कापसाचा उत्पादन खर्च

Submitted by अभय आर्वीकर on 18 November, 2011 - 11:00

कापसाचा उत्पादन खर्च.

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.

उत्पादनखर्च १० एकर कापूस पिकाचा खालील प्रमाणे:


अ] भांडवली खर्च :

१) शेती औजारे-खरेदी/दुरुस्ती :           २०,०००.००

२) बैल जोडी :                                      ८०,०००.००

३) बैलांसाठी गोठा :                           १,००,०००.००

४) साठवणूक शेड :                           १,००,०००.००

--------------------------------------------------------------
अ] एकूण भांडवली खर्च :                 ३,००,०००.००
-------------------------------------------------------------

ब] चालू खर्च (खेळता भांडवली खर्च)

१) शेण खत :                                                   १,२०,००० रु

२) नांगरट करणे :                                                 ८,००० रु

३) ढेकळे फ़ोडणे, सपाटीकरण :                             ४,००० रु.

४) काडीकचरा वेचणे :                                           ८,००० रु.

५) बियाणे :                                                        १८,६०० रु.

६) लागवड खर्च :                                                  ८,००० रु.

७) खांडण्या भरणे :                                               २,००० रु.

८) निंदणी/खुरपणी खर्च (दोन वेळा) :                   १५,००० रु.

९) रासायणीक खत मात्रा                                    २४,००० रु.

१०) रासायणीक खत मात्रा-मजूरी खर्च :                ८,००० रु.

११) सुक्ष्म अन्नद्रव्य :                                          ७,००० रु.

१२) किटकनाशके :                                             ३०,००० रु.

१३) फ़वारणी मजूरी :                                           ६,००० रु.

१४) कापूस वेचणी (६० क्विंटल) :                        ५२,००० रु.

१५) वाहतूक/विक्री खर्च :                                       ५,००० रु.

१६) बैलाची ढेप/पेंड :                                             ३,००० रु.

१७) बांधबंदिस्ती/सपाटीकरण खर्च :                    २०,००० रु.

--------------------------------------------------------------------------
ब] एकूण खेळते भांडवली खर्च :                     ३,३८,६००.००
--------------------------------------------------------------------------

.

१) भांडवली खर्चावरील व्याज :                       ३२,०००.००

२) चालु गुंतवणुकीवरील व्याज :                      ३०,०००.००

३) भांडवली साहित्यावरील घसारा :                ३२,०००.००

---------------------------------------------------------------------------
क] एकूण उत्पादन खर्च १+२+३ :                  ९४,०००.००
---------------------------------------------------------------------------

अ] भांडवली खर्चावरील व्याज आणि घसारा :                    ६६,०००.००

ब] एकूण खेळते भांडवली खर्च  :                                    ३,३८,६००.००

क] एकूण उत्पादन खर्च १+२+३                                        ९४,०००.००

----------------------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क :                                    ४,९८,६००.००
----------------------------------------------------------------------------------------------


निष्कर्ष :
१) १० एकरात ६० क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :             ४,९८,६००.०० 

२) १  एकरात ६  क्विंटल कापूस पिकविण्याचा खर्च :                  ४९,८६०.००

म्हणजेच

प्रती क्विंटल कापसाचा किमान उत्पादनखर्च : ८३१०.०० रु. एवढा निघतो.

  टीप :
१) दर चार वर्षांतून एकदा शेतीमध्ये ओला किंवा कोरडा दुष्काळ हमखास पडतच असतो. त्यामुळे उत्पादन खर्च काढताना चार वर्षाच्या लागवडीचा खर्च तीन वर्षाच्या उत्पादनावर/पीकावर लावणे गरजेचे आहे.  अशा तर्‍हेचा निकष औद्योगीक उत्पादनाचे मुल्य ठरविताना लावले जातच असते. त्या हिशेबाने प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १०,४००/- रुपयावर जातो.

२) लागवडी खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, बैलांचा व पीकाचा इंन्शुरन्स धरला तर प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च ११,५००/- रुपयावर जातो.

३) दुष्काळामुळे, महापुरामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी तसेच माकड, डुक्कर व वन्य श्वापदापासून होणारे नुकसान हिशेबात धरल्यास प्रती क्विंटल कापसाचा उत्पादनखर्च १३०००/- रुपयावर जातो.

   

              वरिलप्रमाणे मी काढलेला कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.    

उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.   

१) १ शेतकरी व १ बैलजोडी १० एकर कापसाची शेती करु शकतो, असे गृहित धरले आहे.    

२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.    

३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.    

४) शेण खत, नांगरट, बियाणे, रासायनीक खते, किटकनाशके, सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षाही कमी खर्च हिशेबात धरला आहे.    

५) शेतमजुरीचा दर २००/- रू. धरलेला आहे.      

६) कपाशीच्या दुबारपेरणीचे संकट निर्माण झाल्यास त्यापोटी वाढणारा बियाणाचा खर्च हिशेबात धरलेला नाही.    

७) शेत जमीनीची किंमत आणि त्या भांडवली गुंतवणुकीवरील व्याज हिशेबात धरलेले नाही. त्यामुळे वडिलोपार्जीत शेतजमीन ज्यांच्याकडे नाही, त्यांनी शेतजमीन खरेदी करून कापसाची शेती करायची म्हटले तर उत्पादन खर्च आणखी वाढेल. 

८) वरील उत्पादनखर्चात काटकसर आणि बचत करायचा प्रयत्न केल्यास उत्पादन घटत जाते. तसेच खर्च वाढवायचा प्रयत्न केल्यास उत्पादनात वाढ होण्याची शक्यता बळावत जाते.

९) शेतीमधील खेळत्या भांडवल तुटवड्याचा पहिला मार जमीनीच्या पोत सुधारणीच्या कामावर पडतो. आर्थिक टंचाईमुळे शेणखत किंवा सेंद्रियखताचा वापर टाळला किंवा कमी केला जातो. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो पण उत्पन्नातही घट येते.

९) बागयती शेतीत उत्पन्नात वाढ होत असली तरी ओलिताची सुविधा निर्माण करण्यास लागणारी भांडवली गुंतवणूक, ओलितासाठी लागणारा मजुरी खर्च आणि विद्युत/डिझेलचा खर्च वाढत जातो म्हणून शेवटी जिरायती शेती असो की बागायती शेती; उत्पादनखर्च सारखाच निघतो.

तोट्याच्या शेतीचे दुष्परिणाम :

१) शेतीत येणारी तुट भरून काढताना शेतकर्‍याचे कुपोषण होते, म्हणून शेतकरी शरीराने कृश दिसतो.

२) सुखाचे व सन्मानाचे जीवन जगता येत नाही.

३) मुलभूत गरजा पूर्ण करता येत नाही.

४) ग्रामीण भाग ओसाड आणि भकास होतो.

५) शेतीत येणारी तुट भरून निघत नाही म्हणून शेतकरी वारंवार कर्जबाजारी होतो.

६) कापसाची शेती करताना कधीच भरुन निघणार नाही एवढी तूट आली आणि सातजन्मात फ़ेडता येणार नाही एवढ्या कर्जाचा डोंगर उभा  राहिला की, शेतकर्‍यात नैराश्य येते.

७) आयुष्य जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले की, तो मग नाईलाजाने विषाची बाटली किंवा गळफ़ासाशी सोयरीक साधून तुम्हा-आम्हा-सर्वांना सोडचिठ्ठी देतो.

   

                                                                                       - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुटेसाहेब, तुम्ही माहिती लिहीलीय ती खरीच असणार हे नक्की.

असे असेल तर शेतकरी कापुस का पिकवतो? कापुस हे कॅश क्रॉप म्हणुन घेतले जाते. धान्यासारखे विकले तर विकले नाहीतर घरी खाल्ले असे करता येत नाही. मग हा असला धंदा शेतकरी करतो कशासाठी? कापुस लावल्यावर जमिनीचा कसही कमी होतो असे मी वाचलेय.

शेतकर्‍याचे काम आहे देशाला अन्न वस्त्र निवारा पुरवणे.. ( आता शिमिटची घरं आल्याने शेतकर्‍याचा निवारा पुरवण्याशी संबंध राहिलेला नाही , असे वाटेल. पण तसे नाही Proud )

जय जवान जय किसान ! Proud

दहा एकर शेती असेल तर एक एकर एन ए करुन प्लॉट पाडून लोकाना घर बांधायला विकणे.. आणि त्याचे व्याज खात बसणे.. ( आला का संबंध निवार्‍याशी? Proud )

मग हा असला धंदा शेतकरी करतो कशासाठी?

ज्या जमिनीत कापूस उगवतो, तिथे बहुदा दुसरे काही उगवत नसावे, त्यामुळे पर्याय नसणार...

येडी घालने असा एक वाक्प्रचार मराठीत आहे.
मुटे काका,
काब्रं येडी घालू र्‍हायले हो?
ते पैले ३ लाख. दर टाय्माले खर्च करस का हो तो गात्या?
आन त्यानं ते घसारा? अन त्यानावर व्याज अखो? अर्‍या बाप! मन्हा जीव करि र्‍हाय्ना की बठ्ठी कोरड इकी टाकू! त्ये कसं काय येस परत हिशोब मा?
जास्त पैका भेटाले जोइये या बद्दल ताक्रार नै.
येकादिकार, मार्केट कमिट्या यांच्या इरोधी बोला की राव. उगा हितं युन सुसिक्क्सीत पब्लिक्ले येडी घाली र्‍हाय्नात तुम्हि? किती बिघं खेडता हो तुम्ही सोता?

ते पैले ३ लाख. दर टाय्माले खर्च करस का हो तो गात्या?>> इब्लिस, वरचा तक्ता पुन्हा बघा... बरोबर आहे... मलापण पहिल्यांदा तसेच वाटलं... पण आपली एकूण भांडवली खर्च आणि एकूण खेळते भांडवली खर्च यामध्ये गफलत होते...

माहिती बद्दल धन्यवाद. तुमचे लेख नेहेमीच विचार करायला लावतात. मुटे साहेब एकाधिकार कापुस योजना काय आहे? त्याने छोट्या शेतकर्‍यांना काही न्याय मिळतो कां? भ्रष्टाचाराचे मोठे कुरण आहे असे मला कुणी सांगितले आहे.

मुटेजी,
सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद !
कसही झालं तरी शेतकर्‍याला सरकारच्या सध्याच्या हमीभाव सध्याच्या महागाईमुळे परवडणारा नाही, तो गोत्यातच येणार आहे.
शेतकर्‍याला किमान वर्षभर जवळचम जगवण्यासाठी,मुला बाळांचे किमान पालन पोषण करण्याइतपत तरी नफा मिळावा,इतका तरी भाव त्याला मिळावा याचा सरकार कधी विचार करणार आहे ?
अजुनही मुळापर्यंत जाण्याचा कुणी प्रयत्न करताना दिसत नाही.

अशा प्रकारचि माहिति जर कोरदवाहु जमिनिसाथि दिलि तर बर होइल. आणि त्याबरोबरच शेतकर्‍याने आपले ताळेबन्द कसे आखावे याबद्दल महिति दिलि तर शेतकरि आपल हिशोब निट थेउ शकतो.
धन्यवाद महत्वाचि माहिति पुरविल्याबद्द्ल.

थोडं विषयांतर ....पण एक सत्य किंवा शेतकर्‍यांच्या निसर्गातला हा असा एक विनोद ...
शेतकर्‍याला मिळालेला हळदीचा (एका क्विंटलचा बाजारपेठेतला) गेल्या वर्षीचा दर रु.१३०००- १९०००
शेतकर्‍याला मिळालेला हळदीचा (एका क्विंटलचा बाजारपेठेतला) या वर्षीचा दर रु.४०००- ६०००
...कारण मधल्या काळाल महागाई तर सगळ्यांसाठीच वाढली आहे
जगात अशी थटटा फक्त (भारतीय) शेतकर्‍यांचीच होत असावी ...द्राक्षे/बेदाणे च्या बाबतीत हिच अवस्था आहे, एका किलो निर्यातक्षम बेदाण्याचा दर फक्त ८० रु काढला जात आहे जो गेल्या वर्षी १५० रु होता.
निसर्गातुन मिळत असलेल्या या उत्पादनाला योग्य भाव न देता एक प्रकारे निसर्गाची देखील थट्टा केली जाते अस म्हणता येईल ...

<<< निसर्गातुन मिळत असलेल्या या उत्पादनाला योग्य भाव न देता एक प्रकारे निसर्गाची देखील थट्टा केली जाते>>>

अशी थट्टा करणे हे सरकारचे अधिकृत धोरणच आहे.