वारी ब्रसेल्सची / मेजवानी म्युरल्सची

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अनेकांचे जे कॉमिक्स जगतातील दोन हिरो असतात त्यापैकी मी सुरुवातीपासुनच टिनटिनपेक्षा अॅस्ट्रिक्षचा जास्त चाहता आहे. पण ब्रसेल्सला पोचल्यावर टिनटिनच्या त्या शहरावरील दृष्य प्रभावाने आपणही प्रभावीत झाल्याशिवाय राहु शकत नाही. तिथे Hergé Museum तर आहेच (ब्रसेल्सच्या Georges Remi याने Hergé हे नाव वापरुन टिनटिनला घडविला), पण शहरात देखील अनेक म्युरल्स विखुरलेली आहेत. टिनटिन व्यतिरीक्त इतरही. एकानंतर दूसरे अशे ते सतत दिसत राहतात. बेल्जीयन लोकांचे कार्टुन्सवरील प्रेम जाणवल्याशिवाय रहात नाही. रंगवलेल्या भव्य भिंती रस्त्या-रस्त्यांवर त्याची ग्वाही देतात. कधीकधी तर पूर्ण तीन मजले एकाच दृष्याने व्यापलेले असतात. प्रत्येकातील डिटेल्स वाखाणण्याजोगे.

एक म्युरल पाहुन झाले की लगेच पुढचे पहायची उत्कंठा लागते.

हा वॅं गो खरा नाही. अनेक ठिकाणी दिसतात तसा हा सजीव मानवी पुतळाही नाही तर चक्क खरा पुतळा आहे. याच्या शेजारी सजीव मानवी पुतळापण बरेचदा असतो.

हे इतर काही नमुने. येवढ्या भव्य आकारात आपले आवडते वीर पाहुन कार्टुनची पुस्तकेही याच आकारात मिळती तर किती छान झाले असते असे वाटुन जाते.

बारिकसारिक गोष्टींना पण योग्य ते महत्व दिले असते. या चित्रातील सुतारपक्षी पहा:

आसपासच्या बांधेसुद कारागिरीत ही चित्रे बेमालुमपणे एक होऊन जातात. कींवा नाही होत, पण सगळीकडेच ती असल्याने तिथे तसे वाटत असावे.

आयुष्याच्या प्रत्येक अंगाशी येथे कार्टुन्स निगडीत आहेत. अर्थशास्त्राशीसुद्धा. Money Museum मधे एका खोलीत पैस्यासंबंधीच्या अनेक बाबी कार्टुन्स द्वारे गोष्टींमधे गुंफल्या आहेत. (नाण्यांमधे रस असल्याने एकदिवस धावतपळत येथे गेलो तर त्यांच्याकडे इंग्रजीत पुस्तिका किंवा अॉडिओ गाईड्स उपलब्ध नाहीत. आत तर इंग्रजीत एखादाच शब्द. दोन दालने बंद, एकात साफसफाई सुरु. अमेरीकेत बंद व्हायला थोडाच वेळ उरला असेल तर पैसे घेतच नाहीत किंवा कमी घेतात. इथे पूर्ण वाजवून घेतले होते. मला फ्लेमीश किंवा फ्रेंच येत नाही हे मी आधीच ज्ञात करुन दिले होते. तरीही मला इंग्रजीचे आत अवाक्षरही नाही हे न सांगीतल्याचे आवडले नाही. बाहेरचा बेल्जिअन बंडु म्हणाला की तो वरिष्ठांना इंग्रजी पुस्तीका ठेवण्याबद्दल सांगत असतो पण त्याचे कोणी ऐकत नाही. मी म्हंटले की कदाचीत बाहेरच्यांनी म्हंटले तर एकतील, दे मला अतिथि-पुस्तक, लिहितो मी त्यात. तर त्यावर पट्ठा म्हणतो की अतिथि पुस्तकपण नाही, ते ठेवण्याबद्दल पण मी त्यांना सांगत असतो. भले बहाद्दर).

René Magritte हा माझा आवडता कलाकार आहे. पाईपचे साधे चित्र व त्यावर लिहिलेले 'हा पाईप नव्हे' या आशयाचे चित्राशी वरवर पाहता विरोधाभास असलेले फ्रेंच वाक्य हे त्याच्या प्रसिद्ध कलाकृतींपैकी एक. (खोलवर पाहता तो पाईप नसुन ते पाईपचे एक चित्र आहे हे ध्यानात येते). त्याचे आयुष्य ब्रसेल्समधे गेले. La fleur en papier dore हे त्याचे आवडते drinking hole. त्यावर बाहेर 'हे अजायबघर नाही' असे 'हा पाईप नाही' शी साधर्म्य असलेले वाक्य फ्रेंचमधे लिहिले आहे (म्हणजेच इथे फक्त Magritte यायचा म्हणुन फोटो काढायला येऊ नका तर आत येऊन आमच्या अर्थकारणालाही हातभार लावा. शास्त्राला म्हणुन एक Trappist beer तिथे रिचवली). तिथे Magritte ने खरडलेली काही खरडणे भिंतींवर आहेत. आतमधे तिथेही एक म्युरल आहेच. खोली जास्त खोल वाटावी या हिशोबाने ते रंगवले आहे.

आणखी काही कार्टुन्सपण आहेतच.

म्युरल्सचा इतका प्रादुर्भाव आहे की कधीकधी जाहिरातीही म्युरल्स आहेत असे वाटु लागते.

भव्य पेंटींग्सचे प्रेम म्युरल्स आणि जाहिरातींवर थांबत नाही. शहरभर ग्रॅफिटीपण आढळते. हे काही नमुने:

या सर्व प्रेमप्रकारणांची सुरुवात बहुदा Mannekin आणि इतर पिसर्स पासुन झाली. Mannekin Piss एक राष्ट्रीय निशाणी बनले आहे. पोस्टकार्डांवर, मेमेंटोजच्या रूपात सगळीकडे Piss. या सर्व ठिकाणी तो क्लोज-अप्स मधे असल्याने मोठा वाटतो. प्रत्यक्षात मात्र अगदीच किरकोळ आहे. But size does not matter. Does it? त्याला पाह्यलाही नेहमीच भरपुर गर्दी असते हे सांगणे न लागे.

येथुन घसरण जी सुरु होते तिचा पुढचा टप्पा म्हणजे एका गल्लीच्या टोकाशी असलेले त्याचे स्त्रीलिंगी रूप.

ते संपते ते एका कुत्र्याच्या येथील जगप्रसिद्ध फॅशनबद्दलच्या प्रतिक्रीयेने. फॅशन डिस्ट्रीक्ट कोणत्या दिशेला आहे ते वेगळे सांगायची गरज नाही.

एकुण या म्युरल्समुळे हे Neo शहर अजुनच रम्य बनते. सुरुवातीला एकदोन दिवसात पाहुन होईल असे वाटणारे ब्रसेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तुंनी आपल्या भुलभुलय्यात कधी खेचते कळतही नाही. तिथल्या इतर गोष्टींबद्दल (जसेकी चॉकलेट्स) नंतर कधीतरी.

नेहमीप्रमाणेच सुरस वर्णन आणि पुष्टीकारक फोटोज. त्यामुळे आवडले.

अधिक सुरस विषयांच्या प्रतीक्षेत आहे!

मस्त Happy परत एकदा तिथल्या रस्त्यांवरुन फिरुन आल्यासारखं वाटलं.

सुरुवातीला एकदोन दिवसात पाहुन होईल असे वाटणारे ब्रसेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तुंनी आपल्या भुलभुलय्यात कधी खेचते कळतही नाही.>> अनुमोदन Happy

मस्त Happy

जगाच्या पाठीवर असे कार्टून्सच्या भित्तीचित्रांनी भरलेले गाव आहे हे पाहूनच खूप छान वाटले. तेथील लोकांच्या प्रत्यक्ष आयुष्यात या म्यूरल्सचा किती सहभाग आहे, त्यांचा त्या भागातील लोकांच्या आयुष्यावर, विचारांवर कसा प्रभाव आहे हेही जाणून घ्यायला आवडेल. त्यासंदर्भात काही वाचण्यासारखे असेल तर जरूर कळवा. Happy

लोकहो, धन्यवाद.

अकु, चांगला प्रश्न आहे. थोडेफार उत्तर - 'कार्टुन्स आवडतात व आयुष्यही तसेच ठेवायचा प्रयत्न करतो' असे असावे.