फक्त चढ म्हणा! (भाग- पहिला)

Submitted by इंद्रधनुष्य on 13 December, 2011 - 06:17

'कळसुबाई' पट्ट्यात 'अलंग-मदन-कुलंग या त्रिकुटाने आपल्या आकारमानाने आणि प्रस्तारोहणाच्या अजब प्रकाराने आपला वेगळाच दबदबा निर्माण केला आहे.

हरिश्चंद्रगड ही ट्रेकर्सची पंढरी... तर AMK म्हणजे मोक्ष!

गेल्या १० वर्षात खडतर ते चिरकूट प्रकारातले बरेच ट्रेक झाले... मात्र कठिण श्रेणीतील 'अलंग-मदन' केल्या शिवाय मोक्षप्राप्ती मिळणार नाही याची खात्री होती. यंदाच्या मोसमात तो योग साधायचाच हे मनाशी पक्क केलं होतं आणि निमित्त साधाले ते ऑफबिट सह्याद्रीच्या साथीने.

१६ ऑक्टोबरला मेल बॉक्स मधे योरॉक्सचा "Ready for Trek" चा खलिता आला... कधी, कुठे, कसे यावर खलबत झाल्यावर १० आणि ११ डिसेंबरचा दत्त पौर्णिमेचा मुहुर्त ठरविण्यात आला. लौकिकपात्र टांगारुंनी आधीच हात वर करुन वेळीच शरणागती पत्करण्यात धन्यता मानली... तरी ही इतर मायबोलीकरांचा जोश काही कमी झाला नव्हता. नेहमीचे उत्साही धारकरी नविन गिलबिले, गिरिविहार, विनय भिडे, डेविल, प्रवण कवळे, योरॉक्स, रोहित मावळा, प्रसाद गोडबोले, आका (आनंद) आणि अस्मादिक अशी मायबोलीकरांची तुकडी सज्ज झाली... तिला साथ लाभली ती बोनी (प्रणवचा मित्र), केके (योरॉक्सचा सहकारी) आणि प्रथमेश (प्रगोचा मित्र).

शुक्रवार ९ डिसेंबरला शेवटची कसारा लोकल पकडून घोटी मार्गे पहाटे पर्यंत आंबेवाडीत पोहचायचे होते. पुर्वतयारीचा अंदाज घेण्यासाठी संध्याकाळ पासूनच प्रत्येकाचे मोबाईल रिंगू लागले. पुपो, सूप, ठेपले, चटणी, ब्रेड, जॅम, चमचा, वाटी, मॅट, फ्लोटर वैगरे गोष्टींवर खल झाला. रात्री बोरिवलीहून निघालेली पहिली तुकडी दादरला भेटली आणि मग पुढे भांडूप, मुलुंड, डोंबिवली असा लवाजमा गोळा करत निघाली ती थेट कसार्‍याला. तसा हा अडीच तासाचा कंटाळवाणा लोकल प्रवास पण जेव्हा सगळे इरसाल मायबोलीकर एकत्र भेटतात तेव्हा हेच अडीच तास अगदी धम्माल मस्तीत निघून जातात... इतके की कल्याण नंतर झोपा काढू म्हणणारे परत उठून मस्तीत सामिल होतात. कल्याण नंतर थंडीचा जोर वाढू लागल्यावर दारे खिडक्या बंद करून 'होल वावर इज आवर'च्या थाटात फोटो सेशन सुरू झाले.

सुन्याने कसार्‍याला दोन काळी पिवळीची आधीच सोय करून ठेवली होती. कारण आमच्या सोबत दहा बारा जणांचा आणखी एक ग्रुप होता... गाडी सोडण्या पुर्वी ड्रायवरला कसारा घाटातील आमच्या फेव्हरीट 'बाबा दा धाबा' वर चहा पाण्यासाठी थांबण्याचे सुचित केले. मध्यरात्री साडे तीनला धाब्यावर पोहचताच गिरिने गेल्या वेळचे रु.५७८/- चे बिल दाखवून तीच ऑर्डर रिपिट करण्याचे फर्मान सोडले. ४ डाल फ्राय, १२ रोट्या आणि २३ चहा :p पोट आणि मन दोन्ही समाधानी असेल तरच ट्रेक सत्कारणी लागतो हे ब्रिद वाक्य पुन्हा एकदा खरे करुन दाखविले.

प्रचि: प्रणव

तुडुंब भरलेल्या गाड्या आंबिवली गावात पोहचल्या तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजले होते. आमच्या आधीची पहिली बॅच मध्यरात्री पोहचली होती. त्यांनी रात्रीच गडाकडे कूच केली होती. दूर डोंगरात लूकलूकणारे टॉर्च त्यांच्या सलामतीची ग्वाही देत होते. पहाटेच्या गारव्यात निसर्गाच्या गप्पा मारून झाल्या... झुंजूमुंजू होताच आम्ही गडाकडे कूच केली. वाटेत ओळख परेड पार पडली. दुसर्‍या ग्रुप मधिल बहुतेकांचा हा पहिलाच ट्रेक आहे.. हे कळल्यावर आम्ही धन्य झालो.

पायथ्याकडची वाट तशी सोपी होती पण ते अलंग मदनचा पॅच कसा काय पार करणार या बाबत आम्ही चिंता व्यक्त केली. आमच्यातील 'यो'चा सहकारी 'केके'चाही हा पहिलाच ट्रेक होता. सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुढे मार्गस्त झालो. गडाच्या डावीकडील सोंडे वरुन आरामात वाटचाल करत पुढे निघालो. डावी कडच्या एका कड्यावर नेढे होते... त्याचा आकार हत्ती सारखा भासत होता.

आठच्या सुमारास मधल्या टप्प्यावर पोहचलो. तिथे ऑफबिटने दिलेला सकाळचा इडली-चटणीचा नाष्टा आटोपून पुढे अंतिम टप्प्याकडे सरकलो.

एव्हाना अंतिम टप्प्यातील चढ स्पष्ट दिसू लागला होता.... पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची जाणिव होऊ लागली.

वाटेत ठिकठिकाणी काटेरी वनस्पती हाता पायांचे लचके तोडत होती. पुण्या वरुन आलेले दोन ट्रेकर्स फक्त बर्मुड्यावर गड चढत होते. त्यांच्यावर त्या काटेरी वनस्पतीने फार फार प्रेम केले. बिच्चार्‍यांचे हाल बघवत नव्हते.

पायथ्या पासून अलंगच्या पहिल्या गुहे पर्यंत पोहचायला आम्हाला अडीच तासाचा अवधी लागला. गुहेच्या उजवी कडे आधी २० फुटाचा रॉक पॅच होता... तो पार केला की पुढे ९० फुटाची सरळसोट कातळ भिंत चढून वर जायचे होते. पण तो कार्यक्रम संध्याकाळी करायचा होता. कारण अलंग वर व्हेज बिर्यानीचा बेत होता. त्यामुळे दुपारी ४ पर्यंत अलंगच्या डावीकडील मदनगड सर करुन यायचे होते. गुहेत सॅग ठेवून थोडी विश्रांती घेतली आणि डावी कडिल मदनच्या वाटेला लागलो.

अलंगच्या कड्याला बिलगून एक वाट पुढे डावी कडे मदनगडाला जाते... या वाटे वर ही काटेरी झाडं स्वागताला उभीच होती. डावी कडे अलंग कडा तर उजवी कडे साधारण बाराशे फूट खोल दरी! थोड्याच वेळात आम्ही अलंग आणि मदनच्या घळी मधे पोहचलो...

तिथून कुलंगचा पुर्वेकडील भाग दिसू लागला. थोड पुढं गेल्यावर मदनच्या एका पॅच वर दोर लावल्याचे दिसले... तसा तो पॅच रोप शिवाय पार करता आला असता... पण तिथे अतिआत्मविश्वासाने आधीच एकाचा बळी घेतला होता.... म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेणे गरजेचे होते. तो पॅच पार करून पुढे गेल्यावर कुलंगनचा आडवा पसारा दिसला. त्या पसार्‍यात एक ग्रुप गडावर जात होता. त्यांना पाहून गेल्या वर्षी आम्ही या उत्तरकडिल वाटेने वर गेलो होतो त्या आठवणी जाग्या झाल्या.

याच साठी केला होता अट्टाहास... ती वेळ आता जवळ येऊन ठेपली होती. मदनच्या त्या चाळीस फुट रॉक पॅच खालील पायर्‍यांवर येऊन पोहचलो होतो. जेथे आम्ही अनुभवणार होतो Rock Climblingचा तो पहिला थरार...

"Belay tight..........."
भूषणने (Offbeat Leader) वर बघत आरोळी ठोकली... आणि इकडे माझी हवा टाईट झाली... साधारण तीस चाळीस फुटाचा रॉकपॅच चढण्याचा पहिलाच अनुभव तो... आत्मविश्वासात तसू भरही कमतरता नव्हती... तरी पण झेपेल ना? असे आत्मघातकी विचार डोक्यात येऊ लागले... काय करणार कारणही तसेच होते... काही वेळा पुर्वीच आमच्यातील एका मावळ्याचा धीर खचल्याने त्याला धडपडत खाली उतरताना पाहिले होते. त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे Belayचा रोप वर सुन्याच्या हातात होता.

तत्पुर्वी मायबोलीकरांची १३ जणांची टिम मदनगडाच्या त्या सुप्रसिद्ध चाळीस फुटी रॉकपॅच जवळ येऊन थांबली होती. पॅच जवळची जागा फारच अरुंद होती. चढुन आलेल्या पायर्‍यांवर प्रत्येक जण आज्ञाधारी मुलाप्रमाणे नंबर लाऊन बसून होता. एका climberला पॅच चढुन जाण्यास कमीत कमी १० मिनिटं लागत होती. आमच्या पुढे अजून पहिल्या बॅचचे दोघे- तिघे शिल्लक होते... त्यामुळे आम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी वाट पहावी लागणार होती. सकाळ पासून केलेल्या डोंगर चढाईमुळे पाय थकले होते. त्यातच समोरील १२०० फुट खोल दरीतून वार्‍याच्या थंडगार झुळुका अंगावर येऊ लागल्या. सुर्य पण विरुद्ध बाजुला असल्यामुळे पायर्‍यांवर सावली होती. त्या थंडगार वातावरणात जर चुकून डोळा लागला तर थेट कुलुंगचा पायथा, असा हिशोब मांडून आम्ही मोकळे झालो.

मदनच्या Rock climbing साठी Single Rope System वापरण्यात आली होती. या पद्धतीत climberची सुरक्षितता ही फक्त एकाच रोपवर अवलंबून असते. ४० फुटाचा पॅच असेल तर रोपची लांबी कमीत कमी ८० ते १०० फुट असावी लागते. ज्याचे दुसरे टोक खाली सोडलेले असते. चढताना जिथे हाताची पकड अशक्य असते त्यावेळी रोपचे दुसरे टोक आधारासाठी वापरता येते.

next मायबोलीकर... झिनतने (Offbeat Leader) पुकारा केला... तसा उठून मी Harness चढवून सज्ज झालो... Belay Harnessला Anchor करुन झाल्यावर भूषणने आरोळी ठोकली.

Belay tight...........
OK.......... वरुन सुन्या उत्तरला... आणि कमरेला बांधलेला Harness कचकन आवळला गेला. Belayचा रोप वर सुन्याच्या हातात होता आणि तोच एकमेव आमच्या सुरक्षिततेचा दुवा होता. डाव्या हाताचा रोप फक्त दगडावरची पकड सुटली तरच आधारासाठी वापरायचा होता. एक-दोन-तीन करत पाच एक फूट वर गेलो असेन नसेन तो हाताला खाच सापडेनाशी झाली... खालून लिडरचे instruction देणे सुरू झाले... डावी सोड... उजविकडे पाय टाक... मनात म्हटले पाय टाकायला आधी पाय तर दिसला पाहिजे... नंतर खाच बघू... खाली बघुन मला धीर गमवायचा नव्हता... तिच्या सल्ला नुसार पाय तसाच ९० अंशात वर उजवीकडे उचलून एका निमुळत्या खोबणीत अडकवला... पण त्यामुळे शरिराचा भार वर उचलणे कठीण झाले... सुन्याने ते बरोबर हेरले आणि लगेच belay वर खेचला... आणि त्याच बरोबर मी हवेत काही फूट वर उचललो गेलो... एव्हाना पोटातला गोळा पायांकडे सरकला होता... शरिराचा पुर्ण भार हातांवर पेलत वर चढण्याची कसरत म्हणजे Rock Climbing हे माहित होते... पण ऐन मोक्याच्या क्षणी हातापायांचा मेळ बसणे फारच कठीण... डावी उजवी करत करत शक्य तेव्हढा भार हातावर पेलत कड्याच्या मधोमध येऊन पोहचलो आणि अचानक हातातील ताकद गेल्या सारखे वाटले... तेव्हा 'हतबल'चा शब्दशः अर्थ उमगला. नशिब वर सुन्या दिसत होता आणि दहा पंधरा फुटाचा पॅच बाकी होता... सुन्याने वरुन instruction देणे सुरु केले आणि नवा जोम अंगात संचारला... त्याच्या सुचनां नुसार वर न दिसणार्‍या खाचां मधे हात घालत कसेबसे वर चढून सुन्याचे चरण कमल स्पर्श केले...

वर पोहचलेल्या सगळ्या मायबोलीकरांची अवस्था काही वेगळी नव्हती... सगळे जण एकच ओळ आळवित होते.

कुसुमाग्रजांची माफी मागून...

पाहुन थोरला प्रस्तर तरी मोडला नाही कणा
पाठीवरती सॅग ठेवून फक्त चढ म्हणा!

(भाग दुसरा)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज ब र द स्त !
सॉल्लिड ट्रेक चुकवल्याची खंत. Sad अमानवीय अनुभव, १५ आणि ९० फुटाचा रॉक पॅच.. फुल्टू थ्रीलर.

जबरी... मंडणचा हा टप्पा दम काढतोच. खासकरून खालचा अर्धा भाग.. Wink

अरे ह्यावेळी सुद्धा रोप सिस्टीमचा फोटो कोणी काढला की नाही?

जबरदस्त अनुभव इंद्रा Happy
मी मिसला Sad

खालून लिडरचे instruction देणे सुरू झाले... डावी सोड... उजविकडे पाय टाक... मनात म्हटले पाय टाकायला आधी पाय तर दिसला पाहिजे... नंतर खाच बघू... >>>>>>:फिदी:

हे काय इंद्रा ... अर्धच लिहिलस ... बाकीच कुठय ... का येतय टप्याटप्याने ...
पण सुंदर वर्णन केलस.. मदनच्या रॉकपॅचचे ... Happy

देवा लै भारी... >>>>चढुन आलेल्या पायर्‍यांवर प्रत्येक जण आज्ञाधारी मुलाप्रमाणे नंबर लाऊन बसून होता.>>> मी तिथेच बसुन राहीलो अस्तो रे बाबा... येताना परत घेवुन यायला लगल असतं.....

लै भारी... Happy
पण एका संपूर्ण लेखाचा छोटासा भाग कापून चिकटवल्यासारखा वाटतोय.>>>
फ़ुल्डं पण टाकाना राव कोणतरी.....>>>>> Sad

दुसर्‍या ग्रुप मधिल बहुतेकांचा हा पहिलाच ट्रेक आहे.. हे कळल्यावर आम्ही धन्य झालो.

>>> आणि हे वाचून मी धन्य झालो. आयोजकांनी नवख्या लोकांना थेट कसे काय नेले? कमाल आहे बुवा..

१२व्या फोटोत सुन्याच्या बाजूला बसलेला जो बिले देतोय त्याने हातात ग्लोव्ह घातलेलेच नाहीयेत!!! समजा कोणी आरोहक खाली सरकला तर तो उघड्या हाताने कसला डोंबलाचा बिले देणार आहे? रोप मुळे हात कसे जाळून निघतात ते आयोजकांना ठावूक नाही आहे का?

सेनापती,

उघड्या हाताने बिले देण्याबाबतची शंका रास्त आहे. मात्र बिलेदाराने दोर सतत घट्ट (belay always tight) ठेवलेला असल्यामुळे आरोहक झर्रकन खाली सरकण्याची शक्यता जवळजवळ शून्य असावी. म्हणून बहुतेक बिलेदाराने हातमोजे घातले नसावेत.

हा आपला माझा तर्क बरं का! चू.भू.द्या.घ्या.

आ.न.,
-गा.पै.

...लई भारी

पाहुन थोरला प्रस्तर तरी मोडला नाही कणा
पाठीवरती सॅग ठेवून फक्त चढ म्हणा.मस्तच