...जरा विसावू या वळणावर!- अर्थात माजी विद्यार्थी संमेलन (१९८४ बॅच), सावित्रीबाई फुले विद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठ

Submitted by मी_आर्या on 18 October, 2011 - 02:43

नमस्कार मंडळी,

१९८४ बॅच,सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. दोनच वर्षांपुर्वी म्हणजे ३ जाने.२००९ ला शाळेने माजी विद्यार्थी संमेलन आयोजीत केले होते. त्यावेळेस या बॅचची काही मोजकीच डोकी हजर होती. त्यावेळेस आपण संपर्कात राहु असे पैजेवार सांगणारी मंडळी दोन वर्षात पुन्हा गायब झाली. त्यांना आणि राहिलेल्यांना शोधुन काढण्याचे काम पुण्यातील राहुल, संजु, मी आणि आसावरी आमच्या गँगने केले. मागच्याच रविवारी ९ ऑक्टो.२०११ला आमचे गटग पार पडले. १५-१६व्या वर्षी विखुरलेले चाळीशी पार झाल्यानंतरच एकत्र आले.सुमारे २७ वर्षांनंतर भेटलेले एसपीएमव्हीकर्स ..त्यांच्या आठवणी.. त्याचा हा वृत्तांत! (माबोकरांबरोबर शेअर करावासा वाटला)

SPMV_1984Batch_Std4_Group_Photo.jpg
चौथीतला हा फोटो आहे.

तसं पाहिलं तर ह्या गटगची नांदी दोन महिन्यापुर्वी झाली. ऑगस्टच्या १० तारखेला राहुलने पुण्यातले आणि जे मिळाले ते इमेल आय्डी घेउन मेलवरुन एक पिल्लु सोडलं होतं.ते पिल्लु डोक्यात वळवळत असल्याने आम्ही उत्साहाने गटगसाठी होकार दिला खरा. पण पहिल्याच मिटींगमधे माझा उत्साह डळमळीत होऊ लागला.राहुल रहातो पुण्याच्या एका टोकाला... नि संजय मोरे नि मी एका टोकाला. पहिल्याच मिटींगला ,राहुलच्या घरुन निघतांना ७.३०-८ वाजले. ननु मोरे उर्फ संजु याने मला आडनाव बंधुत्वाला जागुन सांगवीत पाण्याच्या टाकीजवळ भर पावसात सोडले. त्यामुळे दुसर्या मिटींगला जायच्या नावानेच मला अंगावर काटा आला.
अर्थात त्यानंतरच्या मिटींगांना घरी काही घरगुती कार्य निघाल्याने मी अटेंड केल्याच नाही. तिथेच राहुल नि संजु एकांड्या शिलेदारासारखी कामं करणार हे स्पष्ट झाले. होता होता ९ ऑक्टो. ही तारीख ठरली.

प्रत्यक्ष गेट टुगेदरच्या आधी २-३ दिवस सगळ्यांना फोन करुन पुन:पुन्हा बजावण्यात गेले.शनिवारी दुपारी ऑफीसातच निलु(चौधरी)चा फोन आला की आम्ही(ती आणि विजयमाला) संगमनेरहुन निघालोय. निलिमा (पाटील) दोन दिवस आधीच कुटुंबासहीत पुण्यात आली होती. रात्री निलु माझ्याकडे मुक्कामी आली होती. आणि तेव्हाच मला आपल्या कॉलनीत बरेचसे अ‍ॅग्री.चे लोक रहात असल्याचा साक्षात्कार झाला व ते मी उत्साहात तिच्या वडिलांना मी ते सांगितले. त्याबरोबर त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना भेटण्याचा ध्यासच घेतला. झालं, दुसर्‍या दिवशी लवकर उठुनसुद्धा काका त्यांच्या सहकार्यांच्या गळाभेटी घेत असल्याने तसा आम्हाला उशीरच झाला. दुसरं काही नाही... काकांनी सुरेखा व तिच्या मुलाला तासभर उन्हात 'वाळण्या'ची शिक्षा देउन कुठल्यातरी जन्माचा बदला घेतला. मी व सुरेखा गोरवे ची वर्णी मग त्यांच्यासोबत लागली.सुमारे ११-११.१५ च्या सुमारास सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या 'घाडगे बॉटॅनिकल फार्म" ला पोहोचलो.
बाहेरच 'जलेबी बाई' च्या गाण्याचा ताल ऐकु आला.. .तेव्हाच जेवणात जिलेबी असणार याची कुणकुण आम्हाला लागली. यंट्री केल्यावर हशा, टाळ्यांचे चित्कार ऐकु आले आणी दोन वर्षांपुर्वी भेटलेले एकेक चेहरे दिसु लागले. नाष्ट्याच्या प्लेसजवळ 'अय्या',कुठे होतीस्", "हाय कशी आहेस?" '" मी किती जाड, तु किती बारीक" असे चित्कार ऐकु आले. तिथे महिलामंडळ असणार हे समजुन आलं! जवळ गेल्यावर दिसलं की मंटी तारस्वरात काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. नूतन फोनवर तर गुलाबी साडीतली एक स्त्री नाष्टा करण्यात मग्न होती. तशा अजुनही स्त्रीया तिथे मुलांना घेउन नाष्टा करत होत्या.पण त्या काही ओळखु आल्या नाही. पुरुषांच्या ग्रुपकडुन हशां, टाळ्यासहीत "हायला' "च्यायला', "साल्या' असं काय काय ऐकु आल्यावर आम्ही कानावर हात ठेवले. त्यांचा प्लॅन माझ्या लगेच लक्षात आला.. त्यांनी आपापल्या अर्धांगाला मुलांसोबत सोपवुन त्यांना नाष्ट्याच्या कंटाळवाण्या कार्यक्रमात गुंतवले होते आणि स्वतः लॉनमधे कुजबुजत टाळ्या देत काहीतरी सिक्रेटसची देवाण घेवाण करण्यात मग्न होते.

मी मंटीला २५ वर्षांनी भेटत होते...कडकडुन मिठ्या मारल्या.समोर बसलेली गुलाबी साडीतली सुनंदा ससाणे पहिल्या प्रथम ओळखली नाही. पण नंतर तिचं ते ठासुन बोलणं, उंच कपाळ यावरुन डोक्यात प्रकाश पडला की हीच सुनंदा! नाष्टा चालु असतांना मृदुलाचा फोन आला... नि पुढचा सुमारे अर्धा तास तो फोन ह्या कानापासुन त्या कानापर्यंत फिरत होता....अर्थात वेगवेगळ्या व्यक्तींच्या!खुप मिस करत होती ती सर्वांनाच! आमच्या मागेच निलिमा(चौधरी), विजयमाला होत्या. निलिमाला मी दुसर्यांदा भेटत असल्याने मिठ्या-बिठ्यांचा कार्यक्रम केला नाही.
नंतर आमचे वर्गमित्र पण तिथं आले. सगळ्यांनाच सर्वात भेटण्याची उत्सुकता होती ती 'सुनंदा'ला. सुनंदा म्हणजे अठरा विश्वे दारिद्र्यातुन वर आलेली स्त्री. तिचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला याबद्दल सर्वांनाच उत्सुकता. औपचारीक ओळखी अशा पद्धतीने झाल्या.

प्रक्षेपने आधी मला "ओळख पाहु" म्हणत “रवि कदम”,” सुहास कदम” अशी नावं सांगुन खुप कुठे कुठे फिरवुन आणले. त्याचं उट्टं मी पुढच्या गेट टुगेदरला नक्कीच काढणार आहे.नाष्टा झाल्यावर सर्वांना मोठ्या हॉलमधे जायची मॉनीटरने सूचना दिली.सगळ्यांनी मधला लॉनचा पॅसेज ओलांडुन हॉलकडे कूच केले. तिकडे जातांना कुणी कल्पनाही केली नसेल की, पुढचे २ तास त्यांचे पुर्ण हास्यकल्लोळात बुडुन जाणार आहेत.

हॉलमधे सगळे गोलाकार बसल्यावर 'राहुल- द मॉनिटर' म्हणत होता की सगळे फळ्याकडे तोंड करुन बसु... मग ओळखी करु. संजु(मोरे) ने प्रस्ताव मांडला की आपण आपापली ओळख करुन द्यावी. मग कुणीतरी मधेच पचकलं की आपण स्वतःची ओळख करुन देण्याऐवजी दुसर्यांनी त्याची ओळख करुन द्यावी. तेवढ्यात प्रक्षेपच्या डोक्यात ट्युबलाईट पेटली आणि त्याने आक्षेप घेतला की सर्वांच्या विशेषतः पुरुष मंडळींच्या बेटर हाफ बरोबर आहेत तर काही उखाळ्या पाखाळ्या निघुन २०-२५ वर्षांपासुन 'बंद मुठ्ठी' उघडतील. कुणीतरी त्यावर म्हणालं की अरे, हाच तर खरा चान्स आहे, बदल करायचा. नक्की काय बदल करणं अपेक्षित होतं हे मला शेवटपर्यंत कळ्ळं नाही.

सर्वांनी फॅमिलीला बरोबर आणायचं राहुल ने विचारपुर्वक ठरवलं होतं. त्यामुळे वर्गमित्र 'शांततेत' होते. तशा त्यांच्या बायका तयारीनेच आल्या होत्या आणि डोळ्यात (कि कानात?)प्राण आणुन ऐकत होत्या... न जाणो (इथे तरी)आपल्या नवर्याचं बिंग फुटलं तर काहीतरी ऐकायला मिळेल.
इथे मधली सुमारे २८ वर्ष औपचारीकतेच्या बुरख्याबरोबरच गळुन पडली.सगळे नंतर शिस्तीत फळ्याकडे तोंड करुन बसले.मला नेहमीप्रमाणे पहिल्या बेंचवर म्हणजे पुढेच जागा मिळाली. प्रत्येकाने नाव गाव, शाळा सोडल्यानंतर काय काय 'उद्योगधंदे' केले ई.ई. बोलायचं नि सर्वात शेवटी शाळेतला एखादी अनुभव सांगायचा असं ठरलं.

सर्वात आधी उभा राहिला, संजय मोरे. संजुने छान सोप्या शब्दांत त्याची ओळख करुन दिली. सुरेखा गोरवेशी झालेली जबरदस्त टक्करही त्याला आठवली. माधव अहिरे बी.जे. च्या हॉस्टेलला असतांना ते कसे त्याच्या रुमवर पडीक असायचे ही त्याने आठवण करुन दिली.

नंतर माझं नाव पुकारलं गेलं. वर्गात डोकं खाली करुन लिहित असतांना अचानक शिवथरे सरांनी नाव पुकारावं नि आपण दचकुन लटलट कापत उभ रहावं तशी परिस्थिती माझी झाली. उभं रहातांनाच काय बोलायचं त्याची उजळणी केली.. चौथीत असतांना माधवने मधल्या सुट्टीत शाळेच्या स्टेजवरुन पळतांना पाठीत बुक्की दिली होती. त्या बुक्कीची जखम इतकी खोलवर होती की आता सुमारे ३५ वर्षांनंतरही ते मला आठवलं..म्हणजे बघा! तेव्हा प्रक्षेप म्हणाला की त्याची परतफेड कर..मग राहुलने टिप्पणी केली की 'व्याजासहीत' परत कर. यावर तिथल्या तिथेच १९७६ ते २०११ अशा ३५ वर्षांच्या ३५ बुक्क्या + व्याज वै. धरुन ५०एक बुक्क्यांचा हिशेब 126fs422682.gifमी केला होता पण त्याची बायको, मुली तिथे पाहुन हात आणि मनाला आवर घातला.. पण पुढे-मागे कुठल्याही गेट टुगेदरला याची परतफेड करायचीच असं स्वतःला बजावुन ठेवलं.vahidrk.gif

७वीत/८वीत असतांना, फौंटन पेन गळत असेल तर त्याला कागद गुंडाळुन लिहायची फ्याशन होती. त्याप्रमाणे मी लिहित असतांना साबळे सर म्हणाले होते की,'अरे व्वा, नयनाचा पेन कपडे घालतो"!! ही आठवण सांगितली तेव्हा सगळे जबरदस्तीने हसल्यासारखे हसले.खरं तर यात हसण्यासारखं काही नव्हतं..पण मॉनीटरने मुलांना आधीच तंबी दिल्याचं मला नंतर कळलं.

नंतर सामटिव्हीदंडमंडीत आसावरी बोलायला उठली.तिनेही शाळेच्या छान छान आठवणी सांगितल्या.आसावरी बोलायला उभी राहिल्याबरोबर आधी तिने महेश म्हसकरला उठवले नि म्हणाली की याच्याकडे बघा, याला मी रोज सायकल वर "प्रॉजेक्ट'वरुन डबलसीट आणत होते. तेव्हा सगळे म्हणाले की, याची परतफेड म्हणुन आता महेशने तिला डबलसीट सायकलवरुन घेउन जावे. पुढच्या वर्षी विद्यापीठात होणार्या गेट टुगेदरला हा परतफेडीचा प्रोग्रॅम होणार आहे.

दापोलीचे प्रा.महानंद माने उभे राहिले. हा बोलायला उठला, ते थांबायचं नावच घेत नव्हता. माझ्याशेजारी बसलेल्या संजय मोरेच्या बायकोला मी विचारले,' हा प्राध्यापक आहे काय?' तर ती म्हणाली," हो ना, ४५ मिनिटे झाल्याशिवाय थांबणार नाही तो. मग मी ही म्हटले," तास संपल्याची घंटा वाजवावी काय?

प्रक्षेप सुर्यवंशी: हे महाशय बायकोजवळ उभं रहायला इतका का घाबरत होते हे मला शेवटपर्यंत कळ्ळं नाही. 306.gifतो जर्रा अंतर ठेवुनच उभा राहिला होता...मग राहुल ने त्यांना फ्यामिली फोटोसाठी जवळ या असं सांगितलं. तेव्हा धीर करुन तो उभा राहिला. त्याने सायन्सच्या तांबे सरांची, अंडे आणि पिल्लुची आठवण सांगितली.

नंतर उठला संजय संघवी. तो आणि महानंद माने बेंचवर शेजारी बसायचे तेव्हा भापकर सर कसे दोघांना," महानंद आणि अलकनंद" अशी हाक मारत ते सांगितले.आणि राहुलकडे इंद्रजाल वै. कॉमिक्स वाचण्यासाठी जात असल्याचं सांगितले. दिवाळीचा होमवर्क न केल्याबद्दल क्षेत्रे म्याडम ने त्याला ३०० उठाबशा काढायला लावल्या आणि त्यामुळे ८ दिवस तो चालु शकला नव्हता हे ही त्याला आठवले. संजय संघवी दिपकची आठवण सांगतांना शेवटी म्हणाला की एक म्हण पुर्ण करायला सरांनी सांगितली होती. "साखरेचे खाणार त्याला.... " तर या महाभागाने " .....त्याला गुळ कोण देणार' असे सांगितले होते.

नंतर डॉ. माधव अहिरे उभे राहिले. त्यांनी बी.जे.ला असतांना त्याच्या रुमवर कसे सगळे मित्र पडीक असायचे ते सांगितले. नंतर, मढीकर सरांच्या इंग्रजीच्या तासाला ते पुस्तक धरुन कसे उभे रहायचे ते प्रात्यक्षिक करुन दाखवले.आणि असे उभे राहिल्यावर पहिल्या बेंचवर बसलेले माधव नि...सरांच्या दुसर्या हाताच्या बोटांवर शाईचे थेंब कसे ओतायचे हे सांगुन आपणही काही कमी नव्हतो हे दाखवले. आणि मग एकदा सरांच्या लक्षात आल्यावर ते 'दिव्याखाली अंधार' असं काहीसं म्हणाल्याचं ही त्याला आठवलं!

प्रा. यशवंत साळेंनी भापकर सरांच्या होकायंत्राची आठवण सांगितली. यशवंत साळेने एकबोटे सरांची आठवण सांगतांना म्हणाला की बी. एस्सी अॅकग्रीच्या व्हायव्हाला एक्स्टर्नल सर म्हणुन एकबोटे सर येणार म्हटल्यावर तो खुश झाला होता आणि काहीही अभ्यास न करता गेला होता. प्रत्यक्ष व्हायव्हाच्या वेळेस, एकबोटे सरांनी प्रश्न विचारल्यावर त्याने फक्त "मी राहुलचा मित्र आहे'" एवढच उत्तर दिल्यावर एकबोटे सर छानसे हसले होते!...स्काऊटच्या कॅम्पला भज्या तळायची हौस आली तर म्हणे भज्यांच्या पीठात अंडी टाकुन तळल्या.आणि राहुलसारख्या व्हेजींना खाउ घातल्या.
यशवंत साळेने इच्छा प्रदर्शित केली की ,आपण आता एकत्र जमलोच आहोत तर असं काही कार्य करुया की एकमेकांच्या आपण उपयोगी पडु. आपण तर सर्व सेटल आहोतच, पण आपल्या मुलांनाही काही गरज लागली तर एकमेकांना मदत करुया.

सुहास कदम ही पण एक हसतमुख असामी. पर्सनॅलिटी अशी की हा ही मला पहिल्यांदा राजकारणात आहे असेच वाटले. त्याने पण मजेदार आठवणी सांगुन रंगत आणली.
कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

नंतर उठला राजकुमार भिंगार्डे! हा उभा राहिल्यावर तर मला वाटले की इलेक्शन क्यांपेनलाच कुणी उभा आहे. आणि आता म्हणेल," नयना ताई, विसरु नका बरं ! आपला पक्ष... ! राजकुमारची मस्त आठवणः माधव आणि राजकुमारला घाम फार यायचा. त्यांनी प्रविण मानकरकडे हातरुमाल मागितला तर त्याने दिला नाही म्हणुन यांनी त्याचं लक्ष नसतांना गुपचुप त्याच्या खिशातुन काढला.आता तो घाम पुसुन परत जागच्या जागी ठेवावा ना, तर नाही. या टारगटांनी तो वर फॅनवर टाकला. झालं !प्रविणच्या लक्षात आल्यावर त्याने शेवाळे सरांना नाव सांगितले, की कुणीतरी त्याचा रुमाल फॅनवर टाकला. आणि सरांनी नेमके राजकुमारलाच बेंचवर चढुन रुमाल काढायला सांगितले.

मग आपले स्पोर्टस मास्तर मजिद उभे राहिले. आख्ख्या १५ मिनिटाच्या भाषणात मला फक्त एवढेच कळले की:
१. त्याच्या कॉमेंट्रीची किर्ती आख्ख्या एसपीएमव्ही मधे पसरली होती.
२. तो आता पुणे जिल्ह्यातल्या अॅाथलेटीक्सचा हेड कोच आहे.पोरांना घडवतो.
३. त्याच्या स्टुडंट्सने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत.
४. मढीकर सर, साबळे सरांमुळे त्याचं इंग्रजी एवढं पक्क झालं की तो सगळा इंटरनॅशनल करस्पाँडन्स एकटा हाताळतो.
५. कमी शिकलेली एसपीएमव्हीची मुले सुद्धा आपापल्या क्षेत्रात टॉपवर आहेत. हेच आहे एसपीएमव्हीचे संस्कार.

नंतर मॉनिटर राहुल त्याच्या फॅमिलीसहीत उभा राहिला. राहुलने आठवण सांगितली. .. की प्राथमिक शाळेच्या पाण्याच्या टाकीजवळ एका खड्ड्यात पाण्यात तो कसा पडला tantrumsmiley.gif आणि कदम सरांनी त्याला मानगुटीला धरुन मांजरासारखं कसं बाहेर काढलं हे राहुलला आठवलं तसच तो एका रविवारी केंजळेबरोबर बॉम्बे कॉलनीजवळ मटणाची दुकानं होती, तिथे मटण कसं करतात याची पुर्ण प्रोसिजर पहायला गेला होता. पण त्यानंतर देशीविदेशी फिरुन देखील त्याची नॉनव्हेज खाण्याची कधीच इच्छा झाली नाही.. हे ही नमुद केलं!

नंतर आला सुनिल राऊत! शेवाळे सरांची आठवण सांगतांना तो म्हणाला की सर नेहमी म्हणायचे," तुम्ही मुळा डॅमला रहातात ना! कधीतरी डॅमवर जा. मेंदु बाहेर काढा, दगडावर घासुन पुन्हा डोक्यात फीट करा."

डॉ. दिपक जोशीला खुप काही काही आठवत होते. त्याने मजा सांगितली...की गृहपाठ कधीच पुर्ण नसायचा. म्हणुन हे दोघं तिघं 'उगळे'ची कम्प्लीट असलेली वहीच वरचं पान फाडुन आणि स्वतःचं नाव टाकुन पुढे करायचे.पण एकदा,एकाकडुन वही दुसर्याकडे पास झालीच नाही... तेव्हा दिपकला मार बसला.

सुयोग जोशीला तर अनेक गोष्टी आठवतच नव्हत्या म्हणुन त्याने कागदावर लिहुनच आणले होते.

मधुकर लोंढे:हे गृहस्थ जरा खात्या पित्या घरचे वाटत होते.बोलायला उभे राहिले तेव्हा इतरांची बोलतीच बंद केली.त्यांच्याही आठवणीप्रमाणे ते ब्याक बेंचर होते.११वी १२वीत असतांना मागच्या मागे पळुन जाऊन शाळेशेजारी असलेल्या पेरुच्या बागेत उरलेला अभ्यास करायचे म्हणे.आणि एकदा तर पेरु आणुन वर्गात खात असतांना भापकर सरच मागे येउन उभे राहिले.गायकवाड खिशात मीठ मिरचीच्या पुड्या ठेवत असे. मागच्या बेंचवरचे ६ जण एकदम क्लास बुडवुन बागेत पळायचे.

कुणालाही कल्पना नसेल पण बाळू घाडगेने आठवणींची पोतडीच आणली होती. त्याने त्यातुन एकेक आठवणी बाहेर काढायला सुरुवात केली नि सगळे पोट धरुन हसत होते.. डॅमच्या बसमधे येणारे मुले बहुतेक टारगटच होती. आणि बसमधल्या मुलांची लक्तरे काढायची त्यांची सवय. बाळुला जबरदस्त भूक लागायची ( तसं त्याच्याकडे बघुन वाटत नाही) म्हणुन त्याचा दोन ताली डबा असायचा..भाजी भाकरीचा. लास्ट बेंचवर बसायचा...पण जेव्हापासुन आसावरी आली आणि आसावरी व रेखा दोघी यांच्या लायनीत एका बेंचवर बसायच्या तेव्हा या पोरांना त्यांची फार दहशत वाटायची. एकदा याने दोघींची बेंचवर बसतांना उडणारी तारांबळ पाहुन,'तुम्ही वन बाय वन बसा' असं म्हटल्यावर आसावरीने डोळे वटारले होते हे ही सांगितले. राहुलच्या नीट लावलेल्या दफ्तराकडे पाहुन त्याचा हेवा वाटायचा.बी जे मेडीकलला माधव अहिरे असतांना त्याच्या नावावर कितीतरी वेळेस मेसमधे जेवण हे सगळं त्याला आठवलं.
निलीमा पाटीलः निलुने आणि तिच्या नवर्याने ओळख करुन दिल्याबरोबर कुणीतरी मागे बसलेलं पचकलं की," हिच्यामुळे केस पांढरे झाले का हो?".तशी निलु एकदम गोरी मोरी झाली. तिने खुप आठवणी सांगितल्या. राष्ट्रीय सणांच्या वेळेस नानकटाई पॅकींगसाठी बेकरीत नेले जायचे. शेवाळे सर, ज्ञानदेवी बल्लाळ आणि शारदा.. यांना नेहमी म्हणायचे," बघा, नाव ज्ञानदेवी, आणि ज्ञानाचा पत्ता नाही."!मंटीकडे जायला कंपाउंडच्या भिंतीवरुन उड्या मारुन जायचो. पण तिथे गेल्यावर मंटी "आई झोपलेली आहे, आवाज नका करु" असं म्हणुन सर्वांना गप्प करायची. प्राथमिक शाळेच्या मागे कार्यानुभवच्या तासाला मागे भाजीपाला लावला होता. निलिमा म्हणाली की डॅमच्या बसमधे मुले मुद्दाम मागचे सीट पकडायला पळायची यासाठी की बस उधळली तर पार बसच्या टपापर्यंत उडायचे.वर्गात आसावरी च्या आगमनापुर्वी रेखा ही एकमेव उंच व धिप्पाड मुलगी. कबड्डी खेळतांना “कबड्डी कबड्डी” म्हणत आली की एका खेपेत ५-६ मुलींना घेउनच जायची.

डॉ. चंद्रशेखर केंजळे आणि फॅमिली, संजय पवार (नाशिक), प्रविण मानकर, संजय देवरे (धुळे), रमेश पालकर, सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त केले.

श्री. महेश म्हसकर हे मागच्या गेटटुगेदरला ही भेटले होते. येतांना मी त्यांच्या गाडीतच आले होते. मधे ही कित्येक वेळेस आमचे फोनवर बोलणे झाले. पण घाटगे फार्मला पहिल्या प्रथम त्यांनी मला ओळखलेच नाही. वर निलीमा चौधरीला आडुन आडुन "ही नयना' ना गं?" असं विचारतांना आढळले. त्याबद्दल त्यांना पुढच्या गेटटुगेदरला झाडुन सगळ्या हजर लेडीजची नावं ओळखण्याची शिक्षा देण्यात आली आहे.

विरेश आजरी: विरेश आजरी तर म्हणाला, की सर त्यांना नू.म्.वि. (नुकतेच मवाली विद्यार्थी) असं म्हणायचे. शेवाळे सरांनी पोटाला काढलेले चिमटे, टोचलेले खडु हे ही त्याला आठवले. आणि शिवथरे सर एका हाताने कधीच कानफटात मारायचे नाहीत. दोन्ही हातांनी कानावर फाटदिशी वाजवायचे.
मंटी: मंटीबाई तर विद्यापीठात रोडवरुन चालल्याच नाहीत हे त्यांना आता आठवलं. नेहमी भिंतींवरुन उड्या मारत चालायचं. मला ती पुढच्या जन्मी काय होणार आहे याची फार्र फार्र उत्सुकता आहे.मंटीच्या बोलण्यात इतक्या वर्षांनंतर भेटल्याने खुपच एक्साईटमेंट दिसत होती. मंटीने एकदा रावसाहेब माळीला बदडुन काढले होते आणि खुप लागल्यामुळे तो वडीलांना घेउन शाळेत आला होता... हे मंटीला आठवले. एकदा तर दुसरीत असतांना या बाईने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला भाषणाला उभी राहिल्यावर "आज आपल्या सर्वांची पुण्यतिथी आहे' असं बोलुन बॉम्ब टाकला होता.

सुरेखाला तर आठवले की तिची नी संजु मोरेची इतकी जबरदस्त टक्कर झाली होती की त्याचा व्रण अजुनही तिच्या कपाळावर आहे.माधव तिच्या वेण्या ओढायचा.

सुनंदा ससाणे. ही बाई मोठी धीराची.तिच्या आठवणी अतिशय हृद्य होत्या. तिची आई चार घरची भांडी धुण्याची कामं करायची. वडील शिपाई. आम्हाला आठवलं आम्ही वर्गातल्या सगळ्या मुली तिच्या घरी डिग्रजला गेलो होतो. एका झोपडीत रहायची ती. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहेच्..लवकर लग्न झालं तरी नंतर तिने शिक्षण पुर्ण केलं! डी.एड, बी.एड केलं, जि.प.च्या शाळेत मास्तरीण म्हणुन लागलीये. पण आपल्या दोघी मुलांनाही तिने डॉक्टर बनवले. सर्वांनाच फार कौतुक वाटलं तिचं! हॅट्स ऑफ टु सुनंदा!!!
नंतर स्वतः एकबोटे काका समोर बोलायला उभे राहिले. त्यांनी तर प्रत्येकाला, काहींच्या तर वडीलांचे पुर्ण नावही सांगितले. ही ८४ ची बॅच इतक्या वर्षानंतर भेटलीये तर आम्ही पुढेही समाजोपयोगी काय काय करु शकतो याबद्द्ल त्यांनी मार्गदर्शन केले.ते करतांना ते उदाहरणादाखल म्हणाले की त्यांचा स्वतःचा असा ६० रिटायर्ड लोकांचा ग्रुप आहे. ते ही कायम भेटत असतात.समाजकार्यात बरोबरीने सगळे मदत करतात. जमा झालेल्या निधीचा योग्य विनियोग करतात.
तेवढ्यात मधली सुट्टी झाल्याची घंटा झाली.दिवंगत वर्ग मित्र/मैत्रीणींना श्रद्धांजली अर्पण करुन आम्ही जेवणाच्या हॉलकडे कूच केले. बाजरीची भाकरी, ठेचा, पिठलं, दोन भाज्या, वरण भात, मसालेभात, जिलबी, ताक असा फर्मास बेत होता. तिथे मग सर्वांनीच आडवा हात मारला. जेवतांना खुप धम्माल आली. एकीकडे आठवणी निघत होत्या. सुरेखाच्या घराच्या कंपाउंडमागे 'गुंजेचं झाड' होतं हे मला आठवलं! सुरेखाचे सुंदर अक्षर कुणाला आठवले तर कुणी वर्षा देसाईची आठवण काढली. मला तर आठवीत असतांना 'हैद्राबाद' इथे ट्रीप गेली होती तेव्हा कुठल्या तरी 'पुर्णा' स्टेशनवर कुणीतरी निलिमा चौधरी बसलेल्या काचेच्या खिडकीला दगड मारला नि निलुच्या डोळ्यात काचा घुसल्या होत्या हे आठवले. तसेच कुणी टारगट मुलाने वरच्या फळ्याच्या बर्थवर झोपलेल्या एका मुलीची वेणी व त्याचबरोबर तिच्या ड्रेसचा कंबरेचा बेल्ट याची गाठ बांधली नि ती मुलगी कशी बोंबलत उठली हे ही आठवले. जेवतांना निलुने इकडे तिकडे बघुन हळुच सांगितले कि तिला शाळेत असतांना राहुल फार शिष्ट वाटायचा. एकीकडे जेवणाच्या चवीने तर एकीकडे गप्पांनी पोट भरत होते. हशा आणि टाळ्यांचा कल्लोळ इतका होता की आमच्या व्यतिरिक्त आलेले इतर लोक ही आमच्याकडे बघत होते. घाडगे रिजॉर्ट प्रशासनाने डोक्याला हात मारुन घेतला होता. आणि राहुलला एकीकडे बोलावुन," तुमच्या फॅमिलीला घेउन आलात तरच एंट्री देऊ, पुन्हा एसपीएमव्ही गेट टुगेदर इथे करु नका" अशी तंबीही दिल्याचं ऐकिवात आहे.
जेवण झाल्यावर ग्रुप फोटोची टुम निघाली. त्यासाठी लॉनकडे जात असतांना एक वयस्कर स्त्रीपुरुषांचा ग्रुप दिसला. तेव्हा माधवला फार्र फार भरुन आलं नि तो सद्गदीत आवाजात म्हणाला,” कदाचीत काही म्हणजे १०-१५ वर्षांनी आपणही असच दिसु आणि असच इथे येउ!"

फोटोसेशन आटोपलं लगेच सगळ्यांची निघायची घाई सुरु झाली. तरी राहुलने 'चहा येइल इतक्यात' असं सांगुन तासभर थोपवुन ठेवलं. पुन्हा गोलाकार बसलो. आसावरीने टुम काढली सर्वांनी उखाणे घ्यावेत. सर्वात शेवटी तिनेही एक जबरदस्त लांबलचक उखाणा घेतला.

चहा झाला.. सर्वांनाच पुढे जायची घाई होती. पण कुणाचाही पाय निघत नव्हता. रेंगाळणार्या जड पावले गाड्यांमधे परतत होती. गाड्या सुटल्या....खिडकीतुन निरोपाचे हात हलले...!
खरय! म्हणतात ते!

स्नेहाचे असे चार क्षण
कधीतरीच वाट्याला येतात.
थांबावे असे वाटत असतांनाच
निसटुन जातात…
जपुया ओंजळीत,
असेच हळवे क्षण…
मनाच्या एका कप्प्यात...
सावित्रीबाईने दिलेली शिदोरी म्हणुन
..
..
किमान आयुष्यभरासाठी!

माझ्या या सगळ्या वर्ग मित्रमैत्रीणींचा भरपेट उत्साह आणि साथ यांनी हे गेट टुगेदर यशस्वी झालं! खुप नॉस्टॅलजीक वाटलं! एकेक जण आठवणी सांगत असतांना आम्हीही त्याच्याबरोबरच वर्गात फिरुन येत होतो. शाळेचे ते निरागस दिवस सगळेच 'मिस' करत होते. खरं तर प्राथमिक शाळेची तरी पक्की इमारत होती. पण माध्यमिक ला तर पत्र्याचे छत आणि भिंती असलेल्या वर्कशॉप्समधेच पार्टीशन टाकुन वर्ग बनवले गेले होते. पावसाळ्यात पत्र्यावर टपटप थेंब वाजु लागले की सर शिकवणे थांबुन पाढे म्हणायला लावत. पण म्हणतात ना, शाळा म्हणजे चार भिंतींची निर्जीव इमारत नाही. तर त्यातील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनी शाळा बनते.
मजिद म्हणाला तसं, सावित्रीबाईने जे संस्कार आपल्यावर रुजवलेत ते इतके खोलवर आहेत की प्रयत्न करुनही कुणी वाईट मार्ग अवलंबणार नाही याची मला खात्री आहे. शेवाळे सर, शिवथरे सर यांच्या छड्या/ काठ्या खाऊन आम्ही इतके कणखर झालेलो आहोत की आयुष्यातल्या कुठल्याही संकटाला समर्थपणे परतवण्याची आमच्यात जिद्द आहे.

प्राथमिक शाळेत शेवटच्या तासाला सर्वांनी मिळुन एका सुरात म्हटलेले 'बे एके बे' चे पाढे, दोन बेंचच्या लाईनींमधे येउन 'माझ्या मामाची रंगित गाडी हो, तिला खिल्लार्या बैलांचे जोडी हो" असे नाचत नाचत म्हणणे..ते रुसवे-फुगवे, "माझी मूठ उघड' असं डोळ्यात पाणी आणुन म्हणणे, शाईच्या एकेका थेंबाची केलेली वाटावाटी, आणि शाई नाही दिली तर," ए, मी कसं तुला १५ दिवसांपुर्वी ४ थेंब शाई दिली होती" असं म्हणत मागितलेली परतफेड, रस्त्यात लागणारं ते 'भैरोबा'चं दगडी मंदीर, सूर्यफुलांच्या बिया वेचणे, शाळेच्या रस्त्यावर असलेली 'तुती'ची झाडे, बेकरीच्या बाहेर सापडलेले अभ्रक आणि त्यासाठी भांडाभांडी, वर्कशॉपच्या उतारावर वर्तुळाकार बसुन डबा खाणे, दसरा दिवाळी आली की आपापल्या वर्गांची साफसफाई, कुठल्याही स्पर्धेची नोटीस आली नि मॅडमने विचारले की भाग घेण्यासाठी वर झालेली बोटे... सगळं सगळं आठवलं.

खरच, ते फुलपाखरी दिवस परत येतील? fly2.gif

गुलमोहर: 

...

ओए मस्त लिहले.

खरेच .. आर्ये.... त्या दिवसांच्या आठवणीने मन भरुन येतं .... ... आणि असे वाटते ते दिवस फक्त आठ्वणीतच जमा झाले का?.... पण नाही ह्या अश्या गटग मुळे... बालपणीचे ते मित्र मैत्रीणी भेटणे शक्य आहे नाही का?... खुप छान वाटले वाचुन Happy

अनेक वर्षांनी भेटताना एक वेगळीच मजा वाटत असते. मधल्या वर्षांमधे काय काय घडून गेले असेल याची उत्सुकता असते. काही दिवसांपुर्वी मला माझा एक वर्गमित्र अचानक भेटला आम्ही तब्बल २२ वर्षांनी भेटत होतो. मला म्हणाला की तुझा चेहेरा फारसा बदललेला नाही त्यामुळे लगेच ओळखले.

वा! खूपच मजा केलेली दिसतेय तुम्हा सर्वांनी.
आर्या,वाचतांना मलाही तुमच्यात सामील झाल्यासारखं वाटलं.

सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद! Happy
अगदी खरं आहे. ..इतक्या वर्षांनंतर भेटलो तरी ओळखीच्या खुणा असतात चेहर्‍यावर!

सुरेख!!! Happy

त्या दिवसांच्या आठवणीने मन भरुन येतं .... ... आणि असे वाटते ते दिवस फक्त आठ्वणीतच जमा झाले का?.... पण नाही ह्या अश्या गटग मुळे... बालपणीचे ते मित्र मैत्रीणी भेटणे शक्य आहे नाही का?... खुप छान वाटले वाचुन>>>>>>स्मितुला १००० मोदक. Happy

नॉस्टेल्जिक होऊन ओघवत्या भाषेत लिहिलेला लेख आवडला.
शाळेतले मित्र, मैत्रिणी भेटणं हा आनंद आगळाच असतो.

वाह, वाह

छोटी बातें, छोटी बाते;
छोटी छोटी बातोंकी है यादे बडी,
भूले नही ,
बीती हुई एक छोटी घडी....

आर्ये, मस्तच लिहिलस ग. फोटोही छान आलाय. Wink बालपणीचा काळ सुखाचा. Happy
खूप आनंद होतो बघ, असं पुर्वीच कोणी भेटलं की. मी पण हल्लीच माझ्या एका मैत्रिणीच्या, मोबाईल नंबरचा शोध लावला. आणि आम्ही चक्क १५ वर्षानंतर एकमेकींशी बोललो. तिनेही माझा आवाज त्वरीत ओळखला. दोघीनाही इतका आनंद झाला होता, की आवाजातून तो प्रतित होत होता. अजून प्रत्यक्ष भेटायचे बाकीच आहे. Proud

फारच मस्त लिहीलेयस आर्ये...अगदी सगळ्यांचे वर्णन वाचल्यावर ते डोळ्यासमोर उभे राहीले...थोड्या फार फरकाने आमच्या वर्गातली कारटीपण अशीच होती. आता त्या सगळ्यांना भेटावेसे वाटू लागलेय

धन्स जिप्सी, बाजो, आशु, शोभा, वर्षा, उकाका!

शोभे...तुझा आवाज मला १५ वर्षानीही विचारला तर ओळखु शकेन. Proud
आशु, गंमत म्हणजे बॅक बेंचर्सकडेच आठवणींचा जास्त खजिना होता. मी त्यात किरकाडी (बारीक) नि बुटकी असल्याने कधी पहिला बेंच सोडला नाही. ही कारटी मागे इतकी मस्ती करत होती आपण हे सगळं मिसलय याची आता खंत वाटते.

त्याने आक्षेप घेतला की सर्वांच्या विशेषतः पुरुष मंडळींच्या बेटर हाफ बरोबर आहेत तर काही उखाळ्या पाखाळ्या निघुन २०-२५ वर्षांपासुन 'बंद मुठ्ठी' उघडतील. कुणीतरी त्यावर म्हणालं की अरे, हाच तर खरा चान्स आहे, बदल करायचा. नक्की काय बदल करणं अपेक्षित होतं हे मला शेवटपर्यंत कळ्ळं नाही.>>> त्यांना बदला घ्यायचा म्हणायचे असेल. Happy

फारच छान लिहिले आहेत तुम्ही, माझ्या निवडक १० त.

.... शाईच्या एकेका थेंबाची केलेली वाटावाटी, आणि शाई नाही दिली तर," ए, मी कसं तुला १५ दिवसांपुर्वी ४ थेंब शाई दिली होती" असं म्हणत मागितलेली परतफेड, <<< टडोपा. सुखद आठवणी. उत्त्तम लिखाण. पुढच्या गटगचा वृत्तांत?

खूप सुंदर लिहिलंय आर्या. नवऱ्याच्या नोकरीनिमित्याने पावणेचार वर्षे श्रीरामपूर येथे होतो, तेव्हा राहुरीला जायचो अधून-मधून, तिथल्या बागेत मुलाला घेऊन जायचो, बालाजी मंदिरातपण गेलो होतो.

आमची १९८४ची दहावीची batch पण आमची शाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर- डोंबिवली, ५ महिन्यापूर्वीच आमचेपण गटग झाले, हे वाचताना सगळे आठवले, मला नाही इतक्या छान शब्दात लिहिता येणार, तुम्ही खूप छान लिहिलेत तुमच्या शाळेबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल, गुरुजनांबद्दल.