आयुर्वेदोक्त पंचकर्म

Submitted by तोषवी on 16 November, 2011 - 21:51

सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद आणि पंचकर्म याबाबत इतकी जाहीरातबाजी होत आहे की पुष्कळजणाना पंचकर्म करून घेण्याची इच्छा असते.ह्याला पंचकर्मानेच आराम वाटला म्हणून मलाही करायचय अस म्हणणारे ही भेटतात. पाचही कर्म करायची असतील तर किती वेळ लागेल असही काही विचारतात.
यासाठीच आता पंचकर्म म्हणजे काय , ते नेमके का, कधी, कशासाठी,कोणाला करतात ते पाहू.

पंचकर्म म्हणजे काय?
हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.

आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन

(वात-पित्त व कफ हे त्रिदोष शरीराच्या संपूर्ण कार्यासाठी आवश्यक आहेत. हे समप्रमाणात असणे स्वस्थ शरीराचे लक्षण आहे.मात्र यांचा समतोल बिघडला तर हेच दोष शरीरधातु व मलांना विकृत करून रोगाची उत्पत्ती करत असतात.)

१)शमन-औषधे देउन वाढलेले दोष कमी करणे, कमी झालेले शरीरातील घटक, दोष प्रमाणात आणणे म्हणजे शमन चिकित्सा.
२)शोधन-दोष जर प्रमाणा बाहेर वाढलेले असतील किवा कुठल्यातरी शरीर घटकाच्या(शरीर धातू) आश्रयीत (चिकटून्/दडून)असतील तर त्याना त्या पासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन चिकित्सा.

ही पंचकर्म कोणती ?

पंचकर्माच्या ५ मुख्य प्रक्रीया आहेत.
रोगाच्या स्वरूपानुसार त्या त्या दोषासाठी वेगवेगळ्या प्रक्रीया केल्या जातात.

पंचकर्म
१) वमन
२)विरेचन
३)बस्ती
४)नस्य
५)रक्तमोक्षण

हे शोधन कशा पद्धतीने करतात?
पूर्वकर्म :-
ह्या प्रक्रीया करण्यापूर्वी शरीरातील वाढलेले दोष जे शरीर घटकाना काही वेळा चिकटून बसलेले त्यात लपून बसलेले असतात त्याना त्या पासून मोकळे करून मध्य मार्गात (आतड्यात )आणून जेणेकर्रून ते सहजगत्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना करावी लागते. ह्यालाच पूर्वकर्म म्हणतात.ही २ आहेत
१)स्नेहन २)स्वेदन

१)स्नेहन- काही दिवस आधी पासून पोटातून औषधी तेलं /तुपं एका विशिष्ट मात्रेत प्यायला देउन,तसेच आंगाला मालिश करून (थोडक्यात शरीराला आंतरबाह्य स्निग्ध करून ) चिकटून बसलेले दोष सुटे केले जातात.
जस तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही , किवा स्निग्ध ते मुळे चिकटून बसलेले घटक सुटे होतात त्याच प्रमाणे हे घडते.
२)स्वेदन-शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने घाम येइल असे उपाय करून (वाफेचा शेक, सोना किवा स्टीम बाथ ई.)देउन दोष उष्णते मुळे सुटे झालेले दोष वितळून पाझरत पाझरत मध्यमार्गात येतात.
दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार हे पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना शरीरातून बाहेर काढले जाते.

मुख्य कर्म
१)वमन-दोषाना उर्ध्व मार्गाने (वरच्या बाजूने) शरीराबाहेर काढणे-अर्थात उलटी वाटे तोंडावाटे दोषाना बाहेर काढणे.
ही क्रिया प्रामुख्याने ज्या रोगात दुषित कफ दोषाचे प्रमाण शरीरात वाढलेले असते अशा रोगात करतात(अनेक प्रकारचे त्वचारोग्,आम्लपित्त्,दमा ई.).पूर्वकर्मा नन्तर आतड्यात वरील बाजूला किवा जठरात जमा झालेले दोष उलटीचे औषध,सहज उलटी होइल अशा काढ्याबरोबर /दुधाबरोबर प्यायला देउन. तोंडातून बाहेर काढले जातात.
प्यायला दिलेला काढा,औषध याचे प्रमाण मोजलेले असते.उलटी वाटे बाहेर पडलेले द्रव्य ही मोजले जाते त्याचे स्वरूप वास याची नोंद ठेवली जाते.

२)विरेचन- खालच्या बाजूने म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन.विरेचन हा वाढलेल्या पित्त दोषाचा प्रमुख उपचार आहे.अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लाली जळजळ असते ,पित्ताची डोकेदुखी,आंगावर गांधी उठण ,काही प्रकारचे अर्श (पाईल्स) ,कावीळ तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते.याच्यातही मलवेगाची त्याच्या स्वरूपाची नोंद ठेवली जाते

३)बस्ती- ही वात दोष वाढलेला असल्यास मुख्य उपचार म्हणून दिली जाते.बस्ती म्हणजे औषधी काढे,कधी केवळ तेल असे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडले जाते. यामुळे आतडयातील कोरडे मलाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो.अनेक वातव्याधी(सांधेदुखी,कंबर दुखी),हाडांचे रोग,आतड्यातील विकार ,त्वचारोग यात बस्ती ची उपाययोजना केली जाते.

4)नस्य-नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे.मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, काही प्रकारच्या डोकेदुखीत नस्याचा उपयोग होतो.ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात (पक्षाघात , आर्दीत (facial palsy) याचा बराच चांगला उपयोग होतो.

५)रक्तमोक्षण -रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्ताला शरीराबाहेर काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण त्वचाविकारात जेथे चिकट स्त्राव होत असतो तिथे जळवा लागत नाहीत अशाठिकाणी काही वेळा सिरीन्जीन्ग करून रक्त काढले जाते

पंचकर्मा शी निगडीत काही उपचार आहेत.जे कहीवेळा एखादा पंचकर्मापैकी चा उपचार करताना सहाय्य म्हणून केले जातात किवा काहीवेळा मुख्य उपचार म्हणूनही करावे लागतात
वेगवेगळे अभ्यंगाचे प्रकार ,शेकाचे-स्वेदनाचे प्रकार, शिरोधारा ,कटीबस्ती,जानुबस्ती ई.

ही पंचकर्म कधी करतात?
१) आजारानुसार पंचकर्म-
आयुर्वेदात व्याधीच्या अवस्थांचे वर्णन आहे .पेशंट ची आजाराची लक्षणे पाहून ,नाडी आणि पोट तपासून वैद्यास व्याधीची अवस्था कळते.अशा काही अवस्थांमध्ये गोळ्या काढे औशधे देऊन व्याधी आटोक्यात राहीनासा,बरा होण्यासारखा नसतो.अशावेळी हे उपचार उपयोगी ठरतात.
२)आजाराचा जोर कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार म्हणूनही काहीवेळा हे उपचार करावे लागतात.
उदा.खूप दिवस मलप्रव्रुत्ती न झाल्यास , मलाचे खडे झाल्यास बस्ती देतात. दम्यात कफाची घरघर वाढलेली असताना कधीकधी तात्कालिक उपाय म्हणून वमन द्यावे लागते.
३)ऋतू नुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते, अशावेळी काही आटोक्यात असलेल्या(सध्या लक्षणे न दिसणार्या) व्याधी बळावतात्,जोर धरतात अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात.
४)विशिष्ट आजार लक्षणे नसणार्या व्यक्तीस तिच्या शरीरातील दोषबदल पाहून ऋतू नुसार एखादा उपचार सुचवला जाउ शकतो. उदा. स्थूल (obese ) स्वेदन.
५) आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन उपचारापूर्वी हे उपचार केले जातात

ह्या पंचकर्माचा साधारण कालावधी काय?
प्रथम पंचकर्म उपचार म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे हा समज चुकीचा आहे.
व्याधीच्या गरजेनुसार,ऋतूनुसार्,प्रक्रुती(body constitution)नुसार रुग्णास उपचार केला जातो.
काहीवेळा शोधन उपचारापूर्वी चे पूर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदनाचे उपचार ) केल्यानंतर दोषांची गती ( दिशा पाहून रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना) शरीरातून बाहेर काढले जाते. अशावेळी वमनासाठी औषध द्यायचे का विरेचनासाठी हे त्या त्या वेळी ठरते.
दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार वमन किवा विरेचन दिले जाते
बस्ती,नस्य हे उपचार काही दिवस सतत/दिवसाआड/एका दिवसातून दोनदाही गरजेनुसार करावे लागतात
रक्तमोक्षण त्या आजाराच्या लक्षणांनुसार करावे लागते.
काही आजारांमध्ये पूर्वकर्म (स्नेहन-स्वेदन) हीच मु़ख्य उपचार म्हणून केली जातात

पंचकर्मा साठी पथ्य :-
कोणत्याही उपचारात पथ्यास खूप महत्व आहे,मग ती कोणतीही उपचार पद्धती असो.
हे उपचार करण्यापूर्वी,ते सुरू असताना आणि त्यानंतरही काही दिवस आहार विहारा संबंधीचे पथ्य पाळावेच लागते.यात अगदी खाण्यापिण्यापासून ,गरम कपडे,आंघोळीसाठी गरम पाणी ,थंड हवेत न जाणे , दिवसा न झोपणे ई. सर्व काटेकोर पणे पाळावेच लागते.

इतर उपचारांप्रमाणेच ह्या उपचारातही अयोग- अतीयोग असे धोके असतात, मात्र अनुभवी,वैद्याकडून उपचार झाल्यास ते नगण्य असतात.
ह्या उपचारानंतर शरीर घटक दोषांचे प्रमाणात रहाणे योग्य आहारविहाराने,काही वेळा काही औषधांच्या सहाय्याने राखता येऊ शकते .
पण हे उपचार एकदा केले म्हणजे झाले असे नेहमीच नसते. बर्‍याच व्याधीत त्यांच्या अवस्थेनुसार्/ऋतू बदलान्चे परीणाम म्हणून नंतरही ते आवश्यकतेनुसार करावे लागतात.
वेगवेगळ्या व्याधीत,लक्षणानुसार,वयानुसार ह्या उपचारात वापरली जाणारी औषधी तेले-तुपे,काढे,शेकाचे प्रकार वेगवेगळे असतात.
या उपचारास मर्यादा आहेत, कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत आजाराच्या विशिष्ट अवस्था,वय,गर्भार स्त्री,अती नाजुक प्रकृतीची माणसे हे अपवाद ठरू शकतात.
यासर्व उपचारापूर्वी,उपचार चालू असताना आणि पूर्ण उपचार संपल्यानंतर(त्यानंतर जावा लागणारा पथ्याचा कालावधी झाल्यावर) त्या त्या आजारानुसार लक्षणान्ची ,vital signs ची नोंद ठेवली जाते.

हा एक वैद्यकीय उपचार आहे.प्रशिक्षीत वैद्याच्या सल्याने ,त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केला जावा.

*वैद्य. तोषवी जोशी-डोळस.*
आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<केरळ आयुर्वेदीक केन्द्रामधून पंचकर्म चिकित्सेचं पॅकेज खूप महाग असतं. तिथे डॉक्टर्स असतात सल्ला द्यायला पण तिथे आकारण्यात येणारे दर योग्य आहेत का, चिकित्सा, कर्म व्यवस्थित केली जाते का याबद्दल मनात शंका येतात. तुम्ही काय सल्ला द्याल?>>>

केरळ मधील माझा अनुभव, अगदी गेल्या आठवड्यात तीन दिवसांसाठी तिरुअंनंतपुरमला गेलो होतो. त्यात वेळ होता म्ह्णून वासुदेव विलसन नर्सिंग होम मध्ये मसाज साठी गेलो.

वासुदेव विलसन नर्सिंग होम हे त्रिवेणंद्र्म मधील सर्वात जुन नर्सिंग होम आहे जिथे आयुर्वेदिक चिकिस्ता माफक दरात उपलब्ध आहे. वासुदेव विलसन नर्सिंग होम स्वता:ची औषधे पण बनवतात.

पहील्या दिवशी मला वाटले की सरळ मला टेबल वर घेतील व मसाज सुरु करतील, पण त्या रिसेप्सनीस्टने मला
डॉ ची भेट घालून दिली. त्यानी मला पाहील्या प्रथम सविस्तर चौकशी केली व नंतर त्यानी मला ( माझ्या कडे फक्त दोनच दिवस असल्याने) दोन दिवसाचा अभ्यंग व उष्मा चा कोर्स दिला व मला सलग दोन दिवस यावयास सांगितले. दोन दिवसाची फी ६०० रु.

मला दोन प्रशिक्षित (Messeur) मसाज देणारे मसाज करणार होते. त्यांनी सर्व प्रथम मला विचारले की मला काही व्याधी, ह्र्दय विकार वैगेरे आहे का ? काही अस्थिभंग वैगेरे आहे का?

प्रथम मसाज हा गरम ( कोमट) तेला ने केला जातो. त्या तेलाला मुरुवेण्णा म्हणतात. हे मुरुवेण्णा
नारळाच्या तेलात काही पर्दार्थ घालून (शेवग्याचा पाला, विड्याची पाने, कर्पूर वैगेरे) करतात. प्रत्येक अवयव, सांधे, स्नायु अतिशय सावकाश रगडतात. अगदी तेल शरीरात मुरवतात.

त्यांनतर उष्मा म्ह्णजे, कुकर मधील वाफ एका रबरी नळी द्वारे शरीरावर ( प्रत्येक अंगावर) सोडली जाते. ही वाफ पण साधी नसते. कु कर मध्ये चिंचेची पाने, व ईतर औषधी पाने घातलेली असतात.

त्यांनतर डोक्याला वेगळे तेल लावले जाते. आंघोळीला मुगाच जाडसर पीठ अंगावर लावून कडकडीत पाण्याने
आंघोळ करायला देतात. मुगाच पीठ पाठीवर ते (Messeur) चोळून देतात.

बाहेर आल्या आल्या डोक्यावर रासनादी चुर्ण लावतात व थोडे नाकाला लावतात.

पहील्या दिवशी मसाज नंतर भयंकर झोप येते व अंग सांधे दुखतात. पण दुसर्या दिवशी ईतके जाणवत नाही.

http://www.vasudeva.com/nursinghome/aboutmain.htm

ईतक पुराण लावण्याच कारण की, आपला केरळ वरचा गैर समज दुर व्हावा.

१. केरळात अजुनही स्वस्तात आयुर्वेदाचे उपचार उपलब्ध आहेत.
२. केरळातील संस्क्रूती त्या लोकांनी फारच जपली आहे. तिथे अजुन ही सर्वत्र आयुर्वेदाचा वापर घरां घरा तून
होतो. तिथे रासनादि चुर्ण ची ड्ब्बी घरा घरांत मिळेल. Virgin Coconut Oil हे मी फक्त ईथेच पाहीले. आता
मी त्याचा वापर सूद्धा करतो.
३. केरळात दर जेवणाच्या वेळेला गरम पाणीच सोबत दिले जाते. सर्व साधारण पणे हे गरम पाणी साधे गरम
पाणी नसून औषधी मिश्रीत असते.
४. वर्षातून एक महीना ( करकटम महीना) केरळातील लोक दुपारी फक्त औषधी युक्त पेज ( उकड्या भाताची)
पितात.
५. त्याचे वाढ दिवस ईंग्लीश तारखे प्रमाणे नसून तीथी /नक्षत्रां प्रमाणे साजरे केले जातात. त्यांच्यात नक्षत्रांना
खुप महत्व दिल जात.

नोटः आंघोळ करताना, तोंडात पाणी धरून (चूळ भरून) मगच डोक्यावर पाणी घ्यावे. ह्याने व्यक्तीला
सायनस चा त्रास होत नाही. ही शिकवण खास केरळ मित्रांने मला दिलीय.

<<<<<केरळ आयुर्वेदीक केन्द्रामधून पंचकर्म चिकित्सेचं पॅकेज खूप महाग असतं. तिथे डॉक्टर्स असतात सल्ला द्यायला पण तिथे आकारण्यात येणारे दर योग्य आहेत का, चिकित्सा, कर्म व्यवस्थित केली जाते का याबद्दल मनात शंका येतात. तुम्ही काय सल्ला द्याल?>>>
सर्वच केंद्रा बाबत असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
कोट्टकल येथे काही शास्त्रोक्त आयुर्वेदाची केंद्रे आहेत.काही ठिकाणी तेथील परंपरागत चालत आलेल्या पद्ध्तीच्या जोडीने आयुर्वेदाचे उपचार केले जातात. तेथे नारळाच्या तेलात सिद्ध केलेल्या तेलांचा जस्त करून वापर होतो.
आयुर्वेदात तेलं तुपं तयार करण्याचे ग्रंथोक्त पाठ आहेत. त्यात प्रायः तीळ तेल बेस म्हणून वापरले जाते.काही नारळाच्या तेलात सिद्धीचे ही वर्णन आहे. त्या त्या आजरानुसार औषधी द्र्व्य व तेले वापरली जातात.
हल्ली मुम्बई पुण्यातही आयुर्वेदाच्या नावाखाली कित्येक मसाज पार्लर्स /स्पा चालवले जातात ,जिथे कोणीही प्रशिक्षीत वैद्य उपलब्ध नसतो.अशा ठिकाणी उपचार घेण्याचे निश्चित टाळावे.

अरे वा.. धन्स ह्या माहितीबद्दल.. कोणी लाजरी आणि साक्षीच्या माझ्या धाग्यावरील प्रेग्नन्सी आणि प.न्चकर्म ह्याबद्दलच्या प्रश्णाचे उत्तर देउ शकेल काय? माझ्या बहिणीलाही असे सजेस्ट केले होते.

............. .................

तोषवी, माहितीबद्दल धन्यवाद! अशा लेखाची आणि चर्चेची खुप गरज आहे. माझ्या ओळखीत एक आयुर्वेदिक डॉ आहे. तीन वर्षापुर्वी पास आउट झाला. आयुर्वेदाची काय पृअ‍ॅक्टीस करायची म्हणुन कॉल सेंटरमध्ये काम करायचा. मग ज्योतिषाने सांगितले म्हणुन मागच्या वर्षी आयुर्वेदिक उपचारांचे क्लिनीक काढले. त्यात पंचकर्म्ही असणारच! असे अनुभव नसलेले डॉ काय कामाचे? लोकही पैसे द्यायला तयार असतात!

>>
झंपी | 16 December, 2011 - 02:17 नवीन
<<
आपण / काकू तिथे का -आय मीन कशाला- गेला होतात? हा मुळातच गहन प्रश्न आहे. असो.
दुसरे, फी भरल्याची पावती, व त्या 'सेंटर'च्या भिंतीवर लटकलेले 'शॉप अ‍ॅक्ट' चे लायसन्स पाहून तुम्हाला कन्झयुमर कोर्ट नामक प्रकरण आठवले नाही का?

धन्यवाद!

पी. सी. ओ. डी मधे पंचकर्म उपचार घ्यावे का? त्याचा उपयोग होतो का? कोणते घ्यावे?

छान महिति सन्गितलित मला पिम्पल आनि शिवाय मला अन्गाचि खाज होत अहे आनि न् खानि खजविले कि लाल gandhinsarkhe vran utatat ani jatat mala panchakarm kele tar faydyache ahe ka mi khup upchar kele blood test sagal sagal kel golya khanya purat thambat punha ahe tech .jar mala panchkarm karayche asel tar te mi kuthe karave mhnje mi navi mumbait ahe

अभ्यंग स्नान कसे घ्यावे ? त्याबद्दल सविस्तर माहिती कोठे मिळू शकेल ? संदर्भ वा लिंक दिली तरी चालेल

निरनिराळी तेले वापरून शरिराला जो मसाज केला जातो, त्याला अभ्यंग म्हणतात हे समजले. मला अभ्यंगाबद्दल माहिती हवी आहे. अभ्यंग कसे करावे ? किती वेळ ? आठवड्यातून किती वेळ ? कोणत्या पद्धतीने करतात?
कोणतीही व्याधी नाही , पण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अभ्यंग या प्रकाराबद्दल जाणून घ्यावयाचे आहे

२००० साली Institute of Naturopathy & Yogoic Sciences, Bangalore ज्याचे नाव आता बदलून Jindal Naturecare Institute असे आहे, तिथे १५ दिवस राहुन पंचकर्म, व इतर नैसर्गिक आणि आयुर्वेदिक सोपस्कार केले.
क्रिया / योगासने / प्राणायाम इत्यादि तिथे काटेकोरपणे प्रत्येक व्यक्तीकडे जातीने लक्ष घालुन करुन घेतल्या जातात.
डिटॉक्सचा खरा अनुभव तेथे मिळाला. तेथे Hydro colon therapy सुद्धा करण्यात आली.
निद्रानाश, सानसायटीस, आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशन यांपासून मुक्तता मिळाली. इतरही बरेच फायदे झाले.
तसेच पुढे त्याचा उपयोग, सर्व्हाइकल स्पॉन्डिलायटीस आणि पित्त यापासून सुटका मिळवण्यास झाला.

Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent