फक्त चढ म्हणा! (अंतिम भाग)

Submitted by इंद्रधनुष्य on 16 December, 2011 - 09:43

फक्त चढ म्हणा! (भाग - पहिला)

मदन गड तसा आकाराने लहान... रॉकपॅचची परिक्षा देऊन गडाच्या शेंड्याकडे निघालो. मदनच्या सुळक्याला उजवी कडे ठेवत पुढे गेल्यावर डाविकडील अलंगचे इंग्रजीतील 'C' आकारातील दर्शन होते. अलंगच्या माथ्या वरील गुहा, राजवाड्याची भिंत इथून अस्पष्ट दिसते. थोडावेळ तिथेच घुटमळून वर जाण्यास निघालो. शेंड्याकडे जाण्यासाठी कातळ कड्यात कोरलेल्या पन्नास एक पायर्‍या चढून जावे लागले. शेंड्यावर फक्त पाण्याचे एक टाके आणि एक गुहा एव्हढाच काय तो जामनिमा शिल्लक आहे. मदनच्या उजविकडून कुलंगचा दक्षिणेकडील परिसर नजरेस पडतो. त्या कडेकपार्‍यांतून बरीच गिधाडे विहाराताना दिसत होती. तिथेच एका उंचवट्यावर उभ राहुन उडी उडीचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला... पण दुपारच्या उन्हामुळे कोणालाच त्यात रस उरला नव्हता. थकलेले काही जण तसेच उन्हात पडून राहिले. उन्हाचा त्रास सोसेनासा झाल्यावर सगळ्यांनी परतीचा मार्ग धरला... काही वेळा पुर्वीच धडाधड पायर्‍या चढून आलेलो... आता उतराताना मात्र फाफलत होती. पायर्‍यांचे कोरिव काम करणार्‍या कारागिरांना कंटाळा आला म्हणून की काय त्या पायर्‍यां जवळील कातळ कड्याचा काही भाग बहिर्वक्र पद्धतीने कोरला होता. त्यामुळे सुटलेल्या पोटाबांना त्याचा त्रास होऊ लागला... चढाई पेक्षा उतरण्याला दुप्पट वेळ लागला. पुढे अलंग कडील वळणावर थोडा वेळ दगड-मातीने अग्नी परिक्षा पाहिली.

परतून आम्ही त्या चाळीस फूटी रॉकपॅच जवळ आलो. एव्हाना सगळ्यांचा जठराग्नी चांगलाच भडकला होता... थेपले, कचोरी, शंकरपाळ्यांची त्यात आहुती देण्यात आली. आमच्या सोबत आलेल्या दुसर्‍या ग्रुप मधिल दहा-बारा शिलेदारांचा तो रॉकपॅच चढाईचा कार्यक्रम बाकी होता. वरचा मावळा खाली गेला की खालचा वर असा वेळखाऊ कार्यक्रम सुरू होता... सावली आणि गार हवेमुळे बसल्या बसल्या सगळ्यांनी तिथेच पथारी पसरल्या..

Lower Down Systemने पॅच उतरायला केवळ ५ मिनिटं लागत होती... पुर्वीचा वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव पाठिशी असताना आमच्या साठी ते सोप्पे काम होते. उरताना सगळ्यांच्या कॅमेर्‍यांनी मनसोक्त क्लिकक्लिकाट करून घेतला.

प्रचि : Yo Rocks

खाली येऊन बराच वेळ वाट पाहुन सुद्धा वरचे मावळे उतरेनात... तेव्हा कंटाळून आनंद, मी आणि केके अलंगच्या गुहे कडे निघालो. गुहेत जाऊन थोडासा फराळ केला. बाकीचे मायबोलीकर येईपर्यंत आराम करण्याचा इरादा होता. परंतू लिडर लोकांना लवकरात लवकर सगळ्यांना अलंगवर पाठवण्याची घाई होती. काहीश्या नाराजीने सॅग पाठिवर टाकून उठलो. उजविकडे लगेच एक रॉक पॅच लागला. त्या पॅचवर गावाकर्‍यांनी तार ठोकून ठेवलेली होती. तो पॅच पार करून गेल्यावर दम काढणारा अलंगचा ९० फुटाचा कातळ कडा दिसला.

इथे एक चांगली गोष्ट दिसली ती म्हणजे प्रस्तारोहणासाठी रोपची शिडी लावलेली होती. त्यामुळे वेळ तर वाचणार होताच शिवाय मेहनतही कमी करावी लागणार होती. आधी आमच्या सॅग वर गेल्या नी मग सॅगचे मालक... Harness आणि Belayची जुळवाजुळव करून शिडीला हात घातला... लगेच लिडरने दुरुस्ती सुचविली... दोन्ही हात शिडीच्या पायरी वर न ठेवता रोपच्या डावी उजविकडे पकडत वर जाण्यास सांगितले... जर त्या विस पंचविस पायर्‍या तशाच पकडून वर गेलो असतो तर हाताची बोटं कड्यावर आपटून रक्तबंबाळ झाली असती... झपाझप पाय उचलत पंधरा एक पायर्‍या एका दमात वर चढून गेलो... त्यामुळे प्रस्तारोहणाचा थरार मात्र कमी झाला होता... मात्र अर्ध्या अधिक पायर्‍या चढून गेल्यावर दम लागलाच. काही क्षण तसेच शिडीवर लोंबकळत राहोलो... थोडा दम खाऊन पुन्हा पायर्‍या चढण्यास सुरवात केली.... जस जसे वर सरकू लागलो तसे एक फुट अंतर असलेल्या पायर्‍यांची लांबी आमच्या वजनाने दोन फुटच्या वर होऊ लागली... एक एक पायरी वर चढताना बरिच कसरत करावी लागत होती. अंतिम टप्प्यात Belayerलाच जोर लाऊन वर खेचून घ्याव लागलं.

दिवसभर दोन्ही पॅच वर अशी खेचाखेची करणार्‍या त्या सगळ्या Belayer च्या हातांना सलाम. Hand Gloves घालून सुद्धा त्यांच्या हातांची आगआग होत होती. तो कठिण पॅच सर करून आल्यावर लिडरने उजविकडिल गुहेकडे बोट दाखविले... बघतो तर काय गुहेत सरपण आणि सॅग ठेवलेल्या दिसल्या... म्हणाला, ते सगळे वर घेऊन जायचे आहे. ते ऐकताच शरिरातील उरला सुरला सगळा त्राण गळून पडला... त्याला म्हटले, आधी जे वर गेले आहेत त्यांना बोलावून आणतो... नी मग सगळ्यांची साखळी करून सॅग आणि फाटी वर पोहचवतो. त्या पॅच नंतरचा अलंग वर जाण्याचा रस्ताही मदन सारखाच अरुंद पायर्‍यांचा होता... उजविकडे कडा नी डाविकडे दरी!

वर जाऊन पाण्याच्या टाकी शेजारी सॅग ठेवल्या आणि आराम फर्मावत बसलेल्या शिलेदारांना पायर्‍यांकडे चलण्याची विनंती केली. तो पर्यंत मायबोलीकरां पैकी एक एक जण वर येऊ लागला होता. सगळे थकले भागले जीव पायर्‍यांवर ओळीत बसले... साखळी करून गुहेतील सॅग आणि सरपण वर पोहचवे पर्यंत संध्याकाळ दाटून आली होती. तांबड्या पिवळ्या रंगाची रजई ओढून सुर्व्या निजायला चालला होता... या दुनियादारीत मात्र आमचा सुर्यास्त हुकला होता. पण त्याचे कोणालाच वाईट वाटत नव्हते. कारण... 'उगवला चंद्र पुनवेचा'.

गडावरून चंद्रग्रहण पाहण्याची ही माझी दुसरी वेळ... पहिल्या वेळी राजगडावर चंद्रग्रहाणाचा नजारा पाहिला होता पण त्या वेळी सोबत कॅमेरा नव्हता. आता मात्र मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत निवांत पणे फोटोसेशन सुरू केले...
'ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा'......

गुहेत चुल पेटवली तर धुराचा त्रास होतो... म्हणून चूल उघड्यावर पाण्याच्या टाकी शेजारी मांडली होती. व्हेज बिर्याणीचे सामान गोळा झाल्यावर सगळे मदतीला बसले. कांदे चिरण्यातील नविनचा सराईत पणा पाहून जमलेल्यांच्या डोळ्यात पाणी आले... बटाटे, टॅमेटा, गाजर, कोंथबिर सगळा सरंजाम तयार झाला.

चुलीवर बिर्यानी सोबत पापडांचा फक्कड बेत जमून आला होता... तर वर नभमंडळात त्या लाडक्या मामाने आपल्या कलांचा खेळ सुरू केला होता. संध्याकाळचा अल्हाददायक वाटणारा गारवा रात्र चढू लागल्यावर अंगात कुडकुडी भरवू लागला. लिडर लोकांनी कॅंम्प फायर साठी जागा मोकळी केली आणि तिथेच रिंगण घालून आमची पंगत बसली. थंडीमुळे कधी एकदा जेवतो आणि आडवा होतो हा एकच विचार सगळ्यांच्या मनात घोळत होता. गरमा गरम बिर्यानी संपवे पर्यंत चंद्रग्रहण सुटू लागले होते. हात धुण्याचे कष्ट जिवावर आले होते म्हणून तसेच बाजूला हात साफ करुन गुहे कडे धूम ठोकली.

गुहा अगदी ऐसपैस होती... एक हॉल... एक किचन दोन बेडरुम तर दोन मास्टर बेड रुम... घोरंदाजांचा त्रास नको म्हणून मी, गिरी, विनय, आनंद आणि डेविलने मास्टर बेड रुम मधे बस्तान बसवले. एव्हढ्या मोठ्ठ्या गुहेत जेमतेम २०-२५ जण होतो... गुहेत माती फार होती, सहाजिकच त्यामुळे धूळ उडून त्रास होत होता. सोबत आणलेले वर्तमान पत्र खाली पसरून त्यावर मॅट टाकल्या... ज्यांनी मॅट आणली होती त्यांची चिंता नव्हती... पण आमच्या सोबत आलेल्या नविन ट्रेकर्सची पंचाईत नको म्हणून मी मॅट सोबत TNTचे गोणते घेतले होते... सगळी आवरा आवर करुन अकराच्या सुमारास घोर्‍यांची समाधी लागली.

साडे चारला जाग आली तेव्हा अस्मादिक खाली आणि मॅट डोक्याच्या वर असला विचित्र प्रकार घडला होता. जल्ला पिलास्टिकच्या गोणत्यावर झोपल्यावर असेच व्हायचे म्हणत परत वर जाऊन झोपलो... पहाटे साडेपाचला हिमेस भाईंला कळ लागली तसा तो कोणाच्या तरी भ्रमणध्वनीतून बोंम्बटू लागला...उठून बसलो तर गुहेतून बाहेरील चंद्राचा दुधाळ प्रकाश दिसत होता. धन्य त्या गायनी कळांनी शेजारी झोपलेला आनंदही उठला... खालच्या बेड रूम मधले आणखी दोघ-तीघे उठले... असे करत सगळ्यांनी कळीचा मुद्दा उचलून धरला... नी मग वरात निघाली ति अलंगच्या टाक्याकडे... मात्र टाक्याकडे जाताना कळीचा मुद्दा बाजूला सारून यो आणि गिरीने आवाज कुणाचा या वर चर्चा सत्र भरवलं... कालच्या श्रमाने थकले भागले जिव ढाराढूर झोपले होते... आम्हाला ना आवाज उठवू शकत होता ना वाघ!

पाण्याच्या माग काढत बरच वर जावे लागले... पुर्वेकडील क्षितीजावर त्या दिनकराने सवई प्रमाणे आपला रंगीत पसारा मांडण्यास सुरवात केली होती. अलंगच्या पुर्वेला असलेल्या घनचक्कर, आजोबागडा मागून दिसणारा सुर्योदयाचा नजारा पाहण्यात आम्ही दंग झालो... घाटघर धरणातील पाण्याने केशरी रंग परिधान करे पर्यंत आम्ही सुर्योदयाचा तो रंगित नजारा न्याहळत बसलो.

माघारी फिरून येताना पडलेल्या राजवाड्याचे अवशेष दिसले. राजवाड्या मागे दिसणारा ऐटदार कुलुंग पहाटेच्या उन्हात न्हाऊन निघत होता.

लवकर नाष्टा उरकून परतीला लागू म्हणजे चारची कसारा लोकल गाठता येईल... मागे राहिलो तर इतर ग्रुप सोबत गड उतरायलाच चार वाजतील असे समिकरण मांडून आम्ही गुहेकडे परत आलो. सॅग उचलून तसेच सगळे रामोशी खाली चुली पाशी आलो... तिथे चहा आणि मॅगी तयार व्हायला बराच वेळ होता... हातात वेळ असला की, मग एकेकाला नको नको ते उद्योग सुचतात... आनंदने ब्रेडचे स्लाईस चुलीवर भाजून दिले... चुलीवर खरपूस भाजलेल्या ब्रेडला जाम लाऊन खाल्ले... ती चव म्हणजे... अऽह्हाऽ! सोबतीला यो ने आणलेले खसखस, रामोच्या पुपो, चिवडा, थेपले, केक आदींचे मार्केटिंग सुरू होते... डेविलने रात्रीचे शिल्लक राहिलेले हिरवे वाटाणे मॅगीत टाकले तर कच्चे बटाटे चुलीत... :p

नाष्टा आटोपून आम्ही खाली अलंगच्या कड्या जवळ आलो. लिडर लोक्स रोप लावण्याच्या कामात गुंतले होते. तो पर्यंत काही जण समोरील दरीचे चित्रीकरण करण्यात सगळे गढले... तर गुहेतील बाकीचे Harness चढवून आपल्या नंबरची वाट पहात बसले...

रॅपलिंग करण्याचा पहिला आणि शेवटचा मान नविनला मिळाला... कारण रॅपलिंग करत खाली उतरायला वेळ लागत होता. रॅपलिंगचा सेटअप काढून मग Lower Down चा सेटअप लावला... तसे धडाधड सगळे खाली उतरू लागले... खाली खोल दरी असल्यामुळे पहिल्यांदा कड्यावर मागे झुकताना फार भिती वाटत होती... पण मागे झुकल्या शिवाय बिले वर वजन पडून खाली जाता येणार नाही याची जाणीव होती... कड्याचा तो पहिला टप्पाच फक्त थरकाप उडवणारा होता... एकदा का कडेलोट झाला की मग सगळेच सोप्पे... सरसर करत दोन मिनिटांत खाली... विनयची Lower Down करतानाची कसरत.

तो ९० फुटाचा पॅच पार केल्यावर लगेच एक २० फुटाचा पॅच कमरेला दोर लाऊन पार केला... आणि मग सुसाट सुटलो... जल्ला उतरताना परत एकदा काटेरी झुडपांनी गतिरोधकांची भुमिका पार पाडली... एका सुकलेल्या व्हाळात बसलो... मस्त लिंबू मारके भेळ बनवून खाल्ली... पुढे निघालो ते... धडपडत... घसरत... फोटो सेशन करत.. दोन तासात पायथ्याला पोहचलो.

गावातील एका गावात ऑफबिटने जेवणाची सोय केली होती... गेल्या गेल्या त्यांच्याकडे जेवणाचा तगादा लावला... तो पर्यंत आम्हाला कसार्‍याला घेऊन जाणारा ड्रायवर घोड्यावरून हजर झाला... "जेवण सोडा आधी गाडीत बसा!" काय म्हणाव या ड्रायवरला... विनयने त्याची समजूत काढली, "पाच मिनिटांत जेवतो आम्ही... तुम्ही दोन मिनिटांत परत या".. जेवण वाढेपर्यंत सगळ्यांनी आपले माय मोकळे करून घेतले... तर नविनने चक्क अंगणातच अंग टाकून दिले.

पिठलं-भात आणि चटणी... फटाफट उरकून गाडीकडे निघालो... पण चालक आणि गाडी दोन्ही गायब!... जल्ला काय लोचाय? सुन्याला फोन लावा... प्रितीला फोन लावा... मोबाईलची रेंज आहे का? अरे माझ्या आहे पण वर सुन्याच्या मोबाईलला रेंज नको का?... तुम्ही लईच इनोद करता राव...

वाट पाहुनी जिव शिणला गाड्यां मागून गाड्या गेल्या... गावकर्‍यांना एस्टी बद्दल विचारले तर उत्तर मिळाले.... "रयवारच्याला कधी येते तर कधी न्हाई येत".

दोन तास वाट पाहिल्यावर मागिल ग्रुप येऊन आम्हाला मिळाला... पण गाडीचा काहीच पत्त्या नव्हता... मरगळलेल्या लोकां समोर मग योरॉक्सने 'दाखवण्याचा' कार्यक्रम पार पाडून घेतला. :p जल्ला काय सांगू... 'यो'च्या हातच्या चहाची सर कश्शा कश्शाला म्हणून नाय...

प्याऽपीऽ करत कालच्याच दोन काळ्यापिवळ्या आल्या तसे लगेच सामान चढवून आम्ही सुन्याचा आणि ऑफबिटचा निरोप घेतला. ६.२०ची कसारा लोकल मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. ड्रायव्हरनेही बरोबर वेळेत १० मिनिटं आधी कसारा स्टेशनला पोहचवलं... लोकल आधीच लागली होती त्यामुळे आता खरी परिक्षा होती ती जागा पटकवण्याची... कुलुंगच्या ट्रेकचीच आयडीया इथे सुद्धा वापरली... माल डब्ब्यात अतिक्रमण करुन भैय्याचा ठेला एका बाजुला सारला... गिरिची मॅट आणि वर्तमान पत्र खाली पसरून प्रत्येकाने तळ ठोकला... वडे, समोसे खाऊन घसा गरम करून घेतला नी मग सुरू झाली ती मंगल गाणी दंगल गाणी!

प्रचि : प्रणव

समाप्त...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

इंद्रा.. जमल्यास लेखात तुझ्या पिकासाची लिंक दे.. सर्वच फोटो छान आलेत.. सो मोठ्या साईजमध्ये बघताना अजून छान वाटेल.. बाकी वृत्तांत मस्तच...

चंद्राचे फोटो सुरेख. सूर्योदयाचेही. ते मोठे टाकशील का? तुम्ही सगळे बसला आहात, ते मागचे दार किती सुरेख दिसते आहे..

पायर्‍यांचे कोरिव काम करणार्‍या कारागिरांना कंटाळा आला म्हणून की काय त्या पायर्‍यां जवळील कातळ कड्याचा काही भाग बहिर्वक्र पद्धतीने कोरला होता.
Lol

मस्त वर्णन!
फोटॉही सुंदर!

त्या पायर्‍या बोलावतायत मला... Happy

दगडाला म्हणावं, बास झाले आता "चहाचे कार्यक्रम"! Wink

>>सगळे रामोशी >>यो'च्या हातच्या चहाची सर कश्शा कश्शाला म्हणून नाय...>> Lol
इंद्रा मस्त रे! सगळे फोटोही सुंदर!!

इंद्रा, (नेहमीप्रमाणेच) मस्त लिखाण आणि त्याला साजेशे प्रचि. Happy

पायर्‍यांचे कोरिव काम करणार्‍या कारागिरांना कंटाळा आला म्हणून की काय त्या पायर्‍यां जवळील कातळ कड्याचा काही भाग बहिर्वक्र पद्धतीने कोरला होता. त्यामुळे सुटलेल्या पोटाबांना त्याचा त्रास होऊ लागला... >>>>:फिदी:

छान लिहिलंयस Happy फोटोही छान आहेत. चंद्राचे खुप आवडले.
तो झेंडा लावलेला फोटो बघुन फार म्हणजे फारच भिती वाटली... बापरे... माझ्या पायाखालचा दगड सरकल्यासारखी... Uhoh

तुम्ही सगळे ट्रेकडे लोक महा.......................न आहात. धन्य धन्य _____/\_______

अनुभव ......................... लय भारी
त्या अनुभवाचे वर्णन ........ लय भारी
त्या वर्णनासोबतचे फोटो ... लय भारी !

आणी कांदे चिरण्यातील नविनचा सराईत पणा पाहून जमलेल्यांच्या डोळ्यात पाणी आले.आणी पुलावा वर्णन वाचुन आमचा तोडाला. व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्वावसही रे सही. मस्त फोटो आणी लेख.