मातॄदिन: 'आई'पण

Submitted by अगो on 11 May, 2010 - 16:19

'आई'पण सोपं नाही. तसं मी फक्त मुलगी असताना सुद्धा आईकडे बघून ही जाणीव अधूनमधून व्हायचीच. माझा स्वभाव शीघ्रकोपी, थोडासा हट्टी सुद्धा. वाटायचं ही कसं सहन करु शकते आपल्याला ? आणि कितीही वेड्यासारखं वागलं तरी आपल्यावर इतकं प्रेम तरी कशी करु शकते ? अर्थात म्हणून काही मी एका दिवसात शहाणी झाले अशातला भाग नाही. अजूनही आई म्हणजे राग काढायची हक्काची जागा वाटते मला. तिच्याशी भांडणं, वाद , मतभेद झाले तरी ती समजून घेईल, मुख्य म्हणजे मनात कधीही अढी ठेवणार नाही असा एक विश्वास असतो.

'आईपण' काय असतं त्याबद्दल माझ्या मनात कधीही संदेह नव्हता. नऊ महिने पोटात वाढवणे, जन्म देणे ह्याने आईपण येतं असं मला आधीही वाटलं नाही आणि आता स्वत: गरोदरपण, कळा देणं हे केल्यावरही वाटत नाही. त्यात विशेष असं काय असतं ? शारीरिक त्रास, कष्ट असतील पण ते तर इतर गोष्टींतही असतातच की ! मुख्य म्हणजे ती एक अवस्था असते जी नऊ महिन्यांनी संपते. आईपणातून असं मोकळं होता येत नाही. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आई हरप्रकारे ज्या खस्ता काढते त्यामध्ये आईपणाचं मर्म असतं असं मला वाटतं. ही जबाबदारी हातावेगळी करता येत नाही. आईपण सोपं नसतं ते म्हणूनच.

अनिल अवचटांनी म्हटलं आहे की आपण मुलाला घडवतो पण त्याहीपेक्षा जास्त मुलं आपल्याला घडवतात. किती खरं आहे ! मुलं आपल्याला घडवतात. आपल्यातली सहनशक्ती घडवतात. अरुषने पहिली दोन-अडीच वर्षं प्रचंड जागरण केलं. सुरुवातीला खूप जास्त चिडचिड व्हायची. कधी धो-धो रडूच यायचं. नंतर चिडचिड कमी झाली पण जागरण हसून घेणं मात्र त्यातून पार होईपर्यंत नाहीच जमलं. तेव्हा आई एकदा म्हणाली होती," पहिलं मूल नेहेमीच जास्त ओरडा खातं आईचा. दुसर्‍याच्या वेळी एखादी स्टेज नक्की कधी संपते ह्याचा अंदाज आलेला असतो त्यामुळे थोडं सोपं जातं. सहनशक्ती आपसूक वाढते." तरीही केवळ मी सुद्धा आईपण शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे म्हणून ते शिकता शिकता झालेल्या चुकांचा अरुषला जाच झाला, ह्या पुढेही होत राहणार ह्याचं खूप वाईट वाटतं.
अरुषच्या आजारपणांत तर प्रचंड असहाय्य वाटायचं. एवढासा जीव. तो काय होतंय हे सांगू शकत नाही, मी समजावलेलं त्याच्यापर्यंत पोचत नाही. असं वाटायचं त्यापेक्षा ते आजारपण मलाच का भोगून टाकता येत नाही ? पण हळूहळू तिथेही सहनशक्ती वाढली. 'नेमेचि येतो मग पावसाळा' प्रमाणे मुलांची आजारपणं ह्या ना त्या कारणाने येतच राहणार हे अंगवळणी पडलं. कधी हवा बाधली, कधी पाणी, कधी दात येत आहेत. काहीतरी कारणं असतातच. माझी आजी म्हणते, "पडे,झडे...माल वाढे" पडल्या झडल्याशिवाय मुलं मोठी होत नाहीत. आपणही तसं म्हणायचं की मग बरं वाटतं. आताही तो आजारी पडला की जीव तुटतोच पण ते पेलायची ताकद पूर्वीपेक्षा निश्चित वाढली.

ह्या पलीकडे मात्र जे आईपण सुरु होतं ते फार हवंहवंसं आहे. फक्त आईसाठी म्हणून जी स्पेशल ट्रीटमेंट राखून ठेवलेली असते ती अनुभवण्यातलं सुख शब्दांत सांगण्यासारखं नाहीच. त्या 'पेअर्स' साबणाच्या जाहिरातीत दाखवतात तसं डोळे उघडल्या उघडल्या आईला शोधणं, काहीही नवीन गोष्ट दिसली की धावत धावत आधी आईला ती सांगायला येणं, मग ते सांगतानाची त्याची नाचरी पावलं आणि 'स्पार्कल' होणारे हसरे डोळे, भातुकलीत केलेला खाऊ आईला देण्याची घाई, बाबाने काही खायला घेतलं की "आईला ठेव हं" म्हणून सांगणं ( हे कसं सुचलं कुणास ठाऊक ? ), स्वयंपाक करताना चांगल्या मूडमध्ये असेल तर "खाऊ करुन झाल्यावर खेळायला येशील ?" असं आईला विचारणं, वाईट मूड असेल तर बेबीगेटला लोंबकाळत कुरकुरत राहणं, उचापत्या करताना पकडलं की आतून खदखदून येणारं हसू,त्याचे निरागस प्रश्न आणि गप्पा, टाळ्या वाजवत म्हटलेली गाणी, मांडीत बसवून म्हटलेले श्लोक, तो जेवला की आपलीच भागणारी भूक, कुशीत घेऊन सांगितलेली गोष्ट आणि रात्री त्याचं चौघडी घेऊन कुशीत शिरुन बिलगून झोपणं. आईपण ह्या आणि अशा अनेक गोष्टींतून दिवसरात्र वेढून राहतं.

ह्या वेढलेपणात खूप सुखी असूनही कधी कधी मागचे दिवस आठवतात. कुठलीही बांधिलकी नसलेलं ते पूर्वीचं मुक्त आयुष्य खुणावतं. मागे एकदा असंच स्वप्न पडलं. मैत्रिणींचं गेट टुगेदर झालं स्वप्नात. मी ही गेले होते एकटी. दिवसभर खूप मजा केली, भटकले. संध्याकाळ झाली. अंगणातल्या तुटपुंज्या संधिप्रकाशात सगळ्या मैत्रिणींनी परत गप्पांचा फड जमवला. आणि मला एकदम जाणीव झाली ... अरुषला इथे आणलंच नाही. तो तर रात्री कुणाकडेच राहत नाही. अगदी त्याच्या बाबाकडेही नाही. रडून रडून गोंधळ घालेल. आता मी काय करु ? अशी कशी विसरले मी ? ...जाग आली आणि अरुषला शेजारी पाहिलं तरी किती वेळ धडधडत होतं. तेव्हा खर्‍या अर्थाने जाणवलं, ही स्वतंत्र, विनापाश आयुष्याची ओढ तेवढ्यापुरतीच. आता मागे बघणे नाही. ते मोकळं आयुष्यही काही वर्षांनी परत मिळणारच आहे पण आईपण सोबत घेऊनच !

परवा नेहेमीप्रमाणे अरुषला आंघोळ घालून बाहेर आणलं. अंग पुसता पुसता गप्पा चालू होत्या. त्याला सांगत होते की तू अजून छोटा आहेस ना म्हणून तुला आई आंघोळ घालते,गोष्ट सांगते, फिरायला घेऊन जाते. तू मोठा झालास की तुला सगळं आपलंआपलं करता येईल. त्याने एक क्षण विचार केला आणि मग विचारलं,"मी मोठा झालो की तू छोटी होशील का ?" मला खूप गंमत वाटली. 'म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण' ह्या वाक्याचा असाही अर्थ असू शकतो तर. मी म्हटलं,"हो, तू खूप उंच झालास ना की मी छोटी होईन हं." त्यावर तो सहजपणे म्हणाला,"तू छोटी झालीस ना की मी पण तुला आंघोळ घालणार आणि कडेवर घेणार." मला खूप हसू आलं आणि त्याचबरोबर एकदम खूप भरुनही आलं. त्याच्या ओल्या गालाचा एक पापा घेतला आणि मनात म्हटलं,"नको रे बाबा ! तुझ्या आईचं 'आई'पण करावं लागावं अशी वेळ तुझ्यावर कधी ना येवो !"

गुलमोहर: 

>>तू छोटी झालीस ना की मी पण तुला आंघोळ घालणार आणि कडेवर घेणार.
कित्ती गोड. एकदम असं बोलणार्‍या टॉवेलमधल्या टिल्लू मुलाचं आणि त्याच्या आईचं चित्र दिसलं. छानच.

खरचं खूप आवडल..
या आईपणातून सध्या जात आहे म्हणुन असेल कदाचीत पण कडा ओलावल्या. माझ पिल्लू अजुन लहान आहे, स्पष्ट बोलत नाही पण आपल्या वेगळ्या भाषेत राग, प्रेम सगळ व्यक्त करतो.

बाबाने काही खायला घेतलं की "आईला ठेव हं" म्हणून सांगणं >> हे असं काही ऐकण्यासाठी कान आतुरले आहेत.

खूप छान लिहिलस.

ह्या पलीकडे मात्र जे आईपण सुरु होतं ते फार हवंहवंसं आहे..........दिवसरात्र वेढून राहतं.>>> हा सगळा पॅराग्राफ अगदी नेमक्या शब्दात मांडलास.

मस्त लिहिलयसं !
" पहिलं मूल नेहेमीच जास्त ओरडा खातं आईचा. दुसर्‍याच्या वेळी एखादी स्टेज नक्की कधी संपते ह्याचा अंदाज आलेला असतो त्यामुळे थोडं सोपं जातं. सहनशक्ती आपसूक वाढते." >>> हे एकदम पटलं

पहिलं मूल नेहेमीच जास्त ओरडा खातं आईचा>>>> हे खरं आहेच पण दुसरं झाल्यावर पहिलं जास्त ओरडा खातं असं आपलं मला स्वानुभवावरुन वाटतं.

अगो खरच खूप छान लिहलस.
एकदम आईचि आठवन आलि....अन डोळे पानावले.
कधि एकदा आई होते आणि हे सगळे अनुभवतेय असे झालेय.

अगो, खूपच छान. मी नुकताच आईपणात प्रवेश केलाय.. तुझ्यासारखं मलाही असचं स्वप्न पडलं की आम्ही दोघं कुठेतरी सहलीला गेलो आणि अर्ध्या रस्त्यात जाणीव झाली की माझं बाळ घरी कारसीटमध्येच राहिलं आणि काळजाचं पाणी पाणी झालं. बाळाशिवाय आपलं असणं किती अपूर्ण आहे याची जाणीव झाली.

अजूनही आई म्हणजे राग काढायची हक्काची जागा वाटते मला. तिच्याशी भांडणं, वाद , मतभेद झाले तरी ती समजून घेईल, मुख्य म्हणजे मनात कधीही अढी ठेवणार नाही असा एक विश्वास असतो.>>> माझ्याबाबतीत शंभर टक्के खरं आहे हे!!

अगो, मस्त लिहिलयस. आवडलं.

फारच पारदर्शी लिहिलयस तू अगो. आता मी '' आईची आई'' या भूमिकेत गेलेय. पूर्वीचे दिवस आठवताना आता समजतं की आईपणाच्या त्या काळात पक्वता जरा कमीच होती!! मुलांना न रागवता जरा वेगळ्याप्रकारे वागता आलं असतं.
नातवंडांच्या बाबतीत ''ते'' आईपण फार गहिरं झाल्यासारखं वाटतं! मुलांची जागरणं काढताना रागवायला व्हायचं ..चिडचिड व्हायची. पण नातवंडांसाठी जागताना रागाचा लवलेशही नसतो. नातवंडाचे हट्ट पाहताना बाल मानसशास्त्र आठवत राहतं. सहनशीलता पराकोटीची वाढली असल्याचे जाणवते.
अशीच लिहित रहा.

Pages