******************
सगळे नको नको म्हणत असताना तीस रुपये प्रवेश फी भरून उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. चिठ्ठी उचलायची आलेल्या विषयावर तीन मिनीटे विचार करायचा आणि मग तीन मिनिटे बोलायचं असा प्रकार होता. माझ्या आधी बरेचजण मस्त बोलून गेलेले. गुलाब, आरसा, ती असती तर, माय मराठी असे भन्नाट विषय येऊन गेलेले. ऐकायला भारी मजा येत होती. आमचा नंबर आला, चिठ्ठ्यांच्या डबड्यात हात घातला एका चिठ्ठीसोबत हात बाहेर आला. चिठ्ठी उघडली विषय होता "दगड." नेम धरून आमच्याच नशिबावर धोंडा पडलेला. तीन मिनीटे जाऊन एखाद्या दगडावर डोकं आपटून घ्यावसं वाटलं. संयोजकांपैकी एकाला माझी अडचण लक्षात आली आणि आडरानात दगड यावा तसा तो माझ्या कामी आला.
"काळजी नका करू जमेल तसं बोला"
"पण सर... दगड"
"चिठ्ठी बदलता येत नाही"
"हं...."
स्टेजमागे गेलो. तीन मिनिटं दगडासारखा एका जागी उभा राहिलो. मधून मधून दगडाबद्दल काही बाही आठवायचं पण ते स्टेजवरून सांगण्यासारखं आजिबात नव्हतं. विचार करायची वेळ संपून गेली. हळूवार चालत स्टेजावर गेलो... माझा चेहरा बघून समोरच्या हितचिंतकानी खुदखुदून आनंद व्यक्त केला...
"नमस्कार... रसिक श्रोते वक्ते आणि ज्ञातेहो, मी हणमंत शिंदे उत्स्फूर्त साठी विषय मांडतोय 'दगड'"
समोरून हासण्याचा आवाज.
"खरं तर.... म्हणजे तसं बघायला गेलं तर..... दगड या विषयावर बोलण्यासारखं खूप काही... पुर्वी दगडाची घरं असायची... दगडी मंदीरं असायची... आता सिमेंट आलं आणि... म्हणजे तसं या विषयावर बोलण्यासारख खूप आहे ... आहे पण सध्या मला आठवत नसल्याने उगाच हवेत धोंडे मारण्यापेक्षा मी आपली रजा घेतो... धन्यवाद!"
तहहयात असा पोपट झाला नाही आणि होणे नाही. 'तीस रुपये देऊन इज्जत निलाम करनेवाला ये कैसा बेवकूफ हु मै' म्हणत सभागृहाबाहेर पडलो.
स्पर्धा संपली परतीच्या प्रवासात डोक्यात दगडावर दगड आपटत होते. विषय दिला होता म्हणजे बोलण्यासारखं काहितरी असणारच. दगड! दगड? दगड... हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीचा काळा फत्तर.... यशवंतरावांच्या वाक्यातला काळा फत्तर कसा जिवंत माणसासारखा वाटतो... ना टाळ ना पेटी ना मृदंग, दगडावर दगड आपटत गोपाला गोपाला म्हणत गाडगेबाबा स्वच्छ्तेचा संदेश देऊन गेले... बाबांच्या मुखातून निघालेल्या शब्दगंगेला दगडानी ताल दिला होता... स्वराज्याची राखण गडकोटांच्या कोरीव दगडानी केली हे तर काहीच नाही... अहो दगड स्वराज्यासाठी लढले... शस्त्र होऊन वैर्यांवर तुटून पडले... गडाखालून तोफांचा मारा झाला तरी न डगमगता दगडी बुरूज भक्कमपणे उभा राहिले आणि गडावरून ढकलून दिलेल्या धोंड्यानी राक्षसाएवढ्या शत्रूंनाही चिरडून टाकले... सजिव निर्जीव वगैरे विज्ञानाच्या कसोट्या विसरून रामाचं नावं देहावर उमटताच हातपाय नसाणारे गोल गोटे समुद्राच्या पाण्यावर तरंगू लागले... डोळे दिपतील अशा कोरीव दगडी महलांपासून ते अजिंठा वेरूळच्या मोहक शिल्पांपर्यंत कलासक्त हातांची तहान भगवली ती ही दगडानीच... ज्ञानेशाची समाधी असो वा तुकोबाचे राऊळ, आधाराचा आणि सौंदर्याचा भार मात्र दगडांवरच आहे... दगड धोंड्याच्या पोटातच जगताचा मौल्यवान खजिना सापडतो. कृष्णा,कोयना, गंगा, भिमा सगळ्याच मावल्या दरीखोर्यात दगडाच्या थरातून पाझरतात आणि दगडी माळांना हिरवाईचा आहेर करत वाहत राहतात...
विचार करता करता दगडांचा भला मोठा ढीग डोग्यात जमा झाला.
आपल्या रिकाम्या जागेत गावाने सुगंधी खाडी बनवू नये म्हणून तिथल्या झाडाखाली अंडाकृती दगड ठेऊन त्याला शेंदूर फासणारा आणि कालच देवाला कोंबडा कापलाय हे सिध्द करण्यासाठी दुसर्याच्या उकिरंड्यावरची कोंबडीची पिसं आणून आपल्या दगडाभोवती पसरणारा दिन्या साठे आठवला... रानाच्या हद्दीचे दगड रातोरात हलवून फूटभर सरकवा सरकवी करणारे महाठक आठवले... दंगलीत बसवर पडणारे दगड आठवले... विचाराच्या ओघात मख्ख पडलेल्या दगडांमधलं चैतन्य समोर आलं आणि स्पर्धेत व्यासपिठावर आपण दगडाइतकेही जिवंतपणाने वागलो नाही याची जाणीव झाली. कधीतरी आपल्याला उत्स्फूर्त स्पर्धेत दगड या विषयावर बोलता येईल या आशेने त्यानंतर बर्याच स्पर्धा केल्या बरेच विषय बोलता आले पण पुन्हा दगड काही नशीबात आला नाही...
मोनालीपी जी,
मोनालीपी जी, धन्यवाद!
तुम्हीपण स्पर्धा करायाच्यात का?
हबा हे सटरफटर नव्हे रे हा तर
हबा हे सटरफटर नव्हे रे हा तर मैलाचा एक दगडच म्हण.
आभार मित्रा तुझे !
मस्तच हे ही मलाही अनुभव
मस्तच हे ही
मलाही अनुभव आहेच. इतर वेळी भरपूर सुचतं बोलायला, पण उस्फुर्त बोलायचं असतं तेंव्हा मेंदू चांगलाच ब्लॅंक होतो...
आवडलं तूमच सटरफटर. छान आहे
आवडलं तूमच सटरफटर. छान आहे
हेही छान आहे. यावरुन
हेही छान आहे.
कोर्या कागदाविषयी २ मि. तरी काय बोलायचं? पण माझी एक मैत्रिण (ती पुढे MICA ला गेली) इतकं मस्त बोलली होती. "हा कोरा कागद म्हणजे एका चित्रकारानी रंगवायला सुरु केलेलं एक चित्र आहे. ते त्याला त्याच्या बायकोला भेट द्यायचंय. ते तिला आधी कळू नये म्हणून त्याने ते उलट करुन त्याची कोरी बाजू वर ठेवलीय." असं काहीसं ते होतं. इतकं ओरिजिनल आणि उत्स्फुर्त आणि कल्पक 
यावरुन आठवलं..मी कॅट( CAT) च्या तयारीसाठी क्लास लावला होता. तिथे एकदा सरांनी आम्हाला एक कोरा कागद दाखवला (पूर्ण कोरा, रेषाही नव्हत्या) आणि सांगितलं की याविषयी प्रत्येकानी २ मिनिटे विचार करुन मुद्दे लिहायचे आणि २ मिनिटं बोलायचं
माझ्या ह.बा. बन दगड....
माझ्या ह.बा. बन दगड....
सर्वांचे आभार!!! बहुतांश
सर्वांचे आभार!!! बहुतांश लोकांना उत्स्फूर्तचा अनुभव आहे. नताशा, तो विषय माझ्या एक मित्रानेही अतिशय सुंदर मांडला होता. त्यात तो चांगदेव वगैरेचा संदर्भ, आणि वगैरे वगैरे ललित शब्दडोलारा उभा करून सभागृह टाळ्यानी भरून टाकले होते.
बागुलबुवा,
मी प्रयत्न करतो आहे...
विचाराच्या ओघात मख्ख पडलेल्या
विचाराच्या ओघात मख्ख पडलेल्या दगडांमधलं चैतन्य समोर आलं आणि स्पर्धेत व्यासपिठावर आपण दगडाइतकेही जिवंतपणाने वागलो नाही याची जाणीव झाली. >>>>
जियो हब्या....! रच्याक आता तुच सांगितलेस म्हणून विश्वास बसला, नाहीतर तुला काही सुचलं नाही हे कुणी सांगुनही खरं वाटलं नसतं.
हबा आपण समदुख्खी रे थोड्याफार
हबा आपण समदुख्खी रे थोड्याफार फरकाने .
.
कर्मवीर madhe मला विषय आला होता " माझ्या मना बन दगड "
मस्त!!
मस्त!!
सुंदर लेख.
सुंदर लेख.
आवडला!
आवडला!
आभार!!!
आभार!!!
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
सहीच!
सहीच!
भारी! आवडलं.
भारी! आवडलं.
*
*
बाप्रे... कसले भयंकर हे
बाप्रे... कसले भयंकर हे उत्स्फ़ुर्त विषय!! पण हे मस्त लिव्हलय हबा!
रच्याकने, आमचे शेवाळे सर आम्हाला ’नर्मदेचे दगडगोटे’ म्हणायचे ते आठवलं!! :फ़िदी:
सर्वांचा आभारी आहे!!!
सर्वांचा आभारी आहे!!!
खुप्प्प्प मस्त
खुप्प्प्प मस्त
थ्यांक्स प्रिती!
थ्यांक्स प्रिती!
(No subject)
Pages