'असंभव..!!' :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>भाग-3

Submitted by अन्नू on 16 November, 2011 - 14:14

NOTE ::(ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)

Suspense-Thriller.jpg

असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>2 पासून पुढे़...
.
.
.
.भाग=>3

.................................................................पाठलाग..........................................................

".....आज सकाळीच येथे मरीन ड्राईव्हला, एक खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे... या ठिकाणी एका २० वर्षीय युवतीचा मृतदेह सापडलेला आहे, विशेष म्हणजे हा मृतदेह तब्बल दहा ते पंधरा दिवस येथे दगडांच्या आड लपवून ठेवण्यात आलेला होता...."

".....सबसे पहले हमारे चॅनल पर ये सनसनीखेज़ खुलासा खबर आपको दिखाई दे जा रही हैं,-
हम आपको फिर एक बार बतातें हैं कि... यहाँ पे एक लडकी की लाश मिली हैं- जो के एक कॉलेज छात्र बताईं जाती हैं..... किसीने उसका बेरह़मी से कत्ल कर दिया हैं....."

"...... हमें मिली जानकारी के अनुसार, लड़की की लाश करिब़न पंद्रह़- सोलह़ दिनों तक यहाँ पर पत्थरोंके बीच पडी़ थी लेकीन.... किसीको इसकी जरा सी भी भनक़ तक नही लगी...."

"... मिळालेल्या माहीतीनुसार या मुलीचा इतका निर्घुणपणे खून करण्यात आलेला आहे कि तिचा संपुर्ण चेहरा दगडाने ठेचुन काढण्यात आलेला आहे... या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एक भितीचे वातावरण पसरलेले आहे...."

"......नो बडी़ वॉन्ट टू से अबाऊट धिस सिच्युएशन्...­­­­ एव्हरी पोलिस अल्सो केप्ट टाईट-लिपड्, इन्स्टेड से एनिथिंग.... यु कॅन सी बीहाईंन्ड ऑफ मी- पोलिस डिड ब्लॉकड् द एन्टायर एरिया....."

"....एन पिनल् परकलम् ईला ईडा़मुम अडा़ईकापातुलाडु यारुम नुलाईया मुडियाथु...."

"..... कौन हो सकता है वो कातिल? एक आशिक....या फिर एक सरफिरा हत्यारा..? जवाब कुछ भी हो लेकिन, इस घटना से आज फिर एक बार मुंबई की सुरक्षा तथा़ प्रशासन पर सवा़ल उठायें जा रहे हैं-
क्या मुंबई रहिवासी पूरी तरह से सुरक्षित हैं?...... क्या हमारी पुलिस सच में काम कर रही हैं?...... क्या मुंबई आज आतंक और दहशत से बाहर आयी हैं???......"

".....व्हाय पोलिस डोंन्ट वॉन्ट टु से एनिथिंग? अ‍ॅन्ड आफ्टर ऑल व्हाय दे आर प्रोहिबिटेड एन्ट्री ऑफ ऑल प्रेस अल्सो, इन दॅट एरिया??"

"..... इथे घडणार्‍या प्रत्येक घटनांची आंम्ही तुंम्हाला क्षणोक्षणी माहीती देत आहोत. कॅमेरामॅन राज बरोबर, रिपोर्टींग व...."

सगळ्यांचे लक्ष वेधत, आपल्या कर्कश सायरनच्या आवाजात कोकलत पोलिसांची एक गाडी शामलदास गांधी रोड पासुन पुढे काही अंतरावर थांबली. तशा सर्व प्रेस रिपोर्टरस् च्या नजरा त्या गाडीकडे वळल्या.
गाडीतुन ईन्स्पे. पवार आणि त्यांचे सहकारी उतरताना पाहताच सर्व प्रेसवाल्यांचे लोंबाळे त्यांच्या दिशेने धावले; क्षणार्धात पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांना प्रेसवाल्यांनी घेरले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला..

"सर, हा खून कोणी केला आहे? यामागे कोणाचा हात आहे? हा खूनी कोणी माथेफिरू तर नाही? ..."

"प्रेसवाल्यांनासुद्धा आतमध्ये प्रवेश का दिला जात नाही?...या प्रकरणातील अशा कोणत्या घटना लोकांपासून लपविल्या जात आहेत...? "

याच वेळी पवारांनी एक जळजळीत कटाक्ष तो प्रश्न विचारणार्‍या प्रेस रिपोर्टरकडे टाकला पण त्याचवेळी त्याच्या पाठोपाठच अनेक प्रश्नाचा सुरपाठ सुरु झाला.

"...करीब़न पंद्रह दिनों तक, लाश यहाँ सड़ रही थी... तब पुलिस क्या कर रही थी...???.."

"...व्हॉट यु से अबाऊट धिस मर्डर?.... अ‍ॅन्ड हाऊ कॅन पब्लिक ट्रस्ट ऑन पोलिस आफ्टर धिस इन्सिडेन्ट?"

".... यात मुंबईवासीयांच्या जिवाला काही धोका आहे का...??"

"....वी हिअर्ड धिस इंन्फॉर्मेशन दॅट, द फेस ऑफ धिस कोर्पस् हॅज बीन क्रश्ड् बाय स्टोन!! इज इट ट्रू??

"....सारे पुलिस वाले इस तरह से चुप्पी क्यो साधे हुए हैं...?"

"...शेवटी पोलिसवालेच जर असे वागु लागले तर लो़कांनी त्यांच्यावर विश्वास तरी का आणि कसा ठेवावा.....??

ज्या गोष्टीची भिती होती तीच झाली होती. सर्व पत्रकार आणि न्युज चॅनेलवाल्यांनी या प्रकरणाला ब्रेकिंग न्युज म्हणुन चांगलेच हायलाईट केले होते, कित्येक दिवसांनंतर त्यांना आता अशी झणझणीत, मसालेदार बातमी मिळाली होती; ही संधी ते कसे सोडु शकतील?

"प्लिज,... लेट अस इन्वेस्टीगेइट् केस -फर्स्ट!!!...." त्रासिक चेहर्‍याने पत्रकार आणि न्युजचॅनेलच्या प्रतिनिधींना बोलत पवार तड़क घटनास्थळी जाऊ लागले.
त्यांचे सहकारी भोसले आणि गोडबोले पत्रकारांना बाजुला सारत पवारांना वाट मोकळी करून देऊ लागले.

एव्हाना घटनास्थळी मरीन ड्राईव्ह विभागीय स्थानिक पोलिस येऊन त्यांनी मृतदेहास दगडांच्या खाचेतुन बाहेर काढुन त्याचा पंचनामा सुरू केला होता-
दोन पोलिस फोटोग्राफर पैकी एकजण प्रेताचे विविध बाजुने फोटो काढण्यात व्यस्त होता तर त्याचा दुसरा सहकारी ज्या ठिकाणी प्रेत कोंबण्यात आले होते त्या जागेचे तसेच त्याच्या नजिकचे फोटो घेण्यात व्यस्त होता.
एकीकडे फिंगर प्रिंट ब्युरो एक्सपर्टस् ची टीम दगडांमध्ये काहीतरी डिवचत त्यामध्ये हाताचे किंवा इतर कुठले ठसे भेटतात का, याचे निष्फळ प्रयत्न करत होती तर दुसरीकडे डॉग मास्टर आपल्या कुत्र्यांना सांभाळत फिंगर प्रिंट ब्युरोचे काम होईपर्यंत एका बाजुला थांबले होते.

स्थानिक पो. ईन्स्पेक्टर शिंदे स्वतः तेथे सर्व कामाची देखरेख करित होते. आज सकाळीच ड्युटीवर आल्या-आल्या त्यांना या मृतदेहाची बातमी पोलिस कंट्रोल रूमकडुन कळाली होती. बातमी कळताच शिंदें आणि त्यांच्या टीमने लगेचच घटनास्थळी धाव घेतली. चौपाटीलगतच्या त्या मोठ्या दगडांच्या आंत अक्षरशः गुंडाळुन कोंबलेल्या मृतदेहाची ती भयानक अवस्था बघुन क्षणभर का होईना पण शिंदे नखशिखांत हादरलेच होते, त्यांनी प्रथम ती सर्व जागा सील करून, क्रेनच्या सहाय्याने दगड हलवुन मृतदेहाला बाहेर काढण्याची व्यवस्था केली. शहरात या घटनेचा वाजागाजा होऊन, वेगळा अर्थ काढुन नसत्या अफवा पसरू नये म्हणुन जमलेल्या मिडियाला सुद्धा आंत प्रवेश नाकारण्यात आला.

कालच कोलाबा पोलिस स्टेशनमधुन शोध प्रकरणासाठी आलेला रिद्धीचा फोटो आणि तपशील या मृताशी मेळ खात असल्याने तसेच मृताच्या पर्समध्ये भेटलेल्या एका आय कार्डमुळे ती रिद्धीच असल्याची खात्री पटत असल्याने शिंदेंनी लगेचच कोलाबा पोलिस स्टेशनला फोन करून पवारांना तातडीने बोलावुन घेतले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

रमेश, सुवर्णा, प्रतिक आणि विनिता यांचा आज घरात काहीतरी खोटा बहाणा सांगुन बाहेर मस्तपैकी सिनेमाला आणि मग लाँग ड्राईव्हवर जाण्याचा प्लॅन ठरला होता. त्याप्रमाणे रमेश, सुवर्णा आणि विनिता अगोदर मरीन ड्राईव्हला पोहोचले होते. पण प्रतिक मात्र नेहमीप्रमाणे आजही लेट झाला होता. त्यामुळे रमेश वैतागला होता.

वर कटट्यावर- समोर बसल्याने घरच्या ओळखीच्या माणसांच्या दृष्टीस पडण्याची भिती होती, म्हणुन प्रतिक येईपर्यंत खाली दगडांवर बसुया असे विनिताने सुचवले. तिचे म्हणणे मान्य करून सुवर्णा तेथे दगडांवर बसण्यासाठी तयार झाली. रमेशला मात्र ते पटत नव्हते, आपण बसण्यासाठी आणखीन पुढे जाऊया असे तो म्हणत होता पण त्या दोघींसमोर त्याचे काहीच चालले नाही शेवटी नाईलाजानेच तो तेथे बसण्यास तयार झाला आणि मग सुवर्णा पुढे तिच्या मागे रमेश आणि त्यांच्या मागे, सगळ्यात शेवटी विनिता असे ते तिघेजण क्रमाने खाली ऊतरू लागले.

"शी.. इतका घाण वास कुठुन येतोय?" -विनिता.

"अगं गेले कित्येक दिवस इथं असाच वास येतोय. काही लोकांनी म्युनिसिपाल्टीमध्ये तक्रारही केलेय. पण काSही उपयोग नाही; शेवटी गव्हर्मेंन्टचेच डिपार्टमेंन्ट ते, लवकर काम कसं करणार?" हसत सुवर्णा म्हणाली.

"तरी मी दोघींना सांगत होतो जरा अजून पुढे जाऊया, शेवटी इथे पोहोचल्यावर प्रतिक फोन करणाच आहे."- रमेश वैतागत म्हणाला.

"ई $ $ कित्ती कावळे हे? कशाला जमलेयत इथे? " असे म्हणत कावळ्यांना हटकत विनिता पुढे सरकू लागली. पण जसजसे पुढे जाईल तसतसा तो वास अधिकच वाढत जात होता.

"आय कान्ट वेट हिअर एनी मोअर्, गायझ्! प्लिज $$ लिव्ह धिस प्लेस, रमेश म्हणतोय त्याप्रमाणे आपण पुढेच कुठेतरी जाऊन बसुया"
त्या ठिकाणी सुटलेला तो वास सहन न होऊन विनिता म्हणाली, अन् तेथुन लवकर निघण्यासाठी झटक्यात ती मागे वळाली. नेमके याच वेळी विनिताचा मोबाईल अचानक हातातुन निसटून दगडांच्या आंत पडला.

"ओह माय गॉड़ $$, माय सेल..!!" विनिता ओरडली.

त्याचबरोबर पुढे जाणारे सुवर्णा आणि रमेश पाठीमागे वळुन विनिताकडे पाहु लागले.

"काय झालं?"- सुवर्णा.

"माझा फोन आतमध्ये पडला." दगडांमधील भगदाडाकडे निर्देश करीत काळजीच्या सुरात पण घाबरत, विनिता दोघांकडे पाहत म्हणाली.

" मोबाईलच गेला ना!! मग इतकं घाबरायला काय झालं? प्रतिकला सांग, असे दहा फोन घेऊन देईल तो तुला.!!" विनिताकडे पाहत चेष्टेने रमेश म्हणाला.

"स्टुपिड़!, हा फोन माझ्या डॅडींनी मला परवाच घेऊन दिलाय, डॅडी़ विल किल मी.!!!" घाबरत विनिता म्हणाली.

"अरे यार रमेश, कशाला तिला रडवतोयस, दे ना तिला फोन काढून." रमेशला हलकासा धक्का देत सुवर्णा म्हणाली.

"आता, का$ $ य तुंम्हा मुलींना बोलायचं.."- कपाळावर हात मारत रमेश विनिताचा फोन काढण्यासाठी पुढे सरसावला. आणि विनिताच्या चेहर्‍यावर आनंद पसरला पण काही क्षणांतच विनिता आणि सुवर्णाच्याही तोंडुन एक जोरदार- जिवघेणी किंकाळी बाहेर पडली. मोबाईल काढण्यासाठी दगडांच्या आत टाकलेला रमेशचा हात, खाचेतून एका गळक्या-सडक्या मांसाच्या हाताला घेऊन बाहेर आला होता..!!!
कोपरापासुन निखळलेला तो गळका मानवि हात पाहुन जोरदार विजेचा झटका बसावा तसा रमेशने तो हात आपल्यापासुन दुर भिरकावला, आपला हात झाडत धडपडतच तो त्या जागेपासुन दुर झाला.
या अनपेक्षित घटनेने त्या दोघी पुर्णपणे धास्तावल्या. आपल्याबरोबर आज असं काही घडे़ल असा त्यांनी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. इकडे रमेशचे डोके तर अगदी सुन्न पडले होते पुढे काय करायचे ते त्याला काहीच सुचत नव्हते. धडधडत्या छातीने आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी ते तिघेही कधी त्या विद्रुप हाताकडे तर कधी एकमेकांकडे पाहू लागले होते.

आत्तापर्यंत विनिता आणि सुवर्णा या दोघींच्या ओरडण्याने त्यांच्या भोवती अनेक बघ्या लोकांची गर्दी जमली होती. तिथेच लांब कुठेतरी ऊभी राहीलेली ती व्यक्तीसुद्धा त्या किंकाळीच्या आवाजाने काहीशी धावतच तिथे आली. गर्दीतुन वाट काढत ती पुढे आली, तोच तिची नजर त्या विचित्र पण किळसवाणी मानवी हाताकडे गेली, अन् त्या व्यक्तीच्या ओठावर नकळत एक स्मित हास्याची रेषा उमटली. अजुन काही जास्त लोक जमले नव्हते! त्या व्यक्तीने सभोवार नीट नजर फिरवली. तेथुन बाहेर पडत, ती व्यक्ती त्या गर्दीपासुन काहीसे दुर अंतरावर गेली. आता वेळ वाया न घालवता त्या व्यक्तीने लगेचच एक नंबर डायल केला...

".....हॅलो वर्षा........
शु..S..S..S..S..S..S
काही बोलु नकोस.. फक्त ऐक...... आपलं काम झालेलं आहे, लवकरत लवकर मरीन ड्राईव्हला ये.....
अग, मरीन लाईन स्टेशनजवळ शामलदास गांधी रोड आहे ना...... हा तिथंच!!
लवकर ये!! आणि हो माझी बॅग असेल बघ तुझ्या टेबलाजवळ ती पण घेऊन ये येताना.
आता आपले चांगले दिवस येणार आहेत, सो कम क्विक नाऊ...!!!"

एवढे बोलुन त्या व्यक्तीने फोन कट केला. आणि पुन्हा आनंदाने त्या गर्दीकडे पाहत एक दीर्घ श्वास सोडला. ही एक गोष्ट आज त्याच्या मनासारखीच झाली होती. त्या व्यक्तीच्या मनात आता आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या....

त्याच वेळी गर्दीमधील दुसर्‍या एका व्यक्तीने लगेचच १०० नंबर डायल केला होता...

"हॅलो, पोलिस...."

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

"याSS पवार साहेब या." पुढे जात पवारांच्या हातात हात मिळवून शिंदेंनी त्यांचे स्वागत केले.

"... मी तुमचीच वाट बघत होतो. ही पहा- ही डेड़ बॉडी आहे ती."- असे म्हणत शिंदें पवारांना मृतदेहाकडे घेऊन जाऊ लागले. जवळ-जवळ नाकावर रुमाल धरतच पवार त्या ठिकाणी आले.

अंगावर पंजाबी ब्लु रंगाचा सलवार कमीज; चेहर्‍याभोवती ऊभी अशी, (कदाचित रक्तस्राव थांबविण्यासाठीच) बांधलेली अन् रक्ताने भिजुन काळीठिक्कर पडलेली ती लाईट स्काय ब्लु कलरची ओढणी; कोपरापासुन अमानुषपणे निखळलेला हात, (हा हात कोणत्याही हत्याराने किंवा अवजाराने कापलेला नव्हता तर कोणीतरी आपल्या बलाढ्य हाताने क्रुरपणे मोडलेला दिसत होता) आणि दगडाने पुर्णपणे चेचुन काढलेला तो चेहरा.....

दहा दिवसांपेक्षाही अधिक काळ दगडांच्या भग़दाडात अक्षरश: गोळा-मोळा करुन ठेवलेले ते शरीर आता पुर्णपणे सडू लागले होते किंबहुना पाण्याने भिजुन सडलेलेच होते!
शरीराच्या मणक्याचा मागच्या बाजुला वळल्याने झालेला वक्र आकार, तसेच मागच्या बाजुलाच पुर्णपणे मोडलेले मुंडके, वाकडे-तिकडे झालेले दोंन्ही पाय व एक हात, तर दुसरा हात कोपरापासुन निखळुन त्याभोवती लोंबकळणारे त्याचबरोबर, संपुर्ण अंगावरचे सडुन गळत असलेले, मांस अन् त्यात भर म्हणुन क्रुरपणे चेचलेला आणि आतापर्यंत सडुन भयानक दिसणारा त्याचा तो चेहरा!!!
पाहताचक्षणी अंगावर शहारे येऊन रात्रीची झोपदेखील उडावी असेच काहीसे ते दृश्य होते.

marine drive.jpg

"आज सकाळीच याची बातमी आंम्हाला कळवण्यात आली." - शिंदे.

"..हूं...... हे सर्वप्रथम कोणी पाहिलं?"

" तिघाजणांनी. दोन मुली आहेत, विनिता- सुवर्णा आणि एक मुलगा, रमेश! त्यांची चौकशी मी केली आहे,
त्यांना हि गोष्ट अपघातानेच समजली. बाकी त्यांना जास्त असं याबद्दल काहीएक माहीत नाही. त्यांचे एकदा स्टेटमेंट घेतले की त्यांना सोडण्यात येईल, सध्या तरी मी त्यांना आमच्या व्हॅनमध्येच बसविले आहे. ऊगीचच इथे समोर असले तर सगळ्या मिडीयाचे लोंढे त्यांच्यामागे लागतील."- शिंदे स्पष्टीकरण देत म्हणाले.

"....आणि ही रिद्धी असल्याचा काही पुरावा?" पवार त्या प्रेताचे निरीक्षण करत म्हणाले.

"..हो!! आहे...." असे म्हणत शिंदेंनी आपल्या एका काँन्स्टेबलला इशारा केला. त्याबरोबर त्याने लगेचच धावत जाऊन एक धुळीमातीने बरबटलेली पर्स आणि रिद्धीची केस फाईल आणली. त्याच्याजवळची ती केस फाईल घेत शिंदे पुढे बोलु लागले-

"...रिद्धीच्या दिलेल्या माहिती प्रमाणे तिची उंची ५ फुट ३ इंच तर शरीर मध्यम बांध्याचे आहे, जे या प्रेताशी मेळ खातेय. आता ही गोष्ट यामध्ये तशी दुय्यमच असली तरीही...."
शिंदे एकेक करत रिद्धीच्या केसफाईल मधील काही बाबी सांगु लागले ज्या मृताशी काही प्रमाणात मिळत्या-जुळत्या होत्या. पवार मात्र वेगळाच विचार करित होते. त्यांना ही रिद्धीच असल्याचा ठोस पुरावा हवा होता.

"...पण या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत. यावरून ही रिद्धी असल्याचा फक्त अंदाज बांधता येतो, प्रत्यक्षात हे सिद्ध होत नाही." - शिंदेंच्या बोलण्यात खंड पाडत पवारांनी आपले मत मांडले.

"असेल...पण...."
शिंदें आपल्या हातातील फाईल काँन्स्टेबलकडे देत ते प्रेताच्या डोक्याजवळ बसले.

"....येथे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिच्या डाव्या हातावर कोरलेली ही अक्षरे 'R D'!!.. "
सडलेल्या हातावर एका ठिकाणी धुसर गोंदवलेल्या टॅटुसारख्या अक्षरांवर बोटे नाचवत शिंदे म्हणाले.

"....म्हणजे याचा अर्थ रिद्धी देशमुख असाच होतो! आणि जर अजुनही तुंम्हाला हा पुरावा कमी वाटत असेल तर हे घ्या..." - असे म्हणत शिंदेंनी पर्समधुन एक पांढर्‍या रंगाचे कार्ड काढुन पवारांसमोर धरले.

ते एक लायब्रेरी आय कार्ड होते. पवारांनी ते हातात घेऊन उघडुन बघितले. कार्डाच्या मधोमध गोलाकार लोगो मध्ये अस्पष्टसे कॉलेजचे नाव छापलेले होते, तसेच पर्सचा काही भाग पाण्यात भिजल्या कारणाने आणि मुख्य म्हणजे ती पर्स कापडी असल्याने, पाणी पर्समध्ये शिरून त्यामध्ये ठेवलेल्या लायब्रेरी आय कार्डाचासुद्धा अर्धा म्हणजे नेमका फोटो लावलेलाच वरचा भाग पाण्याने भिजला गेला होता. कार्डावर प्रोटेक्शनसाठी असणारा प्लॅस्टिक कव्हर नसल्याने फोटो भिजुन, पुर्णपणे धुसर पडला होता; तो आता ओळखण्याच्या पलिकडे गेला होता. तर त्या फोटोच्या जरा खाली फिस्कटलेल्या अक्षरात एक नाव लिहीले होते. कार्डावरचे ते नाव वॉटर-प्रुफ पेनने लिहिलेले असावे कारण त्यामुळेच अक्षर धुसर का होईना पण दिसत होती. पवारांनी निरखुन त्या नावाकडे पाहीले, तेथे नाव होते - 'रिद्धी देशमुख!!!'
पवारांचा चेहरा आता गंभीर झाला.

"हि नक्की भानगड काय आहे?" - प्रेताची ती अवस्था बघुन शिंदेंच्या मनात खरं तर आधिच शंकेची पाल चुकचुकली होती. या केसमध्ये काहीतरी वेगळंच काळबेरं आहे हे त्यांनी ताडले होते. त्यांमुळे त्यांना याबद्दल एक प्रकारचे कुतुहल निर्माण झाले होते आणि म्हणुनच त्यांनी न रहावून पवारांना प्रश्न विचारला.

"तिन दिवसांपुर्वी रात्रीचे, पोलिस स्टेशनमध्ये मला मि. महाजन भेटायला आले होते, त्यांच्या मुलीची- सन्वरीची मिसिंग केस घेऊन."

"कोण.. ते प्रसिद्ध उद्योगपती, 'महाजन अ‍ॅन्ड ग्रुप कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर?" - शिंदे

"हो,........."
त्यानंतर पवारांनी तेथपासुन आत्तापर्यंतचा सर्व इतिहास शिंदेंना सांगितला.

".....त्यानंतर हे तिन दिवस आमचे पुर्णपणे इतर कामांच्या धावपळीतच गेले; कोर्टामध्ये आरोपींना न्यायाधिशांसमोर सादर करा, इकडे आपले मंत्रीमहोदयांच्या भाषणाचा आणि सत्काराचा मोठा कार्यक्रम झाला त्यात त्यांना चांगली सुरक्षा द्या. त्यानंतर मंत्रीमहोदय गेल्यानंतर त्यांच्याच माणसानी तेथे तोडफोड केली तेव्हा तेथे दोन गटांत हिंसक भांडणे झाली ती भांडणे थांबवा. आणि आता काल कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये लोकांनी आमच्या विरोधात केलेली निदर्शने.... एक व्याप आहे का मागे.??.
हॅ $ $...या कामांमध्ये तिन दिवस कसे गेले तेच समजले नाही. आणि आज तर तुमचाच फोन...." - पवार वैतागत म्हणाले.

"हूँ $ $... स्ट्रेन्ज, बारा विद्यार्थी!!!, पण मग याची अगोदरच म्हणजे त्याच वेळी का नाही चौकशी केली गेली?" - मघापासुन सुन्न होऊन, गंभीरपणे ऐकत असलेल्या शिंदेंनी इतक्या उशिराने आता तोंड उघडले.

"कशी करणार? आपल्याकडे दररोज कितीतरी अशा केस येत असतात, कोणीही याचा अधिक विचार करत नाही. शिवाय या केसबद्दल बोलायचं झालंच तर सर्व कॉलेजांच्या सुट्ट्या चालु आहेत आणि मुख्य म्हणजे ते सर्वजण एकाच कॉलेजचे असले तरी ते त्या कॉलेजमधुन गायब झाले नाहीत तर ते ज्या ठिकाणी राहत होते तेथुन गायब झालेले आहेत सहाजिकच त्यामुळे मिसिंग कंप्लेंन्ट ही एकाच ठिकाणी न होता जवळपासच्याच पण वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये झालेली आहे." पवार शिंदेंना पुर्ण स्पष्टीकरण देत म्हणाले.

"ओह $ आय सी.... "- येथे शिंदे काहीसे विचारात पडले, जर पवार बोलताहेत त्याप्रमाणे या मिसिंग केसेस कुलाबा जवळपासच्याच वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये नोंदविल्या गेल्या असतील तर आपल्या पोलिस स्टेशनमध्येही यापैकी काही जणांच्या केसेस आल्या असल्याचे नाकारता येत नाही. जर तसे झाले तर कमिश्नर आपल्यालासुद्धा चांगलेच धारेवर धरतील. आणि शिंदेंना स्वतःच्या डोक्याला असा फुकटचा ताप करून घ्यायची मुळीच इच्छा नव्हती.

"हे प्रकरण कमिश्नरांना कानी पडले तर?" आपली शंका कमी; पण काळजी दुर करण्यासाठी शिंदेंनी पवारांना विचारले.

"त्याची काळजी तुंम्ही करू नका; कारण ही केस मी पुर्णपणे माझ्याकडे घेतलेली असल्याने कमिश्नरांना काय सांगायचे ते मी सांगतो, पण सध्या तरी कमिश्नरांना दिल्लीवरून परत यायला अजुन दहा दिवस बाकी आहेत. तोपर्यंत ही केस मी सोडवलेली असेल..." पवारांच्या या बोलण्याने शिंदेंना जरा हायसे वाटले.

"..हं जरूर, बाकी माझ्याकडुन कोणतीही मदत लागली तर सांगा, मी ती आनंदाने करीन" तोंडावर हास्य आणत शिंदे बोलले.

"सध्यातरी तुंम्ही यां सर्वांना या प्रकरणापासुन जरा दुरच ठेवा. केस सोडवे पर्यंत तरी मला याचा गाजावाजा करायची अजिबात इच्छा नाही." मिडियावाल्यांकडे निर्देश करीत पवार म्हणाले.

"नक्कीच, त्यांना याबद्दल काहीएक माहीती कळणार नाही. याची काळजी मी घेईन....." शिंदे पवारांना आश्वासन देत म्हणाले.

".....मग आता पुढे काय करायचं ठरवलयं?" - शिंदे.

"मला सन्वरी बरोबर असणार्‍या तिच्या प्रियकराची अगोदर माहीती काढायची आहे."

"तुंम्हाला म्हणायच आहे की तिचा प्रियकरच खुनी आहे?"

"आय एम नॉट शुअर, पण मला वाटते तो कुठेतरी या प्रकरणात सामिल असावा."

बारीक डोळे करून दुरवर कुठेतरी बघत पवारांनी आपली शंका व्यक्त केली. आणि पुन्हा एक नजर प्रेताकडे टाकली तोच त्यांना प्रेताच्या गळ्याजवळ काहीतरी चमकल्याचे जाणवले. 'काय होतं ते?? की आपल्याला भास झाला?' त्यांनी स्वतःशीच प्रश्न विचारला. ते थोडे पुढे सरकले तोच पुन्हा तेथे काहीतरी चमकले. आता मात्र पवार सावध होऊन पुढे सरसावले. खिशातुन पेन काढुन त्यांनी प्रेताच्या गळ्याजवळची ओढणी थोडी बाजुला सारली. अन् त्यांची नजर प्रेताच्या गळ्यामध्ये असलेल्या चैनवर स्थिरावली. ओढणीच्या खाली असलेल्या त्या चैनीमध्ये पेन अडकवत त्यांनी ती वर ओढली. झटक्याने चैन वर ओढल्याने त्याबरोबर वर आलेली एक चांदीची वस्तु पुन्हा सर्रकन खाली ओढणीवर गेली, हीच ती वस्तु त्यांनी उन्हामध्ये चमकताना पाहिली होती!

"क्रॉस..??" - नकळत त्यांच्या तोंडुन अस्पष्टसे शब्द बाहेर पडले. एका मराठी मुलीच्या गळ्यामध्ये ख्रिश्चनचा क्रॉस? कदाचित, एक फॅशन म्हणून?... असु शकेल, आजच्या मुली कोणतीही फॅशन करत असतात हे त्यांना चांगलेच माहित होते. त्यातल्या त्यात ही क्रॉस घालण्याची पद्धत तर सर्वसामान्य होती. आणि रिद्धीच्या बाबतीत, ती परदेशातल्या मुक्त वातावरणात वाढलेली होती, तिने अशी फॅशन करणे यात काहीच नवल नव्हते. पण का कोण जाणे पवारांना ही गोष्ट काहीशी खटकत होती. चैनीमधल्या त्या चांदीच्या चमकणार्‍या छोट्याशा क्रॉसकडे ते लक्षपुर्वक पाहत होते. तो क्रॉस त्यांच्या मनात अधिकच गोंधळ घालत होता.

शेवटी त्यांच्या डोक्यात किडा वळवळु लागला आणि ते तेथुन उठुन बाजुला झाले. जवळच उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलकडुन रिद्धीची केस फाईल घेत त्यांनी एक ओझरती नजर त्यावरून फिरवली. भोसले हे कोणत्याही गोष्टीची अधिक खोलवर जाऊन माहीती काढुन घेत. रिद्धीचा हा रिपोर्टसुद्धा त्यांनीच तयार केला होता. काही वेळ त्या रिपोर्टमध्ये पवार काहीतरी शोधत होते. आणि नंतर हळुहळु त्यांच्या चेहर्‍यावर असलेले चिंतेचे भाव काहीसे निवळले. कदाचित त्यांना हवी असलेली माहीती त्यातुन मिळालेली होती.

या रिपोर्टमधुन एकंदर तीन गोष्टी पवारांनी वेगळ्या केल्या होत्या-
एक,- डाव्या हातावरील टॅटु;
दोन,- तिने घातलेले कपडे आणि
तिन म्हणजे,- गळ्यामध्ये असलेला तो चांदीचा क्रॉस!!

"ही पर्स रिद्धीचीच आहे ना?" कॉन्स्टेबलच्या हातातील धुळ- मातीने भरलेल्या पर्सकडे बोट दाखवत पवारांनी शिंदेंना विचारले.

'हो तिचीच आहे, तिच्या प्रेताजवळच तिथे पडलेली होती." पवारांच्या बोलण्याला पुष्टी देत शिंदे म्हणाले.

"यात काय- काय होते?"- पवार.

"एक मोबाईल, लायब्रेरी कार्ड, आणि... लिप्स्टिक- नेल पॉलिश- नेल कटर- टाल्कम पाउडर- फेस वॉश- क्रिम...वगैरे..वगैरे.... आणि थोडेफार पैसे."

"बस एवढंच? दुसर काही नव्हत त्यात? म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, तसेच इतर काही अशा वस्तु...."

"दुसरं काही नाही, पण... हा.$ त्यात दोन पब्लिक लायब्रेरीचे अ‍ॅड्रेस असलेले प्लास्टिकचे कार्ड. त्याचबरोबर एक मेक-डोनॉल्डचे कार्ड होते"

पवारांना मध्येच, आत्ता सकाळी भोसलेंचे रिद्धीसंबंधी बोलतानाचे एक वाक्य आठवले...

"........पासपोर्ट आणि व्हिजा सोड़ला तर तिने आपल्याबरोबर काहीच नेलं नव्हतं."

"........जर घरातुन जाताना ती आपल्याबरोबर......... तर मग आत्ता तिचा.........????!!!!!!!......." पवारांचे विचारचक्र जोरात सुरु झाले-

"जस्ट अ मिनिट शिंदे.. मी लगेच आलो" असे म्हणत पवार भोसलेंना घेऊन शिंदेंपासुन तसेच तिथे उभे असलेल्या इतर पोलिसांपासुन काही अंतर दुर गेले. आणि भोसलेंबरोबर ते काहीतरी बोलु लागले. त्याचवेळी इकडे शिंदेंचा मोबाईल वाजु लागला-

"हॅलो, ईंन्स्पेक्टर शिंदे बोलतोय-......... हा.....हा बोला...........काय?? कुठे?........ठिक आहे, आंम्ही येतोच तिथे एवढ्यात. तोपर्यंत कोणालाही तिथे हात लावु देऊ नका. किंवा त्याच्या जवळपास सुद्धा जावु देऊ नका" -इतके बोलुन शिंदेंनी लगेचच फोन कट केला.

".....बरं तुंम्ही आता लवकर निघा, या सांगितलेल्या सर्व कामाचा रिपोर्ट मला, मी संध्याकाळी पोलिस स्टेशनवर आल्यानंतर द्या. आणि आणखी एक गोष्ट,- मी पोलिस स्टेशनला येण्याआधी मला माझ्या टेबलावर गायब झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांच्या मिसिंग केसची फाईल हवी आहे, त्यांच्या संपुर्ण डिटेल माहीतीसह!"
भोसलेंना एका वेग़ळ्या कामगिरीवर पाठवुन पवार शिंदेंकडे जाण्यासाठी पाठीमागे वळले. पण शिंदें स्वतःच गडबडीत आपल्या सहकार्‍यांना काहीतरी सुचना देत, भराभर पावले टाकीत त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसले.

"कॉन्ग्रॅच्युलेशन पवार साहेब, दुसर्‍या एका मुलीचा पत्ता लागला आहे...." आपल्या स्वभावानुसार गंभीर परिस्थिती मध्येसुद्धा चेहर्‍यावर हास्य कायम ठेवत शिंदे म्हणाले.
"........ही तुंम्ही शोधत असलेल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपैकीच एक असावी असा अंदाज आहे!"

"कोण आहे ती?"- प्रश्नार्थक दृष्टीने शिंदेंकडे पाहत पवार म्हणाले.

"..या गाडीत बसा, रस्त्यामध्ये सगळं काही सांगतो तुंम्हाला" असे म्हणत त्याच वेगात, झपाझप पावले टाकीत शिंदे कुठेही न थांबता थेट़ गाडीच्या दिशेने जाऊ लागले. गाडीमध्ये बसताच त्यांनी आपल्या गाडीतील वायरलेस फोनवरून कंट्रोलरूमशी संपर्क साधला-

"..हॅलो..हॅलो, पोलिस कंट्रोलरूम...."

तिथेच काहीसे दुरवर प्रेस- मिडिया आणि पब्लिकच्या प्रचंड घोळक्यात उभ्या असलेल्या त्या दोन व्यक्ती मात्र उशीरपर्यंत पवार आणि शिंदेंच्याच हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेऊन होत्या. काही वेळ फोनवर बोलुन झाल्यावर अचानक शिंदेंनी गडबडीत इतर सहकार्‍यांना एकत्र जमवुन काहीतरी सुचना देताना आणि त्यानंतर पवारांबरोबर कुठेतरी जाण्यासाठी निघताना त्यांनी पाहीले. थोडा वेळ त्या दोघांमध्ये काहीतरी कुजबुज झाली आणि नंतर मग लगेच ते दोघेजण आपल्या बाईकवरून शिंदेंच्या गाडीच्या मागोमाग जायला निघाले.

bike ride take.jpeg

मरीन ड्राईव्ह रस्त्यावरून चर्चगेटच्या दिशेने आपल्या सायरनच्या कर्कश आवाजात, सुसाट जाणार्‍या शिंदे आणि पवारांच्या गाडीमागेच त्यांच्या नकळत एक सी-बी युनिकॉर्न, काळी होंडा बाईक काही अंतर ठेऊन, आता त्यांचा पाठलाग करत धावत होती....

क्रमशः

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>4 पुढे़ वाचा...

गुलमोहर: 

@मी मनी म्यांऊ => ३र्‍या भागाला जास्तच ऊशीर झाल्याबद्दल कानाला हात लावुन शंभर वेळा ऊठाबशा!!!!
अचानक मला कामाला बोलवल्याने पुढचा भाग टाकायला वेळच भेटला नाही. त्यात नेटसुद्धा पंधरा दिवस बंद होता. पण आता पुढचा भाग लवकरच टाकेन. Happy

सर्वप्रथम या भागाला जास्त उशीर लागल्याने सर्व वाचकांची मी मनापासुन माफी मागतो. Happy
खरं तर मागील काही दिवस मी दोन शुटिंगमध्ये इतका व्यस्त होतो की त्यातुन वेळ काढणे केवळ अशक्यच होते. त्यातच नेटसुद्धा तारीख निघुन गेल्याने जवळपास पंधरा दिवस बंदच होता, शेवटी कालच तो चालु करण्यात आला.
तुंम्हाला अधिक काळ वाट पाहावी लागल्याने पुनश्च एकदा क्षमस्व.
Happy
/\
¯¯ ¯¯¯

एकदाच काय ते लिहुन काढा अन मग इथे टाका...आधिचं सगळं विसरुन जायला होतं ..त्यात पुन्हा काय ते बदलुन बदलुन लिहिलंय ते वेगळंच. असो.

कथा छान चाल्लीये.

अन्नूजी नवीन भाग पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.
>>>एकदाच काय ते लिहुन काढा अन मग इथे टाका...आधिचं सगळं विसरुन जायला होतं <<<
ब-याच दिवसांनी पोस्ट केलात त्यामुळे आधीचे दोन्ही भाग पुन्हा वाचावे लागले.
पण, कथा छान रंगात येत आहे.

कथा interesting आहे, पण गॅप पडली तर नावं, घटना विसरायला होतात, कथा पूर्ण झाली की पोस्ट करा Happy