'देऊळ'च्या निमित्ताने श्री. दिलीप प्रभावळकरांशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 October, 2011 - 01:38

अष्टपैलू अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांनी 'देऊळ'मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या अगोदर त्यांनी उमेश कुलकर्णी यांच्या 'वळू' या चित्रपटातही अभिनय केला होता.

'देऊळ'च्या निमित्ताने या चित्रपटाबद्दल, उमेशबद्दल आणि नाना पाटेकर, नासीरुद्दीन शाह या त्यांच्या सहकलाकारांबद्दल त्यांची मतं जाणून घेण्यासाठी मारलेल्या या गप्पा..

dp1.jpg

'देऊळ'बद्दल, त्यातल्या तुमच्या भूमिकेबद्दल काही सांगाल का?.

या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आप्पा कुलकर्णी असं आहे. शहरी आधुनिकतेचं वारं लागल्याने बदलत जाणारं गाव, गावातली बदलणारी पिढी या चित्रपटात आहे. या गावातली माणसं शहरी आधुनिकतेच्या, शहरी संपन्नतेच्या पाठी लागलेली दिसतात. त्यापायी त्यांच्या सुखाच्या व्याख्या बदलतात, मूल्यं बदलतात हे प्रेक्षकांना चित्रपट पाहताना जाणवेल. बदलत जाणार्‍या जगाचा झपाटा अंगी बाणवण्याचा त्यांचा अट्टहास दिसतो. बदलासाठी अजून त्यांची मानसिक तयारी पूर्णपणे झालेली नाही, पण बदलायचा अट्टहास मात्र आहे, अशा विरोधाभासातून विनोद निर्माण होतो. चित्रपटातले संवाद आणि व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संवादांना विनोदाची डूब आहे. व्यक्तिरेखांच्या ठायी असलेला इरसालपणा हा चित्रपटात अर्कचित्रांच्या धाटणीने येतो. संवादांतून, प्रसंगांतून, माणसांच्या स्वभावदर्शनातून त्यातला विनोद फुलत जातो. मात्र माझी चित्रपटातली व्यक्तिरेखा अर्कचित्राच्या पद्धतीची नाही. गावातल्या सगळ्या बदलांचा तो साक्षीदार आहे. गावात अवास्तव, अतिरेकी बदल होत असल्याने संवेदनशील माणसांची जशी घुसमट होते तशीच कुलकर्णीची (माझं या चित्रपटातलं नाव) घुसमट होते. चित्रपटातल्या व्यक्तिरेखांचा मासलेवाईकपणा, इरसालपणा, विनोद, त्यांच्या करामती या प्रेक्षकांना हसवतील, पण त्याचबरोबर चित्रपटाचा आशयही त्यांना भिडेल, असं मला वाटतं. प्रेक्षकांना हा चित्रपट अंतर्मुख करील.

चित्रपटाबद्दल बोलताना नानाचा उल्लेख टाळून चालणार नाही. नानाबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे. आम्हां दोघांची पार्श्वभूमी सारखी आहे. वेगवेगळ्या नाट्यसंस्थांच्या माध्यमातून आम्ही छबिलदास चळवळीत सामील झालो होतो. नाना हिंदी चित्रपटांतला स्टार आहे आणि त्याला चित्रपटमाध्यमाचा खूप अनुभव आहे. नानाबरोबर पहिल्यांदाच काम करताना त्याचं भूमिकेत शिरणं, भूमिकेतली गुंतवणूक बघण्यासारखी होती.

या चित्रपटातल्या तुमच्या व्यक्तिरेखेशी तुम्ही रिलेट करू शकलात का?

हो. 'देऊळ'मधल्या माझ्या व्यक्तिरेखेची भूमिका, विचारप्रक्रिया आहे, ती मला दिलीप प्रभावळकर म्हणूनही जाणवली. हल्ली धर्माचंही बाजारीकरण झालं आहे आणि ते संवेदनशील माणसाला नक्कीच खटकतं. हे खटकणं चित्रपटाच्या भाषेतून इथं व्यक्त झालं आहे. ती घुसमट मलाही जाणवते, म्हणून कदाचित मला ही भूमिका परिणामकारकपणे रंगवता आली असावी.

'वळू' हा उमेशचा पहिला चित्रपट. तुम्ही अशा अनेक नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. उदा. अजय फणसळकरांचा ’रात्र आरंभ’. उमेशबरोबर चित्रपट स्वीकारताना 'हा दिग्दर्शक या चित्रपटाला नीट न्याय देऊ शकेल का', असं कधी मनात आलं का?

मला चित्रपटातलं काहीतरी खुणावतं, आकर्षित करतं, म्हणून मी तो स्वीकारतो. नाईलाज म्हणून, इच्छा नसताना मी सहसा कुठलाच चित्रपट करत नाही. चित्रपटाला ताकदवान पटकथा, अभिनय लागतो, हा भाग आहेच पण चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, असं मला वाटतं. मला उमेशचं वेगळेपण त्याच्या चित्रपटाच्या कथानकातून, हाताळणीतून जाणवलं. अजय फणसेकरांचाही 'रात्र आरंभ' पहिला चित्रपट होता, त्यातली भूमिका मला आव्हानात्मक वाटली. इथे उमेश आणि गिरीशची माध्यमाची समज आणि काहीतरी नवीन करून बघण्याची धडपड मला भावली.

उमेश हा चित्रपटमाध्यमाची जाण असलेला, त्याबाबत विचार करणारा आणि काहीतरी वेगळं देऊ पाहणारा दिग्दर्शक आहे. तो दृश्यमाध्यमाच्या भाषेतच विचार करतो. चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग करून पाहणं वगैरे गोष्टी तो खूप मनापासून करतो. त्याच्याबरोबर वळू करताना वळूचा आवाका, आशय आणि सादरीकरण पाहूनही मला हे जाणवलं होतं. त्याचा 'विहीर' हा चित्रपटही मी पाहिला आहे. या तिन्ही चित्रपटांमध्ये सर्वांत चांगली कथा मला 'देऊळ'ची वाटली. या चित्रपटाची कल्पना ही उमेश आणि गिरीश या दोघांच्या विचारांतून आली आहे. दोघांनी यासाठी भरपूर अभ्यास केला आहे. त्यासाठी ते बरेच फिरले आहेत. त्यांनी गावं बघितली आहेत, तिथली माणसं, तिथली परिस्थिती बघितली आहे. त्यामुळे चित्रपटातल्या सगळ्या व्यक्तिरेखा अस्सल आहेत.

या चित्रपटात नासीरुद्दीन शाह पाहुणे कलाकार म्हणून आहेत. तुम्ही आधीही त्यांच्यासोबत काम केलं आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

मी पूर्वी त्यांच्याबरोबर 'एन्काउंटर' या हिंदी चित्रपटात काम केलं होतं. माझी खलनायकाची भूमिका होती त्यात, आणि संपूर्ण चित्रपट आम्हां दोघांभोवती फिरणारा होता. या चित्रपटात मात्र आमच्या दोघांचे एकही एकत्रित दृश्य नाही. त्यांचं केवळ एक दिवसाचं शूटिंग होतं, आणि नेमका तेव्हा मी चित्रीकरण स्थळी नव्हतो. आधी त्यांच्यासोबत काम केलं तेव्हा मी त्यांचं निरीक्षण करत असे. त्यांची संवादफेक, त्यांचा अभिनय हे प्रत्यक्ष बघणं, हाही एक अनुभव असतो. 'देऊळ'मध्ये ते मराठी कसे बोलतात, कसे काम करतात, हे पाहायला आवडलं असतं.

खरं म्हणजे आवडत्या कलाकाराबरोबर काम करताना, तुमची भूमिका करणं, आणि त्या कलाकाराचं निरीक्षण करणं, या दोन्ही गोष्टी एकत्र जमणं अवघड असतं. नानाबरोबर मी या चित्रपटात पहिल्यांदाच काम केलंय, त्यामुळे त्याच्या कामाचं निरीक्षण करणं, हा एक फार छान अनुभव होता माझ्यासाठी.

विषय: 
Groups audience: 

प्रभावळकरांसारख्या संवेदनशील 'माणसा'चे प्रांजळ विचार भावले.

मुलाखत फारच त्रोटक नाही का वाटत? प्रभावळकरांचे आणखी 'देऊळ' अनुभव जाणुन घ्यायला नक्कीच आवडतील.

त्रोटक वाटते, कारण ती फक्त प्रोमोसाठी असणार. तशीच वाचायची.
प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रभावळकर तरी बिचारे नवीन काय सांगणार. Happy

'देऊळ'च्या निमित्ताने त्यातल्या कलाकारांशी साधलेल्या छोटेखानी संवादांतला हा पहिला संवाद. अजून इतरही कलाकारांच्या मुलाखती येणार आहेत. त्यामुळे मुद्दामच त्या थोड्या त्रोटक, अनौपचारिक स्वरूपाच्या अशा ठेवल्या आहेत.

'देऊळ' प्रदर्शित झाल्यानंतर अर्थातच हे कलाकार 'देऊळ'च्या वेळच्या अनुभवांबद्दल, चित्रपटाच्या कथेबद्दल किंवा एकूणच चित्रपटाबद्दल जास्त बोलू शकतील.

छान मुलाखत.
'देऊळ'मध्ये ते मराठी कसे बोलतात, कसे काम करतात, हे पाहायला आवडलं असतं.>>>> हे पहायला प्रेक्षकांनासुद्धा नक्कीच आवडणार.

प्रमोशनसाठी असल्याने मुलाखत म्हणण्यापेक्षा आजकाल ज्याला "बाइट" म्हणतात त्या प्रकारातला हा दिलीप प्रभावळकरांचा बाइट.
मुलाखत चांगली झाली आहे. अजून वेगवेगळ्या बाइट्सच्या प्रतिक्षेत.

छान आहे मुलाखत. प्रभावळकरांच्या सहसा सगळ्याच भुमिका आवडतात. Happy
बाकी कलाकरांच्या सुद्धा मुलाखती वाचायला आवडतील.

दिलिप प्रभावळकर ग्रेट आहेत !
नासिरुद्दिन शाह कसं मराठी बोलतात , काय भूमिका आहे याची उत्सुकता आहे, त्यांची मुलाखत वाचायला पण आवडेल.

मुलाखत त्रोटक मुळीच नाही. कारण 'देऊळ' आणि 'देऊळ' शी संबंधीत सर्वच कलाकार आणि इतर मंडळी मुरलेली आहेत हे आपल्याला ठाऊकच आहे. अभिनय क्षेत्रातल्या मातब्बर मंडळींना घेऊन धार्मिक विषयाला हात घालून उमेश आणि गिरीश आणखी एक सुवर्णमुद्रा आपल्या पदरी पाडून घेणार यात वादच नाही. उमेशच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाचे लोकेशन्स, त्यातल्या पात्रांचा साधेपणा, चालता बोलता अनुभवलेले विनोद हे सगळं भारावून सोडणारं आहे. 'वळू' मधेही तेच पहायला मिळालं. संपुर्ण सिनेमा वळूच्या पाठीवर बसून गावभर उदडून पाहिल्या सारखाच वाटला. तसंच 'देऊळ' नाही पण एखादी 'देवळी' तरी नक्कीच प्रत्येकाच्या घरात,मनात नक्की दिसेल आणि तेच कदाचित 'देऊळ'चं यश असेल.

'देवा तुला शोधु' ऐकलं खरोखर अंतर्मुख करणारं गाणं आहे ते. Happy
शुभेच्छा आणि अभिनंदन. 'देऊळ' सतत प्रकाशमय राहिल.