Mee Amour..

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गार काळ्या कातळाखालून
तप्तशुभ्र झरा उसळी मारुन वर येताना
मी लाल बनारसी रेशिम असते
आणि त्यावर जरतारी बुंदके असतात.
माझ्यावरची नक्षी मला आवडते.
मी खेळत रहाते
तुझ्या डोळ्यातल्या मधाच्या ठिपक्याशी
चमकत असतो तो.
माझ्या नाकात चमकी आणि पायात जोडवी सुद्धा असतात
तेव्हा तुझ्यासाठी
भांगात बिंदी आणि केसांत चांदण्यांसारखी फ़ुले खोवलेली
तुला आवडतात म्हणून
मला डोळे भरुन काजळ घातलेलं आवडतं
तेव्हा
आणि हातभरुन रंगीत काचेच्या बांगड्या घालायलाही
मला आवडलेलं असतं.
मला लवलवती रेशिम पात म्हणून हाक मारणारे महानोर तेव्हां आवडतात
आणि बोरकरही
जेव्हा तुझ्या वीजेचं चांदपाखरु माझ्या कवेत असतं.
मला बिडी आवडते तेव्हां आणि जळत राहीलेलं जिगरही.

I play for yu. For the twinkle in your eyes
when I rant in Hindi
क्या हैं..

तेव्हा मला आवडतात
गुलाबी कोडं सोडवणार्‍या शृंगारिक लावण्या मंचकावर बसून म्हणायला.
ढोलकीचा ताल अंगात भिनत जाताना त्यांचा अर्थ तुला समजावून सांगताना
मला आवडत रहातं.

माझ्या नावातली लाज माझ्या देहावर शिल्लक राहीलेली नसते
आणि तु त्याचा अर्थ त्यावर कोरत रहातोस.
You bring out my name in me.

मी नीलमोहोर आणि मोहाच्या फ़ुलांचा गुलाबी बहर
माझ्यातला लालजर्द पलाश
आणि सोनसळी अमलताश
गॅलरीत तु जमवलेले कॅक्टस आणि क्रोटॉन्स
निलगिरीचा कुंद वास आणि मेंदीचा लाल श्वास
माझ्यात भरुन उरलेला
तेव्हा.

मिनियाबर्गवरच्या त्या जुनाट दगडी बंगल्याच्या कुंपणावर
लावलेल्या पॅन्सीची पानं
मी चावत राहीलेली असते तुझ्याशी
बोलण्याच्या नादात
माझे ओठ जांभळे पडेपर्यन्त.
आणि तुझ्या हातांचे पंजे
रुतत राहीलेले असतात माझ्या
पालथ्या मनगटावर
त्यांना लाल रंग चढेपर्यंत
पण मी तक्रार करत नाही.

जंगली गुलाबांनी भरलेल्या बागा
आणि रिकामी फ़ायरप्लेस
दरीतून लोटालोटानी वर आलेल्या
धुक्याचा वास
माझ्या अंगाला
कालीघाटावरच्या तुझ्या घराच्या अंगणातली
रातराणी मी बनते जेव्हा तु तो हुंगत रहातोस
माझ्या मानेवर तुझे ओठ खुपसून.

ये माझ्या शेजारी बस. जमिनीवर.
मला न जमलेली पोश्तो करी
हिरव्या पानांच्या द्रोणातली नारळाची बर्फ़ी
आणि मला नीट जमलेलं आम्रखंड
तुझ्या बोटांचा चिकटपणा विसरुन
केलेलं प्रेम
माझ्या पाठीवर आणि पोटावर.

मी म्हणायचं असताना तु हम म्हणतोस
आणि त्या प्रत्येक वेळी माझ्या घोळदार स्कर्टच्या घेरात
तुला मी लपवून ठेवते.
तु शोधत रहातोस
तुला आणि मला.
धुपाच्या कांडीच्या चंदनी धुरात
तु गुदमरतोस
तुझ्या ऐंशी वर्षांच्या आजीची आठवण तेव्हां मी काढते
तुझ्यासाठी.
माझ्या डोळ्यात सेपिया धुळीची वादळं
आणि कच्च्या हिरव्या कैरीच्या बागा
कालीघाटावरच्या पुजारणींचा लाल सिंदूर
मी भरुन घेते
तुझ्यासाठी.

मी खेळत रहाते.
तुझे डोळे बंद आणि घट्ट मिटून घेतलेले असताना
तुझ्या अंगावर पसरत रहाते.

फक्त तुलाच अधिकार आहे मला हाक मारायचा
राणी
आणि माझ्या बिछान्यात ब्रेकफ़ास्ट फ़क्त तुच
आणू शकतोस
माझ्यासाठी
आणि कधीकधी व्हिस्कीसुद्धा.

कलोनच्या पाण्याचा गंध
गच्चीत प्यायलेली वाईन
आणि तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी दिलेल्या
उसाच्या करव्यांमधे दात रुतवताना ओघळून पडलेले
गोड रसाचे थेंब
तुला माझ्यात आठवत रहातात
तेव्हा.
You bring out everything in me.

निळ्या काचांच्या तुझ्या स्टुडिओत
तुझ्यावर पहिल्यांदा केलेलं प्रेम
तिथल्या त्या जुन्या सागवानी पिवळ्या
लाकडी फ़रशीच्या वासासकट
माझ्यात भिनून राहिलेलं आहे
माझ्यात मुरलेलं आहे
मी त्यात गुरफ़टून राहीलेली आहे
माझ्यात ते धुमसत आहे
मला ते नकोस झालेलं आहे
माझ्यातून ते बाहेर पडत नाहीये.
थंडगार बर्फ़ाळ जमिनिवरची उघडी पावलं
एअरकुलर मधला वाळ्याचा वास
उन्हाळ्यातल्या तुझ्या गच्चीवरच्या बरसातीतला.
टपटपलेल्या प्राजक्तांच्या फ़ुलांखालच्या ओल्या मातीचा वास
आणि उफ़ाळून आलेल्या वाफ़ा
तुझ्या माझ्या कातडीला पोळून टाकणार्‍या

You remind me of all these.
The forgotten, pushed away,
Hidden parts of me,
You are the one I spin these yarns for,
At 4 am,
Overworked and sleep deprived.
Let me love yu.
(You do.)
Let me show yu.
(kyunki)
You do. Yes. You do.
come call me jaan, like yu do.

कशाची तरी कसली तरी अ‍ॅनिवर्सरी साजरी करताना
मधली सारी अंतरं मोजून पहाताना
तुला मी आणि मला तू
शोधत रहातोय
आपापल्या जगात..
You bring out the lost world in me.

विषय: 
प्रकार: 

मस्त....मस्त.... ओठांखाली ठेवून दातांनी जरासं दाबताच टच्चकन् रस पाझरणार्‍या, मुखात त्याचा दरवळणारा स्वाद कायम ठेवून हलकेच विरघळणार्‍या मघई पानासारखं....

ट्यु, तू ठरविलेच आहेस का मला पुन्हा पुन्हा तुझ्या लिखाणाच्या प्रेमात पाडायला?
It is a delightful experience to read this. बस्स!!!!

पॅशनेट एक्सप्रेशन...मधल्या मधल्या त्या वाईल्ड छटा खुप भावल्या.....अन अव्यक्ताला अधोरेखीत करत व्यक्त करणंही ....सगळच आवडलं...अन ज्या रेंजमध्ये ते बसवलय ते अफलातूनच !!!
मायबोलीवर मी आतापर्यंत वाचलेल्या अन अतिशय आवडलेल्या लिखाणापैकी एक !!! जियो !!!

ट्यु, co incidentally तुझं हे expression वाचतांना मी YouTube वर सिलसिला मधिल गाणी बघत होते. 'ये कहा आ गये हम', 'मै और मेरी तनहाई' , 'नीला आसमान सो गया'
आणि तुझ्या लिखाणातील ब-याच गोष्टी त्या गाण्यांमधे आपण बघतोय असे वाटले. त्या गाण्यांच्या मुड ने मला तुझा लेख अजुनच एका वेगळया विश्वात घेउन गेला. It is just co-incidence, but this combo of your article and those songs was good.

.

हे एक मायबोलीवरचं टाईमलेस क्लासिक. पारायणं झालीत. आता मात्र मी ठरवलंय, जितक्या वेळा वाचेन तितक्या वेळा लिहीन इथे. सुंदर!!

बाप रे !

कसलं सुंदर ... शप्पथ ! काहीही सुचत नाहीय्ये वाचून झाल्यावर !

बस्स .. एक जबरदस्त फील घ्यावासा वाटतोय !!

कधीतरी वळीवाच्या पावसात सापडल्यावर
वळचणीला उभी असताना..
भिजल्या मातीचा गंध
पलिकडच्या गोठ्यातल्या हंबरणा-या वासरासारखा
अवचित नाकात शिरतो
आणि मग
उन्हाच्या उन्हाच्या होरपळलेल्या तनमनाला
गुलाबपाण्याची थंडाई मिळावी

असं काहीसं झालं..
खरं तर शब्द कमीच पडले
Happy

अप्रतीम!!

कधीतरी वळीवाच्या पावसात सापडल्यावर
वळचणीला उभी असताना..
भिजल्या मातीचा गंध
पलिकडच्या गोठ्यातल्या हंबरणा-या वासरासारखा
अवचित नाकात शिरतो
आणि मग
उन्हाच्या उन्हाच्या होरपळलेल्या तनमनाला
गुलाबपाण्याची थंडाई मिळावी>>>>
हे ही मस्तच!!!

उफ्फ ..

कसलं जबरी आहे हे... काहीतरीच भन्नाट आहे. काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचतच नाही.. जादू आहे सगळी !

अफलातून शर्मिला!!!! मीही ही कविता अगदी हावरटसारखी वाचली. मी कविता म्हणतो आहे कारण मला ही कविता वाटली. संग्रही ठेवणार आहे.

कसलं ग्रेट !
आकृतिबंध माझ्यासारखाच कि.. पण शब्द काय आहेत एकेक ! नेमके आणि अचूक, देखणे आणि टपोरे, नाजूक आणि हळुवार... आपल्याला कधी जमणार ही अशी कलाकुसर ?

कविताच ती....

अतिशय तरल
लव्हेबल...

कितीदा वाचावं समजत नाही....

पुन्हा पुन्हा प्रतिसाद द्यावा लागतोय.. पण हे काहीतरीच सुंदर आहे. हा थ्रेड दिसला कि उघडला जातोय आणि हेल्पलेसली त्यात गुंतून जायला होतंय..

ही बाई आहे कुठे.. एवढं जबरदस्त ट्रेलर दाखवुन अजुन काही का लिहित नाही?? २०१० पासुन गायब??

उफ्फ!
कसलं क्लासिक आहे हे! वाचत गेले.. वाहत गेले... शेवटी अगदी तृप्तता!
खरच होपलेसली ऑसम आहे हे!
वाह!
आत्ताच्या आत्ता कित्येकदा वाचलं ते सांगता येणार नाही!

Pages