मुदतपूर्व प्रसूती आणि बाळाची काळजी - Premature Babies

Submitted by ज्यो on 3 October, 2010 - 14:33

गर्भधारणा झाल्यापासून सदतीस आठवड्यांच्या आत होणार्‍या प्रसूतींना मुदतपूर्व प्रसूती म्हटले जाते. बर्‍याचदा मुदतपूर्व प्रसूतीचं नेमकं कारण काय हे सांगणं कठीण असतं. तरीही गर्भारपणात पुरेशी काळजी न घेतली जाणं, पोषणाची अबाळ, उपचार न केले गेलेले आजार, गर्भाशयासंबंधीच्या समस्या या गोष्टी मुदतपूर्व प्रसूतीस कारणीभूत ठरू शकतात.

काही वेळेस होणारे बाळंतपण हे मातेच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरणारे असते; होणार्‍या बाळाच्या आरोग्यास काही गंभीर आणि गुंतागुंतीच्या समस्या उद्भवणार असतील आणि त्यामुळे त्याच्या जगण्याची शक्यता फार कमी उरते तेव्हा मुदतपूर्व प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मुदतपूर्व प्रसूतीत जन्मलेल्या बाळांचं वजन हे पूर्ण वाढ होऊन जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत खूप कमी असतं. त्वचा अतिशय नाजूक असते. त्वचेखालील मेदांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने त्यांचे शरीर किमान आवश्यक तपमान स्थिर ठेवण्यास असमर्थ असते. त्यांच्या अवयवसंस्था पूर्णपणे विकसीत झालेल्या नसल्याने जन्मल्याबरोबर अशा अर्भकांसमोर आरोग्यविषयक कमीअधिक गंभीरतेच्या समस्या उभ्या ठाकू शकतात. त्यांची क्षीण रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे अनेक सांसर्गिक आजारांना निमंत्रणच ठरते. हा मुदतपूर्व काळ जितका अधिक तेवढे बाळाच्या आरोग्याचे धोके अधिक. म्हणूनच अशी बाळे जन्मल्यापासून त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची, त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जाण्याची आणि खास सुश्रुषेची फार आवश्यकता असते. जन्मल्याबरोबर त्यांना उपचाराकरता नवजात अर्भकांकरता खास बनवल्या गेलेल्या अतिदक्षता विभागात (NICU) ठेवण्याची आवश्यकता भासू शकते.

जन्मानंतर साधारण दोन महिन्यांपर्यंत बाळाची नव्या रक्तपेशी तयार करण्याची क्षमता अतिशय कमी असते. त्यामुळे अशा बाळांमध्ये पुरेशा रक्तपेशींअभावी अ‍ॅनेमिया होवू शकतो. रक्तातील साखरेची पातळी जास्त किंवा कमी असू शकते. मूत्रपिंड आणि यकृत पूर्णपणे विकसीत झालेली नसल्याने त्यांची कार्ये नीट चालत नाहीत. रक्तात यकृताकडून स्रवल्या जाणार्‍या बिलिरुबीन या घटकाचे प्रमाण वाढल्यास बाळाला काविळ होवू शकते. काविळीने गंभीर स्वरूप धारण केले तर त्यामुळे मेंदूतील महत्त्वाच्या केंद्रांना इजा पोहचू शकते (kernicterus).

अशा बाळांमध्ये मुख्यतः श्वसनासंबंधीच्या समस्या आढळून येतात. म्हणूनच फुफ्फुसांचा विकास आणि त्यांची काळजी या बाबी अशा बाळांच्या बाबतीत फार महत्त्वाच्या ठरतात. आपल्या फुफ्फुसात आतल्या बाजूला असंख्य अशी सूक्ष्म रंध्रं असतात. ही रंध्रं रक्तात ऑक्सीजन मिसळण्यास जबाबदार असतात. म्हणून ही रंध्र आत घेतल्या जाणार्‍या हवेने नीट फुगली जाणं आणि रक्त आणि हवेतल्या वायूंची देवाणघेवाण होणं अत्यंत आवश्यक असतं. ही रंध्र आर्द्र ठेवण्याकरता आणि श्वासोच्छवासाची क्रिया सुलभ होण्याकरता फुफ्फुस एक प्रकारचं वंगण तयार करतं (Surfactant). मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये अद्याप ही निर्मितीप्रक्रिया सुरू झालेली नसते. त्यामुळे ही बाळे नीट श्वासोच्छवास करू शकत नाहीस; श्वासोच्छवास करताना पुरेशा सरफॅक्टंटअभावी त्यांच्या फुफ्फुसांना इजा होऊ शकते.

मेंदूंची अत्यावश्यक वाढही अजून नीट झालेली नसल्यानुळे अधूनमधून अ‍ॅप्नेयाचे - म्हणजे मेंदूने श्वासोच्छवासाची क्रिया चालू ठेवण्याचे विसरून जाणे (Apnea) - एपिसोड येऊ शकतात. मेंदूस ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्यास मेंदूत रक्तस्राव होण्याचा धोका असतो. म्हणून अ‍ॅप्नेयाचा एपिसोड आल्याबरोबर बाळाला कृत्रीम श्वासोच्छवासासाठी ताबडतोब व्हेंटीलेटरवर ठेवणे आवश्यक असते. मेंदूची विकासप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे बाळाला स्तनपान आणि इतर द्रव पदार्थ गिळणे कठीण होते. डोळ्यातील पटलं तीव्र प्रकाश आणि ऑक्सीजन यांच्यामुळे अतिप्रभावीत होवून त्याचा परिणाम बाळाच्या दृष्टीवर होवू शकतो. काही वेळेला केल्या जाणार्‍या उपचारांचे दुष्परिणाम होवून इतर समस्या उद्भवू शकतात.

याकरता बाळ सतत वैद्यकीय देखरेखीखाली असणं गरजेचं असतं. बाळाच्या रक्तातील ऑक्सीजन, शर्करा, रक्तपेशींची संख्या, हृदयाच्या ठोक्यांचा वेग इ. गोष्टींची सतत वैद्यकीय नोंद ठेवणे आणि त्यानुसार व चालू असलेल्या उपचारांना बाळाकडून मिळणार्‍या प्रतिसादानुसार पुढचे उपचार ठरवणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे जितक्या लवकर बाळ जन्माला आले आहे तितक्या दिवस किंवा त्याची तब्बेत नॉर्मल येईपर्यंत बाळाला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असते. बाळ घरी आणल्यानंतरही पालकांनी फार दक्ष राहणे आवश्यक असते.

....

मी पेशाने डॉक्टर नाही. पण दीड-दोन वर्षांपूर्वी मुदतपूर्व प्रसूतीच्या या काटेरी जबड्यातून मी गेले आहे. ही दिव्यं एक माता म्हणून मी अनुभवली आहेत. ते दिवस आठवले तर अजूनही अंगावर शहारे येतात. एक एक क्षण म्हणजे यम वाटायचा. बाळाच्या NICU च्या शेजारच्या वॉर्डमधली एकेक रात्र म्हणजे मनाला भयभीत करणारी काळाची गुहा वाटायची. आपलं कोवळं स्वप्न नियतीच्या क्रूर झुल्यावर हेलकावे खात असतं तेव्हा काय वाटतं हे मी शब्दशः अनुभवलं आहे.

अशा प्रसूतींचं प्रमाण हल्ली वाढले आहे. पण त्याचबरोबर अत्याधुनिक असे वैद्यकशास्त्रही त्याचा मुकाबला करण्यास सज्ज आहे. अर्थात हे उपचार तसे बर्‍यापैकी खर्चिक असतात. मुदतपूर्व प्रसूतीची चाहूल लागल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात त्यासंबंधीची बरीच माहिती मी गोळा केली. इंटरनेटवरही मुबलक प्रमाणात ही माहिती उपलब्ध आहे. अर्थात ही माहिती म्हणजेच सर्वकाही असे नाही, पण यानिमित्ताने इथल्या होऊ घातलेल्या पालकांनी या दृष्टीने जागरूक व्हावे, यातल्या गुंतागुंतीची ओळख व्हावी, यावर चर्चा व्हावी यासाठी हे पान उघडले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. चांगली चर्चा आहे.
माझ्या आईच्या अनुभवानुसार कुठलाही प्रकारचा ताण, overexcitement सुद्धा कारण होते/असु शकते. घरात कोणीच premature जन्मले न्हवते त्यामुळे बहुधा गरोदरपणात स्वःताकडे केलेले दुर्लक्ष एक कारण आहे. आई स्वःता मेडिकलच्या परीक्षा देत होती त्यादरम्यान, रोजचे ट्रॅवल, जेवणाची अनिश्चचित वेळ व जुळी असे वगैरे असे मिश्रीत कारणामुळे होते. कोणत्याच डॉक्टरने त्यावेळी नीट सांगू शकले नाही.

पण आजही कधी कधी कुठलेही कारण नसताना सुद्धा असे होवु शकते व हे बर्‍याच हेल्दी स्त्रीयांच्या बाबतीतही का होते हे अजुन तरी नीट असे बर्‍याचदा कळले नाहीआजूबाजूच्या स्त्रीयांबाबत.(इती आई).

आता बर्‍याच प्रमाणात सुविधा व माहीती उपल्ब्ध आहेत फक्त नीट व योग्य वेळी त्याची माहीती असणे आवश्यक असते. व तसे असेल तर काही प्रमाणात परीणाम व त्रास कमी करु शकतो बर्‍यापैकी.

फार महत्वाचा विषय. तुम्ही या परिस्थितीतून तगून गेलात याबद्दल तुमचं कौतुक!
अमेरिकेतल्या बर्‍याच प्रसूतीत्ज्ज्ञांचं मत असं आहे की आईचं कुपोषण, धूम्रपान, मद्यपान , इतर मादक द्रव्यांचा वापर या गोष्टींमूळे मुदतपूर्व प्रसूतीची संभाव्यता वाढते.

गरोदर व्हायच्या वर्षभर आधीपासून धूम्रपान , मद्यपान वर्ज्य करावे. अतिरिक्त चहा कॉफी , कॅफीन टाळावे. नियमित व्यायाम असावा. वजन प्रमाणात असावे - फार कमी नाही , फार जास्त नाही. हेमोग्लोबिन नीट असावे. आहार संतुलित असावा डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रीनेटल व्हिटॅमिन्स घ्यावेत.

गरोदरपणार रक्तदाब वाढला तर आहार विहारावर नियंत्रण ठेवून रक्तदाब आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करावेत.

ज्यो, छान लिहिले आहेस. पुढे अजुन लिही. तुझे अनुभव आहेत त्याचा नक्कीच कोणाला ना कोणाला तरी उपयोग होईलच.

छान लिहीले आहे. आता तुम्ही व बाळ कसे आहे. माझा भाचा पण प्रीमी होता. व जन्मता कावीळ. तिनेही असेच काळ्जीचे क्षण अनुभवले आहेत. तो मुलगा आता दहावीला आहे. ट्ग्या झाला आहे. भारतात प्रीमी केअर चांगली मिळ्तेच असे नाही. सरकारी व निम्न सरकारी रुग्णालयात तर इन्क्यूबेटर पण बरोबर नसतात.

मानसिक कष्टाची कामे करणार्‍या आयांनाही यातून जावे लागते.

मन:स्विनी, मेधा, मिनोती, अश्विनीमामी धन्यवाद. माझ्या बाबतीत अगदी सहाव्या-सातव्या महिन्यापर्यंत मला खाल्लेले फारसे पचत नव्हते. अधूनमधून रक्तदाबही वाढायचा. मी आणि माझे बाळ आता चांगले आहे. बाळाचे वजन सर्वसाधारण मुलांपेक्षा अजून तसे कमी आहे. पण बाकी काही तक्रार नाही.

ज्यो माझे बाळ पन Premature आहे. ति १८ दिवस NICU ला होति , ति आता ६ महिन्यांचि आहे. तिचेहि वजन सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आहे. आनि तशि काही तक्रार नाही , तुम्ही बाळाचि काळ्जी व तुमचा अनुभव सन्गल का ? जे मला उप्योगि होतिल

ज्यो आणि श्रेया.. अभिनंदन आणि ऑल द बेस्ट.

माझी धाकटी बहीण (आता २४ वर्षे) पण प्रीमॅ होती.. आमच्या घराण्यातले रेकॉर्ड कमी जन्मवजन आहे तिचे. १.९की पेक्षा कमी वजन असेल तर बाळाला खूपच संभाळावं लागतं.

पण अशी मूलं हळू हळू आणि निश्चित बाळसं धरतात. सो फिकर नॉट. Happy काळजी घ्यावी लागते खूप. बरेचदा अशा बाळाला घरात झोळीत्/ओढणीत बांधून आईच्या छाती पोटाशी बांधून ठेवतात. आईचा स्पर्श, उब त्यांच्यासाठी इन्क्यूबरेटरचे काम करते असे म्हणतात. Happy

ज्यो,shravya तुम्ही कोणत्या ताणतणावांमधुन गेली आहात याची कल्पना करु शकते. हॅट्स ऑफ टु यु!!!
shravya, अभिनंदन.
दोन्ही बाळाना खूप आशिर्वाद. Happy

Mazi pan mulgi ३५ weekschi ahe , at the time of birth her weight is 2.15 now she 11 months ani weight 7.5

अग कविता, चान्गल आहे कि वजन.
माझी डिलीवरी ३५ वीक ला झाली. मुलगी अडिच किलो ची होती. आत्ता ती जवळपास पावणेदोन वर्शाची आहे आणि वजन आहे साडेसात किलो.
दर वेळेस डॉक्टर कडे गेलो कि आमच रडगाण असत की वजन वाढल नाही. पण डॉक्टर म्हणतात की वजनाची काळजी करु नका. Low weight sector babies कायम कमी वजनाच्याच रहातात.
- सुरुचि

अरे, मी स्वतः premature बेबी होते. वजन फ॑क्त १४०० ग्रँम. आता माझे वजनही चांगले आहे Lol
आता मी स्वतः दोन मुलांची आई आहे, माझी दोन्ही मुलं अजिबात premature नव्हती.

hello
माझे बाल आता १ वर्श पुर्न झाले आहे पन अजुन दात आले नहित दोकत्र म्हन्तात काल्जि करु नका पन तरिहि कोनि कहि मदत करु शक्ते का ? काहि उपाय सन्गु शक्ते क?
ति premature baby आहे