चिकन मोगलाई

Submitted by संपदा on 24 September, 2011 - 16:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१. चिकन - १ १/२ किलो - तुकडे करून ( पुस्तकातील प्रमाण जसेच्या तसे दिले आहे )
२. ६ हिरव्या मिरच्या
३. २० लसणांच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे
४. १ १/२ टी.स्पू . बारीक चिरलेलं आलं
५. १ टी. स्पू . गरम मसाला
६. १ १/२ कप घुसळलेलं दही
७. १ टी.स्पू. हळद
८. २ टी.स्पू . लाल मिरची पूड
९. १० लवंगा .
१०. १२ काळे मिरे .
११. १ दालचिनीचा तुकडा - अंदाजे १ ईंच
१२. १० हिरव्या वेलचीचे दाणे
१३. १५ सोललेले बदाम
१४. १ टी.स्पू . जिरे
१५. २ टी.स्पू. धने
१६. २ टे.स्पू . तूप
१७. ४ मोठे कांदे - बारीक चिरलेले
१८. २ मोठ्या टोमॅटोचा रस
१९. १ टी.स्पू. साखर
२०. अर्धा कप तेल
२१. पाऊण कप पाणी
२२. १ टी.स्पू . कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून
२३. मीठ चवीनुसार
२४. गार्निशिंगसाठी - बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. हिरवी मिरची , १० लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा आले ह्याची पेस्ट करावी .

२. गरम मसाला पूड , थोडे मीठ , हळद , दही , लाल मिरची पूड एकत्र कालवून चिकनला लावून १/२ तासभर मुरत ठेवावे .

३. तवा गरम करून त्यावर लवंगा , मिरे , दालचिनी , वेलची , जिरे , धने , बदाम भाजून त्यात उरलेलं आलं आणि लसूण घालून पेस्ट करून घ्यावी .

४. पातेल्यात थोडे तेल तापवून बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा .

५. कांदा काढून घेऊन त्यातच चिकनचे तुकडे मॅरिनेशनसकट परतून घेऊन काढून ठेवावेत .

६. त्याच तेलात वाटलेला मसाला परतावा . मग त्यात टोमॅटोचा रस ( मी प्युरी वापरते ) , मीठ घालून ढवळावे . आता परतलेलं चिकन घालून , थोडं पाणी गरम करून , साखर ( होय साखरच ) आणि कॉर्नफ्लोअर घालून शिजवावे .

७. चिकन शिजले की कोथिंबीर घालून सर्व्ह करावे .

८. तंदूरी रोटी किंवा बटर नान बरोबर हे चिकन अफलातून लागते .

DSC_0015_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून आहे :) .
अधिक टिपा: 

१. शाकाहारी लोकांनी ह्यात स्वतःला हव्या त्या भाज्या घालून ही डिश करून बघावी . मी कधीही करून बघितली नाही Happy .

२. पाककृतीत चिकन फक्त १/२ तास मॅरिनेट करायचे लिहिले असले तरी मी स्वतः कमीतकमी ४ - ५ तास तरी चिकन मॅरिनेट करते .

३. पुस्तकाच्या प्रास्ताविकातच सौ . सुधा मायदेव ह्यांनी साखर वापरल्याने मांसाहारी पदार्थाची चव न बिघडता पदार्थाचा उग्रपणा कमी होतो आणि लज्जत वाढते असे नमूद केले आहे . ते अगदी खरे आहे हे ह्या पद्धतीने चिकन केल्यावर जाणवते . तरीपण कोणाला नको असेल तर साखर घालू नये .

माहितीचा स्रोत: 
सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब सीरिज मधल्या " चिकन " ह्या पुस्तकातून साभार
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users