शेजारधर्म

Submitted by vandana.kembhavi on 20 September, 2011 - 03:10

इथे सिडनी मधे माझ्या बिल्डींग मधे वेगवेगळ्या देशांचे लोक रहातात. त्यामुळे माझे शेजारी हे वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कॄती मधील आहेत. अर्थात सगळ्यांमधे सामाईक बाब म्हणजे आधी आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत, कुठेही जन्म झालेला असो वा कुठलीही धर्म वा संस्कॄती असो, कुठल्यातरी अनामिक नात्यांनी आपण नेहेमी जोडले जातो. कुठेही असलो तरी आपण नवीन नाती जोडतच असतो आणि एकमेकांच्या चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करत असतो. प्रत्येक संस्कॄती मधे कितीतरी चांगल्या आणि आपल्या संस्कॄतीशी साधर्म्य सांगणा-या बाबी अनुभवास येतात तेव्हा मन खूप सुखावले जाते.

बिल आणि कॅथी, माझे ग्रीक शेजारी.
भारतामधे आपण शेजा-यांशी आपल्या नातेवाईकांएवढेच जोडलेले असतो. घरात काही गोडधोड केले की आपण खायच्या आधी आपण शेजारी नेऊन देतोच. अजुनही ही प्रथा चालू आहे(असा माझा समज) मला तिथे ही सवय होतीच. इकडे आल्यावर सुरुवातीला मला आपण केलेला पदार्थ शेजारी दिला तर चालतो का? हा मोठा प्रश्न पडला होता. एकदा हिम्मत करुन कॅथीला गणपतीत केलेले उकडीचे मोदक दिले. दुस-या दिवशी ती त्या प्लेटमधे माझ्या साठी स्वतः बेक केलेली बिस्किटे घेऊन आली. मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एवढच काय, मला गणपतीसाठी फुले लागणार हे माझ्या बोलण्यात आल्यावर ते लक्षात ठेवून तिने मला दुस-या दिवशी छोटीशी फुलांची सुंदर सजावट स्वतः करुनच आणून दिली. मी ती प्रेमाने गणपतीच्या सजावटीत मांडली.

यावर्षी गणपती यायच्या आधी माझी लगबग तिच्या लक्षात आली. मी तिला मी केलेलं मखर दाखवलं तर तिने ते प्रेमाने वाखाणलं, आणि फेस्टिवल केव्हा सुरु होणार तेही विचारल. गणपती येणार त्याच्या आदल्या रात्री ती एक मोठा वाडगा घेऊन माझ्याकडे आली. तिने आठवणीने माझ्या गणपती साठी "ग्रीक स्वीट" बनवून आणलं होतं. मला अगदी गहिवरुनच आले. आम्ही ते प्रेमाने खाल्लच पण आलेल्या पाहुण्यांना ही ते कॅथीचे कौतुक करुन खायला दिले. यावर्षीही मी तिला उकडीचे मोदक दिले.

एकदा तिने पालक आणि फेटा चीज घालून बेक केलेली पफ-पेस्ट्री मला आणून दिली. माझ्या मुलाला ती अतिशय आवडली मग मी तिला त्याची पाककॄती विचारली आणि त्याप्रमाणे साहित्य घेऊन आले. घरी ते करायच्या आधी पुन्हा एकदा तिला कॄती विचारली तर ती अगदी माझ्या किचनमधे आली आणि मला एक एक स्टेप सांगत माझ्याकडून करुन घेतल आणि मग घरी गेली. मला खरच इतक कौतुक वाटलं....आपल्या आई-मावशीला एखादी कॄती विचारली तर ती पण स्वतःच्या देखरेखीखाली आपल्याकडून तो पदार्थ करुन घेते आणि मगच आश्वस्त होते....अगदी तसच नाही का?

शेजारची कोरियन आजी

आजीच नाव मला अजुनही कळलेलं नाही, आजीला तिची भाषा वगळता कुठलीही भाषा येत नाही. आम्ही नेहेमी एकमेकींशी हसतो आणि कधीतरी खाणाखुणांनी बोलतो. गणपती मधे मी तिलाही उकडीचे मोदक दिले. तिने खुणेनेच काय आहे हे विचारले आणि मी ही खुणेने तो खायचा पदार्थ आहे हे सांगितले. तिने हसून मान डोलावून ते स्विकारले. मी तिला मोदक डिस्पोजेबल बोल मधे दिले होते. तरीही दुस-या दिवशी तिने स्वतःच्या घरच्या भांड्यामधे सुप सदॄश्य पदार्थ आणून दिला. त्यावर थोडेसे पोहे भुरभुरलेले होते. मी ही त्याचा आनंदाने स्विकार केला. यावेळी तिने खुणेने मला मी आणि माझी मुलगी किती सारखे दिसतो आहोत हे सांगितले आणि विशेष म्हणजे मला आणि मुलीला ते पटकन समजले आम्ही तिला हसून अनुमोदन दिले. तो पदार्थ म्हणजे पोह्याची पेज केली तर तसा दिसत होता, चवीला गोड होता. आम्ही तो खाल्ला वा प्यायलो म्हणूया. नाव मात्र कळू शकले नाही.

जाणवले ते हे की प्रत्येक संस्कॄतीमधे ही देवाणघेवाणाची पद्धत आहेच, आणि शेजा-यांचे भांडे रिकामे देऊ नये ही पद्धत देखील तशीच आहे. मला आनंद झाला की भारतापासून लांब इकडे सिडनी मधे मी दोन शेजारी जोडले ज्यांना मी केलेले पदार्थ बिनधास्त देऊ शकते आणि त्यांच्या पदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकते. आता मी मनाने इकडे रुळणार ह्याचा साक्षात्कार मला खूप बळ देऊन गेला.....

गुलमोहर: 

छान

छान