प्रार्थना

Submitted by लंपन on 15 January, 2012 - 10:06

जून महिन्याच्या पहिल्याच पावसात वाडा लख्ख धुवून निघत असे. पुढच्या चौकात तर धम्माल्..पत्र्याच्या घरांना पन्हाळ्या लागत आणि त्याकडे एकटक बघण्यात कितीतरी वेळ जात असे. रात्र झाली की मात्र पावसाचा आवाज गहिरा वाटायचा आणि एकदा मच्छरदाणीत घुसलो की वाटायचे ही जगातली सर्वात सुरक्षीत जागा Happy

सकाळची शाळा असली की आईची त्रेधा उडत असे. सकाळी पावणे सातला मधल्या खोलीत युनिफॉर्म चढवून उभे रहायचे. रेडिओवर बहुदा बातम्या चालू असत.एका हातावर पॅराशूटचे बचाकभर तेल घेउन आई डोक्याला फासायची. तोच हात गालावर ठेवून भांग पाडायची..तेलाचे हात गालाला लागले की अस्सा राग यायचा पण थोड्या झटापटीनंतर आणि एखादा धपाटा खाल्ल्यावर गपगुमान उभे राहून भांग पाडून घ्यावाच लागे.. हा सोपस्कार चालू असतानाच मित्र वाड्याबाहेरूनच हाक मारीत, मग पाचेक मिनिटांनी निघून धावत पळत त्यांना गाठायचे. शाळा ते घर अवघे १० मिनिटांचे अंतर तरिही कधी निवांत पोचलो आहे असे झालेच नाही. मुख्य गेटपाशी असतानाच टोल पडायचा मग पुन्हा धावाधाव करत कसेबसे दुसर्या गेटमधून वर्गात पोचायचे आणि दप्तर 'टाकून' लगेच व्हरांड्यात प्रार्थनेसाठी गोळा व्हायचे. व्हरांडा + च्या खूणेत, मध्यभागी पेटी आणि एक बरा आवाज असलेला विद्यार्थी. गोंधळामधेच स्सावधान विश्रामच्या घोषणा सुरु व्हायच्या आणि एक हातसे किंवा आधे हातसे 'नाप' पण घेउन व्हायची. असे सगळे पार पड्ल्यानंतर प्रार्थना 'शुरूक्कर' अशी चक्क ऑर्डर मिळायची.. प्रार्थना सुरु करायची पण ऑर्डर..

शाळा जैन संस्थेची त्यामुळे सुरुवात नवकार मंत्राने होई. जैन विद्यार्थी त्यामानाने कमीच. बालवाडी ते दहावी रोज नेमाने नवकार मंत्र.. एखाद्या जैन धर्मियाने सुद्धा ईतक्या नेमाने हे व्रत पाळले नसेल. शाळेतल्या प्रार्थनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रार्थनेची अगम्य आणि दुर्बोध चाल. एकतर शाळा फक्त मुलांची त्यामुळे गेयता आणि चाल ह्या सर्वांशी त्यांचा तसा काही संबंध नाही. नवकार मंत्रासारख्या साध्या मंत्राला सुद्धा एकदम क्लिष्ट चाल..त्यानंतरची प्रार्थना मात्रएकाच लयीत 'हे भगवान दया के सागर सबके पालन हारे हो, मात पिता बंधू हितकारी स्वामी सखा हमारे हो' असे काहिसे शब्द.. ही प्रार्थना मुले पाट्या टाकल्यासारखी एका दमात एकाच लयीत फडशा पाडून संपवत. आणि वर परत प्रार्थना संपताना 'मात पिता बंधू हितकारी स्वामी सखा हमारे हो' असे तीन वेळा उतरत्या लयीत म्हणत (एको असल्यासारखे).. 'भगवान'सुद्धा ऐकून म्हणत असेल बर बाबांनो आहे मी तुमचा मात, पिता, बंधू, हितकारी, स्वामी, सखा पण आता बास करा:) राष्ट्रगीताची चाल युनिवर्सल, त्यामुळे त्यात काहीच बदल नाही आणि देशाच्या सुदैवाने ते सुरळीत पार पडत असे.

सर्वात मजा यायची गुरुवारी कारण तेव्हा साने गुरुजींची 'खरा तो एकची धर्म' म्हणावी लागे. ही चालसुद्धा युनिवर्सल.. पण ती अशी काही झोकात व्हायची की बस्स्..गुरवार पेश्शल..पेटीवर सूर मिळताच मुले अशी काही तान घेउन प्रार्थना सुरु करत आणि असा सूर लावीत की साने गुरुजी म्हणत असतील धरणीमाते पोटात घे. 'खरा तो एकची धरम जगाला प्रेम अरपावे' संचेतीच्या पुलावर आजारी पी एम टी कुथत कुथत वर चढत असताना जसा आवाज काढते अगदी तस्साच आवाज मुले चढवत कमी करत चढवत कमी करत्..क्षणात वर तर क्षणात खाली.. एखाद्या अ‍ॅडवेंचर पार्कमधल्या राईडसारखे.. हमखास 'हसवावे' चे 'उठवावे' आणि 'उठवावे' चे 'हसवावे'.. आणि ह्याहून कहर शनिवारी जेव्हा विद्यार्थी वंदे मातरमला आळवीत. चाल एकदमच भारी आणि अवघड..चालीचे मीटरच वेगळे..एका पट्टीत चालली असताना मधेच हेलकावे घेत एक्दम भलत्याच ठिकाणी लँडींग..वंदे माआआतरम वंदे माआआतरम सुजलाआम सुफलाआम मलयज शीतलाआम..मग परत वंदे माआआतरम वंदे माआआतरम.. ह्याचाली शाळेतल्या दिवेकर बाईंनी लावल्या होत्या मुले प्रेमाने त्यांना 'गेंगाणी' म्हणत..बाई शास्त्र आणि गणीत शिकवत. गणिताच्या पेपरमधे आणि शास्त्राच्या प्रयोगवह्यात शुद्धलेखनाच्या चुका काढीत. वर १/४ , १/२ असे मार्क देत..पुर्ण वही आणि पेपर लालेलाल करीत Happy

....पावसाळ्याच्या दिवसांमधे मुलांचा आवाज व्हरांड्यामधे जास्तच घुमायचा..बाहेर पाऊस पडत असे आणि मुले जोरजोरात जोषात प्रार्थना म्हणत असत.. गच्च मिटलेले डोळे आणि जोडलेले हात. व्हरांड्याच्या छतावरून पावसाचा एखादा थेंब डोळ्यावर पडला की डोळे आपसूक उघडत. आजूबाजूला सगळे जिवलग मित्रसुद्धा प्रार्थनेत तल्लीन झालेले दिसायचे. एकक्षण वाटायचे सगळेजण आपल्यासाठीच प्रार्थना करत आहेत, चेहेर्यावर हसू उमटायचे आणि मनात भावना ... श्रीमंत श्रीमंत झाल्यासारख्या......

गुलमोहर: 

छान लिहिलय लंपन. आमच्या पण शाळेत रोज प्रार्थना असायची. पण शाळा बरीच normal (:P) असल्यानी रोज एक ठरलेली प्रार्थना (याकुंदेंदु तुषार हार धवला..) आणि राष्ट्रगीत एवढं च असायचं. एक गाणार्या मुलींचा ग्रूप माईक वर गाणं म्हणायचा आणि सगळ्या वर्गांत स्पीकर वरून ऐकू जायचं. (मी एक वर्षं त्या गाण्याच्या ग्रूप मधे होते Wink )

Pages