शरपंजरी

Submitted by अज्ञात on 24 January, 2012 - 23:47

ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली
रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली
रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली
दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली

हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे
पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे
राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या

मग वाट पहाणे आठवणे गत उरले
नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले
एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे
पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले

.........................अज्ञात

गुलमोहर: 

शरपंजरी मरणे म्हणजे काय हे छान सांगितलेत.. पितामह भीष्म यांच्यानंतरही शरपंजरी मरणे अनेकांच्या नशिबी आलेय.. त्यालाही ही कविता समर्पक होऊ शकेल .
नेहमीच्या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त अशी आशयघन कविता. तुमच्या कविता हा माझ्यासाठी नेहमीच दहावीचा पेपर राहीलेल्या आहेत.

मरणाचा अर्थ विलक्षण परिणामकारक शब्दांत उलगडला आहे. वेदनांतून उमटलेली सर्व मरणं अशीच असतात काय हा एक प्रश्न उरतो.

सुरेख ! शब्दश्रीमंत कविता + १+१
फालकोरांचा मस्त प्रतिसाद.
तुमच्या कविता हा माझ्यासाठी नेहमीच दहावीचा पेपर राहीलेल्या आहेत.>>>>अज्ञातजीनी पेपर काढला असता तर मी उत्तिर्ण झालोच नसतो.

राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या

व्व्व्व्वाह!!!!!

शब्द काय सुरेख वापरलेत!!
Happy

सुंदर कविता ! थोड्या शब्दात तुम्ही बरंच काही सांगता ! थोडं(च) कळतं पण न कळलेलंही छान वाटतं ! मी थोडा "जुनं तेच सोनं" मानणारा ओल्ड फॅशन्ड माणूस आहे. त्यामुळे मला आवडणार्‍या जुन्या कवींशी तुमचं साधर्म्य मला तुमच्या कवितांकडे खेचून घेतं. Happy

शेरलॉक, आपल्या प्रति सादामुळे माझ्या कवितेचा एक नवा पैलु मला कळाला. आनंद वाटला. धन्यवाद. Happy
उल्हासजी आपलेही आभार. Happy

अज्ञात, बहोत खूब. लयीची वेगवेगळी मजा घेऊन येता तुम्ही प्रत्येकवेळी, ते ही वेगळा आशय, आगळी शब्दकळा घेऊन...
काय म्हणू? लिहिते रहा... ही तुमची नाही, आमची गरज आहे.