'पाऊलवाट'च्या ध्वनिमुद्रिकांचा प्रकाशनसोहळा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 9 November, 2011 - 01:41
सुमधुर संगीत हे 'पाऊलवाट'चं वैशिष्ट्य आहे. ही गाणी लिहिली आहेत वैभव जोशी यांनी, तर संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे यांनी. 'पाऊलवाट'च्या ध्वनिमुद्रिकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम परवा, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी मुंबई इथे पार पडला. पं. हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते त्यांच्या वृंदावन गुरुकुलात ध्वनिमुद्रिकांचं प्रकाशन झालं. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक आणि गायक रवींद्र साठे उपस्थित होते. शुभा जोशी, विभावरी जोशी-आपटे, जसराज जोशी, संदीप उबाळे हे गायक आणि किशोर कदम, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, हृषिकेश जोशी हे कलावंत या सोहळ्याला उपस्थित होते. या चित्रपटातल्या गाण्यांमध्ये बासरी ज्यांनी वाजवली आहे, ते हरिप्रसादजींचे ज्येष्ठ शिष्य संदीप कुलकर्णीही उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रपटातली 'एक अनोळखी फूल' (गायिका - आशा भोसले) आणि 'उडन छू' (गायक - अवधूत गुप्ते) ही दोन गाणी ऐकवण्यात आली.

एक अनोळखी फूल




उडनछू




हरिप्रसादजींना ही दोन्ही गाणी अतिशय आवडली. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, "या चित्रपटातली गाणी खूप सुरेख आहेत. अशा पद्धतीची गाणी हल्ली ऐकायला मिळत नाहीत. आम्ही ज्या काळी चित्रपटांसाठी वादन करत होतो, त्या काळी चित्रपटांमध्ये संगीताला महत्त्वाचं स्थान होतं. उत्तम संगीताला प्राधान्य दिलं जाई. चित्रपटसंगीताच्या त्या सुवर्णयुगाची आठवण आज 'पाऊलवाट'मधली गाणी ऐकून झाली. मी नरेंद्रबरोबर अगोदर काम केलं आहे. संगीतक्षेत्रातली त्याची विद्वत्ता मला पूर्णपणे ठाऊक आहे. या चित्रपटातल्या संगीतावर त्याने घेतलेली मेहनत दिसते आहे. एकेकाळी मराठी चित्रपटसंगीतात सातत्याने दिसणारी मेलडी नरेंद्रने या गाण्यांमधून परत आणली आहे. ही गाणी हल्लीच्या गाण्यांपेक्षा वेगळी आहेत. मधुर आहेत. सर्वत्र अंधार दाटलेला असताना या गाण्यांच्या रूपाने मला उजेडाची तिरीप दिसते आहे. या गाण्यांमुळे चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ परत येईल, असा मला विश्वास वाटतो".

या प्रकाशनसोहळ्यातली ही काही क्षणचित्रे...

MRGRP.JPG

पं. हरिप्रसाद चौरसिया ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन करताना (डावीकडून - नरेंद्र भिडे, रवींद्र साठे, पं. हरिप्रसाद चौरसिया, आदित्य इंगळे, आनंद मोडक)

MRNB.JPG
संगीतकार नरेंद्र भिडे मनोगत व्यक्त करताना

MRAI.JPG
मनोगत व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य इंगळे

MRAR.JPG
सोहळ्याला उपस्थित गायक आणि चित्रपटातले कलाकार

***


विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशा भोसल्यांनी वैभवचं गाणं म्हटलं, तेव्हा वैभवने इथे लिहिलेले ललित आता आठवलं. Happy

पाऊलवाटची गाणी संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत बहुतेक.

अवांतर

वैभव जोशी यांनी, तर संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे यांनी. 'पाऊलवाट'च्या ध्वनिमुद्रिकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम परवा, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी मुंबई इथे पार पडला. पं. हरिप्रसाद चौरसियांच्या हस्ते त्यांच्या वृंदावन गुरुकुलात ध्वनिमुद्रिकांचं प्रकाशन झालं. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक आणि गायक रवींद्र साठे उपस्थित होते. शुभा जोशी, विभावरी जोशी-आपटे, जसराज जोशी, संदीप उबाळे हे गायक आणि किशोर कदम, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, हृषिकेश जोशी हे कलावंत या >>>

पाऊलवाट बाय जोशी'च जोशी Happy

वाह मस्त!!! आशाताईंच्या आवाजात नेहमीसारखीच जादू आणि वैभव यांचे शब्द.... सुरेखच!

त्या उडन छू गाण्यात माझ्या भाच्चीबाईंनी इतर बालकलाकारांबरोबर आणि सुबोध भावेबरोबर काम केलंय, त्यामुळे आमच्याकडे हे गाणं खूपच पॉप्युलर होणार आहे यात शंकाच नाही. तिने खूप एन्जॉय केला चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव!