बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ८. "बी टू" ला शेवटचा मुजरा )

Submitted by अवल on 24 November, 2011 - 22:25

७. जंगलातला थींकर आणि थरार : http://www.maayboli.com/node/17030

आज आमचा बांधवगडचा शेवटचा दिवस होता. खरं तर आमची आखलेली ट्रीप आज सकाळीच संपली होती. पण अजून जंगलाची भूल उतरत नव्हती. तशात बांधवगडच्या "राजा"ला अजून आम्ही सलाम करू शकलो नव्हतो. त्यामुळे एक जास्तीची जंगल सफारी करावी असं आमच्यातल्या अनेकांना वाटत होतं. मग आम्ही अनेकांनी जास्तीच्या जंगल फेरीची चौकशी केली , अन आमच्या फोलियाजच्या लिडरने हवी ती सर्व सोय करून दिली, अन मग आम्ही पुन्हा जंगलात निघालो. आज आमच्या दोन जीप्स होत्या. अन आम्हा सर्वांनी ठरवलं होतं की आज फक्त आणि फक्त बी टू लाच भेटायचं. दुसरे सगळे रूट्स बाजूला करून आम्ही बी टू च्या रस्त्यावर आलो. बी टू चा एरिया तसा मोठा, जंगलचा राजाच तो ! पण तरीही गाईडवरती सर्व हवाला टाकून आम्ही निर्धास्त होतो. आज कितीही वेळ एका ठिकाणी थांबायला आम्ही तयार होतो, बी टू च्या दर्शनासाठी.
चार वाजले, आम्ही जंगलात प्रवेश केला. पंधरा मिनिटात एका छोट्याश्या टेकडीला वळसा घालून आम्ही पुढे आलो. अन मग एका ठिकाणी गाईडने "ठहरो" असा इशारा दिला ड्रायव्हरला, अन आमची जीप थांबली. (वेळ : ४.१५ )
समोर एक गवताळ रान होतं अन थोड्या दूरवर छोटा हिरवा पॅच होता. ४-५ हिरव्या पण उंचीला छोट्या झाडांनी घट्ट रान केलं होतं.

B2-01_0.jpgbbb12.jpg

आमच्या गाईडने सांगितलं की तिथे पाण्याचा एक स्त्रोत आहे. त्यामुळेच बाकीचे रान पिवळ्या गवतात असले तरी तेव्हढाच पॅच हिरवा गार होता. दुपारच्या कडक उन्हापासून सुटका मिळवण्याचे अत्यंत रमणीय ठिकाण होते ते. पण तिथे होती प्रचंड शांतता. नव्हता कोणता कॉल, नव्हता माकडांचा आवाज ना हरणांचा आवाज ना मोराचा ओरडा... आम्ही मनातून जरा साशंकच होतो, पण जोडीने गाईडवरचा विश्वासही होता. मग आमची जीप तिथेच दहा मिनिटं थांबली. पण गाईडचे समाधान होईना, त्याने जीप पुढे घ्यायला सांगितली. आता डावीकडे तो स्पॉट ठेऊन आम्ही पुढे झालो. त्या स्पॉटला वळसा घालून बरोब्बर पलिकडे गेलो. पण तिथूनही काही दिसेना. जिथे पाणी होतं तो भाग जरा खोलगड होता, तशात छोट्या झाडांनी जणूकाही तिथे निसर्गनिर्मित गुहाच झाली होती.
आमच्या डाव्या बाजूला ही जागा होती. आमच्या समोर काही हरणं चरत होती. अतिशय निर्धास्तपणे.

B2-02.jpgbbb132.jpg

जंगलही शांत निवांत होतं. आमचा उत्साह आता मावळू लागला. बहुदा बी टू काही आज दिसत नाही असे वाटू लागले. गाईडने पुन्हा दुर्बिणीतून पाहणी केली, आम्ही पण आमच्या दुर्बिणी, कॅमेरे रोखले, पण हाय... शांतता, शांतता, अन शांतता....!(वेळ ४.३०)

अचानक हरणातल्या एकाने आपली शेपूट उंच केली, सगळी हरणं सावध झाली, अन खरी शांतता म्हणजे काय हे आम्ही अनुभवलं. अगदी चिटपाखरूही हलेना... संपूर्ण जंगल अगदी स्तब्ध, आमचा श्वासही थांबला एक क्षण... पण लगेच पुन्हा वातावरण निवळले. आमचा गाईड मात्र आता सक्रिय झाला. त्याने जीप वळवून पुन्हा मागे घायला लावली. आणि आता तो अतिशयच कॉन्फिडन्ट होता. पुन्हा मगाचच्याच स्पॉटच्या थोडं अलिकडे आणुन त्याने जीप बंद करायला सांगितली. (वेळ ४.३५)

B2-04.jpgbbb132.jpg

आमच्याकडे वळुन बघत सांगितलं, " यहीच है वो! मगर कब निकलेगा, निकलेगा या नही कुछ कहाँ नहीं जाता ! अगर आप ठहरना चाहते हो तो ठहरेंगे या दुसरी जगह कोई दुसरे बाघ का चान्स लेंगे ! आप जैसा कहेंगे, वैसा करेंगे ! " पण आता आम्हाला फक्त बी टू चीच आस लागली होती. "तो" नुसता तिथे आहे याचाही खुप भरवसा वाटत होता Happy तो फक्त तिथे आहे ही जाणीवही आम्हाला पुरेशी होती. आणि आम्ही सगळेच अगदी निवांत अगदी कितीही वेळ थांबायला तयार होतो.
अर्धा तास होत आला. आमच्या दोन जिप्स आणि काही चरणारी हरणं, जंगलाची निवांतता अन त्याच्या असण्याची खात्री यांच्या सह तो अर्धा तास कसा गेला हे कळलेच नाही.

B2-04_0.jpgbbb132.jpg

एक खुप खुप छान संधाकाळ आम्ही निसर्गासह अनुभवत होतो. खरं तर आमच्या बरोबर लहान चवथी- पाचवीतली मुलं पण होती, पण सगळे एकदम शांत बसून होतो. २-४ इतर जीप्स आम्हाला असं निवांत बसलेलं बघून थांबत होत्या, विचारणा करून आमच्याकडे पहात पुढे मार्गस्थ होत होत्या.
अन मग तो क्षण आला, एका सांबराने खॅक केलं... जंगल हलू लागलं. आमच्या समोरच्या झाडीतून उजवी कडे हालचाल जाणवू लागली.

B2-05.jpgbbb2_0.jpg

उन्ह उतरू लागली होती, झाडांच्या पानांच्या सावल्या आम्हाला फसवू लागल्या. " तो पहा तिथे"... " नाही या इथे..." सगळे सजग झाले. अन मग तो पुढे आला. (वेळ ५.०१) गर्द हिरव्या झाडीतून अवाढव्य बी टू दिसू लागला. थोडं पुढे होऊन संधाकाळचे उन अंगावर घेत आमच्याकडे पाठ कररून बसून राहिला. त्याचे जेमतेम डोकेच दिसत होते, ते ही मागून. पण त्याच्या कानंवरचे ते प्रसिद्ध ठिपके स्पष्ट दिसत होते.

B2-12.jpg

मध्येच त्याने मान हलवली अन मिळाला हा एक साईड स्नॅप

B2 - 31.jpg

अन मग मध्येच तो झोपत होता, मध्येच मान वर करत होता. जवळ जवळ ४५ मिनिटं तो तिथेच बसला होता. आम्ही दुर्बिणीतून अन कॅमेरतून त्याला मनसोक्त पहात होतो. अन मग तो अचानक उठला... आमच्या आशा जागृत झाल्या... पण कसचे काय Sad तो बाहेर यायच्या ऐवजी पुन्हा झाडीत जाऊन बसला. ( वेळ ५.४५)
पुन्हा १५ मिनिटं गेली. आता अंधारू लागलं होतं. जंगल साडे सहा वाजता बंद होणार होतं, कमीतकमी आम्हाला या स्पॉटपासून ६-१५ ला निघावंच लागणार होतं. आमचा जीव आता मेटाकुटीला आला होता. भेटला भेटला म्हणे पर्यंत हातातून क्षण निसटणार असे वाटू लागले. आता पुढची काहीच मिनिटंच हातात होती.
सहा वाजले, आम्ही आता आशा सोडायची ठरवली. मनात म्हटले बघू त्याच्या मनात असेल तसे! आम्ही निसर्गाला शरण गेलो. अन तो क्षण आला ! आम्हाला पार पार बदलवून गेला.
६.०१ तो झाडीच्या डावीकडून बाहेर पडला, डौलात आमच्या उजवी कडून चालत बाहेर आला .

B2-15.jpg

चिखलात बसल्याने बराच मळला होता, वयाने मोठा असल्याने अन उन्हाळ्यामुळे त्याचा रंगही फारसा आकर्षक दिसत नव्हता, पण त्याचा आकार, चालण्यातला त्याचा रुबाब, भरदार पावलं,त्याची जंगलावरची कमांड सगळे जिथल्या तिथे होते. आम्ही अगदी नजरबंद झालो होतो. इतकेच नव्हे आमच्या जीप चालकांनाही जीप्स सुरू करायचे क्षणभर लक्षात आले नाही. तो आमच्या समोरून पुढे निघाला. अन मग त्याच्या मागे मागे आम्ही.

B2-16.jpgB2-17.jpg

आता मी कॅमेरा बंद करून हँडीकॅम हातात घेतला, त्याची प्रत्येक हालचाल टिपायचा प्रयत्न करू लागले. पण हे काम अजिबात सोपे नव्हते. खडबडीत जंगलातला मातीचा रस्ता, त्याला गाठायसाठी जीपचा असलेला वेग, जीपमधल्या प्रत्येकाची हालचाल या सगळ्यात हँडीकॅम स्थिर होत नव्हता, पण तसाच रोल करत गेले. (याचा काही भाग तुम्ही दिवाळी हितगूज २०११ मध्ये चित्रफितीत इथे बघू शकाल.) आम्ही आता टेकडीपाशी आलो. आता त्याला आपल्या घराकडे जाण्यासाठी टेकडी ओलांडून आमच्या समोरून रस्त्यावर येणे भाग होते.

B2-07.jpgbbb2.jpgB2-08.jpg

आता तो आमच्या अगदी जवळ येणार होता. तो एका झटक्यात ती टेकडी चढून आमच्या डोक्यावर आला अन उडी मारून आमच्या समोर खाली रस्त्यावर आला. अन मी हँडीकॅम गळ्यात सोडून पटकन कॅमेरा हातात घेतला

B2-13.jpg

पुढच्याच क्षणाला झाडांतून बाहेर येत एक क्षण त्याने आमच्याकडे दृष्टी टाकली, अन मिळाला हा त्याचा क्लोज अप. खोटं वाटेल पण शब्दशः खरे "ताटाएव्हढे मोठे तोंड !"

B2-14.jpg(वेळ ६.०३)

आता तो डावी कडच्या झाडीत निघाला. आमच्या जीप्सनी डावीकडचा रस्ता पकडला, पण तो जंगलातून पटकन वळून आत गेला. जीपचालकाने पुन्हा जीप पळवली, आमचा पाठलाग सुरू झाला. पण आता जंगल चांगलच अंधारू लागलं. कॅमेरातली सेटींग्ज बदलायला वेळ नव्हता. मी पुन्हा हँडीकॅम हातात घेतला. रस्त्याने पुन्हा दिशा बदलली अन पुन्हा दूर झाडांत तो दिसला. समोरून पुन्हा त्याचे दर्शन झाले. आता तो त्याच्या आवडत्या जागी बसला. आता तो तिथून रात झाल्याशिवाय उठण्याची शक्यता नव्हती. अन जंगल बंद होण्याची वेळही होत आली होती. (वेळ ६.०८) आम्ही तिथूनच त्याला शेवटचा... हो आता शेवटचाच म्हणायला हवं, सलाम केला. बांधवगडच्या राजाला माझा हा मानाचा मुजरा !

(आधीचे लेख : http://www.maayboli.com/node/16653)

गुलमोहर: 

बांधवगडची लेखमाला लिहिताना असं वाटलच नव्हतं की तिचा शेवट असा करावा लागेल Sad खरं तर अजून पूर्ण लिहून झाली नाहीये; अजून तीन भाग लिहायचेत. पण कधी कधी शेवट आधीच लिहावा लागतो, या परीस अजून दु:ख कोणते ? आजच पेपरमध्ये वाचलं, बी टू चा मृत्यू ! अन मग सगळ्या आठवणी भराभर जाग्या झाल्या. ही लेखमाला अर्धवट सोडल्याची हूरहूर दाटून आली. अन बाकीचे सगळे सोडून आधी बी टू ला शेवटचा मुजरा करायला धावले इथे.... सलाम बी टू , सलाम....

अवलतै

मस्त लेख गो बाय !
वाघाचं दर्शन हा जबरी योग आहे. फोटो पण मस्तच ( वाघाला मांडीवर घेऊन लाड करतानाचा पण एक फोटो हवा होता असं वाटून गेलं Proud )

मस्तच!!! अवल. Happy
क्लोजअप मध्ये कसली भेदक नजर दिसतेय त्याची... सही.. एकदम..!!
पण कशामुळे मृत्यु झाला त्याचा..?? Sad

टेरिटेरी मारामारी. तो म्हातारा झाला होता, पण राजपदासाठीच्या प्राण्यांच्या, त्यातही वाघांच्या मार्‍यामार्‍या अशा प्राणघातकच ठरतात....

ओह!! Sad

पण त्याला आवडले असते का>>>>अवल तो तर फ़ारच खूष झाला असता. पण त्याला खूष केलं नाहीस म्हणून आज आम्हाला खूष केलस. Wink
धन्यवाद उचापती, शोभा.>>>:अओ: Uhoh Uhoh Proud

अवल, बांधवगडच्या या नाट्याचे जबरदस्त चित्रण अटेंबरोंच्या लाईफ या सिडी मधे आहे. त्या नाटकात वाघोबांची शिकार, जागल्यांमूळे हुकते असे दाखवलेय.