भाग्ययोग - टिटवी व तिची पिले
मागच्या वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात सासवडजवळ रहाणारा माझा मित्र दिनेश पवार याने बातमी दिली की त्याच्या शेताजवळ एका टिटवी दांपत्याने दरवर्षीप्रमाणे ४ अंडी घातली आहेत.
मी चक्रावलोच. कारण माझ्या घरासमोरील पाचगाव टेकडीवर मी कितीतरी वेळा या टिटवीच्या अंड्याचा शोध घेतला होता - पण एकदाही मला त्या जमिनीवर अंडी घालणार्या पक्ष्याची अंडी निरखता आली नाहीत.
ही टिटवी अगदी उघड्यावर अंडी घालते व सतत सतर्क राहून त्याचे रक्षण करत असते आपल्या साथीदारासोबत. त्या अंड्याच्या शोधातला प्राणी जरा त्या दिशेला जायचा अवकाश की ती दोघे असा काही कल्ला करतात की तो त्या अंड्यांच्या बरोबर विरुद्ध दिशेलाच भरकटतो. आणि चुकून त्या अंड्याच्या दिशेला गेलाच एखादा तर त्या जोडीपैकी एक़जण जमिनीवर पडून पंख अथवा पाय मोडल्याचा असा काही अभिनय करतो की ती अंडी सोडून सहाजिकच तो प्राणी त्या पक्ष्याकडे लक्ष देत तिकडेच जातो. हळुहळू तो अभिनय करणारा / करणारी त्या प्राण्याला बरोबर गंडवत त्या अंड्यापासून व्यवस्थित लांब नेऊन अखेर पळ काढतात.
मी न राहवून दिनेशला विचारले - तू स्वतः ही अंडी पाहिलीस का ? का उगाच हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून मला सांगतो आहेस....
दिनेश - उद्या फोटो काढूनच आणतो की...... मग तरी विश्वास बसेल ना ?
हा फोटो दिनेशने काढलेला - ही ठिपकेदार अंडी कशी बेमालूम मिसळली आहेत त्या आसपासच्या खड्यात.... हे खडे कसे बरोबर वेचून आणले असतील या टिटवीच्या जोडीने ??
आणि दुसरी गंमत ही की हे खडे एवढेच काय ते घरटे..... दिनेशने पुढे सांगितले की सतत त्या जोडीपैकी एकजण ती अंडी उबवत असतो - तोवर दुसरा आपले खाणे उरकून व सतर्क राहून अंड्यांचे रक्षण करत असतो - निसर्गात काय काय आश्चर्ये भरली असतील हे त्याचा तोच जाणे.......
ते फोटो पाहून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही........ मनात म्हटले - चला याचि देही याची डोळा ही 'टिटवीची' अंडी तरी पाहता येतील...... पण मधेच अशी काही कामे निघत गेली की ती अंडी फोटोतच राहिली.......
पुढे काही दिवसांनी दिनेशने बातमी आणली - त्याच्या घरच्यांनी संध्याकाळच्या सुमारास त्या अंड्यांच्या आसपास एक मुंगुस व एक नाग फिरताना पाहिले - मी विचार केला..... झालं!!!! - आता काय ती अंडी शिल्लक रहातात या दोन तरबेज शिकार्यांसमोर ?? ..... पण माझा अंदाज खोटा ठरला.... त्या टिटवी जोडप्याने त्या दोघाही अंडीचोरांपासून त्या अंड्यांचे यशस्वीपणे रक्षण केले होते..... मला हाही एक धक्काच होता व मनात त्या टिटवी जोडीचे अपार कौतुकही वाटत होते.
आता दररोज न चुकता मी दिनेशला त्या अंड्यांबद्दल (त्यांच्या ख्याली खुशालीबद्दल) विचारत होतो. मला सगळ्यात आश्चर्य वाटत होते की दिनेश अथवा त्याच्या घरातल्या सर्व मंडळींबाबत ती टिटवी जोडी एवढी निर्धास्त होती...... म्हणजेच मला एक चान्स अजून होता..... त्या टिटवीची पिल्ले पहाण्याचा.....
कारण ते टिटवी दांपत्य जर एवढे या मंडळींवर विश्वासले होते तर ती पिल्लेही काही काळ तिथे आसपासच भटकणार - उडण्याइतकी मोठी होईपर्यंत....... मला अजून एक चान्स होता - प्रत्यक्ष टिटवीची पिल्ले पहाण्याचा....... ती देखील भर रानातल्या टिटवीची....
अखेर एक दिवस दिनेशने सांगितले की पिले बाहेर आली आहेत - पुढे दमही दिला की लगेच २-३ दिवसातच या नाहीतर ती पिले फार भराभर वाढतात - एकदा का पळायला लागली की फोटो काय, नजरही ठरत नाही - उडण्यासाठी त्यांचे पंख तेवढे तयार होत नाहीत लवकर, पण पळण्यात फार लगेच पटाईत होतात.
दुसर्या का तिसर्या दिवशीच तिकडे जाण्यास निघालो. जाण्याच्या दिवशी सकाळपासून ४-५ वेळा माझा फोन झाला की पिले आहेत आसपास की नाही.......कारण टिटवीला जरा काही संशय आला की ती पिले घेऊन लगेच जागा बदलते..... दिनेशने मला बिनधास्त या सांगितले - मे महिन्यातले रणरणते ऊन - ती पिले दुपारी त्याच्या सिताफळाच्या बागेतच फिरत असतात -सावलीमधे..... कुठेही लांब जात नाहीत.....
आता माझ्या जीवात जीव आला....... चला, आता नक्की पिले पहायला मिळणार - या अतिशय सावध व चतुर पक्ष्याची....
दिनेशच्या शेतात जाईपर्यंत गाडी एकदा पंक्चर वगैरे झाल्याने अगदी हायसेच वाटले की... आतापर्यंत सगळे कसं काय बरोब्बर चाललय......
पण मला तिर्हाईताला पहायचा अवकाश ...... त्या टिटवी जोडीने असा काही कल्ला सुरु केला की बास रे बास....- मी दिनेशला म्हटले हा कॅमेरा घे व तूच फोटो काढ..... मी आपला त्या फोटोवरच समाधान मानेन... आता काही ती पिले इथे थांबत नाहीत.....
पण दिनेशचा अंदाज बरोबर होता - दुपारच्या रणरणत्या उन्हात ती असहाय पिले त्या बागेबाहेर जाऊ शकत नव्हती -त्याच्या घरच्या मंडळींनी ती साधारण कुठे असतील ते आम्हाला हातानेच दाखवलं -
मी व दिनेश त्या सिताफळाच्या बागेत भर दुपारी(?) अगदी डोळे फाड-फाडून(?) ती पिले शोधू लागलो - कारण ती पिलेही त्या टिटवीचीच ना.... - त्यांच्या आईबाबांनी - ओरडण्यातून त्यांना "जोरदार खतरा" असा इशारा केल्यावर ती लगेच आहे त्या ठिकाणी जमिनीशी अशी एकरुप व्हायची की बास - शोधूनही सापडणार नाहीत ...... वर ते दोन्ही पक्षी आमच्यावर आकाशातून केव्हाही हल्ला करायला तयारच......
अथक प्रयत्नाअंती ती चार पिले असल्याचे लक्षात आले....... निसर्गाने त्यांच्या अंगावरील ठिपके असे बनवले आहेत की जमिनीवर ती पिले नेमकी कुठे बसली आहेत हे अजिबात लक्षात येत नव्हते.....शिवाय अशी मुडपुन बसत की आता इथे पाहिले तर लगेच कुठे गेले - असे वाटून भिरभिरायला होत होते..... आपले डोळेच काय कॅमेर्यालाही चकवत होती किती वेळ - एक फोकस करायचे तर त्या कॅमेर्याच्या स्क्रीनवर वेगळेच यायचे - अखेर कसेबसे ते उन्-सावली व जोडीला ते कल्ला करणारे, आकाशातून आमच्यावर झेपावणारे पालक पक्षी सांभाळत काही फोटो जमवले....
अजून एक भिती अशी होती की एक पिलू दिसले व त्याचा फोटो काढायला जवळ जाताना सारखे वाटायचे की दुसरे एखादे चुकून आपल्या पायाखाली तर येणार नाही !!!! कारण ही पिले एकदा का जमिनीलगत निपचीत पडून राहिली की किती तरी वेळ तशीच गुपचूप बसलेली - अगदी आपण त्यांच्या जवळ गेलो तरी एवढीही हालचाल न करणारी... त्यांच्या आई-बाबांचे ऑल क्लिअर हा इशारा येत नाही तोवर किती ही वेळ..... एवढी डिसिप्लीन्ड पोरं पाहून माझाच जीव कळवळत होता - न जाणो आपल्यामुळे एखादे पिलू उन्हातच बसून राहिले तर या कडक उन्हात हे किती वेळ तग धरणार.....
एकीकडे या गोष्टीमुळे चिडचिडही होत होती तर कधी निसर्गाची ही विलक्षण किमया पाहून धन्य धन्यही वाटत होतं.......एकंदर, हा सगळा अनुभव घेण्याचाच भाग होता -
आता लिहिताना मजा वाटतीये पण प्रत्यक्षात काय काय गंमती झाल्या हे दुसर्या कोणी माझेच शूटिंग घेतले असते तर हे सगळे बोअर वाचण्यापेक्षा तुम्ही सगळे नक्कीच ती कॉमेडी फिल्म पहाण्यातच रंगून गेला असता .......
हे फोटो काढताना माझी कशी व का "फे फे" उडत होती ते पहा -
रागावलेली व कर्कश्श ओरडणारी पालक टिटवी -
ती पुराणात गोष्ट आहे ना त्या टिटवीची - समुद्राने गिळंकृत केलेली तिची अंडी ती कशी परत मिळवते त्याची - एका अर्थाने त्या पराकोटीच्या जिद्दीची सत्यताच पटली..........एवढासा पक्षी - पण ती अंडी जमिनीवर उबवतो काय, पुढे त्या पिलांचे संगोपन करतो काय - सारेच अशक्य कोटीतले..........
एक आगळंच समाधान मिळालं ते पक्षी, त्याची पिले व एकंदर निसर्गाची किमया पाहून.......
टिटवी म्हणजेच - Red wattled lapwing (Vanellus indicus)
माझे इतर भाग्ययोग -
http://www.maayboli.com/node/24654
http://www.maayboli.com/node/28152
आम्हा मुंबईकरांना टिटवी
आम्हा मुंबईकरांना टिटवी पाहायला मिळणं फारच दुर्मिळ. पुण्याला एका शेतात एकदा खूप लांबून दर्शन झालं होतं टिटवीचं. टिटवीचे जवळून काढलेले फोटो पाहून आज दर्शन झालं!!पिल्लं किती गोडुली आहेत. पाय मुडपून्,अंग चोरून बसली आहेत. अलभ्य लाभ!! धन्यवाद.
वा मस्तच.
वा मस्तच.
त्या टिटवीची - समुद्राने
त्या टिटवीची - समुद्राने गिळंकृत केलेली तिची अंडी ती कशी परत मिळवते त्याची - एका अर्थाने त्या पराकोटीच्या जिद्दीची सत्यताच पटली..........एवढासा पक्षी - पण ती अंडी जमिनीवर उबवतो काय, पुढे त्या पिलांचे संगोपन करतो काय - सारेच अशक्य कोटीतले.......... >>> शशांकजी सुंदर माहीती व प्रचि
छान
छान
शशांक, फारच सुंदर लेख आणि
शशांक, फारच सुंदर लेख आणि फोटो! खरंच फोटोमधे पिले शोधावीच लागतायत. निसर्गाची किमया काही औरच असते!!
वा! मस्त चित्रे! भाग्ययोग
वा! मस्त चित्रे! भाग्ययोग खराच!
मस्त. ही टिटवीही किती बेमालूम
मस्त.
ही टिटवीही किती बेमालूम मिसळली आहे आसपासच्या परिसरात..>> हो खालील फोटोत पाहुन परत वरील फोटोत शोधायला गेले
मस्तच माहिती आणि वर्णनही
मस्तच माहिती आणि वर्णनही
अमोल केळकर
सुंदर वर्णन... निसर्गाची
सुंदर वर्णन...
निसर्गाची किमया थोर!
शशांकजी छान माहीती.
शशांकजी छान माहीती.
मस्त लेख
मस्त लेख
काय मस्त वाटलं असेल ना!
काय मस्त वाटलं असेल ना!
टिटवीची पिल्लं काय गोड दिसत आहेत! 
शशांक.. मस्तच.. जवळून बघायला
शशांक.. मस्तच.. जवळून बघायला मिळाल्याबद्दल धन्यवाद
शशांक अतीशय छान लेख आणी सुंदर
शशांक अतीशय छान लेख आणी सुंदर फोटो.
फारच छान लिहिले आहे व फोटो
फारच छान लिहिले आहे व फोटो पण छान आहेत.
शशांक, मस्त माहिती आणि फोटो.
शशांक, मस्त माहिती आणि फोटो. पिलांचे आणि अंड्यांचा फोटो फार आवडले. तुमच्या चिकाटीलाही दाद.
अथक प्रयत्नाअंती ती चार पिले असल्याचे लक्षात आले....... निसर्गाने त्यांच्या अंगावरील ठिपके असे बनवले आहेत की जमिनीवर ती पिले नेमकी कुठे बसली आहेत हे अजिबात लक्षात येत नव्हते.....शिवाय अशी मुडपुन बसत की आता इथे पाहिले तर लगेच कुठे गेले - असे वाटून भिरभिरायला होत होते..... आपले डोळेच काय कॅमेर्यालाही चकवत होती किती वेळ - एक फोकस करायचे तर त्या कॅमेर्याच्या स्क्रीनवर वेगळेच यायचे - अखेर कसेबसे ते उन्-सावली व जोडीला ते कल्ला करणारे, आकाशातून आमच्यावर झेपावणारे पालक पक्षी सांभाळत काही फोटो जमवले.... <<< सुरेख लिहिलंय.
आमच्या गावाकडे टिटवीला अपशकुनी म्हणतात. ती अखंड ओरडायला लागली की आसपासच्या कोणाचातरी मृत्यु होतो म्हणतात!
वा ! सुंदर लेख... याच
वा ! सुंदर लेख...
याच निरिक्षणातून एक शेर सुचला होता
एक टिटवी टिवटिवत सांगून जाते कैकदा
'संकटांच्या चाहुलीने बनविले सक्षम मला !'
-सुप्रिया.
फारच छान लिहिले आहे व फोटो पण
फारच छान लिहिले आहे व फोटो पण छान आहेत हा धागा आज पाहण्याचा योग आला.
माहिती, प्रचि आणि झब्बु मधे
माहिती, प्रचि आणि झब्बु मधे आस्चिग यांनी टाकलेले फोटो सगळच भारी..
ती अंडी, ती मातीत समरस झालेली पिल्ल..देवा..खरच कळल तुमची काय अवस्था झाली असणार ते..
किती बेमालुमपणे मिसळलीय ती .. खरच पायाखाली आल असत तर.. बापरे.. वाचतानासुद्धा शहारा येतोय मला हे..
आस्चिग च्या पहिल्या फोटोत तर मी बघतच बसली काही सेकंद कि नेमका पक्षी दडलाय कुठ..
धन्य..
आणि माहिती बद्दल धन्यवाद शशांक _/\_
भाग्ययोग खरच!!! आमचासुद्धा!
भाग्ययोग खरच!!! आमचासुद्धा!
तुम्ही दिलेले फोटो अगदी झूम केलेले वाटत आहेत. आणखी १ फुट दूर जरी असते तर तिथे काही आहे हे कुणी सांगून सुद्धा खरे वाटले नसते!!
सर्वांचे मनापासून आभार्स
सर्वांचे मनापासून आभार्स ......
माहिती, प्रचि आणि झब्बु मधे
माहिती, प्रचि आणि झब्बु मधे आस्चिग यांनी टाकलेले फोटो सगळच भारी..>>>> अगदी!
छान लेख आणि छान माहिती..
छान लेख आणि छान माहिती.. हाडाचे निसर्गप्रेमी असल्याशिवाय असे उद्योग जमत नाही.. पण मग मात्र मिळतो तो आनंद अवर्णनीय असतो. फोटो पण मस्तच..
मीही फार वर्षांपुर्वी नेरळच्या सगुणा बागेत टिटवीची अंडी पाहिली होती. त्या मालकांनीच दाखवली. पण पिल्लं नव्हती कधी बघितली.. ती मात्र तुमच्या मुळे पहिल्यांदाच..
पुरंदरे सर, दंडवत स्वीकारावात
पुरंदरे सर,
दंडवत स्वीकारावात अशी विनंती करतो
____/\_____
आम्हाला एकदम आमचे कॅमोफ्लाज कंसीलमेंट चे क्लासेज आठवले! आपण लोकं सगळे काही निसर्गातून शिकतो शिकु शकतो , अगदी "जंगल में घुल मिल जाना सुद्धा", हे पाखरू स्पेशल फोर्सेजचं गुरु आहे राव , अन ते लेंस मधे पकडण्यामागचा तुमचा पेशेंस अतिशय कौतुकास्पद. लै म्हणजे लैच भारी
मी पण पाहिलय टिटवीच्या
मी पण पाहिलय टिटवीच्या पिल्लांना ,तास्भर खिड्कीच्या पडद्यामागे लपून.
अगदि वर फोटोत आहेत अशीच मी पाहिली. पुढे २ दिवस पाहिले त्यांना. नंतर नाहि दिसले.

नुकतेच नविन घरात रहायला गेलो होतो. घर जरा गावाबाहेर मोकळ्या ,पडिक शेतजमीनीवर बांधलेले होते. तुरळ्क झाडे,विरळ लोकवस्ती होती. आम्हाला तिथे रानससे बर्याच वेळेला दिसत. आमच्या मांजराने दोन वेळा प़कडुन आणले
होते पिल्लांसाठी.
मे महिन्याचे दिवस होते. ३ -४ दिवस दुपारी ठराविक वेळी ११ च्या दरम्यान टिटवीचा आवज येत होता. कुतुहलाने पाहिले तर फक्त टिटवी दिसायची रस्त्यावर. कंपाउडच्या कोपर्यात बोराचे झाड मोठे वाढले होते. जवळ नारळाचे झाड लावले होते. त्यांची सावली होती.पण टिटवी त्या सावलीच्या कडेला उभाराहून रस्त्याकडे तोंड करुन ओरडायची. मला माहित होते, टिटवी जमिनीवर घरटे बांधते.पण माणसांच्या वस्तीजवळ घरटे सापडणे कठिण .मग अंदाज बांधला, पिल्ले असतील सावलीत.पण काहिच दिसले नाहि.दुसर्या दिवशी मि ११ वाजता खिड्कीच्या पडद्यामागे लपून पाहु लागले. थोड्यावेळाने रस्त्यावरुन एक कुत्रे गेले. तेव्हा टिटवी उडुन न जाता जोरात ओरडु लागली. क्ष्णभर सावलीत हालचाल जाणवली.अगदी डोळे फाडुन सगळी सावली पिंजुन काढल्यावर २ पिल्ले लपुन बसलेली दिसली.
टिटवीची ओरड्न्याची तर्हा प्रत्येक वेळी वेगळी असायची. धोक्याचा इशारा वेगळा,धोका संपल्याचा इशारा वेगळा.
खुप छान आठवणी जाग्या झाल्या.
सुरेख लेख , माहिती अन फोटो
सुरेख लेख , माहिती अन फोटो ही..:)
टिटवीचे ओरडणे खुपदा ऐकलेले..टिटवी पण पाहिली बर्याचदा पण असे तिची पिल्ल पहिल्यांदाच बघतेय..
फार सुंदर माहिती आणि फोटो ही
फार सुंदर माहिती आणि फोटो ही .
काल हिंजेवडी फेज ३ मधे एक
काल हिंजेवडी फेज ३ मधे एक टिटवी मम्मा, पप्पा आणि २ पिल्ले असे कुटुम्ब दिसले..
फोटो काढायला गाडीतून उतरेपर्यन्त पिल्ले गायब !!
मम्मा अन पप्पा दोघे दोन दिशाना पांगले...
आणि जो काही आरडा-ओरडा सुरु केला त्यांनी - बाप रे....
चिड चिड चिडले दोघे माझ्यावर...
एकजण तर डोक्याजवळून जोरात सुर मारुन गेला...
परत निमुट जाऊन गाडीत बसले तर ते दोघे एक्दम शांत झाले..
बाकी मम्मा टिटवीचा खुप होल्ड वाटला ... एक आवाज काय चढवला तर पोरे चिडिचुप...
नाही तर आमची पोरे.....
मत्ताय टिटवी
मत्ताय टिटवी
वा एकदम मस्त आहे आणि तुम्ही
वा एकदम मस्त आहे आणि तुम्ही भाग्यवान आहेत तुम्हाला टिटवीची नुसतीच अंडी नाही तर पिल्ले पण पाहायला मिळाली ... निसर्गाची खरंच काय किमया आहे नाही ...
Pages