माझ्या मनातील 'त्रिवेणी' एक अनोखा संगम.

Submitted by किंकर on 29 January, 2012 - 18:34

आज अचानक माझे एक मित्र श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी 'सहज सप्रेम' म्हणून भेट दिलेले,
थोर रचनाकार श्रेष्ठ कवी गुलजार यांचे त्रिवेणी हे पुस्तक हाती आले.
दहा वर्षांपूर्वी वाचून हातावेगळे केलेले हे पुस्तक,आज गतस्मृतींना उजाळा देवून गेले.
पुस्तकात गुलजार यांच्या रचनांचा भावानुवाद कवियत्री शांता ज. शेळके यांनी केलेला आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या या प्रकाशनाच्या मलपृष्ठावर -
'त्रिवेणी' हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा आकृतिबंध.
कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही.
हि त्यांची कवितेला देणगीच ! या अल्पाक्षरी कवितेत
पहिल्या दोन कवितापंक्तींचाच गंगायमुनेप्रमाणे संगम होऊन कविता पूर्ण होते.
मात्र या दोन प्रवाहाखालून जी सरस्वती गुप्तपणे वाहते,
ती ते अधोरेखित करतात, तिसऱ्या काव्यपंक्तीने.
गुलजरांच्या कवितेतून प्रामुख्याने भिडते ती त्यांच्या अंतरातील 'खामोशी'.
या 'खामोशी'च अंगभूत सामर्थ्य असं,
की ती त्यांच्या अनुभूतींतूनच पुर्णत्वानं व्यक्त होते:
त्यांची कविता यामुळेच मिताक्षरी व तरल आहे.
कधी प्रिय व्यक्तीच्या हरवण्यानं व्याकूळ असते, तर कधी
सामाजिक विसंगतींची खंत करते.
सोबत असतं समृद्ध आकलनातून येणारं भाष्य आणि
जगण्यातलं निखळ सत्य !
याप्रमाणे छापलेला परिच्छेद पुस्तकात डोकावण्यास आपल्याला उद्रूक्त करतो.
मीही असेच या पुस्तकात सहज म्हणून डोकावले खरे, पण केंव्हा त्यात बुडून गेलो हे माझे मलाच कळले नाही.
या वेगळ्या आकृतिबंधाच्या विविध रचनांची त्रिवेणी आपण जेंव्हा उलगडतो तेंव्हा पहिलीच भेटलेली
रचना असते -
उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पहिले
किती तरी वेळ फांदी हात हलवत होती
निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?
............
आणखी एक रचना या आकृतीबंधात मध्येच मला भेटली-
बांगड्यांचे तुकडे रुतले, पावले रक्ताळली
अनवाणी पायांनी खेळत होते पोरगे अंगणात
काल बापाने दारू पिऊन आईचा हात पिरगळला होता!

निसर्ग, वास्तव आणि त्याच बरोबर प्रेम असे अनेक पदर किती सहजतेने उलगडत जातात ते पाहून मन हरकून गेले.
मूळ सृजन काव्य आणि त्याचा तितकाच तरलतेने शांत शेळके या थोर कवियत्रीने केलेला भावानुवाद,कोणते काम श्रेष्ठ मानावे हाच मनात प्रश्न पडतो.
एकूणच या काव्य संग्रहाबाबत आपले मनोगत मांडताना गुलजार म्हणतात.....
त्रिवेणी वाहू लागली ......
अगदी प्रारंभी जेंव्हा मी कवितेचा हा विशिष्ट आकृतिबंध
निर्माण केला ,तेंव्हा हि त्रिवेणी शेवटी कोणत्या संगमाला जाऊन
मिळणार आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती. या रचनेला
मी 'त्रिवेणी' नाव दिले ते येवढ्यासाठीच,की इथे पहिल्या दोन
कवितापंक्तींचाच गंगा-यमुनेप्रमाणे संगम होतो आणि एक संपूर्ण
कविता तयार होते.पण या दोन प्रवाहांखालून आणखी एक
नदी वाहते आहे.तिचे नाव आहे सरस्वती.पण ती गुप्त आहे.
डोळ्यांना दिसत नाही. 'त्रिवेणी'चे काम हि सरस्वती दाखवून
देणे आहे.सरस्वती म्हणजे तिसरी काव्यपंक्ती. ती पंक्ती पहिल्या
दोन पंक्तीमध्येच कुठे तरी लपली आहे.अंतर्भूत झाली आहे.
एकोणीसशे बहात्तर-त्राहात्तर साली, प्रसिद्ध साहित्यकार
कमलेश्वरजी 'सारिका' मासिकाचे संपादक असताना 'त्रिवेणी' हि
'सारिका'मधून प्रकाशित होत होती आणि आता -
'त्रिवेणी' वयात यायला सत्तावीस-अठ्ठावीस वर्षे जावी लागली.

इतक्या तरलतेने लिहताना ते किती अंतर्मुख झाले असतील नाही.
त्यांचे काव्य हे इतके उत्कट आहे की काय वाचू नि किती वाचू
असेच होते. मी त्यांचे हे आकृतिबंध वाचताना -

किती तरी आणखी सूर्य उडाले आसमंतात ...
मी आकाशाचे गूढ उकलत होतो
ती टॉवेलने ओले केस झटकत होती!

या त्यांच्या आकृतीबंधात अक्षरशः अडकून गेलो.
तसे पहिले तर त्यात मध्येच टॉवेल हा शब्द
येतो पण शेवटी भोवतालचे निरक्षण माणसाला
किती सहजतेने भावूक बनवते याची साक्ष
म्हणून मला हि रचना खूपच भावली.
हा संग्रह प्रकाशित करताना पहिल्या पानावरच
गुलजारजी लिहतात -
शांताबाई -
आप सरस्वती की तरह हि मिली I
और सरस्वती की तरह हि गुम हो गयी I
ये 'त्रिवेणी'
आप हि को अर्पित कर रहा हूँ I
गुलजार

या आकृतिबंधाच्या वाचनाने आलेल्या भारलेपणातून मला काही रचना स्फुरल्या त्या अशा -

“एक शब्द नको बोलूस”,म्हणत ती फिरली माघारी.
तेंव्हाच त्याने केली आपल्या प्रपंचाची तयारी
आजही तो गप्पच असतो, कारण त्याला आवाजच नसतो.
..................................................
"मला यावर काहीच नाही बोलायचे
तूच ठरव आता पुढे कसे वागायचे"
ऐकता त्याचा त्रागा, तिने नक्की केले लग्नाचे.
.................................................
तो म्हणाला तिला " नको पाहूस कधीच वाट माझी,
आहेत आता तुझे माझे मार्ग वेगळे "
तेंव्हा ओठी तिच्या शब्द आले, "सुरु होण्या आधीच का संपले सगळे "
.......................................
तिच्या गालीचा रक्तिमा सांडला क्षितिजावर
थकून भागून परतणारा 'मित्र'थबकला वाटेवर
पाहून रूप तिचे तोच लपला ढगाआड,फांदीवरून झेपावले एक पाखरू उनाड.
............................................
आज पुन्हा पाऊल वळले त्या नेहमीच्या वळणावर
वाट पहात उभी ती पलीकडच्या किनाऱ्यावर
रस्ता त्याचा तोच होता, पण मधला पूल कोसळला होता.
................................................
उचलत प्याला तो बोलला, मी नेहमीच नाही घेत काही,
विसरण्या तिला याहुन सुंदर पर्याय नाही
रिचवून पहिला पेला, आठवणीत तिच्या तो बुडून गेला.
...............................................
सांजवेळी नेहमीचा रस्ता झाला धूसर
परतणाऱ्या पाखरांनी केले त्याला कातर
परतीच्या पाऊलखुणा दिसतात का याची खात्री कर फारतर.
......................................
मित्रहो,
आपण कवी गुलजार यांचा हा थोडा हटके असलेला आकृती बंध जरूर वाचा.
कवी गुलजार आणि त्यांचा रचनांचा भावानुवाद करणाऱ्या कवियत्री शांता ज. शेळके यांना,
विनम्र अभिवादन करून माझा हा प्रयत्न आपणास आवडेल अशी आशा करतो..

गुलमोहर: 

वा ! क्या बात है. जस चार ओळीची चारोळी तशी तीन ओळींची त्रिवेणी.

ही जर काव्य कल्पना कवी गुलजार यांची असेल तर सर आखोंपर

काही वर्षांपुर्वी मायबोलीकर सुनिल जोग यांनी कुणाच्यतरी त्रिवेणी कविता असलेल्या ब्लॉगची लिंक पाठवली होती. मला त्यावेळी हा प्रकार फारसा रुचला नव्हता.

जर तीन ओळीत आशय स्पष्ट होत असेल किंवा सरस्वती नदीसारखा एखाद्या शब्दाचा त्या वाक्यातला अर्थ शोधावा लागत असेल आणि त्यातुन आनंद मिळत असेल तर ती त्रिवेणी आनंददायी नक्कीच असेल.

किती सुन्दर कविता आहेत नाही?
पुस्तकातील तुझा अभिप्राय पण आवडेला
धन्यवाद!

छान.

गुलजारच्या 'त्रिवेणी' मलाही फार आवडतात, पण त्यांचा अनुवाद मात्र फार विशेष वाटत नाही- तो शांता शेळके यांनी केलेला असला, तरीही ! "बाप ने कल दारू पीकर मां की बाह मरोडी थी" मधला पंच "काल बापाने दारू पिऊन आईचा हात पिरगळला होता!" यात कुठेही येत नाही. त्रिवेणी वाचावी, तर मूळ भाषेतच.
खरं तर कुठल्याच उत्कृष्ट काव्याचा, त्याला न्याय देणारा अनुवाद अन्य भाषेत होऊ शकत नाही असे मला वाटते.

वानगीदाखल-

"इतनी लंबी अंगडाई ली लडकी ने
शोले जैसे सूरज पर जा हाथ लगा,

छाले जैसा चांद पडा है उंगलीपर !"

याचा मराठी अनुवाद करून पहा बरे ! Happy

प्रज्ञा १२३- धन्यवाद.
ज्ञानेश - आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद.
प्रत्येक भाषेचा स्वतःचा एक बाज असतो,त्यातील प्रत्येक गोष्ट अनुवादात पकडणे केवळ अशक्य. म्हणून अनुवादापेक्षा भावानुवाद काही वेळेस भावतो इतकेच.
उदाहरणार्थ गदिमांनी रचलेले'बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला'... हे गीत 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में' यावरून रचले आहे. किंवा त्यांचेच-'लळा जिव्हाळा शब्दची खोटे' या गीताचे शब्द मला नेहमीच 'कसमे वादे प्यार वफा सब बाते हैं बतोंका क्या' याची आठवण करून देतात.
अर्थात कवी गुलजार यांचे हिंदीतून आलेले काव्य हिंदीतच वाचण्यातील मजा नक्कीच काही औरच. या आपल्या मताशी सहमत.

वाह क्या बात है!!! अप्रतिम.
>>>>आज पुन्हा पाऊल वळले त्या नेहमीच्या वळणावर
वाट पहात उभी ती पलीकडच्या किनाऱ्यावर
रस्ता त्याचा तोच होता, पण मधला पूल कोसळला होता.

आई ग्ग!!!