मायबोली शीर्षकगीत-माझा अनुभव..... माझ्या नजरेतून....(पद्मजा_जो)

Submitted by पद्मजा_जो on 23 January, 2012 - 01:28

"सार्‍या कलागुणांना दे वाव मायबोली....." या आणि यासारख्या आपल्या 'मायबोली'च्या शीर्षकगीताच्या प्रत्येक ओळीची प्रचिती देणारे दिवस पाहणार्‍यांच्या यादीमध्ये माझंदेखील नाव जोडलं गेलं....याचा आनंद शब्दांत मांडणं केवळ अवघडच... संगीत हा विषय तसा जिव्हाळ्याचाच.... मी 'मायबोली'वर सदस्यत्व घेऊन फक्त काही दिवसच झाले होते... नवीन वातावरणाला अजून तितकीशी सरावलेही नव्हते. तेव्हा शीर्षकगीत लेखनाची स्पर्धा पार पडून गेली होती. एके दिवशी सकाळी सकाळी एक धागा दिसला.... 'मायबोली' शीर्षकगीताच्या गायनामध्ये सहभागी होण्यासंबंधी....

प्रचंड आनंद झाला होता तो धागा वाचून. मग म्हटलं.... नाव देऊन पाहू, निवड वगैरे प्रक्रिया असेलच. झाली निवड तर छानच आणि नाही झाली, तरी एक प्रयत्न केल्याचे समाधान.. हो... नाही, हो...नाही करत शेवटी योग (योगेश जोशी) यांना संपर्कातून इमेल केला. आणि नावनोंदणीची तारीख होऊन गेल्यावर २ दिवसातच एक इमेल आला....रिहर्सल्सच्या तारखांसाठी..... हा तसा म्हणायला गेलं तर आनंदाचा धक्काच होता. :)
त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी फार वेगात पार पडत गेल्या.... एकमेकांना इमेल्स, समस... सरतेशेवटी रिहर्सलचा दिवस उगवला... विवेक देसाई यांच्याकडे.. ठीक संध्याकाळी ५ वाजता... योगेशने इमेलमध्येच ठीक ५ वाजताची (धमकी ;) ) सूचना दिल्यामुळे मी बरोब्बर ५ वाजता विवेकदादांकडे पोहोचले... माझ्याआधी सई आणि योगेश आले होते.

जुजबी ओळ्ख झाल्यानंतर मग योगेशने गाणं, चाल समजावून सांगितली. सईने आपल्या उत्तम आवाजात गाणं म्हणायला सुरवात केली. मग हळूहळू मी देखील सुरात सूर मिसळून घेतला.... खरं तर थोडं दडपण आलं होतं. कारण हा पहिलाच सगळ्यांसमोर गाण्याचा अनुभव... पण आता थोडा वेळ होऊन गेल्याने आधी बाहेरच न पडणारा आवाज निदान सुरात बाहेर तरी येत होता. त्यानंतर स्मिता गद्रेसुद्धा आल्या. (जिला मी नंतर स्मिताताई करुन टाकलं) मग यथावकाश सौ. देसाईंतर्फे चहा आणि सामोसा झाला. खाता खाता भरपूर गप्पाही झाल्या.... त्यामध्येच मुंबई आणि पुण्याचं रेकॉर्डिंग एकत्र करुया का यावर च्रर्चा झाली. मग परत एकेकाकडून पूर्ण गाणं म्हणून घेऊन योगेशने कोणाला कुठल्या भागावर मेहनत करावी लागेल ते समजावलं... आणि भरपूर सरावाच्या बोलीवर आमचं रिहर्सलचं पहिलं-वहिलं सेशन पार पडलं.. :)

त्यानंतरचे सगळे दिवस रोज गाण्याचा रॉ ट्रॅक ऐकण्यात, जमेल तसा सराव करण्यात जात होते.. फोनाफोनी करुन रेकॉर्डींगच्या आधी एकदा परत गाणं एकत्र म्हणण्याचा बेतही राहूनच गेला. आणि मग शेवटी रेकॉर्डींगच्या दिवशी सकाळी भेटायचे ठरले...त्यासाठी योगेश दुबई-मुंबई-पुणे असा खरोखर कौतुकास्पद प्रवास करणार होता.... मिलिंद आणि प्रमोद देव(काका) मुंबईहून योगेशबरोबर मिलिंदच्या गाडीतून येतील असे ठरले....
अखेर रेकॉर्डींगचा दिवस उगवला. स्मिताताईकडे जमायचे ठरले. त्याप्रमाणे वेळेत मी, सई आणि विवेक तिकडे हजर झालो. पण स्मिताताईला ऑफिसमध्ये थोडं काम असल्याकारणाने ती ३ वाजेपर्यंत परत येणार असल्याचे कळले. तो पर्यंत आम्ही तिच्या घरी थांबून गाण्याचा सराव करणार होतो. साधारण ११.३० पर्यंत योगेश, मिलिंद आणि देवकाका आले... सईच्या ओळखीमुळे एक कॅसिओ अरेंज झाला होता. त्याची आम्हाला गाण्याचा सराव करताना मदत झाली.

IMG_1251.jpg

एकूणच प्रथितयश गायक मंडळींची गाण्याआधी ज्याप्रमाणे तयारी चालू असते, तशीच आमची देखील चालू होती. टेंशन कमी करण्याचे काम मिलिंद, देवकाका आणि योगेश करत होतेच... अखेर सगळ्यांच्या सेपरेट रिहर्सल झाल्या आणि योगेशकडून "चांगलं म्हणताय" ऐकल्यावर जीव भांड्यात पडला :) मग सगळे पोटोबा करायला बाहेर पडलो.. विशाल कुलकर्णी आणि गिरीराज खास सगळ्यांना भेटायला आले होते. मग जेवणावर ताव मारत, बराचवेळ गप्पा रंगल्या. त्यानंतर मुंबईवाल्यांना पुण्यातल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना भेटायचे असल्याने ते इच्छित ठिकाणी जाऊन वेळेत स्मिताताईकडे परतील असे ठरले.

मी आणि सईने स्मिताताईकडेच थांबायचे ठरवले. त्याप्रमाणे घरी जाऊन शांततेमध्ये बसलेलो असतानाच दरवाजा वाजला... दरवाजा उघडल्यावर समोर साक्षात देव.. (देवकाका ;) ) त्यांचे नातेवाईक घरी नसल्याने ते परत आले होते. पाठोपाठ मिलिंद, विवेकही आले. मग योगेश आणि स्मिताताई येईपर्यंत पुन्हा गप्पा रंगल्या. चहापान आणि स्मिताताईची रिहर्सल पार पडून मग आम्ही स्टुडिओकडे प्रस्थान केले. स्टुडिओचा पत्ता शोधण्यात थोडा वेळ घालवल्यानंतर एकदाचा तो मिळाला.

स्टुडिओ.... अहाहा.... प्रथमदर्शी एकदम साधाच वाटला होता. पण जेव्हा आतमध्ये असणार्‍या रेकॉर्डींगच्या रुम्स पाहिल्या...तेव्हाचा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे. माईक्स, हेडफोन्स, कंप्युटराइज्ड रेकॉर्डींग प्रोसेस टेक्निक्स...सगळंच पाहायचा आणि अनुभवायचा हा पहिलाच प्रसंग...आनंद, एक्साईटमेंट, टेंशन सगळ्या संमिश्र भावना येत होत्या.

सगळ्यात आधी कोरस रेकॉर्डींग पार पाडायचं ठरलं. त्याप्रमाणे मी, सई, स्मिताताई एका माईकसमोर अन् मिलिंद, विवेकदादा, देवकाका दुसर्‍या माईकसमोर.... मग चुकत माकत, अडखळत... आणि मग सवय झाल्यावर कॉन्फीडंट्ली कोरस रेकॉर्डींग झालं. मग चहा-कॉफी ब्रेक नंतर individual रेकॉर्डींग.

विवेकदादा ओपनिंग बॅट्समन म्हणून गेले होते.. आणि आम्ही बाहेर बसून गप्पांमध्ये बुडालो होतो. जेव्हा रेकॉर्डींग संपवून विवेकदादा बाहेर आले तेव्हा आमची धाकधुक वाढली... एक एक करत सगळेच आत जाऊन आपापल्या परीने उत्तम गाणं गाऊन येत होते. एका अवर्णनीय अनुभवाचे धनी आम्ही सगळेच होत होतो. मग
फायनली माझा नंबर आला..... तो एक क्षण.....तो ही अवर्णनीयच....

मी पहिल्यांदाच एकटी माईकसमोर उभी होते...खूप आनंद होत होता. कधी स्वप्नातही पाहिले नसेल असं माझ्याबाबतीत घडत होतं. फक्त आवड, आवाज बरा यावर गाणं रेकॉर्ड करायची संधी केवळ 'मायबोली'मुळेच मिळाली होती.

IMG_1272.jpg

यथावकाश सगळ्यांची सोलो रेकॉर्डींग्ज पार पडली. मग सगळ्यांनी मिळून आत्तापर्यंत रेकॉर्ड केलेले ट्रॅक्स आम्हाला ऐकवले गेले.... ते ऐकून आम्ही तर '७ वा आसमाँ' वर होतो... :) या सगळ्यामध्ये योगेशचं खूप कौतुक करायला हवं ! आमच्यासारख्यांचं कितीही वेळा चुकलं तरी न चिडचिड करता परत परत सांगणं यासाठी त्यांनी भरपूर पेशन्स ठेवला होता. या शीर्षक-गीताच्या निमित्ताने खूप छान लोकांची ओळख झाली. योगेश, सई, विवेकदादा, स्मिताताई, मिलिंद, देवकाका.....सगळ्यांनीच मी सगळ्यात लहान असल्याने तितकेच सांभाळूनही घेतले.

आणि गाण्याच्या बाबतीत म्हणायचे तर...हा सगळा अनुभवच स्वप्नवत होता. स्वर, ताल, लय यांची जाण असूनही महत्त्वाच्या अशा इतर अनेक गोष्टी असतात याची जाणीव त्यानिमित्ताने झाली. आपल्या 'मायबोली'च्या गाण्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निगडीत सगळ्याच लोकांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.....
अशाच अनेक उपक्रमांमधून आम्हाला पुन्हा संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत!

आता उत्सुकता शिगेला येऊन पोहोचली आहे. आणि आम्ही कधी गाणं ऐकतोय असं झालंय.......
ऐकवा आता...... :) लवकर........ :)

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टुडियोमध्ये..... पद्मजाचा आवाज ऐकवा आणि बक्षिस मिळवा अशी स्पर्धा ठेवली होती...... Biggrin

प्रॅक्टिस सेशन्समध्ये पण गुणी मुलीसारखी गप्प बसून असायची...... "बोललं तर चालतं इथे, शिक्षा म्हणून ओणवं उभं नाही करणार कोणी" असं म्हटल्यावर "तुम्ही इतकं बोलताय ना, म्हणून मी ऐकायचं काम करतेय" असं अत्यंत मंजूळ आणि म्रूदू आवाजात पद्मजा म्हणाली..... व्हायोलिनच जणू Wink

रात्री १ वाजता हिला घरी सोडताना हिच्या दुचाकीच्या मागोमाग आमची चारचाकी फिरवत नेताना कुठून कुठून गल्लीबोळातून गाडी काढत होती... एक दोनदा तर मला वाटलेलं की आता पुढे जाऊन रस्ता संपेल की काय?? Proud

तरी अजूनही हिने व्हायोलिन वाजवून दाखवलेलं नाही.... नेक्स्ट गटगला व्हायोलिनशिवाय हिला एंट्रीच मिळणार नाही. Happy

>>स्टुडिओ.... अहाहा.... प्रथमदर्शी एकदम साधाच वाटला होता. पण जेव्हा आतमध्ये असणार्‍या रेकॉर्डींगच्या रुम्स पाहिल्या...तेव्हाचा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे. माईक्स, हेडफोन्स, कंप्युटराइज्ड रेकॉर्डींग प्रोसेस टेक्निक्स...सगळंच पाहायचा आणि अनुभवायचा हा पहिलाच प्रसंग...आनंद, एक्साईटमेंट, टेंशन सगळ्या संमिश्र भावना येत होत्या.

छान!
स्टूडीयोची गंमतच त्या.. खास पुणेरी स्टाईल बंगला तो त्यामूळे बाहेरून कळणारही नाही (बहुतेक तोच हेतू असावा) Proud
सगळ्यात भारी म्हणजे स्टूडीयो मधला आतला काम करणारा ध्वनीमुद्रण तंत्रज्ञ कुठे आहे हे बाहेर बसलेल्या गुरख्याला विचारले तर आधी "माहीत नाही" मग "ईथच बाहेर गेलेत" अशी दोन ऊत्तरे दोन मिनीटाच्या अंतरावर दिली.. आणि प्रत्यक्षात तंत्रज्ञ (जयदेव) आत स्टूडीयो मध्येच होता. हे असं पुण्यातच होतं काय? Wink
~हलके घ्या पुणेकर्स.

छान लिहिलयस पद्मजा Happy
योग Proud
प्लीज नोट आम्च्या इथल्या गुराख्याला देखील स्टुडिओ आणि साऊंड रेकॉर्रडिस्ट बद्दल महिती असते Proud

प्.जो. मस्त लिहिलं आहेस.. अभिनंदन.. Happy
तु व्हायोलिन शिकतेस हे माहित होते पण गातेस पण हे पाहुन खुपच आनंद झाला.

पज्जी, मस्त लिहिलं आहेस गं. गाण्याची झलक पण मस्त वाटते आहे. आता संपुर्ण गाणं ऐकायची फार उत्सुकता आहे.

धन्यवाद सगळ्यांना...... Happy Happy

नेक्स्ट गटगला व्हायोलिनशिवाय हिला एंट्रीच मिळणार नाही. >>>> भुंग्या... नक्की रे.... Happy

योग Proud

प्लीज नोट आम्च्या इथल्या गुराख्याला देखील स्टुडिओ आणि साऊंड रेकॉर्रडिस्ट बद्दल महिती असते>>> स्मिताताई.... अगदी अगदी Wink

Happy

धन्यवाद अगो.... कधी जमलो सगळे... की व्हायोलिन नक्की ऐकवेन Happy

धन्यवाद अवल, स्वाती२ Happy

अगं चिमुरडे, छाssssन लिहीलंस, भरभरून अगदी..
तुझ्या अनेक चित्रांसारखं हे मनोगतही निरागस वाटलं मला...

अवांतर- तुझं व्हायोलिन वादन आम्हांलाही ऐकायचं आहे Happy