ससे आणि जादुगार -

Submitted by विदेश on 10 November, 2011 - 00:06

छोटे छोटे ससे कसे
टकमक इंद्रधनू बघती -
बघता बघता कोपऱ्यात ते
रुसुनी मुकाट का बसती !

चुन्यात बुडुनी आलो वाटे,
लाल ना कुणी दिसे निळे -
रंग कुणाचे ना नारंगी
कुणीच ना काळे पिवळे !

एक छडी जादूची घेऊन
तिथेच जादुगार आला -
'हिरमुसलेले तुम्ही दिसता
कोपऱ्यात ह्या का बसला ?'

'आम्ही सारे असे पांढरे -
रंगित नाही, शुभ्र कसे ?'
- एकमुखाने वदले सारे
जादुगार तो मनीं हसे !

मूठ उघडुनी जादुगार तो
रंगित चकती दावितसे
भरभर जादूच्याच छडीने
रंगित चकती फिरवितसे -

फक्त पांढरा रंगच दिसला-
फिरता चकती गरगर ती !
हसू लागले ससे बघुनिया
जादू रंगित चकतीवर ती !

'मिसळुन सारे रंग जगीचे
शुभ्र ससे बनलात तुम्ही ,
मुळीच ना तुम्ही बिनरंगी-
बहुरंगी आहात तुम्ही ! '

आनंदाने फिरू लागले
सर्व ससे अवतीभवती -
गुप्त जाहला जादुगार तो
जादुची छडी अन् चकती !

गुलमोहर: 
शब्दखुणा: