संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर - भाग २ - प्रोब मायक्रोस्कोपी (बोले तो तू करता क्या है मामू?)

Submitted by राजकाशाना on 18 November, 2011 - 03:53

हल्ली मला हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. "तू काय करतोयस?" लोक ओळखीचे असतील तर 'य' असतो, पहिल्यांदा भेटत असतील तर नसतो. Happy

खर तर हा प्रश्न साधा आहे आणि ९९.९९% लोक याचे उत्तर "मी इथे आहे, मी तिथे अमुक करतो" असे देतात. सध्या माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे उत्तर बदलणारे आहे कारण मी याचे खरे उत्तर द्यायचे ठरवले तर "मी फ्रेंच शिकतोय" किंवा "मी लेख लिहीतो" असे द्यावे लागेल. तसे देऊन बघितले पण लोकांचे समाधान होईना. मग काही लोक आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न करतात, "तू एक्झॅक्टली काय करतोयस?" (एक्झॅक्टली बोल्ड टायपात.) मला त्यांचा रोख कळतो पण तरीही मी समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. का ते हे घडाभर तेल संपल्यानंतर कळेल अशी अपेक्षा आहे. (खरं तर या भागात नुसते तेलच आहे, जगाची तेल-समस्या इथे सुटायला हरकत नाही.)

विज्ञान विषयात पीएचडी, नंतर काही वर्षे संशोधन असे केल्यानंतर ठराविक पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये पर्मनंट पोझिशन घेऊन संशोधन करणे किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी - तिथे संशोधन आणि शिकवणे दोन्ही करावे लागते किंवा एखाद्या कंपनीत नोकरी. माझ्या बरोबरच्या सर्व मित्रमैत्रिणिंंनी यापैकी एखादा पर्याय निवडलेला आहे. मला तीनही पर्याय मान्य नव्हते.

शिकवण्यासाठी जो अमाप संयम लागतो तो माझ्याकडे नाही. कंपनी जे म्हणेल त्यावर काम करायचे आणि थांब म्हणले की थांबायचे हे मला जमणारे नाही. आणि फक्त संशोधन करायचे म्हटले तर ते ही शक्य नाही कारण -कारण हल्ली मला रिसर्च बोअर होतो. हे कारण माझ्या काही प्राध्यापकांना सांगितल्यावर त्यांचे आश्चर्यचकित चेहेरे अजूनही आठवतात. Proud

रिसर्च कंटाळवाणा का वाटू लागला याचीही बरीच कारणे आहेत.

१. जसजसे तुम्ही अधिकाधिक सिनियर होत जाता, तसतसे तुम्हाला प्रयोगशाळेत काम करण्याची संधी कमीकमी होत जाते. मग पीएचडीचे विद्यार्थी, अंडरग्रॅड्स यांना मार्गदर्शन करणे, मिटिंगा अटेंड करणे, रिपोर्ट लिहीणे, पेपर लिहीणे अशी कामे वाढू लागतात. नंतर नंतर तुम्ही नुसती देखख करता. मला ही बाकीची कामे कंटाळवाणी वाटायला लागली. ही आवश्यक आहेत हे खरेच पण ती करताना माझा वेळ वाया जातो आहे असे वाटायला लागले.

२. पीएचडी किंवा स्पेशलायझेशन ही दुधारी तलवार आहे. एखाद्या क्षेत्रात तुम्ही खोल जाण्याचा निर्णय घेता तेव्हाच इतर क्षेत्रे बंद करण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो. याची परिसीमा म्हणजे मी प्रोब मायक्रोस्कोपीच्या एका शाखेमध्ये संशोधन करत असलो तर इतर काही शाखांमध्ये काय चालले आहे हे मला कळते पण त्यापलिकडे नोंद ठेवणे अशक्य. मग पदार्थविज्ञानाच्या इतर शाखांमध्ये किंवा रसायनशास्त्र/ जीवशास्त्र यांचे काय चालले आहे हे कळणे दुरापास्तच. (अगदी जागतिक दर्जाचे संशोधन झाले तर कळते, उदा. नुकताच प्रकाशाचा वेग ओलांडला गेला अशी बातमी आली.) जसजसे मी खोल जायला लागलो, तसतसे हे मला जाचक वाटू लागले. कारण माझे आवडीचे विषय वाढत होते, त्यात फक्त विज्ञानच नव्हे तर भाषा, इतिहास, साहित्य असे विषय यायला लागले. विविध क्षेत्रांमध्ये जाणून घेण्यासारख्या इतक्या गोष्टी असताना फक्त एका छोट्या विषयावर आपले आयुष्य खर्च करणे हा मला वेळेचा अपव्यय वाटू लागला.

३. माझा निर्णय सध्याच्या आपल्या व्यवस्थेच्या विरूद्ध एक छोटीशी बंडखोरी आहे. या व्यवस्थेमध्ये तुम्ही एकदा एक मार्ग पत्करला की परत फिरण्याची मुभा नाही. (इथे गॉडफादर आठवतो, एकदा त्या मार्गाला लागलात की सुधारणे नाही. Happy ) मला हे पटत नाही. अर्थात ज्यांना तो मार्ग पत्करायचा आहे त्यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. पण एखाद्या क्षेत्रामध्ये पुरेसा काळ घालवल्यानंतर त्या क्षेत्राचा कंटाळा आला तर काय करायचे याला आपल्या व्यवस्थेकडे उत्तर नाही. पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. दा विंचीसारखे लोक काय-काय होते याची यादी पाहिली तर छाती दडपते. (चित्रकार, शिल्पकार, वास्तुशात्रज्ञ, संगीतकार, गणितज्ञ, इंजिनियर, भूगर्भशास्त्रज्ञ, लेखक, इ. इ.) इथे दा विंचीच्या प्रतिभेशी तुलना करण्याचा हेतू नाही, तो वेडेपणा ठरेल. मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते. त्या काळात सर्वांना चित्रकला ते शेती - कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य होते. सध्याच्या स्पेशलायझेशनमुळे हे स्वातंत्र्य हिरावले आहे.

४. तुम्ही जे काम करता ते तुम्हाला आवडते की नाही हे शोधण्याचा एक सोपा मार्ग आहे. जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात विकांताची आतुरतेने वाट पहात असाल आणि जर सोमवार म्हटले की नको वाटत असेल तर तुमचे काम तुम्हाला आवडत नाही असे मानायला हरकत नसावी. कल्पना करा, पिकासो 'आज कंटाळा आलाय, आज नाही चित्र काढत' असे कधी म्हणाला असेल का? परत, तुलना पिकासोशी नाही. पिकासोने जो मार्ग निवडला त्याच्याशी आहे. हे बरेचसे 'थ्री इडियट्स' सारखे आहे मात्र हा विचार चित्रपट यायच्या बराच आधीपासून डोक्यात चालू होता.

५. प्रयोगशाळेत काम करतानाही बराच वेळ इतर गोष्टींध्येच जातो. जपानमध्ये निर्वात चेंबरमध्ये टायटॅनियम डायऑक्साइडचे एसटीएम इमेजिंग करायचे होते. यासाठी त्याचा पृष्ठभाग स्वच्छ हवा. किती स्वच्छ? त्यावर दुसरा कोणताही अणू दिसायला नको. हे कसे करायचे तर टायटॅनियम डायऑक्साइड एका विशिष्ट तपमानार्यंत तापवायचे, मग त्यावर आयनचा मारा करायचा, परत तापवायचे, परत आयन. असे चक्र पृष्ठभाग स्वच्छ होईपर्यंत करायचे. याला किती वेळ लागला? तीन महिने. तीन महीने सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत (जेवण इ. सोडून) मी फक्त हेच काम करत होतो. तीन महिन्यानंतर पहिली इमेज घेता आली. हे चालू असताना मला माझे आयुष्य कणाकणाने कमी होत असल्याचे जाणवत होते. Proud

अर्थात आपले क्षेत्र सोडण्याचा निर्णय सोपा नाही हे मान्यच. किंबहुना माझ्यावर कोणतीही जबाबदारी नसल्याने मी हा निर्णय घेऊ शकलो पण अन्यथा हे शक्य झाले नसते याचीही जाणीव आहे.

"मग तुला करायचय तरी काय?" [१]
असा प्रश्न उघड विचारत नाहीत, पण मनातल्या मनात विचारलेला मला ऐकू येतो. Proud

मला अजून पाच एक तरी भाषा शिकायच्या आहेत. दहा-एक हजार पुस्तके वाचायची आहेत. जी पहिली भाषा जाणीवपूर्वक शिकलो (इटालियन) तिच्यामध्ये असलेले इतालो काल्विनोसारखे बाप लेखक मूळ भाषेत वाचायचे आहेत. या सर्वांबद्दल लिहायचे आहे. विषय आवडीचा असेल तर लेख लिहीणे मला कधीही कंटाळवाणे वाटत नाही. (त्याचा प्रत्यय इथे दिसतोच आहे.) अजूनही काही गोष्टी डोक्यात आहेत पण सगळेच आता सांगितले तर पुढे मजा काय? आम्ही सेंट रामदासांना फॉलो करतो,

"फर्स्ट डू बाबा, देन टेल ना." Happy

----
[१] हे लिहीत असताना कोणते गाणे चालू असावे?
ऐ दिल-ए-नादां
आरजू क्या है
जुस्तजू क्या है Happy

----

भाग १
भाग ३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> माझे आवडीचे विषय वाढत होते,
मला ही हाच प्रॉब्लेम आहे. मला बहुतेक सर्व गोष्टीत रस आहे.. आणि थोड्या थोड्या दिवसांनी माझा करंट रस बदलत असतो. अशा स्वभावाचे फायदे आहेत आणि तोटेही! सगळ्यात मोठ्ठा तोटा म्हणजे आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे ते न कळणे!

फार आवडले....अगदी मना पासुन लिहीले आहे. फार प्रामाणिक.

बोले तो एकदम झकास मामु......आवाज एकदम दिल से नीकली है.

मस्त लेख. आवडला आणि पटला.
अनेक विषयांची आवड असल्याचे बरेच तोटे आहेत. पण एक फायदा म्हणजे कोणाशीही गप्पा मारता येतात. Happy

चिमण, "करंट रस" शब्द आवडला.

>>परत तापवायचे, परत आयन.
हे होत असताना बॅकग्राउंडला निवांत पुस्तक वगैरे वाचत बसता येत नाही का?

क्या बात है!!!
काय करायच नाही याबद्दल स्वतःशीच प्रामाणिक असणे, ही अवघड प्रक्रिया आहे. वरच्या लेखातील अनेक वाक्यांना, +१. Happy

>>पण एक फायदा म्हणजे कोणाशीही गप्पा मारता येतात. >>
खरे आहे. ज्याक ऑफ ऑल ट्रेड्स.. Happy

>>हे होत असताना बॅकग्राउंडला निवांत पुस्तक वगैरे वाचत बसता येत नाही का?>>
येतात ना. मी बरीच संपवली. Proud
पण यापेक्षा मूळ कामातच वेळ दिला नाही तर तो अधिक सत्कारणी लावता येईल असे वाटू लागले.

टेरिफिक.
केल्याबद्दल आणिक लिहील्याबद्दलही _/\_

यु मेड माय डे. धन्यवाद.
पहिला लेख वाचला पण समजेपर्यंत तिथे लिहीत नाही. हा मात्र चांगलाच समजला. Proud

पण यापेक्षा मूळ कामातच वेळ दिला नाही तर तो अधिक सत्कारणी लावता येईल असे वाटू लागले.>>>>> Lol

मस्त लिहिलय... आवडलं... Happy

दोन्ही भाग मस्त!
भाग छोटे केल्यामुळे आमच्यासारख्यांना वाचायला कंटाळवाणं होत नाहीये, याबद्दल धन्यवाद! Happy

अप्रतिम, हॅट्स ऑफ.
अशाप्रकारे निर्णय घेण्याचे सुख अनुभवले आहे, त्यामुळे तर लेख प्रचंडच आवडला.
जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात विकांताची आतुरतेने वाट पहात असाल आणि जर सोमवार म्हटले की नको वाटत असेल तर तुमचे काम तुम्हाला आवडत नाही असे मानायला हरकत नसावी.>>>> अचूक!!!!!

जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात विकांताची आतुरतेने वाट पहात असाल आणि जर सोमवार म्हटले की नको वाटत असेल तर तुमचे काम तुम्हाला आवडत नाही असे मानायला हरकत नसावी.>>>> ट्णSSS धोक्याची घंटा........... कळतय पण नाही वळत टाईप वाजली की हो डोक्यात Proud

वा! Happy

मस्त लिहीलंय. फारच छान.
लेखनशैली तर मस्तच आहे आणि मुद्देही प्रामाणिक. अतिशय आवडले.
नं ३ बद्दल घरात पुषकळदा बोलले जाते. तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल हॅट्स ऑफ. :).
इथे लिहील्याबद्दल धन्यवाद. Happy

वाचायला छान आहे पण अमलात आणायला कठिण, म्हणूनच जास्त कौतुक !
मलाहीविचारचयकीसध्याकाय्चालूआहे?:)

राज,
सहीच बरंका दोन्ही लेख. पहिला लेख फारच सोपा करून समजेल असा लिहिल्याने माझ्यासारख्या अनेक अशास्त्रीय अडाण्यांना किती काय काय समजलं. कसला सही विषय आहे रे. Happy
आणि दुसरा लेखही एकदम पटला. जगताना शक्यतोवर आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देत जगावे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुनिया गयी तेल लगाके (मी एकदा असंच मधल्या गॅपच्या काळात 'सध्या काय चाललंय? याला 'श्वासोच्छ्वास' असं उत्तर दिल्याचं आठवतंय :फिदी:)

पण तरीही यात तू स्वतः नक्की काय संशोधन केलंस त्याबद्दल विस्ताराने यायला हवं होतं असं वाटतं. तू त्या यंत्रावर नक्की काय काम केलंस? तुझ्या संशोधनाचा वापर पुढे कुठे होऊ शकतो/झाला? इ. विषयावर तू काहीच लिहिलं नाहीस Sad

आणि दोन्ही भागांत एकमेकांच्या लिंक्स दे ना.

चिंतन स्टाइल भाग दोन पण अफाट आवडला.

>>मुद्दा इतकाच की माणसाला एकाहून अधिक विषयांमध्ये रस असू शकतो, किंबहुना असतो आणि त्या विषयांचा परस्परसंबंध नसेल तरीही चालू शकते.
न्यु यॉर्कात एक अवलिया छापाचा मानव भेटला होता. तो गणितात पीएचडी करता करता न्युरोबायलॉजीचे कोर्सेस ऑडिट करायचा आणि म्युझिक डिपार्टमेंटात पण दिसायचा. 'असे परस्परसंबंध नसेलेल्या वेगवेगळ्या विषयांची आवड जोपासता, कमाल आहे' या किंवा तत्सम कमेंटीवर त्याचं उत्तर, 'कुठल्याही विषयांचे परस्परसंबंध नाहीत हे गृहीतकच पुन्हा विचार करण्यासारखं आहे.' (डोक्यावरून गेलं हो! :P)

'कुठल्याही विषयांचे परस्परसंबंध नाहीत हे गृहीतकच पुन्हा विचार करण्यासारखं आहे.' <<<
आयला काय सही! महानच होता म्हणायचा. Happy

मला विचार आवडले.... आणि तेव्हढीच त्यामागची लेखन शैली...

मग काही लोक आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न करतात, "तू एक्झॅक्टली काय करतोयस?" (एक्झॅक्टली बोल्ड टायपात.)
----- अशा प्रश्नांना किती तरी वेळा सामोरे जावे लागले आहे त्यामुळे प्रश्न विचारण्या मागची मानसिकता (भावना) समजतो.

हा भाग मस्त जमलाय. मजा आली वाचायला.
तुम्ही आत्ता 'नक्की' (एक्झॅक्टली नव्हे) काय करताय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला Proud

सही लिहिलयसं राज , आवडलं.

जर तुम्ही प्रत्येक आठवड्यात विकांताची आतुरतेने वाट पहात असाल आणि जर सोमवार म्हटले की नको वाटत असेल तर तुमचे काम तुम्हाला आवडत नाही असे मानायला हरकत नसावी.>>> त्याला पण नशीब लागतं , आम्ही स्वप्न पण गुलाबी सोडुन कामाची ( ऑफीसवर्क हो Wink ) बघतो. Proud
माझा एक मित्र आयटी मध्ये काम करतो , एव्हिएशन्चे लेसन्स पण घेतो आणि सोबत सुतारकाम पण शिकतो.

Pages