मला बी जत्रंला येऊ द्या की! - १

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दरवर्षी काहीनाकाही कारणाने राहून जात होतं ते अखेर यावर्षी घडलं. यावर्षीच्या उत्सवाला हजेरी लागलीच.
७ - ८ दिवस नुसती धुमशान.

सकाळी उठून धडाधडा आवरून सिनेमॅक्स, वर्सोवा (तेच ते इन्फिनिटी मॉलमधलं!) गाठायचं. थेट्राबाहेर लायनी लावायच्या. जागा पकडायच्या. सिनेमा बघायचा. संपला की एक्झिटच्या दारातून पळत पळत ४० पायर्‍या उतरायच्या दुसर्‍या बाजूचा जिना गाठायचा परत सिक्युरिटीसाठी पर्स उचकायला द्यायची आणि ते झालं की पळतपळत दुसरीकडच्या ४० पायर्‍या परत चढायच्या. परत थेट्राबाहेर रांगेत. रांग लावायची म्हणून जेवण स्किप करायचं. किंवा रांगेत ४-५ जणांनी मांडा ठोकून बसायचं आणि तिथेच जेवायचं, घुसायला लागले लोक तर आरडाओरडा करायचा, कसतरी मरतमरत आत घुसायचं आणि परत तेच... रात्री थकल्या डोळ्यांनी घरी. अधल्यामधल्या वेळात उद्याच्या फिल्म्स कोणत्या, कुठल्या बघायच्या याचा कॅटलॉगमधून अभ्यास करायचा. कॅटलॉगमधे पुरेशी माहिती नसेल तर रात्री गुगलायचं. 'उद्या सकाळी अमुक वाजता स्क्रीन अमुकच्या लायनीत भेट' असले समस...
मज्जा न काय एकुणात!

१३-२० ऑक्टोबर २०११ या काळात घडलेल्या 'मामि' चित्रपट महोत्सवाची ही गोष्ट. दिवसाला प्रत्येक माणूस ५ चित्रपट बघू शकतो. माझी रोजच तेवढी क्षमता नव्हती. किंवा कधी चित्रपट सुरू झाल्यावर १० मिनिटात बकवास म्हणून बाहेर यायचो आम्ही मग पुढच्या चित्रपटासाठी रांग असायचीच त्यामुळे रांगेत तंबू. असे करून एकुणात २५ तरी सिनेमे बघितले गेले.

यावर्षीचं 'मामि' चं चित्रपटांचं कलेक्शन मस्त होतं यात वाद नाही. साधारण ७-८ स्पर्धात्मक आणि अ-स्पर्धात्मक विभाग ज्यामधे कान महोत्सवात नावाजले गेलेले चित्रपट, फ्रेंच सिनेमा, गाजलेले भारतीय चित्रपट यांपासून मुंबई या विषयावर नवख्या/ विद्यार्थी फिल्ममेकर्सनी केलेल्या शॉर्ट फिल्म्स असे सगळे रंग होते. या विविधरंगी गुच्छाबद्दल फेस्टिव्हल प्रॉग्रॅमिंग टीम आणि सिलेक्शन टीमचे विशेष अभिनंदन आणि आभार.

यावर्षी पहिल्यांदाच सिनेमॅक्समधे हा महोत्सव होत होता. सिनेमॅक्स, वर्सोवा हे मुख्य ठाणे तर सिनेमॅक्स, वडाळा आणि मेट्रो ही अजून दोन ठाणी या महोत्सवाची केंद्रे होती. सिनेमॅक्सच्या स्टाफला वेड्याविद्र्या चित्रपटांसाठी ३-३ ४-४ तास रांगा लावून बसलेल्या वेड्यावाकड्या जनतेला सांभाळताना आणि शिस्त राखताना घाम फुटला असणार. पण त्यांच्याशिवाय हे सगळं सुरळीत होऊ शकलं नसतं.

मात्र सिनेमॅक्सच्या प्रोजेक्शनिस्टससाठी आणि प्रोजेक्शनिस्टसबरोबर कोऑर्डिनेट करणार्‍या 'मामि' च्या लोकांसाठी चित्रपट महोत्सवात कसे काम करावे याचे मोठ्ठे वर्कशॉप कुणीतरी तज्ञ लोकांनी घेण्याची प्रचंड जरूर आहे. आलेल्या फिल्म्सची रिळे बरोबर न जोडणे किंवा अजिबातच न जोडणे किंवा खाली डोके वर पाय अशी जोडणे, सबटायटल्सशिवायच स्क्रिनिंग चालू करणे, आस्पेक्ट रेश्यो पार गंडलेला त्यामुळे सबटायटल्स दिसतील किंवा माणसांची डोकी तरी असले प्रकार, गोंधळ झाला काही तर थेट्रातले लोक आरडाओरड करत नाहीत तोवर दुर्लक्ष करणे, गोंधळ निस्तरून मधली ५-१० मिनिटे गायबच करून डायरेक्ट पुढचाच भाग सुरू करणे असले अक्षम्य अपराध प्रत्येकी रोज ४ वेळातरी हे लोक करत होते.

प्रत्येक चित्रपट बघत असताना सुरक्षेला धोका उत्पन्न होईल असं काहीतरी प्रत्येकाकडे निर्माण होतं असा सिक्युरिटीवाल्यांचा समज असावा कारण ४० पायर्‍या उतरणे आणि परत ४० पायर्‍या चढणे या परिक्रमेमधे दर वेळेला सगळी पर्स पूर्ण उचकून पाचकून बघितली जात होती. जाम जाम वैताग. अर्थात ते लोक त्यांची ड्यूटी करत होते त्यामुळे त्यांना दोष काय देणार पण निर्णय घेणार्‍यापुढे माझे कोपरापासून हात जोडलेले

तरीही बघायला मिळालेल्या सिनेमांची शिदोरी इतकी महत्वाची की त्यांचं पारडं जडच...
त्यांच्याबद्दल पुढच्या भागात...
(क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------------------------------
मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २
मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३

विषय: 
प्रकार: 

आवडले. अशा महोत्सवांबद्दल उत्सुकता आहे आणि कधीतरी असे बरेच बघायचे आहेत. पुढच्या भागांची वाट पाहतो.

बापरे वाचताना तुझी झालेली दमछाक इथपर्यन्त पोचली.. Happy
पण एव्हढ्या मेहनतीचं फळ शेवटी गो>>ड च असणारे नै???
पुढचा भाग लिव पटापटा

हुश्श.. सापडला अंराचिमबद्दलचा लेख.
बाकि तुझी धावपळ इंट्रेस्टींग आहे. अश्या परीस्थितीत सुद्धा एवढे सिनेमे पहायचे म्हणजे खरंच __/\__ . आता सिनेमाबद्दल येऊदेत.

सबटायटल्स च्या आणि रिळच्या गोंधळाबद्दल निदान एक तरी फूली. आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधे हे खरोखर नको व्हायला. आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल साठी रांगा लावतायेत लोक म्हणजे आंतराष्ट्रीय सिनेमाबद्दल लोक आता बरेच उत्सुक असतात तर.

आलेल्या फिल्म्सची रिळे बरोबर न जोडणे किंवा अजिबातच न जोडणे किंवा खाली डोके वर पाय अशी जोडणे, सबटायटल्सशिवायच स्क्रिनिंग चालू करणे, आस्पेक्ट रेश्यो पार गंडलेला त्यामुळे सबटायटल्स दिसतील किंवा माणसांची डोकी तरी असले प्रकार, गोंधळ झाला काही तर थेट्रातले लोक आरडाओरड करत नाहीत तोवर दुर्लक्ष करणे, गोंधळ निस्तरून मधली ५-१० मिनिटे गायबच करून डायरेक्ट पुढचाच भाग सुरू करणे असले अक्षम्य अपराध प्रत्येकी रोज ४ वेळातरी हे लोक करत होते.
>>>> अरे बापरे ! नॉट एक्स्पेक्टेड Sad

आता सिनेमांच्या शिदोरीचं गाठोडं सोडा Happy

तुझ्या या उत्साहाबद्दल व नेत्र/शरीर/मेंदू परिश्रमांबद्दल तुझं कौतुक! आता आवडलेले/ न आवडलेले किंवा उल्लेखनीय वगैरे चित्रपट आणि त्यांबद्दलचे तुझे अनुभव इ. इ. वाचण्यास उत्सुक.

मस्त. माझे काही २५ वगैरे सिनेमे नाही बघीतले गेले, कामाच्या धावपळीत वेळा गाठणं अवघड जात होतं, काही वेळा सुरुवातीचा बराचसा भाग मिस होत होता, पण जे बघीतले ते सिनेमे सुंदरच होते.
रांगेत उभं रहाण्याचा पेशन्स संपल्याने ज्या स्क्रिनला कमीतकमी किंवा अजिबातच रांग नाही असे बघितलेले सिनेमे अपेक्षेपेक्षा जास्त चांगले निघाल्याचा आनंद जास्त वाटला. उदा. रितुपर्णोचा उनिशे एप्रिल. काही चांगले सिनेमे वेळ गाठता न आल्याने हुकले.

सिनेमॅक्सला झालेल्या 'मामि'बद्दल एक सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे टिपिकल फिल्म फेस्टीवलचं वातावरण टोटल मिसिंग होतं. म्हणजे रांगाबिंगा होत्या पण पुल.अ‍ॅकेडमी (रविन्द्र नाट्य) किंवा यशवंतरावला जसं बाहेर उभं राहून, कॅन्टिनमधे बसून फेस्टिवलचं वातावरण अंगावर पांघरता येतं ते इथे तशा मोकळ्या जागे अभावी मिसिंग होतं. फक्त अशा फेस्टीवल्सलाच काही लोक भेटतात एकमेकांना, त्यांच्यात गप्पाटपा, सिनेमांबद्दल चर्चा होतात, हा बघच किंवा अजिबात बघू नकोस अशा रेकमेन्डेशन्स होतात.. तसलं काहीही सिनेमॅक्सला होत नव्हतं, त्या ऐवजी दोन सिनेमांच्या ब्रेकमधे लोक मॉलच्या फूडकोर्टात गायब होत होती.
प्रोजेक्शनचे गोंधळ, सबटायटल्स गायब होणे वगैरे प्रकार मामिच्या प्रेक्षकांना नवे नाहीत. उलट ते झाले नाहीत तर खटकेल अशी परिस्थिती नेहमीचीच. ह्यावेळी सिलेक्शन चांगलं होतं हा उलट बोनस. ह्यावर्षी दाखवण्यात येणार्‍या सिनेमांची संख्या सर्वात जास्त होती, त्यामुळे वैविध्य खूप होते ही चांगली गोष्ट पण त्यामुळे रिपिट शोज कमी होते हे आमच्यासारख्या वेळा न गाठता येणार्‍यांच्या दृष्टीने वाईट.
दरवर्षी हमखास भेटणारे क्रिटिक्स किंवा सिनेअभ्यासक यावर्षी अजिबातच दिसले नाहीत मला तरी.

अगदी अगदी शर्मिला. ते वातावरण इफ्फीला मस्त असतं. Happy
आणि बिन्डोक सिरीयल्समधले बिन्डोक नट उगाच येऊन फुटेज खायचा प्रयत्न करत होते ते तर लईच विनोदी. 'मामि' च्या इथे आपल्याला लोकांनी बघावं याचा इतका आटापिटा असायचा की बस्स.

बिन्डोक सिरीयल्समधले बिन्डोक नट उगाच येऊन >>> हो Proud पण ते बिचारे गपचूप लाईनीत तरी उभे रहातात. काही बी ग्रेड हिरोंना यायची तर हौस पण लाइनी वगैरे लावायला कमीपणा ते जामच इनोदी (रितेश देशमुख आठवतोय ना?).

हो हो अगदी अगदी. काही रोज येणारे होते लायनीत उभे रहाणारे गपगुमान. पण नंतर होते एकदोन कुणी फोटो काढेल का? कुणी मला बघेल का करत फिरणारे.
म्हणजे कसं की तिकडे अनुराग कश्यप फोरम संपवून बाहेर पडतोय. लोक त्याचे फोटो काढतायत, त्याला प्रश्न विचारतायत आणि एक टुक्या नुसताच स्टाइलभाई बनून कोण छपरी लोकांचे फोटो काढतायत हे असं बघतोय... हे सगळं लायनीत तंबू अस्ताना बघितलेलं.. Happy

आवडलेल्या चित्रपटांबद्दल कधी लिहितेस त्याची वाट पाहते. Happy
शर्मिला, तूही लिही.

बाकी दाखवतांना असे घोळ होत असतील तर अवघड आहे.

(मला आताशा दोन तासांच्या वर गेला की एक सिनेमासुद्धा कंटाळवाणा व्हायला लागतो (काही सन्माननीय अपवाद वगळता.) त्यामुळे दिवसाला एकाहून अधिक सिनेमे नुसते बघायचेच नाहीत तर सर्वांगाने अ‍ॅप्रिशिएट करायचे हे भारीच!) Happy

अगं ते सिनेमे तेवढे महत्वाचे आणि उत्तम निघाले म्हणून जमलं.
दुष्काळातून आलेल्याला उत्तम पक्क्वान्न दिसल्यावर दोन्ही हाताने जेवढं ओरबाडता येईल तेवढं ओरबाडून घेतलं.. (काय ड्वायलॉकेय साला! ) Wink

हम्म्म.. हे असले काही कधी अनुभवले नाही. दिवसाला एक सिनेमाच मी पाहु शकते. Sad

अता तिथल्या सिनेमांबद्दल कधी लिहिणार?

सुरवात चांगली झालीये. बरोबर मित्र, मैत्रिणी परिवार असेल तर एकदम कॉलेजचे दिवस आठवले असतील.
वाचते पुढचा भाग.