औषधि -आवळा

Submitted by अर्चना दातार on 11 June, 2011 - 01:20

औषधी आवळा
निसर्गाची किमया अगाध आहे हवामानातील बदलाचा मानवी जीवांवर खूपच प्रभाव असतो. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी निसर्गच आपल्याला मदत करतो. कार्तिक महिन्यात थंडीला चांगली सुरवात होते. त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला असे विकार उद्भवतात. क जीवनसत्वाच्या अभावी हे विकार जास्त जोर धरतात. परंतु या दिवसात येणाऱ्या आवळा या फळामुळे ती कमतरता भरून निघते.
आवळा हा मध्यम उंचीचा पानझडी वृक्ष असून भारतात सगळीकडे आढळतो. तसेच श्रीलंका , चीन, मलेशिया इथे आढळतो. हे फळ शीतल, तुरट, मुत्रल व सारक आहे. आवळा पित्तशामक, बलदायी आणि कांती सतेज करणारा आहे. आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असून इतर फळात न मिळणारा तुरट रस हि भरपूर असतो. आरोग्यदृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आवळ्याला खूप महत्व आहे.
निसर्गउपचार पद्धतीत आवळ्याचा औषध म्हणून खूपच उपयोग केला जातो. आयुर्वेदातही आवळ्यापासून निरनिराळी औषधे तयार करतात.
दुर्बल हृदय सुधृढ करण्यासाठी आवळ्याचा रस रामबाण औषध आहे. याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होतात आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात आणि संतती प्राप्ती साठी आवळ्याच्या रसाचा उपयोग केला जातो.
पोटामध्ये जंत झाल्यास एक चमचा आवळ्याचा रस आणि एक चमचा ओल्या नारळाचे दूध एकत्र करून जेवणापूर्वी १.५ महिने नियमाने घेतल्यास जंताची तक्रार दूर होते. आव पडणे, जुलाब या विकारावर आवळ्याच्या रसात सुंठ पूड घालून ते चाटण दोन्ही जेवण पूर्वी १ महिना घेतल्यास आतड्याची शक्ती वाढते.
उन्हाळ्यामुळे डोळ्यांची आग होते किंवा डोळे थकतात अश्या वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने डोळे धुतल्यास हा त्रास कमी होतो आणि डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी सुधारते. आवाज बसला असेल तर आवळकाठीचे चूर्ण दुधात घालून घेतात. उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस आणि पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात. खरुज झाल्यास आवळकाठी जाळून ती तेलात खालून त्याचा लेप फोडांवर लावावा. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत म्हणून आवळकाठी पाण्यात वाटून ती चेहऱ्याला लावावी.
वातामुळे होणार्‍या सांधेदुखीतीही एक चमचा आवळा चूर्ण आणि एक चमचा गुळ एकत्र करून आल्याच्या रस बरोबर घेतल्याबरोबर सांधेदुखी कमी होते. अर्थात १/२ महिने औषध घेणे आवश्यक आहे.
शरीरकांती सतेज होण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवळा गुणकारी आहे. आवळा, माका , ब्राम्ही आणि खोबरेल तेल ह्यांच्या मिश्रणापासून केलेले तेल केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
इतर सर्व फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असून त्यामुळे रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. आवळ्यात लोह तत्व हि भरपूर आहे. १६ केळी, ३ संत्री, किंवा मोसंबी यात जेवढे क जीवनसत्व आहे त्याच्या कितीतरी अधिक क जीवनसत्व छोट्या आवळ्यात आहे.
आवळा सावलीत सुकवला तर त्यातील जीवनसत्व कमी होण्या ऐवजी वाढते. १०० ग्रॅम सुकवलेल्या आवळ्यात २४००-२६००मिली ग्रॅम क जीवनसत्व असते. आरोग्यदृष्ट्या आवळ्याचे विविध उपयोग आहेत. रोग्याला निरोगी करण्यासाठी निरोगी माणसाला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना उत्साह आणण्यासाठी आवळा म्हणजे कल्पवृक्षच आहे.
आवळ्याच्या या गुणधर्मामुळे त्याला धार्मिक दृष्ट्या हि फार महत्व आहे. आवळ्याच्या झाडत निरनिराळ्या देव देवता वास्तव करतात अशी समजूत आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे अशी समजूत आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमे परेंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात. भोजना पूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्घ्य देऊन झाडाखाली श्री विष्णूची यथासांग पूजा करतात. झाडाच्या ४ हि बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्या संबधी श्लोक किंवा गाणी म्हणुन सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात.
कार्तिक महिन्यात केल्या जाणार्‍या तुळशीच्या लग्नात आवळा, उस, बोरे यांना महत्व आहे. आवळ्याामध्ये असणार्‍या अलौकिक गुणधर्मामुळे त्या वनस्पतीची माहिती व्हावी , वनस्पतीचा सहवास मिळावा म्हणून आवळी भोजना सारखे कार्यक्रम केले जातात. आपल्या संस्कृतीत याच कारणास्तव वृक्ष पूजेचे महत्व आहे. आवळा गुणकारी असला तरी तुळशीच्या लग्नापूर्वी त्याचे सेवन करू नये असा संकेत आहे.
आवळ्याच्या झाडात देवांचे वास्तव्य असल्यामुळे मंदिराच्या घराच्या दक्षिण दिशेला आवळ्याचे झाड लावतात. कार्तिक महिन्यात या झाडाखाली दामोदर आणि राधेची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करतात. या महिन्यात रोज आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास ती व्यक्ती विष्णू व शिवाला प्रिय होते. तसेच हे झाड लावणारा आणि वाढवणारा पुनर्जन्मातून मुक्त असे म्हणतात. मरणमुख माणसाच्या नाक, कान व केस या ठिकाणी आवळा ठेवल्यास त्या व्यक्तीला विष्णुलोक मिळतो अशी एक समजूत आहे.
आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी समजूत आहे. ज्याच्या घरी आवळ्याचा वृक्ष असतो त्या घरात भूतबाधा होत नाही.
आवळ्यापासून निरनिराळे औषधी पदार्थ तयार करतात. आवळ्यापासून चवनप्राश हे उत्तम टॉनिक तयार करात तसेच आवळकाठी, आवळाचुर्ण, सुपारी, सरबते, तेल, मोरावळा अशी विविध उत्पादने आरोग्यवर्धक आहेत. अश्या उत्पादनामुळे अनेक व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो.
या झाडाच्या सालीत आणि पानात टॅनिन भरपूर असल्यामुळे त्याचा उपयोग चामडी कमवण्यासाठी होतो आणि झाडाच्या लाकडाचा उपयोग इमारतीच्या बांधकामात आणि शेताची अवजारे बनवण्यासाठी होतो. पाला आणि फळे जनावरांना चारा म्हणून उपयोगी होतो आणि झाडाचा सरपण म्हणून हि चांगला उपयोग होतो. याच्या पानापासून तपकिरी आणि पिवळे रंगद्रव्य निघते.
असा बहुगुणी आवळा दारात लावणे पुण्याकाराकच ठरेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख, पण या लेखात असलेली आवळ्यातली क जीवनसत्वाविषयीची माहिती अयोग्य आहे.
मुळात आवळ्यातले औषधी गुणधर्म हे त्यातील पॉलिफिनॉलांमुळे असतात. HPLC करताना या पोलिफिनॉलांचे बॅण्ड्स आणि क जीवनसत्वाचे बॅण्ड्स् हे सारखेच दिसल्यामुळे क जीवनसत्वाच्या प्रमाणाविषयी चुकीची धारणा करून घेतली जाते. इतर पदार्थांमधल्या जीवनसत्वांप्रमाणेच आवळ्यातलं जीवनसत्वही उष्णतेमुळे नष्ट होतं. टिकतात ती पॉलिफिनॉल्स.

इंदोर ला एक प्रसिद्ध देशी औषधे विकणारे वैद्य+दुकानदार आवळ्याची तारीफ करताना म्हणायचे ,आवळ्यात इतके गुण आहेत जे तयार मिठाईत नाहीत्,मिठाई नेवुन तुम्ही रोगांना आमंत्रण च देता,वाजवी पेक्षा जास्त साखर खायला लावुन ..त्यापेक्षा सबंध आवळ्याचा मोरांबा न्या..रोज सकाळी एक आवळा खा अन निरोगी रहा..

आवळ्याचा उपयोग रक्तातील साखर कमी करण्याकरता होतो का? आमच्या इथे फ्रोझन आवळे, आवळे-पूड, आवळ्याचा रस असे प्रॉड्क्ट्स मिळतात. इंडियन स्टोअरचा मालक सांगत होता की अनोशापोटी एक आवळा खाल्ला किंवा त्याचा रस दोन चमचे घेतला तर साखर नियंत्रित राहते. ह्यात तथ्य आहे का? कुणी सांगेल का?

चिनूक्स्-अमेझिंग माहिती!