असच आपलं... सटर फटर... दोन.

Submitted by ह.बा. on 19 December, 2011 - 06:32

******************

सगळे नको नको म्हणत असताना तीस रुपये प्रवेश फी भरून उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. चिठ्ठी उचलायची आलेल्या विषयावर तीन मिनीटे विचार करायचा आणि मग तीन मिनिटे बोलायचं असा प्रकार होता. माझ्या आधी बरेचजण मस्त बोलून गेलेले. गुलाब, आरसा, ती असती तर, माय मराठी असे भन्नाट विषय येऊन गेलेले. ऐकायला भारी मजा येत होती. आमचा नंबर आला, चिठ्ठ्यांच्या डबड्यात हात घातला एका चिठ्ठीसोबत हात बाहेर आला. चिठ्ठी उघडली विषय होता "दगड." नेम धरून आमच्याच नशिबावर धोंडा पडलेला. तीन मिनीटे जाऊन एखाद्या दगडावर डोकं आपटून घ्यावसं वाटलं. संयोजकांपैकी एकाला माझी अडचण लक्षात आली आणि आडरानात दगड यावा तसा तो माझ्या कामी आला.
"काळजी नका करू जमेल तसं बोला"
"पण सर... दगड"
"चिठ्ठी बदलता येत नाही"
"हं...."
स्टेजमागे गेलो. तीन मिनिटं दगडासारखा एका जागी उभा राहिलो. मधून मधून दगडाबद्दल काही बाही आठवायचं पण ते स्टेजवरून सांगण्यासारखं आजिबात नव्हतं. विचार करायची वेळ संपून गेली. हळूवार चालत स्टेजावर गेलो... माझा चेहरा बघून समोरच्या हितचिंतकानी खुदखुदून आनंद व्यक्त केला...
"नमस्कार... रसिक श्रोते वक्ते आणि ज्ञातेहो, मी हणमंत शिंदे उत्स्फूर्त साठी विषय मांडतोय 'दगड'"
समोरून हासण्याचा आवाज.
"खरं तर.... म्हणजे तसं बघायला गेलं तर..... दगड या विषयावर बोलण्यासारखं खूप काही... पुर्वी दगडाची घरं असायची... दगडी मंदीरं असायची... आता सिमेंट आलं आणि... म्हणजे तसं या विषयावर बोलण्यासारख खूप आहे ... आहे पण सध्या मला आठवत नसल्याने उगाच हवेत धोंडे मारण्यापेक्षा मी आपली रजा घेतो... धन्यवाद!"
तहहयात असा पोपट झाला नाही आणि होणे नाही. 'तीस रुपये देऊन इज्जत निलाम करनेवाला ये कैसा बेवकूफ हु मै' म्हणत सभागृहाबाहेर पडलो.
स्पर्धा संपली परतीच्या प्रवासात डोक्यात दगडावर दगड आपटत होते. विषय दिला होता म्हणजे बोलण्यासारखं काहितरी असणारच. दगड! दगड? दगड... हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीचा काळा फत्तर.... यशवंतरावांच्या वाक्यातला काळा फत्तर कसा जिवंत माणसासारखा वाटतो... ना टाळ ना पेटी ना मृदंग, दगडावर दगड आपटत गोपाला गोपाला म्हणत गाडगेबाबा स्वच्छ्तेचा संदेश देऊन गेले... बाबांच्या मुखातून निघालेल्या शब्दगंगेला दगडानी ताल दिला होता... स्वराज्याची राखण गडकोटांच्या कोरीव दगडानी केली हे तर काहीच नाही... अहो दगड स्वराज्यासाठी लढले... शस्त्र होऊन वैर्‍यांवर तुटून पडले... गडाखालून तोफांचा मारा झाला तरी न डगमगता दगडी बुरूज भक्कमपणे उभा राहिले आणि गडावरून ढकलून दिलेल्या धोंड्यानी राक्षसाएवढ्या शत्रूंनाही चिरडून टाकले... सजिव निर्जीव वगैरे विज्ञानाच्या कसोट्या विसरून रामाचं नावं देहावर उमटताच हातपाय नसाणारे गोल गोटे समुद्राच्या पाण्यावर तरंगू लागले... डोळे दिपतील अशा कोरीव दगडी महलांपासून ते अजिंठा वेरूळच्या मोहक शिल्पांपर्यंत कलासक्त हातांची तहान भगवली ती ही दगडानीच... ज्ञानेशाची समाधी असो वा तुकोबाचे राऊळ, आधाराचा आणि सौंदर्याचा भार मात्र दगडांवरच आहे... दगड धोंड्याच्या पोटातच जगताचा मौल्यवान खजिना सापडतो. कृष्णा,कोयना, गंगा, भिमा सगळ्याच मावल्या दरीखोर्‍यात दगडाच्या थरातून पाझरतात आणि दगडी माळांना हिरवाईचा आहेर करत वाहत राहतात...
विचार करता करता दगडांचा भला मोठा ढीग डोग्यात जमा झाला.
आपल्या रिकाम्या जागेत गावाने सुगंधी खाडी बनवू नये म्हणून तिथल्या झाडाखाली अंडाकृती दगड ठेऊन त्याला शेंदूर फासणारा आणि कालच देवाला कोंबडा कापलाय हे सिध्द करण्यासाठी दुसर्‍याच्या उकिरंड्यावरची कोंबडीची पिसं आणून आपल्या दगडाभोवती पसरणारा दिन्या साठे आठवला... रानाच्या हद्दीचे दगड रातोरात हलवून फूटभर सरकवा सरकवी करणारे महाठक आठवले... दंगलीत बसवर पडणारे दगड आठवले... विचाराच्या ओघात मख्ख पडलेल्या दगडांमधलं चैतन्य समोर आलं आणि स्पर्धेत व्यासपिठावर आपण दगडाइतकेही जिवंतपणाने वागलो नाही याची जाणीव झाली. कधीतरी आपल्याला उत्स्फूर्त स्पर्धेत दगड या विषयावर बोलता येईल या आशेने त्यानंतर बर्‍याच स्पर्धा केल्या बरेच विषय बोलता आले पण पुन्हा दगड काही नशीबात आला नाही...

गुलमोहर: 

ह. बा. उत्स्फूर्तचे विषय अशीच भल्याभल्यांची दांडी गुल करतात. मनमाडच्या एका स्पर्धेत आपल्या एका मित्राची अशीच गंमत झाली होती. बाकी तीन पायांची खुर्ची, असे संयोजक, असले टिनपाट विषयही यायचे स्पर्धांना! Proud

ती बारामतीची स्पर्धा आठवली तरी अंगावर आजही काटा उभा राहतो. त्या स्पर्धेची दुसर्‍या क्रमांकाची ट्रॉफी आम्ही दोन भागांत तोडून परत केली होती. त्यांनी नंतर धसका घेतला असावा... Proud

अगदी अगदी मुक्ते... उत्स्फूर्तचे विषय ठरवणं याच्याइतकी धमाल दुसरी नाही! Happy

मस्तं लिहिलंय. काहीही विषय देतात 'समयस्फूर्त'ला.

एस्टीत कंडक्टर राजा, पॄथ्वीचं गुरुत्त्त्वाकर्षण संपलं आणि...., माझ्यासाठी आयोजित शोकसभेत.. हे त्यातल्यात्यात बरे मिळालेले विषय आठवताहेत.

Happy

Happy

Biggrin !!!

सटर फटर सिरीज मस्त आहे Happy

अजून दगड आहेत -
रस्त्याच्या कडेचा मैलाचा दगड, कबरीवरला दगड, पाट्या वरवंट्याचा दगड, नर्मदेतला गोटा, जिब्राल्टर रॉक...

ह.बा. ..... लेखन खूप आवडलं.

"दगडावर काय लिहिणार...... दगड !"
हा सर्वसाधारण समज खोटा ठरवलात या लेखातून.

एखाद्या संथ तळ्यात फेकलेल्या दगडातून निर्माण होणार्‍या
तरंगांसारखा अगदी लयीत तरंगला हा तुमचा दगड.
असं म्हणू ?
की एका दगडाने तुम्ही कितीतरी ’खापर्‍या’ निर्माण केल्यात म्हणू ?

पुन्हा दगड काही नशीबात आला नाही...>>> मस्त. ह. बा. खरेय उत्स्फूर्तचे असे विषय त्या ३ मिनिटात देव आठवायला लावायचे.

विचार व बोलण्याची एकुण ६ मिनिटे संपली की खंडीभर कल्पना सुचत. Happy (सगळ्यांचे असेच होते ना)

Pages