'आई'पण सोपं नाही. तसं मी फक्त मुलगी असताना सुद्धा आईकडे बघून ही जाणीव अधूनमधून व्हायचीच. माझा स्वभाव शीघ्रकोपी, थोडासा हट्टी सुद्धा. वाटायचं ही कसं सहन करु शकते आपल्याला ? आणि कितीही वेड्यासारखं वागलं तरी आपल्यावर इतकं प्रेम तरी कशी करु शकते ? अर्थात म्हणून काही मी एका दिवसात शहाणी झाले अशातला भाग नाही. अजूनही आई म्हणजे राग काढायची हक्काची जागा वाटते मला. तिच्याशी भांडणं, वाद , मतभेद झाले तरी ती समजून घेईल, मुख्य म्हणजे मनात कधीही अढी ठेवणार नाही असा एक विश्वास असतो.
'आईपण' काय असतं त्याबद्दल माझ्या मनात कधीही संदेह नव्हता. नऊ महिने पोटात वाढवणे, जन्म देणे ह्याने आईपण येतं असं मला आधीही वाटलं नाही आणि आता स्वत: गरोदरपण, कळा देणं हे केल्यावरही वाटत नाही. त्यात विशेष असं काय असतं ? शारीरिक त्रास, कष्ट असतील पण ते तर इतर गोष्टींतही असतातच की ! मुख्य म्हणजे ती एक अवस्था असते जी नऊ महिन्यांनी संपते. आईपणातून असं मोकळं होता येत नाही. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आई हरप्रकारे ज्या खस्ता काढते त्यामध्ये आईपणाचं मर्म असतं असं मला वाटतं. ही जबाबदारी हातावेगळी करता येत नाही. आईपण सोपं नसतं ते म्हणूनच.
अनिल अवचटांनी म्हटलं आहे की आपण मुलाला घडवतो पण त्याहीपेक्षा जास्त मुलं आपल्याला घडवतात. किती खरं आहे ! मुलं आपल्याला घडवतात. आपल्यातली सहनशक्ती घडवतात. अरुषने पहिली दोन-अडीच वर्षं प्रचंड जागरण केलं. सुरुवातीला खूप जास्त चिडचिड व्हायची. कधी धो-धो रडूच यायचं. नंतर चिडचिड कमी झाली पण जागरण हसून घेणं मात्र त्यातून पार होईपर्यंत नाहीच जमलं. तेव्हा आई एकदा म्हणाली होती," पहिलं मूल नेहेमीच जास्त ओरडा खातं आईचा. दुसर्याच्या वेळी एखादी स्टेज नक्की कधी संपते ह्याचा अंदाज आलेला असतो त्यामुळे थोडं सोपं जातं. सहनशक्ती आपसूक वाढते." तरीही केवळ मी सुद्धा आईपण शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे म्हणून ते शिकता शिकता झालेल्या चुकांचा अरुषला जाच झाला, ह्या पुढेही होत राहणार ह्याचं खूप वाईट वाटतं.
अरुषच्या आजारपणांत तर प्रचंड असहाय्य वाटायचं. एवढासा जीव. तो काय होतंय हे सांगू शकत नाही, मी समजावलेलं त्याच्यापर्यंत पोचत नाही. असं वाटायचं त्यापेक्षा ते आजारपण मलाच का भोगून टाकता येत नाही ? पण हळूहळू तिथेही सहनशक्ती वाढली. 'नेमेचि येतो मग पावसाळा' प्रमाणे मुलांची आजारपणं ह्या ना त्या कारणाने येतच राहणार हे अंगवळणी पडलं. कधी हवा बाधली, कधी पाणी, कधी दात येत आहेत. काहीतरी कारणं असतातच. माझी आजी म्हणते, "पडे,झडे...माल वाढे" पडल्या झडल्याशिवाय मुलं मोठी होत नाहीत. आपणही तसं म्हणायचं की मग बरं वाटतं. आताही तो आजारी पडला की जीव तुटतोच पण ते पेलायची ताकद पूर्वीपेक्षा निश्चित वाढली.
ह्या पलीकडे मात्र जे आईपण सुरु होतं ते फार हवंहवंसं आहे. फक्त आईसाठी म्हणून जी स्पेशल ट्रीटमेंट राखून ठेवलेली असते ती अनुभवण्यातलं सुख शब्दांत सांगण्यासारखं नाहीच. त्या 'पेअर्स' साबणाच्या जाहिरातीत दाखवतात तसं डोळे उघडल्या उघडल्या आईला शोधणं, काहीही नवीन गोष्ट दिसली की धावत धावत आधी आईला ती सांगायला येणं, मग ते सांगतानाची त्याची नाचरी पावलं आणि 'स्पार्कल' होणारे हसरे डोळे, भातुकलीत केलेला खाऊ आईला देण्याची घाई, बाबाने काही खायला घेतलं की "आईला ठेव हं" म्हणून सांगणं ( हे कसं सुचलं कुणास ठाऊक ? ), स्वयंपाक करताना चांगल्या मूडमध्ये असेल तर "खाऊ करुन झाल्यावर खेळायला येशील ?" असं आईला विचारणं, वाईट मूड असेल तर बेबीगेटला लोंबकाळत कुरकुरत राहणं, उचापत्या करताना पकडलं की आतून खदखदून येणारं हसू,त्याचे निरागस प्रश्न आणि गप्पा, टाळ्या वाजवत म्हटलेली गाणी, मांडीत बसवून म्हटलेले श्लोक, तो जेवला की आपलीच भागणारी भूक, कुशीत घेऊन सांगितलेली गोष्ट आणि रात्री त्याचं चौघडी घेऊन कुशीत शिरुन बिलगून झोपणं. आईपण ह्या आणि अशा अनेक गोष्टींतून दिवसरात्र वेढून राहतं.
ह्या वेढलेपणात खूप सुखी असूनही कधी कधी मागचे दिवस आठवतात. कुठलीही बांधिलकी नसलेलं ते पूर्वीचं मुक्त आयुष्य खुणावतं. मागे एकदा असंच स्वप्न पडलं. मैत्रिणींचं गेट टुगेदर झालं स्वप्नात. मी ही गेले होते एकटी. दिवसभर खूप मजा केली, भटकले. संध्याकाळ झाली. अंगणातल्या तुटपुंज्या संधिप्रकाशात सगळ्या मैत्रिणींनी परत गप्पांचा फड जमवला. आणि मला एकदम जाणीव झाली ... अरुषला इथे आणलंच नाही. तो तर रात्री कुणाकडेच राहत नाही. अगदी त्याच्या बाबाकडेही नाही. रडून रडून गोंधळ घालेल. आता मी काय करु ? अशी कशी विसरले मी ? ...जाग आली आणि अरुषला शेजारी पाहिलं तरी किती वेळ धडधडत होतं. तेव्हा खर्या अर्थाने जाणवलं, ही स्वतंत्र, विनापाश आयुष्याची ओढ तेवढ्यापुरतीच. आता मागे बघणे नाही. ते मोकळं आयुष्यही काही वर्षांनी परत मिळणारच आहे पण आईपण सोबत घेऊनच !
परवा नेहेमीप्रमाणे अरुषला आंघोळ घालून बाहेर आणलं. अंग पुसता पुसता गप्पा चालू होत्या. त्याला सांगत होते की तू अजून छोटा आहेस ना म्हणून तुला आई आंघोळ घालते,गोष्ट सांगते, फिरायला घेऊन जाते. तू मोठा झालास की तुला सगळं आपलंआपलं करता येईल. त्याने एक क्षण विचार केला आणि मग विचारलं,"मी मोठा झालो की तू छोटी होशील का ?" मला खूप गंमत वाटली. 'म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण' ह्या वाक्याचा असाही अर्थ असू शकतो तर. मी म्हटलं,"हो, तू खूप उंच झालास ना की मी छोटी होईन हं." त्यावर तो सहजपणे म्हणाला,"तू छोटी झालीस ना की मी पण तुला आंघोळ घालणार आणि कडेवर घेणार." मला खूप हसू आलं आणि त्याचबरोबर एकदम खूप भरुनही आलं. त्याच्या ओल्या गालाचा एक पापा घेतला आणि मनात म्हटलं,"नको रे बाबा ! तुझ्या आईचं 'आई'पण करावं लागावं अशी वेळ तुझ्यावर कधी ना येवो !"
कित्ती गोड लिहिलयस....
कित्ती गोड लिहिलयस....
डोळे भरुन आले. मस्त लिहिलय.
डोळे भरुन आले. मस्त लिहिलय.
माझा मुलगा 'वेद' (२ वर्ष ४ महिने) काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिकचे डबे (भरलेले) एकावर एक ठेवत होता. ६वा डबा ठेवायला त्याचा हात पण पोहोचत नव्हता मग मी त्याला मदत केली आणि म्हणलं चल आता एकेक खाली ठेऊ. तोपर्यंत त्यानं मधलाच डबा ओढला आणि वरचा भरलेला डबा माझ्या पायाच्या बोटावर पडला. इतकी कळवळले मी! आणि पाय धरून खाली बसले. माझं रडवेलं तोंड बघून वेद मला म्हणतो, आई बाऊ झाला का? थांब मी औषध लावतो. मी तुला जीवन (कैलास जीवन - हे आमचं हीट औषध आहे.) लावतो. मग बरा होइल बाऊ! ललू नकोस.
त्याच्या बोलण्यानच मला जास्त रडू आलं! किती गोड असतात आपली पोरं!
बाकी आई म्हणून मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट आमच्याकडेही सेम.
~साक्षी.
खरंच!!! एकदम गोड लेख
खरंच!!! एकदम गोड लेख
खूप सुंदर लिहिलयस अगो. अशीच
खूप सुंदर लिहिलयस अगो. अशीच लिहीत रहा.
स्वतंत्र, विनापाश आयुष्याची
स्वतंत्र, विनापाश आयुष्याची ओढ तेवढ्यापुरतीच. आता मागे बघणे नाही. ते मोकळं आयुष्यही काही वर्षांनी परत मिळणारच आहे पण आईपण सोबत घेऊनच ! >>> खास एकदम! काय मस्त लिहिलयस सगळच अगो.
इतक्या भरभरुन दिलेल्या
इतक्या भरभरुन दिलेल्या प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
कित्ती गोड लिहीलयं!
कित्ती गोड लिहीलयं! स्मित
आवडत्या १०त गेला हा लेख!
गोड>>मिट्टं
गोड>>मिट्टं
परत द्यावासा वाटला प्रतिसाद
परत द्यावासा वाटला प्रतिसाद
डोळ्यात पाणी आणि घसा दाटून
डोळ्यात पाणी आणि घसा दाटून आलेला - धड रडताही येईना की वाचताही येईना, अशी अवस्था करून टाकलीस तू माझी अगो.
खूप खूप क्युट लिहिलं आहेस!
साध्या, सोप्या शब्दांत
साध्या, सोप्या शब्दांत मांडलेलं अतिशय महान तत्वज्ञान....
कौतुकाला शब्द अपुरे पडताहेत......
सर्व मातांचरणी दंडवत.
हे उत्तम लिखाण वर आणल्याबद्दल धारा यांना मनापासून धन्यवाद.
मस्त च...............!
मस्त च...............!
अतिशय सुंदर लिहिलंय. डोळ्यात
अतिशय सुंदर लिहिलंय. डोळ्यात पाणी आलं. शेवटचं वाक्य तर एकदमच सुंदर.
छानच जमलाय हा लेख अगो. तो
छानच जमलाय हा लेख अगो.
तो जेवला की आपलीच भागणारी भूक>> ह्या स्टेज ला मी कधी पोचेन असं वाटत नाही
आजी झाल्यावर आपोआप वाढलेल्या सहन्शीलतेविषयी एक किस्स आठवला.
मैत्रिण पोरावर वैतागली होती तर माझ्या साबा तिला म्हणाल्या की आजी झाल्यावर तुम्हाला असं वाटणार नाही बिलकूल, तर ती म्हणे अहो काकू, तसं समजू नका मला तर आधी पोराला बडवू की आधी नातवाला/नातीला असं होइल..
अगो खूप छान लिहिलं आहेस.
अगो खूप छान लिहिलं आहेस.
आज पुन्हा वाचताना कै इरावती
आज पुन्हा वाचताना कै इरावती कर्वे यांच्या एका लेखाची आठवण झाली - इरावतीबाईंनी स्वतःच लिहिलाय - इरावतीबाई खूप मोठ्या विदुषी - सहाजिकच अनेक व्याख्याने देत असत - एका व्याख्यानाच्या सुरुवातीला त्यांची ओळख करुन देताना सांगण्यात येते - महर्षि धोंडो केशव कर्व्यांची सून, प्रा. दिनकरराव कर्व्यांची सुविद्य पत्नी....... वगैरे... व्याख्यान संपवून घरी येत असताना २-४ पोरे खेळत असतात त्यातला एक दुसर्याला म्हणतो - अरे या बाई चालल्यात ना त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का...... इरावतीबाईंनी लेखाच्या शेवटाला फक्त एकच वाक्य लिहिलंय - आता माझी ओळख पूर्ण झाली होती.
जगात कुठेही गेलं तरी ...आईची ओळख एकच असते...... आई.
पुन्हा एकदा सर्व मातांचरणी शिरसाष्टांग दंडवत.
खूप आवडलं!!
खूप आवडलं!!
मी हा लेख आधी पण वाचला आहे.
मी हा लेख आधी पण वाचला आहे. आज परत वाचला. इतकं अप्रतिम लिहिलं आहे!!
काय प्रतिसाद द्यावा तेच कळ्त नाहीए.
धनश्री + १
धनश्री + १
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
नि:शब्द! अप्रतिम लिखाण!
नि:शब्द! अप्रतिम लिखाण!
खूप सुंदर लिखाण
खूप सुंदर लिखाण
अतिशय सुंदर लिहीलय , अगो.
अतिशय सुंदर लिहीलय , अगो. वाचताना अगदी रिलेट झालं.
खूप छान मी पण आताच आई
खूप छान मी पण आताच आई झालेय...
शेवटचं वाक्य फार सुंदर आहे गं
शेवटचं वाक्य फार सुंदर आहे गं आणि खरं पण...
अगो, खरंच खूप सुंदर उतरलाय
अगो, खरंच खूप सुंदर उतरलाय लेख!
Pages