रसग्रहणस्पर्धा--वृकोदर--लेखक-राजेंद्र देशपांडे

Submitted by mrunalpotnis21 on 21 August, 2011 - 11:02

पुस्तकाचे नाव – वृकोदर
लेखक राजेंद्र देशपांडे
प्रकाशन- कॉन्टिनेंटल प्रकाशन
प्रथमावृत्ती-२०११
मूल्य-३७५ रुपये
वृकोदर (परीक्षण)
भीमाच्या जीवनावर विशेषतः त्याच्या भावनिक आणि वैचारिक जीवनावर प्रकाश टाकण्याची भूमिका राजेंद्र देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सुरुवातीलाच व्यक्त केली आहे. प्रत्येक भारतीयाला महाभारतातील भीमाची ओळख बालवयातच होते. आणि तेव्हांपासूनच त्याच्याविषयीची प्रतिमा त्याच्या मनात साकारत जाते.. वयानुसार आणि त्या त्या व्यक्तीच्या वाचनवृद्धीनुसार ती प्रतिमा त्याच्या उत्तर आयुष्यात अधिकधिक गडद होत जाते. पांडवांच्या संरक्षणार्थ सदैव दंड थोपटून उभा ठाकणारा भीम, द्रौपदीवरच्या अन्यायाने पेटून उठणारा भीम, आपल्या बाहुबलाच्या सार्थ अभिमानाने शत्रूला चळचळा कापायला लावणारा भीम, बकासुरासाठी नेलेले गाडाभर अन्न स्वतःच खात बसणारा खादाड भीम त्याच्या बलाढ्य आकृतीबरोबर त्याच्या शौर्याचा खास ठसा वाचकाच्या मनावर नेहमीच उमटवत राहतो. एवढे असूनही भीमाचे स्वतःचे भावविश्व, त्याची सहृदयता, त्याची सारासार विचारशक्ती त्यामानाने अज्ञातच राहते. तो भासतो त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेमळ, विचारी, धर्माधर्माची जाण असणारा, न्यायासाठी झगडणारा, पांडवांच्या एकजुटीचे महत्त्व जाणून वागणारा होता. तो युद्धपिपासू नव्हता तर महासंहारक युद्ध टाळण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला होता, त्याच्या मनस्वितेमागेही संतुलित तात्त्विक विचारांची बैठक होती यावर अधिक प्रकाश टाकण्याची गरज लेखकाला वाटली. भीमावर वेळोवेळी झालेल्या अन्यायाचे थोडेतरी परिमार्जन आपल्या लेखणीद्वारे करावे असे उत्कटपणे वाटूनच लेखक या कादंबरी लेखनाला प्रवृत्त झालेला आहे.
भीम या कादंबरीचा नायक असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर भर देणारे प्रसंग निवडून त्याचे विचार, स्वभाव यावर स्वाभाविकपणेच भर दिसतो. युधिष्ठिराच्या शांत, सौम्य, क्षमाशील आणि धर्मनिष्ट प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभ्या राहणा-या भीमाची खरा धर्म समजून घेण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची तळमळ वाचकाला जास्त भावते. द्वैतवनामध्ये द्रौपदी आणि इतर भावांसह युधिष्ठिराशी झालेल्या धर्मासंबंधीच्या वादचर्चेच्या वेळीही भीम परोपरीने युधिष्ठिराला क्षत्रियाचा धर्म समजून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. तेव्हा तो म्हणतो, “ तू सारखा जो धर्म, धर्म करतोस ते नुसते धर्माचे बाह्यांग आहे.खरा धर्म जर समजावून घ्यायचा असेल तर तो जाऊन कृष्णाला विचार. कर्मरूपी धर्मच श्रेष्ठ धर्म आहे. त्या कर्मामुळेच अर्थप्राप्ती होईल. अरे जर अर्थच नसेल तर तुझ्या धर्माचे आचरण तरी नीटपणे करता येईल का १ अरे तू क्षत्रिय आहेस क्षत्रियासारखे आचरण कर, भटाभिक्षुकासारखे नाही. तुला सर्वोच्च सुख मिळवायचे असेल तर मग मोक्ष तरी मिळव नाही तर अभ्युदय तरी संपादन कर. मनुष्य जर स्वधर्मभ्रष्ट झाला तर जगात निंदनीय ठरतो. केवळ धर्म धर्म करून कधीही राज्यप्राप्ती होणार नाही. कपटी लोकांना शठपणाने जिंकले तरी काही बिघडत नाही. -------- थोडासा धर्माचा त्याग करून जर विपुल धर्म संपादन करता येणार असेल तर तो अधर्मदेखील चुकीचा ठरत नाही.” अशाप्रकारे मनुष्यधर्माचा साकल्याने विचार वादचर्चांमधून सर्वत्र केलेला कादंबरीत दिसतो. प्रत्येकाचा त्याबाबतीतला विचार आपआपल्या परीने समर्पक वाटला तरी भीमाने केलेला धर्मविचार सर्वात अधिक उचित वाटतो. मुकाट्याने प्रत्येकवेळेस क्षमावृत्ती धारण करून अन्याय सोसत रहावा हे त्याला मान्य नसले तरी युद्ध होताहोईतो टाळावे त्यासाठी समेटाचा ,शांतीचा विचार धारण करावा आणि महासंहार टाळावा हीच भीमाची मनापासून इच्छा होती. कुलक्षय करून मिळालेले राज्य काय सुख देणार या विचाराने तो विलक्षण अस्वस्थ झालेला आहे. धर्माचा असा चौफेर विचार हे या कादंबरीचे बलस्थान आहे. या चर्चा एवढ्या रंगतदार आणि विचारप्रवर्तक होण्यामागे लेखकाचा संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास दिसतो. वास्तवाचा अपलाप होऊ न देता उपजत कल्पनाशक्तीचा समर्थ वापर करून प्रत्येकाचा धर्मविचार स्पष्ट होईल आणि हिंदू धर्मातील चारही वर्णाच्या लोकांची कर्तव्ये निर्देशिली जातील, विशेषेकरून क्षत्रियधर्म आणि राजधर्म यावर चांगला प्रकाश पडेल असा लेखकाचा प्रयत्न कादंबरीत सारखा दिसतो. कादंबरीचा दर्जा उंचावण्यामागे वैचारिक पातळीवरून झालेल्या या वादचर्चांचे विलोभनीय स्वरूप आहे असे म्हणावेसे वाटते.
हिडिंबेबरोबरचे भीमाचे प्रेमपूर्ण सहजीवन पूर्णतः लेखकाच्या कल्पनाविश्वातून साकारलेले एक अप्रतीम प्रकरण आहे. भीमावर पूर्णपणे अनुरक्त झालेली, त्याच्यासाठी सर्वस्वाने जीवन समर्पित करणारी, घटोत्कचाला जन्म देणारी आणि पांडवांच्या रक्षणासाठी आपला पुत्र प्राणही देईल अशी ग्वाही देणारी हिडिंबा महाभारतात आहे. परंतु राक्षसकुळात जन्म झाला असला तरी भीमावरचे आपले सच्चे प्रेम विवाहात परिणत व्हावे यासाठी कुंतीची तिने केलेली मनधरणी आणि मिळविलेला रुकार हा सगळाच प्रसंग लेखकाने ज्या कौशल्याने रेखाटला आहे त्यावरून भीमाच्या भावजीवनातील एक अति कोमल कप्पा हळुवारपणे वाचकासमोर उघडतो. आपल्या पुत्राला औरसत्व लाभावे आणि आपल्या ख-या प्रेमाला न्याय मिळावा म्हणून हक्काची मागणी करणारी हिडिंबा एकाच वेळी आदर्श प्रेयसी, पत्नी आणि माता यांच्या भूमिका निभावताना दिसते. ती जंगलाची राणी आहे सामर्थ्यवान राक्षसांचे बळ तिच्या पाठीशी आहे. आर्थिक दृष्ट्या किंवा स्वसंरक्षणार्थ ती पांडवांवर अवलंबून नाही. तिच्या प्रेमाला निःस्वार्थतेची झळाळी आहे म्हणूनच भीमालाही त्या प्रेमाचा उत्तर आयुष्यात कधीही विसर पडलेला नाही उलट ज्या घटोत्कचाला आपण काही दिले नाही त्याने मात्र आपल्या आईच्या वचनाला जागून पांडवांसाठी आपला प्राण द्यावा याचे शल्य त्याला कायमचे दुःख देत राहिले. भीमाच्या दृष्टीने द्रौपदीचे त्याच्यावरचे प्रेम हिडिंबेच्या तुलनेत हिणकसच ठरते.
महाभारतासारख्या अति विशाल जीवनपटाच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी असल्यामुळे तिला काही मर्यादाही पडल्या आहेत. उदाहरणार्थ अनेक महत्त्वाच्या घटना फ्लॅशबॅक पद्धतीने त्रोटक स्वरूपात कोणत्या तरी पात्राच्या मुखाने त्या वदवल्या गेल्या आहेत. ते संदर्भ टाळता तर येत नाहीत आणि सगळ्यांना समाविष्ट करणेही शक्य नाही हे त्यामागचे कारण असले तरी कथानकातले तुटलेले दुवे अशाप्रकारे सांधून सलगता टिकवण्याचे प्रयत्न कादंबरीच्या सहजतेला बाधा आणतात. कृत्रिमतेकडे नेणारी ही ठिगळे लेखकाला अपरिहार्य झाली असावीत. लहानपणापासून महाभारत परिचित असलेल्या भारतीयांना त्यातील अपरिहार्यता समजू शकेल परंतु या इतिहासाला अनभिज्ञ अशा परकीय वाचकाला कथानकाचे आकलन किती समर्थपणे होईल याची शंका वाटते.
द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातील सर्वज्ञात प्रसंग म्हणजे कृष्णाने अदृष्य रूपाने द्रौपदीला वस्त्रे पुरवली तो प्रसंग येथे टाळला आहे. त्याचे कारण कदाचित् चमत्कार टाळण्याचा हेतू असेल असे वाटते. परंतु अन्यत्र असे चमत्कार नाहीत असे नाही. उदा. हिडिंबेचे मानवी रूप धारण करणे, आकाशगमन, घटोत्कचाचे स्मरण केल्याबरोबर येणे, मारुतीचा वृद्ध कपीचा अवतार इत्यादी. उलट द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाच्या वेळेस कृष्ण तेथे नव्हता, अन्यत्र कामात गुंतलेला होता, नंतरच त्याला या घटना समजल्या असे कादंबरीत दाखवले आहे.
द्रौपदीने फक्त आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, तिने आपल्यावर खरेखुरे प्रेम केलेच नाही असे वाटून भीमाची खंत कादंबरीत अनेकवेळा व्यक्त झाली आहे पण द्रौपदीजवळ त्याने ती कधी व्यक्त केलेली दिसत नाही. अन्यायाला वाचा फोडणा-या भीमाच्या स्वभावाच्या विरुद्ध हे वाटते. शिवाय ज्या व्यक्तीबद्दल एवढा विश्वास की जो अर्जुनाबद्दलही द्रौपदीला वाटत नाही त्या विश्वासामागे प्रेम नसणार हा विचार तेवढासा पटत नाही. शिवाय द्रौपदीची त्याच्याबद्दलची खरी भावना तिच्या मुखाने कादंबरीत कोठेच व्यक्त झालेली नाही त्यामुळे अप्रकाशित सत्य द्रौपदीवर नकळत अन्याय करून जाते असेही वाटते. भीम हा कादंबरीचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्याच्या मानसिकतेच्या शोधार्थ लिहिलेल्या कादंबरीत अशा काही थोड्याफार त्रुटी जाणवल्या तरी बुद्धीपेक्षा बळाचाच वापर करणारा, अविवेकी , तापट, आपल्या प्रतिज्ञापूर्तीसाठी युद्धाला कारणीभूत होणारा अशी त्याच्याबद्दलची आधीची कल्पना जाऊन विचारी, विवेकशील, न्यायी, सहानुभवी, महासंहारक युद्ध टाळावे हीच भावना प्रबळ असणारा, त्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा, प्रजाहितदक्ष, जबाबदार आणि प्रेमळ असा भीम मनात दृढ होतो हे लेखकाचे यश निश्चितच मोठे आहे. कादंबरीची भाषा सहज, प्रवाही, कादंबरीचा तोल आणि ओघ संभाळून कालानुरूपतेचा प्रत्यय देणारी आणि रोचक अशी आहे. कादंबरी हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय ठेवाविशी वाटत नाही. पहिल्याच कादंबरीने गाठलेली उंची लेखकाच्या पुढील कादंबरी लेखनाबद्दलच्या वाचकाच्या आशा निश्चितच वाढवते.
डॉ. सौ. मृणालिनी पोतनीस .१४६ गुरुवार पेठ पुणे ४२. फोन नं. २४४७७५२०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे
पुर्वी पत्रकार प्रेम पनिकर
भीमावर आंतरजालावर कादंबरी लिहायचे
ती वाचली होती, आणि छान होती.
http://prempanicker.wordpress.com/2009/10/05/bhim-complete-and-unabridged/

ही पण वाचिन.