प्रार्थना

Submitted by लंपन on 15 January, 2012 - 10:06

जून महिन्याच्या पहिल्याच पावसात वाडा लख्ख धुवून निघत असे. पुढच्या चौकात तर धम्माल्..पत्र्याच्या घरांना पन्हाळ्या लागत आणि त्याकडे एकटक बघण्यात कितीतरी वेळ जात असे. रात्र झाली की मात्र पावसाचा आवाज गहिरा वाटायचा आणि एकदा मच्छरदाणीत घुसलो की वाटायचे ही जगातली सर्वात सुरक्षीत जागा Happy

सकाळची शाळा असली की आईची त्रेधा उडत असे. सकाळी पावणे सातला मधल्या खोलीत युनिफॉर्म चढवून उभे रहायचे. रेडिओवर बहुदा बातम्या चालू असत.एका हातावर पॅराशूटचे बचाकभर तेल घेउन आई डोक्याला फासायची. तोच हात गालावर ठेवून भांग पाडायची..तेलाचे हात गालाला लागले की अस्सा राग यायचा पण थोड्या झटापटीनंतर आणि एखादा धपाटा खाल्ल्यावर गपगुमान उभे राहून भांग पाडून घ्यावाच लागे.. हा सोपस्कार चालू असतानाच मित्र वाड्याबाहेरूनच हाक मारीत, मग पाचेक मिनिटांनी निघून धावत पळत त्यांना गाठायचे. शाळा ते घर अवघे १० मिनिटांचे अंतर तरिही कधी निवांत पोचलो आहे असे झालेच नाही. मुख्य गेटपाशी असतानाच टोल पडायचा मग पुन्हा धावाधाव करत कसेबसे दुसर्या गेटमधून वर्गात पोचायचे आणि दप्तर 'टाकून' लगेच व्हरांड्यात प्रार्थनेसाठी गोळा व्हायचे. व्हरांडा + च्या खूणेत, मध्यभागी पेटी आणि एक बरा आवाज असलेला विद्यार्थी. गोंधळामधेच स्सावधान विश्रामच्या घोषणा सुरु व्हायच्या आणि एक हातसे किंवा आधे हातसे 'नाप' पण घेउन व्हायची. असे सगळे पार पड्ल्यानंतर प्रार्थना 'शुरूक्कर' अशी चक्क ऑर्डर मिळायची.. प्रार्थना सुरु करायची पण ऑर्डर..

शाळा जैन संस्थेची त्यामुळे सुरुवात नवकार मंत्राने होई. जैन विद्यार्थी त्यामानाने कमीच. बालवाडी ते दहावी रोज नेमाने नवकार मंत्र.. एखाद्या जैन धर्मियाने सुद्धा ईतक्या नेमाने हे व्रत पाळले नसेल. शाळेतल्या प्रार्थनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रार्थनेची अगम्य आणि दुर्बोध चाल. एकतर शाळा फक्त मुलांची त्यामुळे गेयता आणि चाल ह्या सर्वांशी त्यांचा तसा काही संबंध नाही. नवकार मंत्रासारख्या साध्या मंत्राला सुद्धा एकदम क्लिष्ट चाल..त्यानंतरची प्रार्थना मात्रएकाच लयीत 'हे भगवान दया के सागर सबके पालन हारे हो, मात पिता बंधू हितकारी स्वामी सखा हमारे हो' असे काहिसे शब्द.. ही प्रार्थना मुले पाट्या टाकल्यासारखी एका दमात एकाच लयीत फडशा पाडून संपवत. आणि वर परत प्रार्थना संपताना 'मात पिता बंधू हितकारी स्वामी सखा हमारे हो' असे तीन वेळा उतरत्या लयीत म्हणत (एको असल्यासारखे).. 'भगवान'सुद्धा ऐकून म्हणत असेल बर बाबांनो आहे मी तुमचा मात, पिता, बंधू, हितकारी, स्वामी, सखा पण आता बास करा:) राष्ट्रगीताची चाल युनिवर्सल, त्यामुळे त्यात काहीच बदल नाही आणि देशाच्या सुदैवाने ते सुरळीत पार पडत असे.

सर्वात मजा यायची गुरुवारी कारण तेव्हा साने गुरुजींची 'खरा तो एकची धर्म' म्हणावी लागे. ही चालसुद्धा युनिवर्सल.. पण ती अशी काही झोकात व्हायची की बस्स्..गुरवार पेश्शल..पेटीवर सूर मिळताच मुले अशी काही तान घेउन प्रार्थना सुरु करत आणि असा सूर लावीत की साने गुरुजी म्हणत असतील धरणीमाते पोटात घे. 'खरा तो एकची धरम जगाला प्रेम अरपावे' संचेतीच्या पुलावर आजारी पी एम टी कुथत कुथत वर चढत असताना जसा आवाज काढते अगदी तस्साच आवाज मुले चढवत कमी करत चढवत कमी करत्..क्षणात वर तर क्षणात खाली.. एखाद्या अ‍ॅडवेंचर पार्कमधल्या राईडसारखे.. हमखास 'हसवावे' चे 'उठवावे' आणि 'उठवावे' चे 'हसवावे'.. आणि ह्याहून कहर शनिवारी जेव्हा विद्यार्थी वंदे मातरमला आळवीत. चाल एकदमच भारी आणि अवघड..चालीचे मीटरच वेगळे..एका पट्टीत चालली असताना मधेच हेलकावे घेत एक्दम भलत्याच ठिकाणी लँडींग..वंदे माआआतरम वंदे माआआतरम सुजलाआम सुफलाआम मलयज शीतलाआम..मग परत वंदे माआआतरम वंदे माआआतरम.. ह्याचाली शाळेतल्या दिवेकर बाईंनी लावल्या होत्या मुले प्रेमाने त्यांना 'गेंगाणी' म्हणत..बाई शास्त्र आणि गणीत शिकवत. गणिताच्या पेपरमधे आणि शास्त्राच्या प्रयोगवह्यात शुद्धलेखनाच्या चुका काढीत. वर १/४ , १/२ असे मार्क देत..पुर्ण वही आणि पेपर लालेलाल करीत Happy

....पावसाळ्याच्या दिवसांमधे मुलांचा आवाज व्हरांड्यामधे जास्तच घुमायचा..बाहेर पाऊस पडत असे आणि मुले जोरजोरात जोषात प्रार्थना म्हणत असत.. गच्च मिटलेले डोळे आणि जोडलेले हात. व्हरांड्याच्या छतावरून पावसाचा एखादा थेंब डोळ्यावर पडला की डोळे आपसूक उघडत. आजूबाजूला सगळे जिवलग मित्रसुद्धा प्रार्थनेत तल्लीन झालेले दिसायचे. एकक्षण वाटायचे सगळेजण आपल्यासाठीच प्रार्थना करत आहेत, चेहेर्यावर हसू उमटायचे आणि मनात भावना ... श्रीमंत श्रीमंत झाल्यासारख्या......

गुलमोहर: 

मस्त लिहिलय.

प्रार्थना आणि प्रतिज्ञा रोज म्हणायचो त्याची आठवण झाली. नंतर खास श्लोकही म्हणायला लागायचे. मनाचे श्लोक, रामरक्षा, गीतेचा अठरावा अध्याय हे न समजता म्हणायचो. शिवाय संगिताचा एक तास असायचा. पुरूषी आवाजाच्या बेंद्रेबाई हा तास घ्यायच्या. त्यांनी शिकवलेलं 'सब के लिये खुला है मंदिर ये हमारा' हे गाणं अजूनही आठवतं.

आवडलं! प्रकाश नारायण संतांचा लंपन याच वयातला आहे त्याची तुमच्या लेखामुळे आणि नावामुळे आठवण झाली!
पुलेशु!

मस्त लिहिलेय!
आमच्या शाळेतल्या 'इतनी शक्ती हमें देना दाता' ची आठवाण आली. आम्हा सर्वांच्या रेकून गाण्यामुळे 'येवडी शक्ती काय आमाला देउ नको' असा अर्थ त्यातून देवाने लावला असेल!

मस्त!!
छान वाटलं वाचून...
Happy

शाळेतल्या प्रार्थना आठवल्या...
तयाजा ऊन उठवावे >> संपदा +१

सर्वांचे खूप खूप धन्यवाद..आभारी आहे. तुमच्या शाळेतल्या प्रार्थनांबद्दल वाचायला नक्कीच आवडेल..

सही आहे. शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे उलटे होते. सकाळी जण गण मन आणि संध्याकाळी वंदे मातरम. पण आमची शाळा जरा मॉर्डन होती. त्यामुळी वर्गावर्गात स्पीकर्स बसवले होते. त्यामुळे आपापल्या वर्गातच उभे रहायचे. Happy

बाकी लिहिले सहीच आहे. मस्त एकदम

मस्त रे लंप्या! Happy
हा तुझा माध्यमिक शाळेतला अनुभव असं ग्रुहीत धरतो. माझ्या शाळेत तर खंडीभर प्रार्थना असायच्या. किमान ३० मिनिटे चायायच्या. आणि शनिवारी ४० मिनिटे. त्यातला सगळ्यांत आवडायच ते गायत्री मंत्राचा सामुहीक ओमकार.

आवडलं. Happy

ऑस्सम रे भौ.
शाळेतल्या प्रार्थना पोरंपोरी लईच भे(बे)सूर म्हणतात हे खरंच. पण छोट्याछोट्या मनांमध्ये धा वर्षे रेकताना कधीमधी अस्सल भाव झळकायचे हे बी खरं.

आता आमच्या पोरीच्या (वय वर्षे ४) शाळेत 'हम्म कोमन कीश क्तीदेना, मनी जय क्रे sss ' असलं असतंय. तरीपण मी तिला कितीदा गुड्डीतली वरिजिनल प्रार्थना दाखवलीये. आणि 'आई, क्लोज युवर आईज, डोळे नो उघड,' असे तार स्वरात किंचाळून ही प्रार्थना म्हणण्याचा साप्ताहिक कारेक्रम असतो.

शाळेतले दिवस आठवले Happy छान लिहिलय...

शाळा जैन संस्थेची त्यामुळे सुरुवात नवकार मंत्राने होई. जैन विद्यार्थी त्यामानाने कमीच. >>>>>> सेम सेम.. अगदी १० वर्षे रोज म्हणुनही आज जर कोणी मला प्रार्थना म्हणायला सांगितली तरी येणार नाही.. ती कोरसमधेच जमते... Happy आमच्याकडे नवकार मंत्र रोज असायचा. याशिवाय दर वारी वेगळी वेगळी प्रार्थना ठरलेली.. खरा तो एकची धर्म गुरुवारी, इतनी शक्ती हमे देना दाता (हमको मनकी शक्ती वेगळं असेल तर तेही) बाकीच्या आठवतही नाहियेत Sad पण यामुळे प्रार्थना पाठच झाल्या नाहीत.. वाराप्रमाणे वेगवेगळ्या भाषेतुन प्रतिज्ञा, अगदी संस्कृतसुद्धा.. आणि शाळा सुटताना वंदे मातरम..

दुपारी शाळा असायची तेव्हा पण प्रार्थनेनंतर कवायतीचे थोडेफार प्रकार व्हायचे.. जागा कमी त्यामुळे एकमेकांच्या हातात हात गुंफुन व्यायाम चालु असायचे.. घरुन जेवुन आल्यानंतर इतकं सगळं उन्हात उभं राहुन केल्यावर मुली धपाधप चक्कर येवुन पडायच्या.. आणि राष्ट्रगीताच्या वेळी कोणी चक्कर येवुन पडलं तर तिला उचलायला हलायचं की नाही तेच कळायचं नाही.. आणि प्रार्थना संपल्यानंतर वर्गात जाताना प्रत्येकीचं चेकिंग व्हायचं, टिकली लावली आहे ना, बांगड्या घातल्या आहेत ना, वेण्या नीट घातल्या आहेत ना, नखं कापलेली आहेत ना इ. आमचे पीटीचे सरच आम्हाला इतिहास शिकवायचे त्यांना मुलींनी तेल न लावता आलेलं अजिबात चालायचं नाही, मग त्यांच्या सोमवारच्या तासाच्या आधी बर्‍याच मुली केसांना पाणी लावायच्या Happy मंगळवारनंतर शक्यतो त्यांची आईच तेल लावायला भाग पाडत असावी..

आज हा लेख वाचला आणि इतकं सगळं आठवलं Happy

शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे उलटे होते. सकाळी जण गण मन आणि संध्याकाळी वंदे मातरम. पण आमची शाळा जरा मॉर्डन होती. त्यामुळी वर्गावर्गात स्पीकर्स बसवले होते. त्यामुळे आपापल्या वर्गातच उभे रहायचे.>>> आमच्याकडे पण Happy

प्रार्थना संपल्यानंतर वर्गात जाताना प्रत्येकीचं चेकिंग व्हायचं, टिकली लावली आहे ना, बांगड्या घातल्या आहेत ना, वेण्या नीट घातल्या आहेत ना, नखं कापलेली आहेत ना इ. >>> आमच्याकडे पण Happy ज्यांनी कुंकू लावलं नसेल त्या मुली पटकन पेनाने कपाळावर कुंकू गिरबिटवायच्या. वेण्या शेवटपर्यंत वळून वरच बांधलेल्या हव्यात. बटा बिटा बाहेर आलेल्या चालणार नाहीत. (कालच आवराआवर करताना अश्या वेण्या घातलेला फोटो सापडला आणि आज हा लेख वाचला.) आमच्या शाळेत पत्र्याची पेटी चालत नसे. दप्तरच हवं. ते खाकी दप्तर एकदा आणलं की ३-३ वर्षं चाले.

मस्तच रे लंप्या...
माझ्या शाळेतली प्रार्थना आठवली. मुलगा इथे आस्त्रेलियात वाढलाय. त्यांच्या शाळेत प्रार्थना-ब्रिर्थना असलं काय्येक नसतय.
मग ".. मला शिकव तुझ्या शाळेतली प्रार्थना" असा लकडा झाला. मी धन्यच धन्यं. पण मग शिकवताना मलाच रडूच रडू सारखं सारखं. माझा "रडीचा डाव" बगून बिच्चारर्‍यानं नाहीच परत म्हटलं.
आमच्या शाळेचा ड्रेस म्हणजे पांढरा ब्लाऊज आणि पिनोफ्रॉक (मुलींचा).. त्याला पट्टा मस्ट्टं. तो नसला तर... ",,, या अशा पुढे या... अफझलखान... हात पुढे करा..." व्हायचं.

ज्यांनी कुंकू लावलं नसेल त्या मुली पटकन पेनाने कपाळावर कुंकू गिरबिटवायच्या. वेण्या शेवटपर्यंत वळून वरच बांधलेल्या हव्यात. बटा बिटा बाहेर आलेल्या चालणार नाहीत.>>>>>>>>> अगदी...

लंपन हो.. तुम्ही पण जैनचे का?

<< ",,, या अशा पुढे या... अफझलखान... हात पुढे करा..." व्हायचं.>>

परत मागे येताना अफझलखानाचा शाहिस्तेखान करुन नाही ना पाठवायचे ?

Pages