उद्योजक आपल्या भेटीला- विजय पाध्ये

Submitted by साजिरा on 10 October, 2011 - 07:23

नियतकालिकांची सतत बदलती धोरणं, ग्राहकांच्या सारख्या वाढत असलेल्या अपेक्षा, जागतिकीकरण आणि स्पर्धा, व्यावसायिकता आणि मित्रत्वाचे संबंध यांचा सतत घालावा लागणारा मेळ, पैसे थकण्याचं वाढतं प्रमाण.. ही न संपणारी यादी आहे सध्याच्या कुठल्याही जाहिरात संस्थेच्या, एजन्सीच्या दुखण्यांची. छोट्या-मोठ्या, नव्या-जुन्या अशा सार्‍याच कंपन्यांना कमीजास्त प्रमाणात भेडसावणार्‍या या समस्या. खरंतर अशा प्रश्नांचा हात धरतच कुठलीही व्यावसायिक संस्था वाढते, बहरते, पुढे जाते. तरीही या प्रश्नांचं संधीमध्ये रूपांतर करत ग्राहकांशी आणि समाजाशी असलेली बांधिलकीही जपणारे विरळाच.

मुंबईच्या 'बीवाय पाध्ये पब्लिसिटी'चे विजय पाध्ये हा असाच एक कलंदर. एक व्यावसायिक म्हणून जितका आदर्श, त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून मोठा. साठी ओलांडलेले पाध्ये हे 'बाबा' या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. जाहिरात एजन्सीचा वाढता पसारा सांभाळतानाच त्यांनी स्वतःतला 'माणूस'ही वाढवला. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाणार्‍या मिश्कील, मनमिळावू, निगर्वी, नि:स्वार्थी बाबांनी असंख्य लोकांच्या आणि मित्रपरिवाराच्या हृदयात अढळपद मिळवलं आहे. म्हणूनच त्यांच्या साठीच्या कार्यक्रमात भारतकुमार राऊतांनी 'मनस्वी आणि मनाने चिरतरूण असलेल्या बाबांनी व्यवसायाला मैत्रीच्या आड कधी येऊ दिले नाही. नुसते 'एजंट' म्हणून ते कधीही वावरले नाहीत, तर माध्यमांतील 'दुवा' म्हणून त्यांनी काम केले..' असे गौरवोद्गार काढले.

कधी दांडगा संपर्क आणि जाहिरात व्यवसायाला पूरक असलेले कलागुण असल्यामुळे, तर कधी फक्त स्वतःजवळ पैसा आहे म्हणून इथल्या झगमगाटाला भुलून अनेक लोक या व्यवसायात येतात. व्यावसायिकता आणि इथलं कल्चर, इथल्या वागण्याच्या आणि संपर्क ठेवण्याच्या पद्धती, नवनवीन गोष्टी आणि तंत्रांना सामोरं जाण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव- यामुळे त्यातल्या अनेकांना लवकरच गाशा गुंडाळावा लागतो. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ ग्राहकांना जाहिरात सेवा देत असलेल्या 'बीवाय पाध्ये पब्लिसिटी'सारख्या संस्था मात्र अपवाद ठरतात, आणि आपल्यासमोर एक आदर्श घालून देतात.

'कालनिर्णय'च्या जाहिरातींसारख्या महाराष्ट्रिय मध्यमवर्गाला भिडणार्‍या जाहिराती करणार्‍या विजय पाध्ये ऊर्फ 'बाबा' यांनी मायबोलीकरांसाठी व्यक्त केलेलं छोटंसं मनोगत.

***
vijay padhye.jpg

'बीवाय पाध्ये पब्लिसिटी'ची स्थापना १९५९ साली माझे वडील बी. वाय. तथा दादा पाध्ये आणि माझी मावशी जयंती जोशी ह्यांनी केली. 'जाहिरात एजन्सी' ही कल्पना बर्‍यापैकी नवीन आणि फारशी परिचयाची नसलेल्या त्या काळात सुरूवातीला अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. खूप मेहनत करावी लागली. पहिली काही वर्षं हाताखाली माणूस, मोठी जागा, दळणवळणाची सर्व साधनं इत्यादी गोष्टी म्हणजे चैनच होत्या. परवडणं शक्यच नव्हतं. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या (म्हणजे टीव्ही आणि रेडिओवरच्या) तसंच आऊटडोअर मीडियाच्या (होर्डिंग्ज) जाहिराती यांचं प्रस्थ नव्हतंच. असलं तरी नव्या एजन्सीला मोठ्या ब्रँड्स आणि कंपन्यांच्या जाहिराती मिळणं शक्य नसतंच. कुणी वरदहस्त किंवा गॉडफादर नसला, तर ही शक्यता आणखी कमी होते. त्यामुळे प्रिंट मीडियामध्ये काम सुरू झालं. असलेल्या ओळखींतून आणि आणखी प्रयत्न करून दोघांनी जाहिराती पार्टीकडून आणून, तयार करून त्या त्या प्रकाशनाला, वृत्तपत्राला किंवा मासिकाच्या ऑफिसला पोचत्या करायच्या, असं चाललं होतं. या गोष्टींत अनेकवेळा तोचतोपणा येत असल्याने आपण नुसतीच हमाली करत आहोत की काय, असंही दादांना आणि मावशीला वाटलं असेल. पण मुहूर्तमेढ रोवून नवा रस्ता तयार करण्याचं मोठं काम माझ्यासाठी या दोघांनी केलं होतं. जगण्याचा स्वतःचा एक फॉर्म्युला त्यांनी तयार केला होता. त्यात कष्ट होते, पण कटुता नव्हती. सलगी होती, पण चिकटूपणा नव्हता. स्नेहसंबंध होते, हितसंबंध नव्हते. व्यवहार होता, व्यापार-धंदा नव्हता. दादांनी केवळ 'पाध्ये' हे आडनावच नव्हे, तर त्यासोबत वसा आणि वारसाही दिला. 'बी. वाय. पी.' ही अक्षरे म्हणजे माझ्या आयुष्याची मूळाक्षरे ठरली.

चारपाच वर्षांनी एक माणूस हाताखाली ठेवण्याइतकी गरज आणि परिस्थिती निर्माण झाली. हे 'पहिले' गृहस्थ म्हणजे 'श्री धामणसकर' आजही आमच्याकडे आहेत!

दादा-मावशींनी हा व्यवसाय दहा वर्षं चालवला. ते करत असलेलं काम, त्यांना येत असलेला आत्मविश्वास, त्यांची ग्राहकांशी वागण्याची पद्धत मी जवळून बघत होतो. मीही हे सारं अशाच पद्धतीनं, किंबहुना आणखी नवीन आणि चांगल्या पद्धतीने करू शकेन- या भावनेनं उचल खाल्ली. मी १९७१ सालापासून काम बघू लागलो. दादांनी घालून दिलेल्या मूल्यांच्या चौकटीत राहून, तिचाच हात धरून व्यवसायातली नवनवी क्षितिजं पार करत मी प्रिंट मीडियासोबत इलेक्ट्रॉनिक मीडियातही काम करू लागलो. आकाशवाणी, आणि नंतर दूरदर्शनवरही माझ्या क्लायंट्सच्या जाहिराती झळकू लागल्या. यातही सुरूवातीला अनंत समस्या आल्याच. जिंगल्स आणि कमर्शियल्स यांचं प्रॉडक्शन दुसर्‍याकडून करून घ्यावं लागत होतं. पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ कधीतरी असतेच आणि ती एकदाची येऊन गेली की, इच्छाशक्तीच्या बळावर सारं सुरळीत होतंच, हे नीट समजलं. सुरळीत होण्याआधी बसलेले फटके, चटके आणि सोसावं लागलेलं नुकसान- ही ते शिकण्याची किंमत. ते सारं रुपये, डॉलर किंवा हिरेमोती देऊनही कुठे मिळत नसतं.

'रेडिओ जिंगल' बनवायची पहिल्यांदा वेळ आली, तेव्हा रेडिओतलं काहीही ठाऊक नव्हतं. 'आकाशवाणी'तल्या बाळासाहेब कुरतडकर या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वानं मला अक्षरश: बोट धरून सारं काही शिकवलं. पुढे काही क्लायंट्सच्या जाहिरातींसाठी चक्क 'अमीन सयानी' या बड्या प्रस्थाचा आवाज वापरण्याची कल्पना मला सुचली. काहीच ओळख नसताना मी सयानींकडे गेलो, आणि त्यांनी मोठ्या आस्थेनं हात धरून, बाहेर त्यांच्या बोलावण्याची वाट बघत असलेल्या मला आत नेलं, तो प्रसंग आठवून आजही रोमांच उभे राहतात. नंतर सुमारे पंचवीस वर्षं निरनिराळ्या जिंगल्ससाठी मी त्यांचा आवाज वापरला.

साठीच्या दशकात दादांनी हे काम चालू केलं तेव्हा जाहिरातींना फक्त 'इन्फर्मेटिव्ह' स्वरूप होतं. त्यात फारशी 'क्रिएटिव्हिटी' अपेक्षित नव्हती. 'ब्लॉक्स' तयार करणं हेच मोठं जिकिरीचं काम असायचं. नंतर तंत्रं बदलत गेली. 'डेस्कटॉप पब्लिशिंग' म्हणजे डीटीपीचा जमाना आला. काँप्युटरनं अनेक नवीन दरवाजे उघडले. नवीन तंत्रं, साधनं आली. ही अंगिकारताना सुरूवातीला भीती, अविश्वास या सार्‍यांतून अर्थातच जावं लागलं. या व्यवसायात टिकायचं, वाढायचं असेल, तर नवीन तंत्रांकडे पाठ फिरवून चालणार नाही, हे एव्हाना कळायला लागलं होतं.

हळूहळू कोहिनूर इन्स्टिट्यूट, अंजली किचनवेअर्स, कोकोराज, सचिन ट्रॅव्हल्स, वैद्य पाटणकर काढा, खो-गो, महाराष्ट्र व्यापारी पेठ, अनेक मराठी नाट्यसंस्था, मातोश्री कंस्ट्र्क्शन्स असे अनेक प्रथितयश आणि दिग्गज क्लायंट्स मिळत गेले. असेच जवळजवळ साडेचारशे क्लायंट्स अजूनही माझ्यासोबत टिकून आहेत. कालनिर्णय, केसरी ट्रॅव्हल्स, शिवसेना- यांच्याही जाहिराती सुमारे पंचवीस वर्षं मी केल्या. ठाकरे घराण्याशी आमच्या घराचं पूर्वापार असलेलं सख्य हाही आमच्या मित्रपरिवारात चर्चेचा विषय. पण या ओळखीचा आम्ही गैरफायदा घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. तशी वेळच आली नाही. आज 'पॉलिटिकल अ‍ॅड्स' म्हटलं की, जाहिरात एजन्सी बिचकून असते. कारणं अनेक. त्यातलं मुख्य म्हणजे पैशांसाठी होणारा त्रास. पण शिवसेनेच्या इतकी वर्षं जाहिराती करूनही वाईट अनुभव कधीच आला नाही. साधा छोटा उद्योजक असो की भलीमोठी राजकीय पार्टी, व्यक्तिगत संपर्काला मी नेहमीच प्राधान्य देत आलो. त्यामागून येणारा 'व्यवसाय' हा आपोआप विनाकटकटीचा आणि सुरळीत होत गेला. आज जी काय मला फळं दिसली आहेत, ती अर्थात त्याच जोरावर.

आज 'बीवाय पाध्ये पब्लिसिटी' भारतभर आणि परदेशातही सर्व माध्यमांतल्या जाहिराती करते. आमचे क्लायंट्स मोठे होत गेले, त्यायोगे आम्हीही मोठे होत गेलो. आज 'बीवाय पाध्ये पब्लिसिटी' हा एक ब्रँड झाला आहे, याचा रास्त अभिमान वाटतो.

समस्या म्हणाल तर सतत नवीन उदयाला येणार्‍या जाहिरात एजन्सीजची स्पर्धा. यातल्या काही एजन्सीज म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्याही असतात. प्रचंड पैशाच्या बळावर त्या बाजारात प्रचंड मोठ्या उलाढाली करू बघतात. क्रेडिट्स, डिस्काऊंट्स आणि कमी किंमतींच्या जोरावर नवी तत्त्वं निर्माण करू पाहतात. या वादळात छोट्या एजन्सीजची ससेहोलपट होते. पण तरीही या वादळात तुम्हांला टिकवतात एक 'माणूस' या नात्याने टिकवलेली नाती, मेहनत, प्रामाणिकपणा, पारदर्शकता.

पार्टीकडून पेमेंट उशिरा आलं तर त्रास होतोच. एकाने दिलेल्या त्रासामुळे तुमचं संपूर्ण व्यावहारिक, व्यावसायिक चक्रच सुकाणू नसल्यागत भिरभिरतं, कधी कोसळतंही. हा प्रश्न सोडवण्याचा कुठलाही फॉर्म्युला वगैरे नाही. तुमची मूल्यं, वागण्याच्या पद्धती आणि धोरणं- हेच तुम्हाला अशा वेळेला दिशा दाखवतात.

आपल्यासाठी जे लोक काम करतात- त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत कधीही बाकी ठेवायचे नाहीत, हेही तत्त्व मी पाळत आलो आहे. त्यांच्या कामाची, गुणांची, कलेची कदर झालीच पाहिजे. मी धंदा करतो आहे, त्यामुळे रोज नवनवीन प्रश्नांना सामोरं जावं लागणं हे ओघाने आलंच. पण माझ्या अडचणीपोटी माझ्यासाठी काम करणार्‍यांना वेठीस धरणं, हे चूक. यात माझ्यासाठी छोट्यातलं छोटं काम करणार्‍या माणसापासून, ते किर्तीवंत, दिग्गज कलाकार- सारे आले.

आता इतक्या वर्षांनंतर या व्यवसायाचं माझ्या आनंदात, छंदात रुपांतर झालं आहे. अन्य कुठला व्यवसाय करणं मनातही येत नाही, इच्छा नाही, तेवढा वेळही मिळत नाही. जे काही सध्या करतो आहे ते समाधानानं करणं मजेशीर आहे, आंनंददायक आहे. आज बागेश्री आणि मंजूश्री या माझ्या दोन मुलीही या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडून अवलंब केल्या जाणार्‍या नवनवीन तंत्रे, धोरणे इत्यादींचे अर्थातच स्वागत आहे. माझी शिकण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे.

या व्यवसायामुळे खूप काही शिकलो, अजूनही शिकतोय. अनेक प्रकारची, खूप मोठी माणसं जवळून बघायला मिळाली, मिळतात. प्रथमदर्शनी अगदी छोटी, फाटकी वाटणारी माणसंही मला अनेक वेळा काहीतरी अफाट शिकवून गेली. नव्हे, प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं असतंच, यावर आता माझा पक्का विश्वास बसला आहे. माणसं कशी जमवावीत, राखावीत हे शिकलो. अशी मैत्रं जमवली, की व्यवसाय करणं सोपं जातं. क्लायंट हा क्लायंट न राहता कुटुंबातील एक बनतो आणी व्यवसाय त्यामागून आपोआप होतो. रिलेशनशिप्स- हा एकच मंत्र या व्यवसायाचा आहे, असं मला वाटतं. खरा आणि चांगला जाहिरात संस्थाचालक तो, जो आपल्या जाहिरातदाराचा सल्लागार, मित्र आणि हितचिंतक या भूमिकांत वावरतो; आणि आपल्याला अधिक कमिशन मिळावे, म्हणून त्याचे बजेट न आखता, त्याला रिझल्ट्स मिळावेत म्हणून ते व्यवहार्य ठेवतो.

याच नाही, तर कुठल्याही व्यवसायात मेहनत, प्रामाणिकपणा, पारदर्शकता महत्त्वाची आहे. मूळची हुशारी, नवनवीन तंत्रं हा फक्त तांत्रिक भाग आहे. इतक्या वर्षानंतर मला समजलं आहे, ते हे.

***

vijay padhye 1.jpg

विजय पाध्यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त जमलेला मित्रपरिवार- अनंत भालेकर, अभिनेते विनय आपटे, स्टार वाहिनीचे नितीन वैद्य, 'मटा'चे रणजित काटे, खासदार भारतकुमार राऊत, कालनिर्णयचे जयंत साळगावकर, श्री. व सौ. पाध्ये, जाहिरातगुरू आणि नाटककार भरत दाभोळकर, नाट्यनिर्माते सुधीर भट आणि सारस्वत बँकेचे किशोर रांगणेकर.

***

'उद्योजक आपल्या भेटीला..' साठी विजय पाध्ये यांचं नाव सुचवल्याबद्दल 'मंजूडी' आणि या लेखाचं शुद्धलेखन तपासल्याबद्दल 'श्रद्धा' यांचे आभार.

विजय पाध्ये यांच्यासाठी मायबोलीकरांचे काही प्रश्न असतील, तर कृपया प्रतिसादांत लिहावेत.

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा,खूपच छान मुलाखत... धन्यवाद तुला या उद्योजकाची ओळख करून दिल्याबद्दल ..

आता इतक्या वर्षांनंतर या व्यवसायाचं माझ्या आनंदात, छंदात रुपांतर झालं आहे. अन्य कुठला व्यवसाय करणं मनातही येत नाही, इच्छा नाही, तेवढा वेळही मिळत नाही. जे काही सध्या करतो आहे ते समाधानानं करणं मजेशीर आहे, आंनंददायक आहे..... >>>> हे खूप महत्त्वाचं.

पार्टीकडून पेमेंट उशिरा आलं तर त्रास होतोच. एकाने दिलेल्या त्रासामुळे तुमचं संपूर्ण व्यावहारिक, व्यावसायिक चक्रच सुकाणू नसल्यागत भिरभिरतं, कधी कोसळतंही. हा प्रश्न सोडवण्याचा कुठलाही फॉर्म्युला वगैरे नाही. तुमची मूल्यं, वागण्याच्या पद्धती आणि धोरणं- हेच तुम्हाला अशा वेळेला दिशा दाखवतात.>>>>>

एक प्रामाणिक विनंती

ह्या सर्वांच उदाहरण देऊन स्पष्टिकरण हवयं........... त्यातून मला माझ्याच काही गोष्टी स्पष्ट होतील.

बाकी श्री विजय पाध्ये यांची मुलाखत छानच !
त्यांच्या प्रगतीचा आले़ख उत्तरोत्तर उंच भरारी घेवो !!!

सुंदर परिचय. कॉलेज संपल्यावर काही काळ मी फ्रीप्रेस ग्रूपसाठी स्पेससेलिंगचे काम केले होते त्यावेळी बीवायपीचे दादर कबुतरखान्याजवळील ऑफिस हा हक्काचा थांबा होता. मावशींची आपुलकी, फटकळ स्वभाव, घरगुती विचारपूस या सर्वांचा खूप छान अनुभव मनात आहे. सर्वच पाध्ये कुटुंबिय अतिशय उमद्या स्वभावाची माणसे. जाहिरात क्षेत्रामधे ज्या धडाडीने, वेगळेपणाने त्यांनी पाय रोवला आहे ते खरंच कौतुकास्पद. खूप गोष्टी त्यांच्याकदून शिकण्यासारख्या आहेत.
एक होता गोल्डी आणि इतरही सिनेक्षेत्रातील व्यक्तींवर पुस्तके लिहिणारी अनिता पाध्ये ही विजय पाध्येंची बहिण.

अक्कलेत निश्चितपणे भर घालणारी मुलाखत Happy धन्यवाद
(प्रश्न कस्ले विचारतोय डोम्बलाचे, जेवढ वर लिहिल्/सान्गितलय, ते नीट समजू दे, पचूदे तरी Proud )

वा मस्त मुलाखत. इतके क्लायंट जपणे काही सोपे काम नाही. खूप काही शिकण्यासारखे आहे. पेमेंट्स बद्दल अगदी अगदी. त्या प्रश्नाने जे केस पांढरे होतात व चेहर्‍यावर आठ्या पडतात त्यावर कोणत्या ही हेअर डाय/ अँटी एजिन्ग क्रीम चा काहीही उपयोग होत नाही. यू लिव्ह विथ युअर ड्यूज!. मुंबईस आल्यावर पाध्ये साहेबांना भेटायची इच्छा आहे. व्यवसायास अनेक शुभेच्छा.

या व्यवसायामुळे खूप काही शिकलो, अजूनही शिकतोय. अनेक प्रकारची, खूप मोठी माणसं जवळून बघायला मिळाली, मिळतात. प्रथमदर्शनी अगदी छोटी, फाटकी वाटणारी माणसंही मला अनेक वेळा काहीतरी अफाट शिकवून गेली. नव्हे, प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं असतंच, यावर आता माझा पक्का विश्वास बसला आहे. माणसं कशी जमवावीत, राखावीत हे शिकलो. अशी मैत्रं जमवली, की व्यवसाय करणं सोपं जातं. क्लायंट हा क्लायंट न राहता कुटुंबातील एक बनतो आणी व्यवसाय त्यामागून आपोआप होतो. रिलेशनशिप्स- हा एकच मंत्र या व्यवसायाचा आहे, असं मला वाटतं. खरा आणि चांगला जाहिरात संस्थाचालक तो, जो आपल्या जाहिरातदाराचा सल्लागार, मित्र आणि हितचिंतक या भूमिकांत वावरतो; आणि आपल्याला अधिक कमिशन मिळावे, म्हणून त्याचे बजेट न आखता, त्याला रिझल्ट्स मिळावेत म्हणून ते व्यवहार्य ठेवतो.

याच नाही, तर कुठल्याही व्यवसायात मेहनत, प्रामाणिकपणा, पारदर्शकता महत्त्वाची आहे. मूळची हुशारी, नवनवीन तंत्रं हा फक्त तांत्रिक भाग आहे. इतक्या वर्षानंतर मला समजलं आहे, ते हे>> याच्या हून चांगल्या शब्दात लिहीणे शक्यच नाही. उद्योजक जीवनसार. शिवाय मार्केट मध्ये आपली इमेज एक मदत करणारी,
प्रश्न सोडविणारी, व्यवहाराला चोख, चरित्रशील व्यक्ती अशीच पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे. आर्थिक नुकसान झाले तरी भरता येते पण वरील मुद्द्यांवर कधीही काँप्रमाइज करू नये.

साजिरा धन्यवाद.

खूपच चांगला परिचय करून दिला आहे. सर्व संबंधितांचे आभार !
पाध्ये यांच्या वाटचालीतून अनेकांना अनेक शिकण्यासारख्या गोष्टी दिसतील, यात शंका नाही.

जाहिरातक्षेत्रातील कोणाहीबद्दल फारसे काही चांगले न बोलणारे एका मराठी मासिकाचे संपादक दादा पाध्ये यांच्या विशयिमात्र हळवे होऊन बोलत असत! मुलाखत छान असली तरी त्रोटक वाटली.