Under the Sky of Paris

Submitted by सावली on 3 December, 2011 - 12:53

पॅरिसला जाऊन फक्त लूव्र बघायचे आहे इतकेच काहीसे डोक्यात होते. त्याच बरोबर सेंट मॉनमिशेल बघायचे असेही होते. पण जसजसे माहिती काढत गेले तसे तिथे बघायला खूप काही आहे हे जाणवले. मायबोलीकर Sam आणि अस्चीग कडून खूप उपयोगी माहिती मिळाली आणि १२ दिवसांच्या फिरतीचा आराखडा तयार झाला. सगळे बुकिंग स्वतःच शोधून करायचे असे ठरवले त्याचा फायदाही झाला पण त्यासाठी फार वेळ मात्र द्यावा लागला. १२ दिवसातले पहिल्या दोन रात्री पॅरिसमध्ये पुढचे काही दिवस रोम आणि फ्लोरेंसमध्ये आणि पुन्हा शेवटच्या चार रात्री पॅरिस मध्ये होत्या. रात्रीच्या हिशेबात पाहिले तर बराच काळ वाटला तरी प्रवासात रात्री पोहोचणार असल्याने एकूण फिरण्याचे दिवस तसे कमीच होते. त्यात पुन्हा एक दिवस देऊन सेंट मॉनमिशेलला जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने ते रद्दच केले.

साधारण संध्याकाळी मुक्कामी पोहोचू असा अंदाज होता. पण कोपेनहेगनला विमान २ तास उशिरा निघाले. पुढच्या सगळ्यालाच अर्थात उशीर झाला. अगम्य उच्चाराच्या पॅरिस विमानतळावर पुढच्या बसची चौकशी केल्यावर आपले उच्चार इथल्या लोकांच्या आणि इथले उच्चार आपल्या पचनी पडणारे नाहीत हे लग्गेच ध्यानात आले. गेअर मोन्टपार्नासे असा मराठीच्या ठेक्यात केलेला खणखणीत उच्चार तिथल्या कन्यकेच्या कानाच्या पार वरून गेला. मग जपानमध्ये आल्या आल्या शिकलेली चिन्ह-हातवारे-कागदी घोडे यांची भाषा वापरून बस मध्ये एकदाचे बसलो. तोपर्यंत जायच्या ठिकाणाला गेआ मोन्पानाझ असे काहीसे म्हणतात असे कानांना कळले होते (म्हणजे उच्चारता येत नाही पण ऐकल्यावर कळते असे.) अशा उच्चाराच्या ठिकाणी मोठी बॅग घेऊन उतरलो. इथून पुढे फक्त ८ मिनिट चालायचे होते पण कुठल्या दिशेला चालायचे हे आमचे दोघांचे नक्की होईना. शेवटी Taxi ला शरण जाऊन दोन चार मिनिटात पोहोचलो. इथे मात्र गुगल मॅप्सच्या कृपेने हॉटेलचा चेहेरा! वगैरे आधीच शोधून ठेवल्याचा फायदा झाला.

हसतमुख चेहऱ्याने इराशशाईमासे वगैरे ऐकण्याची सवय झालेल्या आम्हाला एका निर्विकार चेहऱ्याने रूमची चावी दिली आणि जपानच्या पहाटे झोपेच्या आधीन झालो.
दुसरा दिवस आमच्यासाठी फारच लवकर उजाडला आणि आम्ही अगदी भल्या सकाळी निघालो सुद्धा. दोन मिनिटे चालल्यावर समोरच एक मोठठा बाझार नुकताच चालू होताना दिसला. लोकल बाझार बघणे हे अत्यंत आवडीचे काम असल्याने अर्थातच तिथे वेळ घालवला. आजूबाजूच्या शेतामधली फळफळावळ, भाज्या, ताजे मांसमासे, नवनवीन प्रकारचे ब्रेड, मसाले, स्कार्फ, कपडे काय वाट्टेल त्या वस्तू तिथे होत्या. फ्रेंच माणसे एकमेकांशी गप्पा मारत आपापले दुकान सजवत होती. काहीशी आनंदी , काहीशी आपल्यातच मग्न असलेली. माणसांचे फोटो काढण्यासाठी माझी भीड चेपली नसल्याने अर्थात त्या कुणाचे फोटो नाही काढता आले.

थोडीफार सूर्याची किरणे दिसायला लागल्यावर इथून सरळ आयफेल टॉवर ला निघालो. इथल्या पहिल्याच ट्रेन प्रवासामध्ये कुणीतरी येऊन गाडीत दोन मिनिटांचा एक पपेट शो करून आम्हाला पहिला धक्का देऊन गेले. गाडीत पपेट शो म्हणजे गम्मतच!! इतके वर्ष ट्रेनने प्रवास करूनही खिडकीतून बाहेर बघण्याची लहान मुलासारखी माझी हौस अजूनही भागलेली नाहीये. इथे तर सोनेरी किरणात आळोखेपिळोखे देत उठणारे एक अख्खे नवीन शहर होते बघायला. त्याच त्या उंच फ्रेंच खिडक्या असणारी घरं, वेगळ्याच प्रकारचे छत आणि बांधकाम असलेल्या बिल्डींग आणि मधेच डोकावणारे आयफेल टॉवरचे डोके! सगळ्याच गोष्टी मोहवून टाकणाऱ्या!

आता जपानचा तोक्यो टॉवर पाहिल्यावर इथल्या टॉवरमध्ये काय असे वेगळे असणार असे काहीसे मला वाटले होते. पण तो भ्रमाचा भोपळा टॉवरच्या समोर पोचल्याक्षणीच फुटला. या टॉवरची क्लासिक style आणि दुसऱ्याची Modern style म्हणजे ते apples टू oranges सारखं आहे . पण त्याशिवायही आयफेल टॉवरमध्ये जी भव्यता, प्रशस्तपणा आहे तो अक्षरश: गल्लीत असलेल्या तोक्यो टॉवरला नाहीये. सकाळच्या सोनेरी किरणात आणि एकांतात समोर असलेली सेईने (Seine ) नदी , तिच्यावरचे ते कमानीसारखे पूल, काठाकाठानी उभ्या असलेल्या जुन्या पद्धतीच्या बांधकामाच्या इमारती, मधून मधून मान उंच करून बघणारे चर्चचे मनोरे ! एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्याच टाईम झोनमध्ये पोचल्यासारखे वाटले. एका क्षणी प्रेमात वगैरे पडतात तसेच काहीसे मीही या शहराच्या या चेहर्‍याच्या प्रेमात पडले. शहराचा खरा चेहरा काही का असेना, मला हा चेहरा दिसला आणि भावला.

नदीजवळची सकाळ 

प्रशस्त! 

टॉवरच्या पुढची वर चढायची रांग बघून मात्र आमचे यान पुन्हा याच टाईमझोनात परतले. वर चढायचा प्लॅन शक्य नव्हताच. इथेच समोर हिरवळीवर निवांत बसलो. पुढचा प्रवास केला तो आर्क दे त्रीओम्फ (Arc-de-Triomphe) ला मात्र हा ट्रेन प्रवास काहीतरी स्पेशल असणार आहे याची आधीच कल्पना असण्याचे काही कारण नव्हते. ट्रेनच्या फलाटावर एक जण अकोर्डिअन घेऊन बसला होता. माझे संगीत ज्ञान नगण्य आहे त्यामुळे असे वाद्य असते हे माहित असूनही त्याचे नाव माहित नव्हते! त्याने जे सूर छेडले ते मात्र पार मनात आत आत घेऊन गेले. मघाशी ज्या वेगळ्या टाईमझोनात पोचले होते त्याच काळात पुन्हा परतले. काही मिनिटे  आणि एक शब्दहीन नुसती सुरावट. पण काय जबरदस्त मोहिनी होती त्या सुरांची. ती त्या कलाकाराची कला, त्या वाद्याचा आवाज, संगीतकाराच्या हाताची जादू कि या शहराचा प्रभाव. कोण जाणे? पण इतके प्रश्न तेव्हा ऐकताना पडले नाहीत. ते पडायला लागले कारण ते सूर मनातून जाईचनात. पुन्हा ऐकायचेय पण सुरावरून काय शोधणार? तेही असे सूर जे मनातच आहेत. गुगलने अजून सुरावरून गाणे शोधायची किमया केली नाहीये. ती खरच असायला हवी. एक कुठलीशी धून मनात अडकली की फार अस्वस्थ व्हायला होतं ती कळेपर्यंत. इथे तर कळणार नाही याचीच खात्री होती. ते सूर "Sous le ciel de Paris" (Under the sky of Paris) या गाण्याचे होते हे पार जपानला परत आल्यावर कळले.

आर्क पाहिला. आतमध्ये वरपर्यंत चढलो. तिथल्या कलाकृती पाहिल्या. अप्रतिम! इथून शहराचा एकच भाग वेगळा दिसतो नवीन काचेच्या इमारती असलेला.  हा एवढा भाग सोडला तर अख्खं पॅरिस एकाच साच्यातल्या सुंदर इमारतींनी भरलेले आहे. आणि एखाद्या मध्याकडून त्रिज्या काढाव्यात तसे आखलेले सरळच्या सरळ रस्ते. त्या कोपर्‍यावरच्या सगळ्या इमारतींचा एक ठराविक साचा. पॅरिसचे एक चित्र. आणि अजून मनात वाजणारे मघाचे अकोर्डिअन. "Under the sky of Paris" ची ती सुरावट हवेत रेंगाळतेय.

आर्क 

आर्कवरुन दिसणारे दृश्य. जिथून नंतर सूर्यास्त पाहिला ती  एकच उंच इमारत. 

इथून ओपेराला थोडा फेरफटका मारून मात्र सरळ आराम करायला गेलो. कारण मला कितीही उत्साह असला तरी चार वर्षाच्या पिल्लाला इतके फिरणे शक्य नव्हते. संध्याकाळी मी टॉवर मोन्पानाझ च्या छतावर सूर्यास्त बघायला गेले. ही एकच उंचच उंच इमारत इथे आहे. इथूनही मघाशी आर्क वरून पाहिल्यासारखे रस्ते , इमारती दिसतात. टॉवर सगळ्या शहरात दिमाखाने उभा असला तरी इथून मात्र छोटा दिसतो. सूर्यास्ताचे काही मूड असतात. काही दिवशी सूर्य महाराज अगदी रंगाची उधळण करीत परततात तर कधी कधी अगदी पार रंगहीन होऊन. आजचा दिवस असाच रंगहीन सूर्यास्ताचा निघावा हे अति दुर्दैव. पण किमान सूर्यास्त दिसला हे ही नसे थोडके.

३६०डिग्री मोन्पानाझ वरून सूर्यास्त 

शहर 

दुसऱ्या दिवशी पहाटेच रोमला प्रयाण आणि पुढचे काही दिवस तिथले. २२ तारखेला परत एकदा रात्री पूर्वीच्याच हॉटेलात निर्विकार चेहेऱ्याकडून  चावी घेतली.

पुन्हा एकदा त्या लोकल बझारला भेट द्यायची असे आधीच ठरवले होते. आज अजून एकदा आश्चर्याचा धक्का बसला. मागच्या वेळी फळफळावळ, भाज्यांनी भरलेले ते मार्केट यावेळी असंख्य कलाकृतींनी भरले होते. अनेक चित्रकार आपापली चित्रे मांडत होते. वा! असे मार्केट तर कधीच पाहिले नव्हते आम्ही. प्रत्येक चित्रकाराची वेगळी शैली , वेगवेगळे विषय असे सगळे एकत्र बघताना ते ही गॅलरी मधली शिस्तबद्ध मांडणी नसताना बघणे म्हणजे एक वेगळीच पर्वणी होती. जलरंग, तेलरंग, पेन्सिल स्केच, क्रेयोन अशी माध्यमांचीही भन्नाट सरमिसळ होती. मस्तच! आजचा दिवस इथेच सत्कारणी लागला असे वाटले.

इथून नोत्रे दामे (Notre Dame Cathedral) ला गेलो. आजही वाटेत मध्ये एक दोन ठिकाणी कुणी गिटार , कुणी ट्रम्पेट असे वाजवून लोकांचे कान सुखावत होते. आम्ही लेकीच्या आग्रहानुसार थांबत, ऐकत पुढे जात होतो.  तोक्योमधेही हे प्रकार असल्याने  त्याबद्दल खूप आश्चर्य वाटत नव्हते.    पण का कोण जाणे ते आधी ऐकलेलं अकोर्डीयन मात्र अजून मनात होतं. आज रविवार असल्याने Notre Dame  मध्ये रविवारची प्रार्थना चालू होती. बाहेरची बेशिस्त स्थानिक आणि परदेशींची गर्दी आणि आत शांत शिस्तबद्ध वातावरणात चाललेली प्रार्थना - एकमेकांच्या अगदी विरोधी वातावरण होतं. इथल्या त्या काचेच्या रंगीत तावदानातून सांडणारा प्रकाश इवल्या इवल्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात मिसळून प्रचंड उंच कमानीवर पसरलेली गूढता आणि शांत आवाजात चाललेली ती प्रार्थना हे एक अफलातून जादुई मिश्रण होते. पुन्हा एकदा टाईम झोन बदलणे प्रकार ! आता तर ती सुरावटही साथीला होती.

नोत्रे दामे 

आतमध्ये प्रार्थनेच्या वेळी 

प्रवेशद्वार 


आजची संध्याकाळ केवळ लूव्र (Louvre) म्युझियम बाहेरून बघून तिकिटे वगैरे कुठून घ्यायची हे बघायचे होते . धडधडत्या अंतकरणाने म्युझियमच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलो. हेच ते आपल्याला पहायचे होते ! तोच काचेचा पिरामिड , सुंदर बांधकामाची इमारत. वॉव ! इथे संध्याकाळभर निवांत बसलो. का कोण जाणे पण तिथल्या कारंजामध्ये आज पाणी नव्हते, पिरामिडाला लाईटिन्ग नव्हते. तरीही ते सगळे सुंदरच भासले.

लूव्र म्युझियम 

उलट पिरामिड 

पुढचा दिवस पूर्ण म्युझियम मध्ये घालवायचा हे ठरले होते. "द विन्ची कोड" या पुस्तकात ज्या कलाकृतींचा उल्लेख झाला त्या बघायच्या असतील तर म्युझियमच्या साईट वर तसा एक प्लान आहे. तो मार्ग बघू असे ठरवले होते. सकाळी लवकर उठून तिकीट काढणे प्रोग्राम केला आणि एकदाचे आत शिरलो. आमच्या मागे इतकी रांग झाली ते पाहून लवकर आल्याचे सार्थक झाले. आत मुलीसाठी बेबी स्ट्रोलर घेतला हा एक चांगला निर्णय होताच पण वाईटही होता हे आमच्या नंतर लक्षात आले. तो वेबसाईट वर दिलेला मार्ग पायऱ्या वापरून सांगितला आहे. एलेव्हेटर वापरताना दिशांचे पार कडबोळे होते आणि एका मोठ्ठ्या चक्रव्युहात फिरतोय असे काहीसे वाटते. आम्ही तिथे कितीवेळा चुकलो आणि चुकत चुकत नवी नवी दालनं पाहिली ते आम्हांलाही आठवत नाही. तो मार्ग गुंडाळून ठेवून आम्ही दोनचार नावाजलेल्या कलाकृती आणि इजिप्त भाग बघू असे ठरवले. त्याप्रमाणे पहिल्यांदा मोनालिसाला भेट दिली. प्रचंड गर्दीत आणि काचेच्या तावदानापलीकडे असलेले ते छोटेसे चित्र पाहून आमची तरी निराशा झाली. ते चित्र इतके का प्रसिद्ध झाले हे ते चित्र प्रत्यक्ष पाहूनही कळले नाही. व्हॅटीकन मधले सिस्टीन चॅपल पाहून आल्यामुळे हे अजूनच साधे वाटले का ते देव जाणे!  या चित्राच्या बरोबर समोर म्युझियम मधले सर्वात मोठे "वेडिंग ऑफ काना" हे चित्र आहे. हीच दोन चित्रे का इतक्या समोर आणि जवळ ठेवलीत माहित नाही.

स्फिंक्स 

इजिप्शियन ममी

इथे खटकलेल्या गोष्टी म्हणजे चित्रांची माहिती इंग्रजी मध्ये लिहिलेली नाही. आम्ही ऑडियो गाईड घेतले होते पण ती माहिती अगदी काही कलाकृतींसाठीच उपलब्ध आहे. दुसरे म्हणजे सुचना / मार्गदर्शक फलक नाहीत फारसे. खोल्यांना रंग आहेत पण कलर कोडींग काही नीटसे कळत नाही. इथले रुट्स प्लान करण्यासाठी आणि त्यांचे योग्य फलक दाखवण्यासाठी एखाद्या जपान्याची मदत घेतली तर हे काम अचूक होईल असेही वाटले. म्हणजे वेगवेगळे रुट्स ठरवून त्याप्रमाणे मार्गदर्शक फलक लावले तर नवीन येणारे लोक हवा तो मार्ग निवडून शकतील.   अजून काही चित्रे पाहिली, हरवत हरवत फिरलो . तसेच हरवत इजिप्शियन ममी, पुतळे, मुखवटे अशा अनेक गोष्टी पाहिल्या. इथे सराईतपणे फिरायचे आणि हवे ते पहायचे तर बहुधा चार पाच वेळा सलग यावे लावेल, तेव्हा कुठे कुठे काय आहे याचा मागमूस लागेल.

संध्याकाळी दमून भागुन म्युझियमचा निरोप घेतला आणि चालत टॉवरकडे निघालो. तिथे लाईट्स बघायचे होते. या लाईट शोचा कॉपीराईट  आहे म्हणे. त्यामुळे लाईट्स लावलेला आयफेल टॉवरचा फोटो फ्रांस कडून पूर्वपरवानगी असल्याशिवाय प्रकाशित करता येत नाही. त्यामुळे अर्थातच त्याचे फोटो इथे दिले नाहीत.  म्युझियमपासून टॉवर पर्यंत  हा एक तासाभराचा निवांत वॉक आहे. नदीच्या कडेकडेने जाणारा, जुन्या इमारती, कमानीदार पूल यांच्याशी भेट घडवणारा. खरतर Sam ने बोटप्रवास करा असे सांगितले होते पण गर्दीत रांग लावणे, वाट बघणे या प्रकाराचा कंटाळा असल्याने चालत निघालो. शिवाय वाटेत अजून काही ठिकाणेही दिसतात ती ही बघायची होती. या आमच्या भटकंतीत हे निवांत शहर फारच आवडले. फ्रेंच लोक सगळी कामे निवांत करतात, दुपारी इतका मोठा लंच ब्रेक घेतात वगैरे वगैरे ऐकून होतो. इथे चालताना वाटलं, का आरामात जगू नये इथल्या लोकांनी? इतक्या निवांत फिरण्याच्या जागा आहेत, भर शहरात राहूनही नदीकाठी मोकळ्या जागा आहेत, शांत बसण्यासाठी , गप्पा मारण्यासाठी उद्याने आहेत, झालंच तर रस्त्यांच्या कडेला लाल औनिंग असलेली ती कॉफीगृह, उपहारगृह  आहेत. मस्तपैकी आपल्या नादात चालावं, आवडीचे वाद्य घेऊन हवे तिथे सूर छेडावेत, आवडीच्या माणसाबरोबर तासनतास कॉफी पीत गप्पा माराव्या नाहीतर हातात हात घालून संध्याकाळी नदीच्या काठी बसून राहावं ! काय गरज आहे नसत्या चिंता घेऊन वाघ मागे लागलेले आयुष्य जगण्याची? अर्थात इथल्या लोकांनाही ज्या चिंता असतील , जे प्रश्न असतील ते मला त्या एक तासाच्या भटकंतीमध्ये का आणि कसे जाणवणार म्हणा.
या शहराची एक अनामिक मोहिनी मनात उतरवत  आम्ही पॅरिसच्या निळ्या आकाशाखाली चालत राहिलो. पॅरिसची सुरुवात केली होती आयफेल टॉवर ने आणि शेवटही इथेच केला.

गर्दीने भरलेल्या प्रचंड बोटी

पण इथे आमच्या प्रवासाचा शेवट झाला असे म्हणणे फार चुकीचे ठरावे. दुसऱ्या दिवशी ट्रेनने अगम्य उच्चाराच्या विमानतळावर परत चाललो होतो. कुठल्यातरी एका स्टेशनवर एक माणूस चढला. एक पोर्टेबल
स्पीकर आणि ट्रम्पेट काढली आणि वाजवायला सुरुवात केली. नुसती ट्रम्पेट पहिल्यांदाच ऐकत होते. लेकही खुश झाली. त्या माणसाने दोन कुठली तरी छान गाणी वाजवली आणि तिसरे सुरु केले. वॉव !तीच सुरावट पुन्हा एकदा. ही सुरावट रोमामधेही एकदा थोडीशी कानावर पडली होती. पुढचे काही क्षण आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. बाकीचे असेच भारले होते कि त्यांच्यासाठी हे नेहेमीचेच होते काय माहित.  गाणं संपलं तसा तो नेहेमी प्रमाणे पैसे घ्यायला आला. सहसा असे कुणाला उगाचच पैसे द्यायला जमत नाही पण यावेळी मात्र उत्स्फूर्तपणे पैसे दिले गेले. त्याच्या कलाकारीला दाद द्यायला त्यावेळी तितकेच सुचले.

या गाण्याबरोबर सुरु झाला तो एक नवा प्रवास. हे शब्द माहीत नसलेलं गाणं शोधायचा. आल्यावर अनेक फ्रेंच इन्स्ट्रुमेंटल्स  युट्युबवर शोधून ऐकली. ती सुरावट मनात होती पण मिळत नव्हती. मग लेकीच्या पियानो सेन्सेईशि बोलले तर तिने काही सुरावटी वाजवून दाखवल्या आणि अगदी युरेका क्षण आला. हीच सुरावट तिने वाजवून दाखवली. अप्रतिम ! आता याची सीडी घरात आहे. मध्ये मध्ये ऐकते. अजूनही तीच मोहिनी आहे. आणि मनात वाटतंय ही सुरावट आणि अकोर्डीयनच्या सुरांत स्वतःला विसरण्यासाठी पुन्हा एकदा फ्रांस मध्ये ट्रीप करावी का?
ही सुरावट इथे ऐकता येईल. सगळ्यांना आवडेल का ते माहिती नाही. पण ऐकून काय वाटले ते नक्की इथे  सांगा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त फोटो आणि माहिती.
इजिप्शियन ममीचा फोटो अगदी त्याच्या शेजारी उभे राहुन काढ्ल्या सारखा वाट्तोय......

सुरेख वर्णन आणि सुरेख प्रकाशचित्रं Happy
सुरावट ऐकली. सुरावट ऐकताना काय वाटले ...

नदी , तिच्यावरचे ते कमानीसारखे पूल, काठाकाठानी उभ्या असलेल्या जुन्या पद्धतीच्या बांधकामाच्या इमारती, मधून मधून मान उंच करून बघणारे चर्चचे मनोरे ! एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्याच टाईम झोनमध्ये पोचल्यासारखे वाटले. >>> नेमके असेच वाटले Happy

ती सुरावट ऐकून मला मेरा नाम जोकर मधले जाने कहा ची सुरावट
आठवली तर कधी, किशोरच्या ठंडी हवा ये चांदनी सुहानीची सुरावट
आठवली.

फोटो नेहमीप्रमाणे मस्त! वर्णन व गुंफणही छान. आवडते शहर असल्याने अजुनच भावले.

नोत्र दामच्या पुढे एक क्रिप्ट आहे. वर्णनावरुन छान असावी. मी गेलो होतो तेंव्हा बंद होती.

> तो वेबसाईट वर दिलेला मार्ग पायऱ्या वापरून सांगितला आहे. एलेव्हेटर वापरताना दिशांचे पार कडबोळे होते आणि एका मोठ्ठ्या चक्रव्युहात फिरतोय असे काहीसे वाटते.

मे बी तोच उद्देश असावा? Happy
शक्य आहे पायर्यांनी गेल्यास पण तसाच अनुभव येईल?
एनीवे, त्यांना त्याबद्दल कळवुन पहा. ते फ्रेंचमधेच लिहुन पाठवायला विसरु नको. सॅम (किंवा येथील इतर मदत करु शकतील)

वर्णन मस्त.. ! फोटो छान आहेत.. पण नेहमीसारखे खूप भारी नाही वाटले..
मादृदो असू शकेल.. Wink

मस्त फोटो आणि वर्णन Happy

आयफेल टॉवर पायर्‍यांनी चढण्याचा आणि उतरण्याचा अनुभव मात्र खरंच खास असतो Happy

छान! Happy

दा विंची कोडमधला पिरॅमिड !

रात्रीचे 'इल्युमिनेशन' चे फोटो नाहीत काढले का? ??

> ...पहिल्यांदा मोनालिसा ला भेट दिली. प्रचंड गर्दीत आणि काचेच्या तावदानापलीकडे असलेले ते छोटेसे चित्र पाहून
> आमची तरी निराशा झाली. ते चित्र इतके का प्रसिद्ध झाले हे ते चित्र प्रत्यक्ष पाहूनही कळले नाही.

अनुमोदन! मला आणि माझ्या बायकोलाही मोनालिसा रद्दड चित्रं वाटलं. त्यामानाने चॅपेलांतली छतावरची चित्रकला खरंच छान आहे.

आ.न.,
-गा.पै.

मस्तच.

मस्त गं सावली. फोटो नेहेमी प्रमाणे सुंदरच आहेत.
मला तू ती सुरावट ओळखण्यासाठी केलेला प्रवास फार आवडला. माझे असे ऑस्ट्रेलिया हून आल्यावर झाले होते. तिथल्या डिजरीडू च्या एका पीसने असेच वेड लावले होते.
बाकी मस्तच.
बाजार बघायला आवडतात याला अनुमोदन. माझा पायच निघत नाही Happy

जागोमोहनप्यारे ,विनार्च ,Yo.Rocks,आऊटडोअर्स, सायो,शापित गंधर्व,कंसराज,बित्तुबंगा,रंगासेठ,पराग, दिनेशदा, अगो,प्रसिक,मंजिरी, रोहित ..एक मावळा,ऋयाम,मानुषी,शैलजा,गामा पैलवान,जिप्सी,जागू,एम्बी खुप आभार Happy
@विनार्@, हो शेजारीच होते फक्त मधे काच होती Proud
@अगो, आवर्जुन गाण ऐकल्याबद्दल धन्यवाद Happy
@दिनेशदा, तरी फिरायला काहीच त्रास झाला नाही. फक्त रेस्टॉरंटचे मेन्यु इंग्लिश मधे नसणे यामुळे अंदाजाने जेवण मागवावे लागले.
जाने कहा ची सुरावट>> कारण त्यात अ‍ॅकॉर्डीयन वापरले आहे. नविन गाण्यात ते अज्जिबात नसतेच.. किमान ऐकु तरी येत नाही. पण रॉकस्टारच्या दोन गाण्यात (हवा हवा आणि टँगो फॉर ताज ) आहे.

@अश्चिग,
नोत्र दामच्या पुढे एक क्रिप्ट >> मीही नाही गेले.
मे बी तोच उद्देश असावा>> वाटत नाही कारण फार डीटेल मधे दिलेय आणि बाकीच्या दोन रूट सारखेच वाटतेय. फक्त एकच रुट फ्री अ‍ॅक्सेसवाला ( स्ट्रोलर, व्हिलचेअर घेऊन जाता येण्यासारखा ) आहे.
@पराग,
नेहमीसारखे खूप भारी नाही वाटले>> प्रामाणिक प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. चांगले न वाटल्याचे कारण हे असु शकते. हे असेच जाता जाता काढलेले फोटो आहेत. योग्य वेळी, योग्य प्रकाशात जाऊन काढलेले नाहीत Happy
@मंजिरी,
लेकीला घेऊन चढणे शक्य नव्हते खरच.
@ऋयाम
रात्रीचे 'इल्युमिनेशन' चे फोटो >> मी गेले तेव्हा लुव्रला नेहेमीसारखे कारंजे आणि लाईट्स नव्हते.! थोड्या प्रकाशातले आहेत पण इथे टाकायचे राहिले.
आणि आय्फेल टॉवरचे लाईट्स वाले फोटो देण्यासाठी फ्रान्समधुन परवानगी घ्यावी लागते Uhoh
@जिप्सी,
इजिप्शियन ममी काचेमध्ये >> हो काचेत आहे. पोलरायझर आणि म्युझियम मधले लाईट्स यामुळे काच जाणवत नाहीये फोटोत.
@एम्बी,
हो ना काहीवेळा असेच मनात येत राहाते आणि कळेपर्यंत अस्वस्थ व्हायला होतं.
मज्जा येते फार बाजार बघताना Happy

आयफेल टॉवरचा, ममीचा फोटो मस्त. आर्क मस्तच आहे. Happy सही वाटते तिथे गेले की. ट्रॅफिक बघुन जीव घाबरा होतो पण. Happy

इथले रुट्स प्लान करण्यासाठी आणि त्यांचे योग्य फलक दाखवण्यासाठी एखाद्या जपान्याची मदत घेतली तर हे काम अचूक होईल असेही वाटले. Lol

फोटो खूप आवडले. वर्णनही छान.
सुरावट नाही ऐकु शकले. घरून ऐकते.

Pages