कारंजे उसळते.

सगळे फोटो अप्रतिम. खरंच डिस्कव्हरी वगैरे बघितल्यासारखे वाटतेय. दिनेशदा, तुमच्यामुळे जगाची सफर घरबसल्या घडतिये!

शांकली, सगळे खरेच अदभूत होते तिथे.
हे पक्षी घरटे वगैरे बांधत नाहीत. तिथल्या जोरदार वार्‍यात नुसती खडकावर घातलेली अंडी कशी टिकत असतील ?
एरवी अशा अंड्यांवर कोल्ह्यासारखे प्राणी टपलेले असतात, पण ती जागा अशी आहे कि तिथे बाकीचे प्राणी जाऊ शकणार नाहीत. (न्यू झीलंडमधे हिंस्त्र प्राणी, नैसर्गिकरीत्या आढळत नाहीत.)

हे पक्षी एकदा उडून गेले तरी ५/६ वर्षांनी जोडीदार शोधायला आणि अंडे घालायला, त्याच जागी परत येतात.
काही फोटोत दूरवर उडणारे पक्षीही दिसताहेत.

मी आत्ता फक्त फोटो पाहिले.... निळा निळा, अथांग निळा रंग पाहूनच डोळे निवले. आता परत एकदा पाहेन फोटो आणि मग वर्णन वाचन. Happy

<<<<आणि त्या डोंगरावर जायला सुबक लाकडी पायर्‍या दिसल्या. आता वयोमानानुसार
मला डोंगरावर चढायची हौस राहिलेली ना>>>> दिनेशदा, हे वयोमान म्हणजे किती Happy
फोटो सुंदरच आहेत. सर्व पक्षी कसे अगदि नेमून दिलेल्या जागी बसलेत. असे वाटतेकी, वर्गात शिस्तीत बसलेले विद्यार्थीच!

प्रज्ञा, मी जन्मलो तेव्हा देवानंद खराच तरुण होता, आणि दादामुनि, नुकतेच चरित्र भुमिका करु लागले होते. रेशनिंगचा जमाना होता. लढाईचे दिवस होते... !!!

ती २८ वाली, नवी नवरी बाहुलीसारखी देखणी होती. (क्लोजप देऊ शकेन, पण नको.
खाजगीपण जपले पाहिजे.)

अप्रतिम रेझ टु एन. Happy

प्रची १३ मधे पक्षी बसलेत त्यावर एक सिंहाच्या तोंडाचा आकार तयार झालाय. जणु तो त्यांचे रक्षण करतोये.

मस्त वाटले सर्व प्रची, तो बीच, तो निसर्ग. आहाहा. ईथे आता उन्हाळ्याची चाहुल लागतेय वर त्यात असे गार गार पाणीदार फोटो Happy

मस्त मस्त!! तो पक्षी काय देखणा दिस्तोय शेवटच्या फोटोत!!!
निळ्याशार पाण्याचे फोटोही मस्तच! Happy