''विज्ञान''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 February, 2012 - 22:36

सौख्य भोगाया कुणाला भान आहे
वेदनेशी बांधले संधान आहे

फार अपमानीत झालो,...होत आहे
अन जगाला वाटतो सन्मान आहे

दुश्मनांची याचना करतो अताशा
आपल्यांचे घातकी अवसान आहे

आणले भानावरी अवघ्या जगाला
त्यामुळे बहुधा जरा बेभान आहे

रोज वस्तीतील गजबज वाढताहे
राजरस्ता आजही सुनसान आहे

तो विचारी,''काय बाप्पा दूध घेतो''?
हात जोडत बोललो,'' विज्ञान आहे''

ऐकवा, इर्शाद!! कोणी बोलले का?
संपले ''कैलास''चे आख्यान आहे.

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

आणले भानावरी अवघ्या जगाला
त्यामुळे बहुधा जरा बेभान आहे>> व्व्वा

तो विचारी,''काय बाप्पा दूध घेतो''?
हात जोडत बोललो,'' विज्ञान आहे''>> मस्तच

स्वच्छ व छान गझल

अभिनंदन

-'बेफिकीर'!

डॉक ..खूपच टोकदार आणि जबरी शेर झालेत सगळेच. उत्तम गझल आहे. अभिनंदन !

.
विज्ञान वाला शेर ठीक वाटला.

.

सही Happy

छान.

चांगली गझल आहे!
शेवटचा शेर खूपच छान जमलाय! पण आम्ही नेहमी इर्शाद म्हणत असतो... माणसं ऐकत्यात हो बुवा, तुमी अख्यान चालू ठेवा!

रोज वस्तीतील गजबज वाढताहे
राजरस्ता आजही सुनसान आहे >>> खरा राजरस्ता पहिल्यापासूनच बाजूला पडला आहे. हे वस्तीवाले पोपटपंची करून, उघडे वाघडे नाचून गर्दी वाढवतात. राजरस्त्यावरच्या हत्तीला चोच नाही. पण सोंड आणि दात आहेत. असो, हा शेर खूपच आवडला.

सौख्य भोगाया कुणाला भान आहे
वेदनेशी बांधले संधान आहे..............वा!!!

फार अपमानीत झालो,...होत आहे
अन जगाला वाटतो सन्मान आहे......ह्म्न!

दुश्मनांची याचना करतो अताशा
आपल्यांचे घातकी अवसान आहे.......खल्लास!

आणले भानावरी अवघ्या जगाला
त्यामुळे बहुधा जरा बेभान आहे..........क्या अ‍ॅटीट्यूड ! वा वा वा

आवडली गझल

वा! सुंदर. आवडली.

तो विचारी,''काय बाप्पा दूध घेतो''?
हात जोडत बोललो,'' विज्ञान आहे''>>>>

यावरून एक किस्सा आठवला. आमच्या संस्थेत एकदा इंदिरा गांधी आलेल्या होत्या.
त्यांनी एक बटन दाबायचा अवकाश की एका संयंत्राचे उद्घाटन होणार होते.
त्यांनी बटन दाबलेही. मात्र झाले काहीच नाही.

त्यावर त्या म्हणाल्या:

"ओह. हाय टेक"

रोज वस्तीतील गजबज वाढताहे
राजरस्ता आजही सुनसान आहे... मस्त शेर!!

चांगली गझल!!! Happy