अशांत शांत

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

रोजच्या जगण्याचं हे दैनंदिन धबडगं इतकं आवश्यक का होऊन बसतं, काही कळत नाही. हंड्याहंड्याने पाणी भरताना माठालाच भोक असल्याने शेकडो हजारो हंडे टाकूनही तो भरू नये, पण तो भरत राहणं मात्र श्वास घेण्याइतकंच आवश्यक होऊन बसावं, असं काहीतरी. श्वास घेण्याला निदान काही निश्चित अर्थ आहे, प्रयोजन आहे. इथं मात्र ते हंडे, माठ, पाणी आणि ते भरणं- सारंच निरर्थक.

हे असं आवश्यक निरर्थक जगत असल्याची लाज किती वेळा वाटते? लाज वाटण्याच्या त्या, तात्पुरत्या का होईना, वावटळीला न्याय देण्याइतपत तरी विचार किती वेळा मी करतो? आणि तो किती वेळ, किती दिवस मनात टिकतो? या सार्‍यातली अपरिहार्यता आणि एकंदरच हात टेकणे- हे समजून घेणे, हीच माझी आयुष्यभरासाठीची 'पक्की भूमिका' होऊन बसते का?

समजा आजवर मी शेकडो पुस्तकं वाचली; आजवर अमुक दर्जांच्या आणि तमुक प्रकारांच्या कलांचा आस्वाद घेतला; माझ्या समाजातल्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचीही जीवणमरणाचा प्रश्न असल्यागत माहिती करून घेतली; मित्रांतल्या आणि घरातल्या चर्चांमध्ये ज्ञान आणि बुद्धीवाद पाजळला. इतक्या या सार्‍यातून कमावलेल्या बुद्धी, तर्कशास्त्र, संस्कार आणि नैतिकता यांच्या बळावर जगण्यातल्या प्रत्येक भागावर, गोष्टीवर मला स्वतःची स्वतःलाच नीट समजेल-उमजेल-कळेल अशी स्वच्छ, स्पष्ट भुमिका असायला हवी. जिथे अशी भुमिका ठरवता येत नाही, तिथे ती ठरवण्यात गोंधळ होतो आहे, किंवा आजवर स्वतःशीच ठरवलेल्या काहीएक मुल्यांशी ती जुळत नाही हे तरी कळायला हवं. पण रोज अंगावर दगडांसारख्या भिरकावल्या जाणार्‍या जगण्याच्या तुकड्यांमध्ये हे सारं कुठेतरी बाजूला राहतं. 'मत ठरवणं', 'भूमिका घेणं' हे ऑप्शनल कसं काय होऊन बसतं? अपरिहार्यता स्वीकारून पुढे जाणं- हीच माझी सर्वात मोठी भूमिका कशी काय होऊन बसते?

हे म्हणजे स्वतःलाच शरण जाणं.
स्वतःला फितूर होणं- हे जास्त बरोबर.

***

निमित्त होतं- पुण्यातल्या 'सातव्या आशियाई फिल्म फेस्टिव्हल' मध्ये बघितलेले 'हा भारत माझा..' आणि 'जय भीम कॉम्रेड' हे दोन सिनेमे. सिनेमे म्हणा, डॉक्युमेंटरी म्हणा, डॉक्युड्रामे म्हणा किंवा अजून काही. पण यांतली साधीसरळ, इतर कुठच्याही सामान्य माणसांसारखीच हेवेदावे असलेली, आणि जगण्याच्या तुकड्यांचा पझलगेम खेळत बसलेली आणि त्यात सतत अयशस्वी होणारी आणि मग हे अपयश नेहेमीचंच आहे हे मानून पुढे सरकणारी अस्सल मातीची माणसं इतकी अंगावर येतील आणि इतका विचार करायला लावतील- असं वाटलं नव्हतं.

***

मागल्या आठवड्यात माझ्या सोसायटीच्या आवारात एका राजकीय नेत्याचं पोस्टर लागलं. वाईट वाटलं. त्या दिवशी ते जसजसं पुन्हापुन्हा दिसत राहिलं, तसतसा संताप होत राहिला. अख्खं शहर विद्रूप करणारी ही रंगीबेरंगी फ्लेक्सची कळकट रायवळ संस्कृती आता माझ्या दारातच आली म्हणायचं.

मी अस्वस्थ होऊन पिंजर्‍यात अडकलेल्या वाघागत त्या फ्लेक्सच्या समोरून चकरा मारू लागलो. माझं आयुष्य विद्रूप करायचा अधिकार या नालायकांना कुणी दिला?

मी काय करू शकतो? त्या नेत्याला जाऊन भेटावं का थेट? किंवा त्याच्या शिष्यांना? नको. त्यापेक्षा पत्र लिहावं. किती उपयोग होईल? माहिती नाही. 'कर्म करते रहो..' चा धीर माझ्यात नाही. माझ्या खिडकीतून दिसणारं सोसायटीच्या आवारात असलेलं हे नतद्रष्ट पोस्टर लवकरात लवकर नष्ट व्हायला हवं. काय करायचं? इमारतीतल्या इतर सभासदांना जागं करावं? पण अजून हे कुणाला खुपलेलं नाही, याचा अर्थ ते लोक कितपत जागे होतील, हाही प्रश्नच आहे.

त्या नेत्याच्या चेहेर्‍याकडे पाहिल्यावर आणखीच डोकं फिरलं.

शरण या! शरण या!! हे असले घाणेरडे फ्लेक्स लावणार्‍या कुणालाही मत देणार नाही, हे मी काही वर्षांपूर्वीच ठरवून ठेवलं आहे.. कळलं का? मला काय हवं आहे, ते आधी तुम्ही नीट विचारलं पाहिजे. मला गृहित धरता कामा नये, समजलं? शरण या.

आता त्या चेहेर्‍याकडे मला पाहवेना. सोसायटीतल्या इतर लोकांना काय वाटत असेल या मिशाळ, फोटोशॉप वापरून गोरा केलेल्या, तीक्ष्ण लोचट डोळ्यांच्या, झुपकेदार लबाड कोंबडा असलेल्या केसवाल्या रूबाबदार लाळघोट्या चेहेर्‍याकडे पाहून? पुरूषांना काय वाटत असेल? आणि बायकांना-मुलींना? शाळकरी-कॉलेजवाल्या पोरांना? याच आवारात खेळणार्‍या न-कळत्या वयातल्या लहान मुलांना?

यातल्या कुणाचीच काही भूमिका नाही, काही मत नाही म्हणजे अफाटच नवल आहे. बाकीचे मरू देत. मी काहीतरी केलं पाहिजे. सोसायटीच्या चेअरमन आणि संचालक मंडळाला भेटलं पाहिजे. किमान खरमरीत पत्र लिहून लेखी निषेध-नाराजी नोंदवली पाहिजे.

मला आता किंचित बरं वाटलं. मग मी फ्लेक्सवरच्या त्या काळ्या-गोर्‍या, हँडसम-विद्रूप, हलकट-मायाळू, कर्तबगार-नाकाम-नाकर्त्या चेहेर्‍याकडे खुनशी बघून घेतलं. 'बघूनच घेईन' असं बजावल्यागत. घरात आलो, आणि सारं गरळ ओकून टाकलं. ते सारं ऐकून घेण्यात आलं. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी निघाल्या. हॉस्पिटल-पेशंट-आजारपणं, लग्नाचे मुहूर्त आणि द्यायचे आहेर, राहून गेलेली कामं आणि दुरूस्त्या, संपत आलेलं सामान आणि कधीच्याच घ्यायच्या राहून गेलेल्या वस्तू, अजून भरायचा असलेला प्रॉपर्टी टॅक्स आणि अंगावर असलेली बँकांची कर्जं.

मग मी जेवलो आणि शांत झोपलो. अशांत शांत. नेहेमीप्रमाणेच स्वप्नांमुळे आजही मध्यरात्री जाग आलीच. मग जीवनमरणाचा प्रश्न असल्यागत दोन ग्लास घटाघटा थंड पाणी प्यायलो. मग जीवनमरणाइतकीच झोपही आवश्यक असल्याने पुन्हा झोपलो. स्वप्नांतल्या मेलोड्राम्यांनी सार्‍या दस्तावेज आणि तपशीलांसकट मागील पानावरून पुढे आपापले सिनेमे चालू केले. बुद्धी, तर्क, शहाणपण.. सारं बाजूला ठीवून ते निमूटपणे बघून घेतले. कारण दुसरा इलाजच नव्हता. तिथं आपली काहीच भूमिका-बिमिका ठरवण्याची कटकट आपल्याला नसते, याचा सुक्ष्मभव्य आनंद मला झाला.

***

दुसर्‍या दिवशी अनेक विचार डोक्यात घेऊन ऑफिसला निघताना पुन्हा 'ते' पोस्टर बघितलं, आणि पुन्हा वीज कोसळल्यासारखं झालं. आज दणदणीत पत्र तयार करायलाच हवं.

ऑफिसला आल्यावर रोजचे सिनेमे, डॉक्युमेंटर्‍या, डॉक्युड्रामे पुन्हा सुरू झाले. डोंबार्‍याच्या दोरीवर चालता आल्याचा सुखद अभद्र आनंद उपभोगत तो संपूर्ण दिवस पार पाडून मी घरी आलो, आणि सोसयटीच्या फाटकाच्या आत आल्यावर लक्षात आलं, पत्र राहिलं की रे!

दुसर्‍या दिवशी पुन्हा फाटकाच्या बाहेर निघताना त्या अभंग फ्लेक्सवरच्या सुंदरकुरूप चेहेर्‍याकडे मी मुद्दाम पाहिलं नाही, तरी मी बाहेर पडताना तो माझ्याकडेच पाहत असल्याची तिडीक डोक्यात गेलीच. मी मनातल्या मनात ठरवलं- भलंमोठं नसलं, तरी एक चार ओळींचं तीव्र भाषेतलं निषेधात्मक पत्र तरी खरडायलाच हवं आज.

पुन्हा ऑफिस.. डोंबार्‍याचा खेळ.. दोरी.. आनंद.. कर्तबगारीतलं हलकंफुलकं हलकटतुपकट समाधान..

छे! ते पत्र तयार करा, मग प्रिंट, मग पाकिट, मग नेऊन द्या. छे! 'रिटन कम्युनिकेशन' महत्वाचं. मेलआयडी काय आहे सोसायटी-ऑफिसचा? आणि चेअरमनचा?

आधीच कसं लक्षात आलं नाही, हे ईमेल करण्याचं? एसएमएस तर गाडी चालवताना सिग्नलला थांबल्यावरही करू शकतो की. ओके. 'प्लीज सेंड युवर ईमेल आयडीज.' लगेच तीन चार एसएमएस इनबॉक्समध्ये येऊन पडले.

दुसर्‍या दिवशी काही कामामुळे पहाटेच निघावं लागलं. संध्याकाळी गच्च भरून ओसंडणारं डोकं घेऊन फाटकातून आत आलो, तेव्हा त्या फ्लेक्सवरच्या चेहेर्‍याकडे नजर गेलीच. अगतिकतेने पण तुच्छता दाखवत पुटपुटलो, 'क्षुद्र माणूस! एका ईमेल इतकीही किंमत नाही तुला. यू..'

आणखी चार दिवस गेले. फ्लेक्स हरलं. म्हणजे अ‍ॅक्च्युअली जिंकलं. तो चेहेरा निवडणूक लढवायच्या आधीच जिंकला. तो अजून तसाच आहे तिथं. माझ्या पत्राने पांढरा झेंडा फडकावला. ईमेलने शरणागती पत्करली. माझ्या घराची खिडकी फितूर झाली.

मी स्वतःलाच फितूर झालो. हे असं फितूर होऊन दाखवणं म्हणजे किती अवघड आहे..! म्हणजे कित्ती सोपं आहे. काही करायलाच नको. काहीच न करता असं बरंच काही करून दाखवणं म्हणजे महानच.

***

'हा भारत माझा..' बद्दल बोलताना काल सुनिल सुकथनकर म्हणत होता, 'अण्णा हजारेंचं आंदोलन नक्की कशासाठी आहे, आणि त्याची फलनिष्पत्ती नक्की काय झाली- हा संपूर्णपणे वेगळा भाग आहे. ते सगळं एका वरच्या पातळीवर, किंवा फारतर आपण दैनंदिन आयुष्य ज्या पातळीवर जगत आहोत, तिच्यापेक्षा कुठच्यातरी भिन्न पातळीवर चाललं आहे असं म्हणू या. तिथं खूप सारे लोक खूप सार्‍या संसदेच्या आणि समाजाच्या कायद्या-नियमांबद्दल आणि चौकटींबद्दल भाष्य करत आहेत. आपल्या दैनंदिन जगण्याच्या प्रक्रियेची त्या सार्‍याशी मिळूनजुळवून घेताघेता दमछाक होते. लोकांनी, समाजाने, संसदेने, नेत्यांनी काय करायला हवं याबद्दल अनेक लोक हिरिरीने बोलू शकतील. त्यात अनंत वादप्रवादही तयार होतील. पण हे सारं जेव्हा 'मी स्वतः त्यात काय करायला हवं' या विचारांच्या पातळीवर येतं, तेव्हा प्रचंड गोंधळ होतो. अपरिहार्यतेतून जगण्याचे निरनिराळे तुकडे आपल्याला ठाम भूमिका घेऊ देत नाहीत, किंवा आपण आजवर होतो, त्याच्या एक्झॅक्टली उलट भूमिका घ्यायला लावतात- त्या सार्‍याचं काय करायचं हा प्रश्न छळतो. उदाहरणच द्यायचं झालं, तर 'भ्रष्टाचार' ही संकल्पना घेऊया. नेते पैसे खातात, कामं करत नाहीत इथपर्यंत आपली भ्रष्टाचाराची संकल्पना मर्यादित असते. दररोजचं जगणं याच्यापलीकडे आपल्याला विचारच करू देत नाही. खरंतर घरातल्या घरातच एखाद्या व्यक्तीचा सामान्य अधिकार-हक्क नाकारणं, खिडकीतून कचरा खाली टाकणं, घाई असल्याने सिग्नल तोडणं, आजवर जपलेल्या मुल्यांशी फारकत घेऊन एखाद्या परिस्थितीत स्वतःच विशिष्ठ मत तयार करणं- इतक्या सुक्ष्म पातळीला आपल्या आयुष्यात रोज हा भ्रष्टाचार पोचतो. मग सिग्नल तोडल्याने पोलिसाला पैसे देणं, सरकारी कामं व्हावी म्हणून एखादी नोट सरकवणं- हे तर फारच पुढचं. आपल्या शरीराच्या नसानसांत आणि रोजच्या जीवनातल्या धाग्याधाग्यांत पोचलेल्या या भ्रष्टाचाराचं काय करायचं, किमान त्याबदल आपली स्वतःची वैयक्तिक अशी ठाम भूमिका तरी आहे का, हा खरा प्रश्न आहे..'

***

आपणच गोंधळलेले, तर आपल्या शाळेत जाणार्‍या मुलांना या भुमिके-बिमिकेबद्दल काय सांगणार? 'जय भीम कॉम्रेड' मधल्या एका बौद्ध धर्म स्वीकारलेल्या कुटुंबातली आठ-दहा वर्षांची लहान मुलगी जेव्हा 'आम्ही कोणताच देव मानत नाही, त्याचं नक्की कारण काय, ते माहिती नाही. बाबांनी कधी सांगितलं नाही. माझ्या शाळेतल्या सार्‍या मुलांच्या घरांत वेगवेगळे देव मानले जातात. त्यामुळे आमच्या घरात देव नाही, हे सांगितल्यावर ते चिडवतात, उलटंसुलटं बोलतात. म्हणून मी असलं काही शाळेत सांगतच नाही..!' असं म्हणते, तेव्हा नक्कीच विचार करण्याजोगी परिस्थिती उद्भवलेली असते. याच डॉक्युमेंटरीमध्ये एका दलित कुटुंबातली मावशी 'नवरा दारूडा आहे, पण काय करणार? आम्ही शाळा शिकलो नाही. आईबापांनी नवरा कसाही असला, तरी पुजायचा असतो असं शिकवलं आहे, ते कसं मनातून जाणार?' असं म्हणते. याच माहितीपटात पुढे अनेक मोठमोठ्या, शिकलेल्या, असतील नसतील तेवढ्या सर्व जाति-धर्मांच्या नेत्या-पुढार्‍यांची मराठी-हिंदी-इंग्रजी भाषेतली, सामान्य लोकांची 'मतं बनवण्याचा, घडवण्याचा' प्रयत्न करणारी मुक्ताफळं बघायला मिळतात; तेव्हा त्या दलित कुटुंबातल्या मावशीचं 'शिकलो असतो, तर काहीतरी ठाम भूमिका घेता आली असती, काहीतरी करता आलं असतं..' हे सपशेल खोटं वाटू लागतं. सामान्य लोकांच्या जगण्यात जातिधर्म घुसडून दंगेधोपे माजवणं हे नक्की कुठच्या ठाम आणि तर्कशुद्ध भुमिकेवर आधारलेलं आहे, हे खरोखर समजत नाही. मोठमोठी विद्रूप फ्लेक्सेस, व्यक्तीपूजेचं स्तोम वाढवणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूका, रॅल्या, स्पीकर्सच्या भिंती आणि कैलासवासी महापुरूषांच्या जयंत्यांना धुंद होऊन नाचणं- हे नक्की कुठच्या ठाम धारणेतून आलं आहे, ते कळत नाही.

***

पण मी इतरांबद्दल बोलणं हा शुद्ध मुर्खपणा. मी फक्त माझ्या बाजूने विचार केला तर सारं सोपं आहे. मी मलाच फितूर होणं कसं थांबवणार, इतकाच प्रश्न.

***
***

विषय: 
प्रकार: 

सुं द र!!

पण मी इतरांबद्दल बोलणं हा शुद्ध मुर्खपणा. मी फक्त माझ्या बाजूने विचार केला तर सारं सोपं आहे. मी मलाच फितूर होणं कसं थांबवणार, इतकाच प्रश्न.

--/\--

<<<<<आता त्या चेहेर्‍याकडे मला पाहवेना. सोसायटीतल्या इतर लोकांना काय वाटत असेल या मिशाळ, फोटोशॉप वापरून गोरा केलेल्या, तीक्ष्ण लोचट डोळ्यांच्या, झुपकेदार लबाड कोंबडा असलेल्या केसवाल्या रूबाबदार लाळघोट्या चेहेर्‍याकडे पाहून? पुरूषांना काय वाटत असेल? आणि बायकांना-मुलींना? शाळकरी-कॉलेजवाल्या पोरांना? याच आवारात खेळणार्‍या न-कळत्या वयातल्या लहान मुलांना?>>>>>

लेखन आवडले. अनेक विधान आवडली. हा वरील पॅरा मात्र पटला नाही. पोस्टर्स लावणे याचा राग ठीक, पण चेहरा कसाकसा आहे हे म्हंटले जायला नको होते असे वाटते. Happy

(अवांतर - एखाद्याची एखाद्या विषयाबाबत एखादी ठाम भूमिका नसणे / नसणे हे त्याला व इतरांना पटणे, हेही शक्य वाटते)

-'बेफिकीर'!

__/\__

पण मी इतरांबद्दल बोलणं हा शुद्ध मुर्खपणा. मी फक्त माझ्या बाजूने विचार केला तर सारं सोपं आहे. मी मलाच फितूर होणं कसं थांबवणार, इतकाच प्रश्न. >> कळीचा प्रश्न. याचं उत्तर सापडलं तर कदाचित ब्रम्हज्ञान झाल्याचा आनंद होईल. आपण सारेच शापित अश्वत्थामे, भळभळत्या जखमा मिरवणारे चिरंजीव!
विचारांची साखळी सुरेख मांडली आहेस. अनेक शब्द नवे पण चपखल.

मस्त!!

मस्त जिराईतखाने !
मस्त हा शब्द अगदी मस्तवालपणे, पोस्टरसारखाच घुसलाय. जे सांगायचंय त्यासाठी शब्द सापडले की सांगतो.

आशूडी+१

जबरी रे! प्रत्येक वाक्याला अनुमोदन.
रच्याक ने साजिर्‍या तुला एक किनारा बक्षिस मिळाला असता यासाठी! Happy

मस्त ! छान लिहलेय आवडले Happy

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
©º°¨¨°º©!!! सर्व मायबोलीकरांना इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!! ©º°¨¨°º©

(कोई शक??? )

या प्रश्नाचं उत्तर इनव्हेरिएबली 'नो, सर' असंच द्यायचं असतं ना प्राची आर्मीत ? Happy

Happy
तळ्यात-मळ्यातची अस्वस्थता, कोणतीतरी भूमिका घेणं, मग तिच्यापासून परत डळमळीत होणं आणि शेवटी तो एक उमाळाच असणं- शब्दबद्ध सुरेख केलं आहेस.

ऑस्सम. यू मेड माय डे !!
स्वातीआंबोळे +२. I doubt therefore I am हीच आपल्या पिढीची 'चांगदेवी' भूमिका आहे असे मला हल्ली वाटते.
विकी, क्रिस्टीना, बार्सीलोना मध्ये ती म्हणते ना की 'chronically dissatisfied' तेच.. तसेच.

भापो