रॉयल - ए - रोमान्स

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नुकती कुठे त्याची ओळख पटतेय असं वाटायला लागलेलं असतं.

ओळख तरी काय नजरेचीच फक्त.

त्याच्या रुबाबाची, अप्रतिम शौर्याची, कठोर न्यायबुद्धीची, दाईला बडीमांचा दर्जा देऊन तिच्या वात्सल्याचा मान जपणार्‍या त्याच्यातल्या कोवळीकीची, त्याच्या पिळदार, कोरीव देखणेपणाची आणि तिच्याविषयीच्या आर्जवाची..ही सारी ओळख पडद्या आडूनच तर झालेली. ओझरती.. चुटपुटती.
त्याची तिच्यावर सतत खिळलेली नजर कधी हट्टाने, कधी लाजेने, बरेचदा रागाने ती कायम चुकवतंच नव्हती कां आली?

आणि आता ओळख पटतेय, त्याच्यावर विश्वासाने विसंबायला मन सरावतय तर त्याच्याच मनात अविश्वासाचा डोंब उसळलेला. गैरसमजाच धुकं त्याच्या मनात पसरवणारी खुद्द त्याची दाईमां हे समजल्यावर तर ती अवाक होऊन काही बोलूही न शकलेली.
स्वत:चा अभिमानाच्या कशाबशा शिल्लक राहीलेल्या दशा गोळा करत त्यानेच फ़र्मावलेली आमेरला, तिच्या माहेरी तिने परतावे ही शिक्षा दुखावलेल्या मनानी ऐकून घेत ती पाठमोरी वळलेली.
मनात नुकत्या मुळ धरू पाहणार्‍या कोवळ्या प्रितीचा अंकुर त्याच्या संतापाच्या धगीत कोमेजून जाणार आता कधीच.

..आपलं लग्न हा फक्त एक व्यवहार आहे. मनं जुळल्याशिवाय तु स्पर्श केलेला मला चालणार नाही असं तिने त्याला खुद्द हिंदुस्तानच्या शहेनशहा जलालुद्दीन मोहम्मदाला लग्नाच्या पहिल्या रात्रीच घुंगटही न उठवू देता बजावलेलं असतं.

आपल्याला राजकीय पटावरचा फक्त एक मोहोरा म्हणून वापरुन घेत असल्याची जाणीव झाल्याने कमालीचा जखमी झालेला तिचा आत्मसन्मान त्याला दुखावण्याची एकही संधी सोडायला तयार नसतो.

तिच्या बेरुखीने आधी चकीत झाल्यावर मग तिच्याइतक्याच अभिमानाने तुझ्या मनाविरुद्ध हा निकाह झाला असेल तर इस्लाम मधील खुला चा मार्ग स्विकारायला तु मोकळी आहेस. ह्यापुढे तु स्वत्:हून जवळ येशील तेव्हाच अन्यथा माझा स्पर्श तुला होणार नाही असं तिला बजावत ताडकन उठून जाणार्‍या त्याच्या तिच्याकडे वळलेल्या पाठीला राजपूत हिंदू स्त्री कोणत्याही परिस्थितीत विवाहाचं एकदा स्विकारलेलं बंधन नाही तोडत असं तिने तितक्याच तडकाफ़डकी उत्तर दिलं असतं खरं पण आपण हे बंधन कसं काय निभावू शकणार आहोत हे तिलाच कळत नसतं. ह्याच्या धर्माला तर सिंदूरही मान्य नाही आणि ह्याला आपला पती कसं मन मानणार आहे?

शिवाय मनातला राग. त्याचं काय करायचं?

हिंदुस्तानवर राज्य करणार्‍या ह्या तरुण गरम रक्ताच्या शहेनशहाला भडकवण्याचा तिचा हा अजून एक प्रयत्न फ़सलेला असतो. रागावण्यपेक्षा दुखावला जास्तं जातो तो आणि तिच्यासारखं उघडपणे ते दाखवतही नाही.

लग्न ठरवताना ह्या आधी तर तो धुडकावूनच लावेल अशा खात्रीने तिने घातलेल्या हिंदू धर्म आणि रितीरिवाज तुझ्या महालात आल्यावरही सोडणार नाही आणि माझ्या कृष्णासाठी माझ्या शयनगृहात तु मंदिर उभारु देशील अशा अटीही उलट त्याने आज मला राजपुत तेजस्वीतेचा त्यांच्या आन आणि बानचा प्रत्यय आला असं म्हणत सर्वांसमोर विनातक्रार, शब्दश्: मान्य केल्या असतात.
आणि त्या पाळलेल्याही असतात.
कोणत्याही तक्रारीला जागा न ठेवता. तरीही तिच्या मनात ही अढी कां?

तो खरं तर कधीचाच तिच्या आरस्पानी सौंदर्याने, तिच्यातल्या लखलखत्या स्वाभीमानाने पुरता घायाळ झालेला.

तिचा स्वाभिमान.
तिच्या अटी.
तिचं दुखावलं गेलेलं मन.
तिचा संताप.

सारं सारं तिचंच.

त्याचं फक्त तिच्याविषयीचं मनात उसळी मारणारं अनाकलनीय प्रेम.

तिच्या प्रत्येक गोष्टीला मानावं अशी असोशी त्याच्या मनात जन्मली तेव्हा त्याने निटसा तिचा चेहराही न्याहाळलेला नसतो खरं तर.
आपल्या अटी त्याला सांगताना पडद्या आडून तिच्यातून उसळत त्याच्या पर्यंत येऊन पोचलेल्या त्या आकर्षणाच्या तीव्र शलाकेत सामिल असते फक्त तिच्या धारदार, लखलखत्या आत्मसन्मानाच्या जाणीवेची ठिणगी.

निकाह झाल्यावरही दोघांमधले अंतर मिटत नाहीच.
पास है फ़िर भी पास नही हमको ये गम रास नही.. असं मनात येत तिच्या मोहक हालचालींचा वेध घेत असताना तो हिंदुस्तानचा बादशाह नसतो तर असतो फक्त एक नुकता तारुण्यात प्रवेश केलेला, प्रेमाच्या हुरहुरत्या भावनेचा मागोवा घेणारा कोवळा आशिक.
आपला शब्द राखत त्याने कायमच शारिरीक अंतर राखलेलं पण तरी त्याच्या नजरेचे स्पर्श ती कशी टाळू शकणार?
शिवाय आता तर त्या नजरेचाच मोह पडत चाललेला.

त्या नजरेतून दिसणारं त्याच्या निवळशंख पारदर्शी, प्रामाणिक हृदयाचं प्रतिबिंब तिला त्याच्या अधिकाधिक जवळ खेचून घेत असणारं.
ती कृष्णाची पुजा करत असताना तो भर दरबारात धर्मकट्टर मौलवींना तिचीच बाजू ठामपणे समजावून देत असतो आणि त्या महत्वाच्या सभेत अचानक तिच्या गोड आवाजात कृष्णाच्या भक्तीरसात वेढलेले सूर कानी पडताच कुणाची पर्वा न करता, सगळ्यांच्या कुत्सित, छुप्या हेटाळणीच्याही नजरा बिनदिक्कत धुडकावत तो तिच्या अंत:पुरात येतो आणि हातात निरांजनाची थाळी घेऊन उभी असणार्‍या तिचं ते निरांजनातल्या दिपकळीसारखं लख्ख तेजस्वी सौंदर्य पहिल्यांदाच नजरेस पडतं त्याच्या.

आणि तो निव्वळ भारावून जातो.
तिच्या नजरेत अडकून पडतो.

मुर्तीची पुजा? निरांजनावरुन हात ओवाळणं? त्याला कुठे काय माहिती असतं?
तिच्याकडे मंत्रमुग्ध नजरेनं पहात त्याचे हात आपोआप ति जे शिकवेल सांगेल ते करत रहातात.
आणि तिचं ते पाया पडणं? तो संकोचतो.
हिंदुस्तानची नव्हे त्याच्या हृदयाचीही मलिका अशी त्याच्या पायाशी?
रिवाज असला तरी तो असा कसला?
तो गडबडीने तिच्या खांद्यांना धरुन वर उचलायचा प्रयत्न करतो आणि आपण तिला स्पर्श केलाय हे त्याच्या लगेचच लक्षात येतं ते अंगात धावत गेलेल्या विजेच्या लहरीमुळे.
हात झटक्यात मागे घेतो तो पण मग तिच सुचवते तेव्हां निरांजनाच्या थाळीतलं कुंकुम अलगद तिच्या माथ्यावर टेकवतो.

जष्न-ए-बहार महालाभोवती दरवळतेय खरी पण दरम्यानचे फ़ासले तर मिटतच नाहीयेत.
पास हैं फ़िरभी पास नही.. काचेची एक भिंत मधोमध उभी असल्यासारखी सतत.
हा गम त्याला रास येत नाहीये आणि ती तरी खुश कुठेय?
तिने मानलं नाही तरी अस्वस्थ ती ही आहेच.

कैसा ये इश्क है.. कैसा ये ख्वाब है.. कैसे जजबातोंका उमदा सलाब हैं.. सज्जात अस्वस्थपणे फ़ेर्या मारणार्‍या त्याच्याकडे तिची नजर पुन्हा पुन्हा कां वळतेय?
दिवाने आम मधे तिच्यासाठी धर्मगुरूंनाही खडसावणारा तो, अपने फ़ैसले हम खुद लिया करेंगे म्हणत त्याला घडवणार्‍या बैराम खानलाही निष्ठूरपणे मक्केला पाठवून देणारा तो, उन्मत्त हत्तीला आपल्या नुसत्या हातांनी थोपवून त्याच्या गंडस्थळावर आरोहण करणारा तो हा नाजूक गुंता मात्र काही केल्या उलगडू शकत नसतो.

आणि आता दोघांच्या हृदयातले जजबात आत्ता कुठे नजरेतून का होईना एकमेकांसमोर चिलमनमधून बाहेर डोकवण्याच्या प्रयत्नात असतात पण मधे येतो तो दुरावा..
निव्वळ गैरसमजाचा पण तिला स्पष्टीकरणाचा मौकाही हासिल न होणारा आरोप करुन आणि सजाही एकतर्फ़ी फ़र्मावून तो मोकळा..
स्वत्:ची काहीच चूक नसूनही त्याचा विश्वासच हरवून बसलो आहोत हा फ़ाळ काळजात रुतवून निघून जाताना तिच्या मनात अपमानापेक्षाही आपण त्याला समजावू शकलो नाहीची घायाळ वेदनाचं.

माहेरी मन कसं लागणार?
नजर तर सतत गच्चीवरुन आग्र्याच्या किल्ल्याच्या दिशेने खिळून राहीलेली.

तो येईल?

तो येतोही.

राजेशाही स्वागत झेलताना इतरांसाठी तो हिंदुस्तानची शान महंमद जलालुद्दीन अकबर असला तरी त्याची नजर फ़क्त ती कुठे दिसतेय का शोधत रहाते. मनात अपराधी भावना घेऊन.

माफ़ करेल ती? येईल परत आपल्या सोबत?

स्वागतचंदन सोहळ्यात तिला शोधणारी त्याची नजर अलगद पकडत तिची आई मिस्किलपणे त्याला राजपुत रिवाज सांगते. ह्या सगळ्या घुंगटधारी स्त्रियांमधून स्वत्:ची स्त्री शोधून काढ. तरंच तिच्यासोबत रात्र घालवायला मिळेल शाही महालात. आणि नाही ओळखता आली तर? सारी रात्र आकाशातल्या चांदण्या मोजत उघड्या छताखाली झोपावं लागणार. .

तिला शोधून काढायच? इतकच नां?
त्याच्या साठी तर ते अगदीच सोपं.
तिचे अलगद श्वास, अधीर स्पंदनं तर तो कुठूनही टिपू शकेल इतक्या ओळखीची झालेली.
तिच्या नाजूक बोटांवर नेहमी दिसणार्‍या रत्नजडीत अंगठ्या इतर कोणीही घातल्या तरी तो कसा फ़सेल?
त्या बोटांवरची ती नाजूक गुलाबी नखं तर त्याच्या कितीतरी ओळखीची. त्याची नजर चुकवताना प्रत्येकवेळी घुंगट अधीकच पुढे ओढून घेताना, पहील्या रात्री त्याच्या हाताच्या स्पर्शाने मागे सरकताना अशी कितीएक वेळा नजरेत ठसा उमटवून राहीलेली.

काय नाही करत तो तिला मनवायला? जाईच्या कळ्यांसारखं टिपूर चांदणं तिच्याभोवती उधळून देतो. तिच्या नाजूक हातातल्या तलवारीची वार अंगावर झेलून दाखवतो पण नाहीच येत ती.
जिद्दीने येत नाही.
मनात असूनही येत नाही.

पण ह्यावेळी परतताना तोच तिला खात्री देतो की तु येशील. तुझं हृदय मी जिंकलेलं आहे हे मान्य करत येशील.

ती येते.

प्रजा त्याचा जल्लोषात सत्कार करत असताना थाटात अंबारीवर बसून, मलिका ए हिंदोस्तांच्या रुबाबात येते.

जनतेच्या मनात त्याने मिळवलेलं मानाचं, प्रेमाचं स्थान ओळखून त्याच्या विषयीच्या अभिमानाने भरुन जात ती येते.

दोघांची निरभ्र मनं उगवत्या सूर्याच्या साक्षीने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देतं.

परस्परांशी अनुरक्त होताना.. झळाळत्या किरणांनी ती नाहून निघत असताना त्याचं हृदय हळुवारपणे गात रहातं..

इन लम्होंके दामन में.. पाकिझा से रिश्ते है..

दोघे एक होतात आणि मुहोब्बतका कलमा फ़रिश्ते दोहरवतच रहातात.
पुढील कितीतरी सालोंसाल.

जोधा अकबर ची ही दोन तरुण जिवांना प्रेमाची पहिली ओळख पटवून देत अत्यंत रेशमी नाजुकपणे उलगडत जाणारी प्रेमकहाणी आशूतोष गोवारीकरने कमालीच्या बेहतरीन अंदाज मधे ग्लोरियसली पडद्यावर मांडली आहे.
It's really a grand magnum opus by Ashutosh Govarikar. The film is just magnificent!!..
and what an enchanting, mesmerising performance by Hritik Roshan!!
He is awesome, brilliant, graceful, romantic and .. and splendidly beautiful. .!!!

माझ्यासाठी तरी ही फ़िल्म बघणे ही सर्वात बेस्ट romantic valentine's gift ठरली आहे.

विषय: 
प्रकार: 

उच्च !!!!!!!!!!
काय ' दिल धक धक' मोड मधे लिहिल आहेस गः), पुन्हा पहावासा वाटतोय अता !

मस्तच लिहिलय, जोधा अकबर बद्दल. सगळ्याच पत्रकारानी मुक्त हस्ते लिहिलय पण हे मत खास आपले.
दीपांजली या सिनेमातल्या दागिन्यांविषयी आणि कपड्यांविषयी खास टिपण्णी हवीय आता.

ट्यु,

एकदम अलवार आणि तरल लिहीलं आहेस. लगेच पाहावासा वाटतोय मूव्ही.
सुरेख!

रंगीबेरंगीत नव्यानेच जागा पटकावलीयेस कां? मस्तच लिहीलं आहेस. एवढं मस्त परिक्षण वाचल्यावर जास्त वेळ न दवडता लवकरात लवकर पहायलाच हवा.

मस्त लिहिलंयस ट्युलिप......... वाचताना हे परीक्षण आहे सिनेमाचं की एक तरल प्रेमकहाणी असा प्रश्न पडत होता. छे!! आता लवकरच पहायला हवा.

ट्यु तू लिहीलंयस तेवढा मूव्हीही तरल आणि आर्त असेल तर (बाकी सगळी धुमश्चक्री लक्षात घेऊनही) नक्की आवडेल असं दिसतंय.
(पण तरीही इतकं कन्विन्सिंग आशुतोषच्या स्क्रिप्टरायटरनं लिहीलं असेल का याची शंकाच आहे. )

अगदी तरल लिहिलं आहेस ट्यु. आशुतोषला 'प्रेमकहाणी' मांडायला जमलं आहे असं दिसतंय.. पण बाकी चित्रपटाचं काय? :)))

असो, हृथिक म्हणजे 'मार डाला' आहे याबद्दल दुमत नाही :)))) त्याला पाहिलं की हृदयात 'कळ-बिळ' कशी उठते ते कळतं Wink

आशुतोष ने हे तु जे लिहिल आहेस ते जर वाचल तर त्याला सुधा ही फिल्म काढून सार्थक झाल्याचा आनंद मिळेल.

तुलिप, ऊत्क्रुष्ट, सॉल्लिड. मी तर पिक्चर 'मरहबा' गाण्या पर्यन्तच बघितला होता. आत पुढचा बघयची ओढ लागली आहे. टाटा , मी तर चालले बाबा पिक्चरला.

हा बघितलाय... पण मला बिल्कुल आवडला नव्हता... पण तुझं वाचल्यावर आवडायला लागला... हे काय आहे?

हे काय आहे?>>हे असंच किती जणांनी हीच हे वाचून बघितला असेल काय माहित proud.gif

मीपण तुझ हे वाचल्यावर अगदी आवर्जून बघितला. आवडला हे वेगळ सांगायला नकोच Happy

अप्रतिम.. सुरेख.. लाजवाब!!!
(शब्दच संपले..) Happy

किती सुरेख लिहिलंय!

ट्युलिप, असाच एखादा खूप मस्त लेख शम्मी कपूरवरही लिहा ना! तसा तुम्हीच एक धागा काढला आहे, जिथे आवडती गाणी, लिंक्स आणि थोड्याफार आठवणी आहेत लोकांच्या...पण असाच, खास "ट्युलिप टच" असलेला लेख वाचायला मिळाला तर..
मनावर घ्याच!