एशियन फिल्म फेस्टिव्हल : एक पर्वणी ! (भाग एक )

Submitted by अवल on 5 January, 2012 - 00:24

त्या दिवशी सकाळी एशियन फिल्म फेस्टिव्हलची जाहिरात वाचली होती, अन कष्टाने पान उलटले होते. मागचे दोन एशियन फिल्म फेस्टिवल पाहिले होते त्यामुळे याही फेस्टिव्हलला जावं वाटत होतं, पण नेमकी लेकाची पहिल्याच सेमिस्टरची परीक्षा याच काळात होती. त्यामुळे मी माझा बेत अगदी रहित करत आणला होता. तेव्हढ्यात प्रमोद देवांचा फोन आला, एशियन फिल्म फेस्टिव्हलला येणार का ? लेकाने माझे देवांबरोबरचे फोनवरचे बोलणे ऐकले अन त्याने हट्टच केला, जाच तू फेस्टिव्हलला! खरं तर मी काही आता त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही, पण तो परीक्षा देतो अन आपण फिल्म्स बघतोय हे काही माझ्या 'आईमना'ला पटत नव्हतं. पण मग त्याने माझी कान उघडणी केली अन मग मी ठरवलं जायचं फिल्म फेस्टिव्हलला.

या वेळेस प्रमोद देव अन राकेश शेंद्रे यांच्यामुळे मला हा फेस्टिव्हल अगदी आरामात बघायला मिळाला, धन्यवाद प्रमोद अन राकेश Happy

मी काही चित्रपट समिक्षक नाही, मला हे चित्रपट कसे भावले ते आपल्याशी शेअर करतेय.

२३ ते २९ डिसेंबर या कालावधीत सातवा एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक फिल्म्स आयनॉक्स थिएटर, अर्काईव्ह थिएटर, एफ्टीआयआय थिएटर आणि बालशिक्षण ऑडिटोरियम या चार ठिकाणी दाखवल्या गेल्या.

या फेस्टिव्हलमध्ये मी पहिला चित्रपट पाहिला तो 'ताकाशि कोतानो' यांनी दिग्दर्शित केलेला जपानी चित्रपट 'किडस रिटर्न' ! हायस्कूलमधल्या दोन मुलांवरचा हा चित्रपट. सामान्य मुलांतून घडणारी दोन व्यक्तिमत्व. एक बॉक्सर तर दुसरा गँगस्टर. दोघांच्यात होणारे बदल, दोघांचे कष्ट, दोघांना मिळणारी प्रतिष्ठा (?), त्यांचा त्यांच्या मार्गातला प्रवास, त्यातले अडथळे, बॉक्सिंग ( खरं तर सर्वच) खेळातली जीवघेणी स्पर्धा, त्यातले मिसगाईड करणारे , स्ट्रिऑईड्सचा वापर अन परिणाम, एखाद्या खेळाडूची प्रगती ते अधोगती पर्यंतची वाटचाल,... कितीतरी गोष्टींचे खुप सुरेख चित्रण हा चित्रपट करतो. अतिशय सुरेख दिग्दर्शन, अतिशय समजून केलेला संयत अभिनय, समाजातील अनेक गोष्टींवर मार्मिक टिपणी करत हा चित्रपट पुढे सरकतो. संपूर्ण 'पुरुष जगता'तला हा चित्रपट अतिशय संयत भावनिक पद्धतीने आपल्या समोर उलगडत जातो. चित्रपटात दिलेले पार्श्वसंगीत आवर्जून उल्लेखावे असे ! जेव्हा मिळेल तेव्हा नक्की पहा. माझ्याकडून ७/१०. जाता जाता एक टिपण्णी - एकही हिरॉईन नसलेला असा अपवादात्मक चित्रपट Happy

रविंद्रनाथ टागोरांच्या १५० व्या जन्मदिनाप्रित्यर्थ त्यांच्या कथांवर आधारित काही चित्रपट या एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवले गेले. त्यातील एक रिमा मुखर्जींनी दिग्दर्शित केलेला 'अर्धांगिनी - एक अर्धसत्य' हा हिंदी चित्रपट !' घरे बाहेर' या रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या अन नंतर सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ! सुबोध भावे, श्रीलेखा मित्रा, मनोज मित्रा, रिमा लागू, वर्षा उसगावकर अशी मोठी कास्ट असलेला चित्रपट ! पण मनाची पकड नाही घेऊ शकला हा चित्रपट. ना तो काळ व्यक्त झाला ना त्यातली भावना पोहोचली, ना त्यातला संघर्ष खरा वाटला,... एखाद वेळेस सत्यजित राय यांच्या चित्रपटाची मोहिनी असल्याने असेल पण मला नाही हा चित्रपट भावला Sad सुबोधचा हा पहिला हिंदी चित्रपट, त्याचे काम चांगले झालेय, तो पक्का बंगाली बाबू दिसलाय Happy श्रीलेखाचेही काम मला आवडले. ही अभिनेत्री हिंदीत पुढे येईल असे वाटते. पण अनेक प्रसंग केवळ संवादातून घडतात, त्यांचे फिल्मिंग का झाले नाही असे वाटत राहते. चित्रपटा पेक्षा नाटकाची ट्रिटमेंट वाटली. संगीत काळानुरुप वाटले नाही,पार्श्वसंगीत अगदीच सुमार . काही ठळक चुकाही जाणवल्या, जसे मेणबत्यांच्या उजेडातील शॉटमध्ये चक्क मेणबत्यांच्या सावल्या दिसत होत्या, एव्हढ्या मोठ्या हवेलीच्या खिडकीतून बाहेर रत्यावरचा मोर्चा दिसतो; जणूकाही एखाद्या चाळीतली खिडकीच Sad एकूणात चित्रपट अतिशय लो बजेट असावा असे वाटले. असो. माझ्याकडून ३/१०.

टागोरांच्याच कथेवरचा सत्यजित राय यांनी दिग्दर्शित केलेला १९६४चा 'चारुलता' हा चित्रपट पुन्हा एकदा सत्यजित राय यांचे गारुड घालून गेला. या चित्रपटातील अभिनेत्री मधुबी मुखर्जी या शोला उपस्थित होत्या. काय सुरेख दिसत होत्या त्या Happy त्यांनी चित्रपटाविषयी काही र्हुद्य आठवणी सांगितल्या. 'नास्तनीर' या टागोरांच्या कादंबरीवर चित्रपट काढताना या चित्रपटाचे नाव आधी त्यातील नायकांच्या नावावरून ठेवायचे ठरले होते, पण भूपती, अमल यांची नावे लिहून बघितल्यावर रायना ती आवडली नाहीत. मग त्यांनी चारुलता लिहून बघितलं, अन ते त्यांना फार आवडलं, म्हणून मग चित्रपटाचे नाव चारुलता ठरले. मधुबींच्या गोड बंगालीत अन सुमधुर आवाजात हे ऐकताना खुप छान वाटले Happy
इतका जुना चित्रपट असून, इतकी जुनी कथा असूनही पहिल्या फ्रेमपासून चित्रपट आपल्याला घट्ट पकडून ठेवतो. अगदी साधेपणा, साधे ड्रेस, सहज सोपा अभिनय, साधी सरळ गोष्ट सांगण्याची पद्धत,... हे सगळं पाहून एक नक्की कळलं, साधं सोप्पं सांगणं, दाखवणं हेच सगळ्यात अवघड असतं . अन हेच अवघड असणं सत्यजित राय कित्ती सोप्प करून दाखवतात. Happy
त्यांच्या फ्रेम्स, त्यातला उजेड, त्यांच्या कॅरेक्टरमधला साधा-सरळ्-सच्चेपणा सगळं सगळं आपल्याला आपलसं करून सोडतात. आपण चित्रपट न पाहता सरळ त्यांच्या चित्रपटात उतरतो अन त्या सगळ्या कॅरेक्टर्सचं जीवन अक्षरशः अनुभवतो. आपणही त्या चित्रपटातले एक कॅरेक्टर होऊन जातो जणू ! अन हे मला वाटतं सर्वात मोठ यश आहे सत्यजित राय यांचं ! त्यातला भूपती, अमल, चारुलता, तिची जाऊ, सगळे अगदी आपण वागू तसे, अगदी तसे वागतात, आपण आपलं प्रोजेक्शन अगदी सहज त्या त्या कॅरेक्टर मध्ये करत जातो.... शब्द संपले माझे.... कधीच चुकवू नये असा चित्रपट. http://www.youtube.com/watch?v=pPPgyzVBeak&feature=fvsr
माझ्या कडून( खरं तर माझी काय पात्रता याला गुण देण्याची... पण तरीही ) १०१/ १०
(क्रमशः ...)

गुलमोहर: 

nice article. waiting for more. unable to type in marathi sorry.

अवल, छान जमलंय.

आणि समीक्षकांचीच मतं ग्राह्य धरायची असा कायदा नाही, त्यामूळे आपल्या मायबोलीच्या सभासदाचे प्रांजळ मत, माझ्यासाठी तरी महत्वाचे.