देहरीचा गोरखगड (प्रकाशचित्रे)

Submitted by आनंदयात्री on 17 January, 2012 - 23:52

पावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं. मग लगेच एकदाही नेट न धुंडाळता गड ठरवला - न भेटलेला जुना दोस्त - गोरखगड! त्या भटकंतीमधले हे काही फोटो -

देहरीच्या अलिकडे डाव्या हाताला एक वाट मंदिराकडे जाते.

डावीकडचा मच्छिंद्रगड, उजवीकडचा गोरखगड -

गडाच्या सर्वोच्च ठिकाणी असलेलं मंदिर -

जाताना दिसलेला सुंदर सिद्धगड आणि त्याच्या अलिकडे साखरमाची डोंगराची सोंड -

कातळामध्ये कोरलेल्या पायर्‍यांचा पहिला चाळीस एक फुटांचा भाग आहे. त्या भागाच्या शेवटी गोरखगडाचा छोटा पण सुंदर दरवाजा आहे.

वर गेलं की गुहा लागतात. नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका सरपंचांनी सांगितली होती. म्हणून हा गोरखगड! गुहा प्रशस्त आणि शांत असून आत मुक्कामाची, स्वयंपाकाचीही सोय होते.

गुहेतून दिसणारा मच्छिंद्रगड -

गोरखगडाचा अवघड म्हणता येईल असा पॅच गुहेपासून सुरू होतो. सरळसोट कातळामध्ये खड्या पायर्‍या आहेत.

मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, कातळातच कोरून काढलेल्या पूर्ण वर्तुळाकार खाचा! सर्वसाधारणपणे, चार बोटांची पेरे मावतील, इतक्या खाचा बघितल्या होत्या. इथे मात्र, एक छोटा अँकरही आरामात बसेल इतक्या आकाराच्या खाचा पाहिल्या.

डावीकडून नाणेघाट, अलिकडे जीवधन-वानरलिंगी, पायथ्याचं सिंगापूर गाव (अंदाजाने), आंबोली घाटाची खाच, सर्वात उंच दिसणारा ढाकोबा डोंगर (दुर्ग दिसला नाही), त्याच रेषेत अहुप्याचा कडा, अहुपे पठाराचा माथा, त्याच्या अलिकडच्या डोंगरावर आत भट्टीचं रान, साखरमाचीचा पुढे आलेली सोंड, दमदम्या, राजाची लिंगी, सिद्धगड! सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून काहीसा अलग असल्यामुळे गोरखगडावरून ही रांग नुसत्या डोळ्यांनीही दिसते.

पायथ्याचे, जिथून वाट सुरू होते, ते मंदिर -

मच्छिंद्रगड -

मच्छिंद्रगड आणि मागे खोपिवली गाव -

मिनिबसने म्हसाकडे येताना मी सिद्धगडच बघत बसलो होतो. मला गड बघतच बसावं वाटत होतं!सिद्धगडाला वळसा घालून रस्ता असल्यामुळे गडाची चतकोर प्रदक्षिणा झाली.

म्हसाहून मयूर कर्जतला गेला (त्याची डेक्कन क्वीन चुकली आणि त्यानंतर 'हात दाखवा ट्रेन थांबवा' उर्फ सह्याद्री एक्प्रेसने त्याला घरी पोचायला पावणेअकरा झाले) आणि मी म्हसा-मुरबाड-कल्याणमार्गे मुंबईत आलो.

- नचिकेत जोशी
(या भटकंतीचा संपूर्ण वृत्तांत इथे - http://anandyatra.blogspot.com/ )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्यांकन सरून काही दिवस नाही होत, तो पुन्हा ट्रेक?
धन्य आहेस बाबा.._/\_
ती गुहा काय मस्त, स्वच्छ आणि प्रशस्त आहे Happy
गोरखगडाचा तो दरवाजाही छान टिपलाय..

मस्त.
माझ्याकडेही साधारण सगळे असेच आणि अशाच स्पॉटस् वरून घेतलेले फोटो आहेत Happy

त्या दगडातल्या खाचांसाठी अगदी अगदी !! तो रॉक पॅच मस्त आहे. खूप कठीण नाही, पण सोपाही नाही.

हायली इम्प्रेस्ड! उत्कृष्ट चित्रे! सर्वांशी सहमत! (न भेटलेला जुना मित्र - मस्त विधान) ! शुभेच्छा व अभिनंदन!

सह्ही Happy
किती भरभरुन लिहिलयस....

मंदिराकडे जाणार्‍या वाटेचा फोटो मस्तं आलाय एकदम Happy

फोटो मस्तच.
तो शेवटचा पायर्‍यांचा पॅच फार (तुझ्यासारख्या पट्टीच्या ट्रेकरला) अवघड नसला तरी पलीकडे असणार्‍या दरीच्या एक्सपोजरमुळे माझ्यासारख्याला घाबरवणारा असेल. जास्त करुन उतरताना. Happy
वृतांत लिहिताना हात आखडता घेतलास. का??????????

सिद्धगडाचा घेरा बराच मोठा दिसतोय.
मच्छिंद्रगडावर जाता येतं????

आनंद सहीच... आमच्या नाईट ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.

मच्छिंद्रगडावर जाता येतं???? >>> झकास नाही जाता येत... गावकर्‍यांची तिथे जाण्यास मनाई असते.... मात्र भर पावसात आम्ही वाट चुकून मच्छिंद्रच्या सुळक्या खाली पोहचलो होतो :p

मस्तच रे नचीकेत... फोटो बरोबर थोडे अजून वर्णन चालले असते... Happy

आमच्या ८ वर्षांपुर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या....
सध्या माहीत नाही पण आम्ही गेलो त्याच्या आदल्या वर्षीपासून देहरी गावात गोरखगडावर जाणार्‍या प्रत्येकाची नोंद जसे पत्ता, टे. नंबर ठेवायची सुरुवात झाली होती. कारण विचारल्यावर सांगीतले की...

त्यावर्षी म्हणे काही मध्यमवयीन मित्रांचा ग्रूप गोरखगडाला गेला होता आणी त्यात एक त्याकाळचा मुंबईचा प्रथीतयश कामगारनेता होता म्हणजे जाताना होता पण येताना न्हवता. गोरखगडा सभोवतालच्या जंगलाचा फायदा घेऊन त्याचा काटा काढण्यात आला होता...

खरे खोटे देव जाणे पण गोरखगडा सभोवताचे जंगल निर्मनुष्य आणी अशी काही घटना घडण्याइतके एतके घनदाट आहे नक्कीच.....

आता पुढचा ट्रेक कधी ?

मस्त रे (नेहमीप्रमाणेच Happy )
आम्ही गोरखगड देहरीच्या ऐवजी खोपीवली गावातुन केला होता. तेथुन जाताना भवानी मातेचे एक मंदिर आहे आणि वीरगळही आहेत.

http://www.maayboli.com/node/14333

धन्यवाद दोस्तहो!
Happy

डॉक, हो, म्हसाची जत्रा सुरू आहे, ब्लॉगवर वृत्तांतामध्ये लिहिलंय त्यावर. येतांना एसटीमध्ये एक काकूंशी गप्पा मारता मारता त्यांनी सांगितलं की, त्या जत्रेमध्ये चांगल्या घोंगड्या मिळतात. त्या घ्यायला आसपासहून बरेच लोक येतात.

किती भरभरुन लिहिलयस....
>> ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद पजो.. Happy

झकासराव, अहो यावेळी इथे फक्त प्रचिच टाकलेत. पूर्ण लेख, ब्लॉगवर लिहिलाय - http://anandyatra.blogspot.com/

सिद्धगडाचा घेरा खूप मोठा आहे... मला हल्ली सिद्धगड लईच आवडायला लागलाय.. Proud

मनोज, हे नवीनच कळलं. आमच्याकडून असं काही नोंदवून नाही घेतलं.. हम्म्म..

ए चॅंम्पा, तुला विचारलं होतं की भावा! PIFF ला जायला कोण नाचत होतं? Wink

आया.. शेवटी गेलासच का... शाब्बास..!!!

दुरून 'मच्छिंद्र सुळका' हा किल्ला तर गोरक्षगड (गोरखगड) हा सुळका वाटत राहतो. जवळ गेल्यावर मात्र खरा प्रकार कळतो.
गडाच्या पायऱ्या अप्रतिमरित्या कोरल्या आहेत.. पेठ किल्ल्यासारख्या.. शिवाय शेवटच्या पायऱ्या तर भन्नाट... Happy

नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका सरपंचांनी सांगितली होती. म्हणून हा गोरखगड!
>>> हे चूक बर का.. गोरक्षनाथांनी कधीच समाधी घेतलेली नाही. ते अजूनही संजीवन स्वरूपात आहेत अशी नाथपंथीयांची धारणा आहे. इथे गोरक्षनाथांनी समाधी नाही तर फक्त ध्यान-धारणा केली होती. ते सुद्धा 'मच्छिंद्र सुळका' गुरुस्थानी ठेवून. कारण मच्छिंद्रनाथ त्यांचे गुरु होते.

गुरुदेवा प्रचि आणी वृतांत दोन्ही आवडले. पण आदल्यादिवशी गोरखगड ते सिद्धगड मुक्कामी ट्रेक बद्द्ल मी विचारत होतो तेव्हा या ट्रेक बद्दल काही बोलला नाहीस Angry

आनंदयात्री,

ब्लॉगवरचा वृत्तांत वाचला. मस्त ट्रेक होता. आटोपशीर तरीही ताजातवाना! Happy

अवांतर : सह्याद्री एक्सप्रेसला आम्ही सह्याद्री लोकल म्हणायचो. आणि तिच्या अगोदर बदलापूरहून येणार्‍या लोकलला बदलापूर एक्सप्रेस म्हणत असू. Proud (या गाड्या सकाळच्या मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आहेत.)

आ.न.,
-गा.पै.

मागे मायबोली करांसोबतच गोरखगडाची नाईट ट्रेकयात्रा झाली होती ... मस्त ट्रेक आहे हा .( पण शेवटच्या टप्प्यात माझी फाटली होती जाम !)

ती गुहा खुप मस्त आहे , भरपाअवसाळ्यात २ दिवस मुक्काम टाकुन रहाय्ला मजा येईल तिथे Happy

बाकी सर्वच प्रचि सुरेख !!

इंद्रधनुष्य | 18 January, 2012 - 03:33
आनंद सहीच... आमच्या नाईट ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.

मच्छिंद्रगडावर जाता येतं???? >>> झकास नाही जाता येत... गावकर्‍यांची तिथे जाण्यास मनाई असते.... मात्र भर पावसात आम्ही वाट चुकून मच्छिंद्रच्या सुळक्या खाली पोहचलो होतो फिदीफिदी>>>>

इंद्रा
मच्छिंद्रवर जाता येत.

http://www.maayboli.com/node/45698

अरे म्हणजे ट्रेक करुन जाता येत नाही असे म्हणायचय रे त्याला. प्रस्तरारोहण करुन कुठेही जाता येतेअच की. Wink