रसग्रहण स्पर्धा - वाचणार्‍याची रोजनिशी - लेखक सतीश काळसेकर

Submitted by नंदन on 1 September, 2011 - 03:20

सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते. एलकुंचवारांनी लिहिलेलं 'पश्चिमप्रभा' किंवा विद्याधर पुंडलिकांचं 'शाश्वताचे रंग' ही लगेच आठवणारी काही उदाहरणं.

'वाचणार्‍याची रोजनिशी' हे सतीश काळसेकरांनी लिहिलेलं पुस्तक हाच वारसा समर्थपणे पुढे नेतं. 'इंद्रियोपनिषद', 'साक्षात', 'विलंबित' हे कवितासंग्रह लिहिणारे काळसेकर सिद्धहस्त कवी आहेतच, मात्र त्याशिवाय साठच्या दशकात उदयास आलेल्या 'लिटल मॅगझिन' चळवळीत एक कवी आणि संपादक म्हणून सक्रिय सहभागी असणारा साक्षीदार, म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास तीव्रतेने जाणवू लागलेल्या; चाकोरीतल्या रूढ साहित्यापेक्षा अधिक सच्चे, वेगळे काही लिहिले जावे अशी आच लागलेल्या; 'असो', 'फक्त', 'अबकडइ' सारखी वैशिष्ट्यपूर्ण अनियतकालिकं सुरू करणार्‍या चित्रे, नेमाडे, कोलटकर, भाऊ पाध्ये, राजा ढाले, तुलसी परब, चंद्रकांत खोत, अशोक शहाणे, अर्जुन डांगळे ह्या ताज्या दमाच्या साहित्यिकांच्या फळीचे काळसेकर हे प्रतिनिधी म्हणता येतील. आपल्या मध्यमवर्गीय अनुभवांची जाणवणारी मर्यादा, नैतिक कोतेपण आणि दांभिकता ह्यांच्या पलीकडे जाऊन बाहेरचे जग समजून घेण्याची तीव्र इच्छा, प्रयोगशीलता, मार्क्सवादाचा केवळ एक विचारसरणीच म्हणून नव्हे तर जगण्याच्या अनेक स्तरांवर केलेला स्वीकार ही या पिढीची व्यवच्छेदक म्हणता येतील अशी लक्षणं 'वाचणार्‍याची रोजनिशी'मध्येही लख्ख उमटतात.

लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होणार्‍या 'वाङ्मयवृत्त' ह्या मासिकात डिसेंबर २००३ पासून जानेवारी २००९ पर्यंत काळसेकरांनी 'रोजनिशी' नावाचा स्तंभ लिहिला. त्या साठ लेखांचं संकलन ह्या पुस्तकात आहे. अरुण खोपकरांची अतिशय नेटकी प्रतिक्रिया ह्या पुस्तकाला लाभली आहे. अगदी पहिल्या लेखापासून ह्या लेखात जो सहज संवादाचा सूर लागतो तो संपूर्ण पुस्तकात टिकून आहे. 'जे जे आपणासि ठावे' ते इतरांना सांगण्याच्या प्रेरणेतून हे सारे लेख लिहिलेले असले तरी कुठेही शिकवण्याचा किंवा शहाणे करून सोडण्याचा अभिनिवेश त्यांत जाणवत नाही. सतत जाणवत राहतं ते कुतूहल आणि ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः' (चांगले विचार चहूबाजूंनी आमच्यापर्यंत येवोत) ह्या वृत्तीने वेगळ्या विचारांचंही केलेलं स्वागत. बहुश्रुतता आणि व्यासंग यांच्यासोबतच जोपासलेली सामाजिक बांधीलकी आणि साहित्याची प्रवाही जाणीव.

काळसेकरांनी वाचलेल्या, सुचवलेल्या पुस्तकांची यादी देणं अशक्यप्राय आहे - लीळाचरित्र, तुकारामाच्या गाथा ते 'नाते' हे छोटेखानी कथा, रिपोर्ट, टिपणे व प्रवासनोंदी अशा मिश्र ललित लेखनाचे अमर हबीब ह्यांचे पुस्तक; मराठी साहित्याच्या विस्तारणार्‍या भूगोलाचा - पर्यायाने सदानंद देशमुख, रमेश इंगळे-उत्रादकर ह्या नव्याने लिहू लागलेल्या लेखकांच्या लेखनाचा मागोवा इथपासून ते इ. एच. कार ह्या इतिहासकाराच्या 'व्हॉट इज हिस्टरी?' ह्या मूलगामी ग्रंथाच्या अनुवादाचा वेध - हैदराबादहून प्रसिद्ध होणार्‍या 'पंचधारा' ह्या त्रैमासिकापासून ते अर्नेस्तो कार्देनाल ह्या निकाराग्वा देशातल्या 'मार्क्सवादी धर्मोपदेशक' कवीच्या भेदक कवितेपर्यंत 'जे जे उत्तम' काळसेकरांच्या दृष्टीला पडलं, ते त्यांनी वाचकापर्यंत आणलं आहे.

ज्या काळात आजच्यासारखी संवादाची साधने उपलब्ध नव्हती, अशा वेळी बाहेरच्या जगाबद्दल असणारं कुतूहल शमवण्याचं काम प्रामुख्याने पुस्तकं करत असत; त्यामुळे 'वाचणार्‍याच्या रोजनिशी'मध्ये पुस्तकांबद्दलची मतं आणि अनुभव बहुसंख्येने येतात, पण त्याचबरोबर संगीत, चित्रपट आणि नृत्याबद्दलही चर्चा होते. अर्थशास्त्राबद्दलच्या एका माहितीपूर्ण, पण सुबोध नियतकालिकाची माहिती येते. लोकभाषांच्या शब्दसंपदेबद्दल आणि जागतिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांबद्दल ते लिहितात. मार्खेझच्या कादंबर्‍यांच्याच जोडीने सुधीर पटवर्धनांच्या चित्रांची चर्चा होते आणि हिंदीभाषक कवी मंगेश डबरालबद्दल सांगत असताना संगीत हेही पूरक वाचन कसं ठरू शकतं, ह्याबद्दलही काळसेकर लिहून जातात.

इतका विस्तृत आवाका मांडण्याचा प्रयत्न करणारं हे पुस्तक मला दोन दृष्टींनी महत्त्वाचं वाटतं. एक म्हणजे, मराठीत वर्षाला सुमारे तीन हजार पुस्तकं प्रसिद्ध होतात. सगळीच दर्जेदार नसली तरी विषयांतलं वैविध्य, वेगळे प्रयोग करून पाहण्याची वृत्ती आणि आतापर्यंत अनेक वर्षं साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेर असलेला, मात्र नव्याने लिहू-वाचू लागलेला लेखकांचा आणि वाचकांचा वर्ग ह्या कारणांमुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं मराठीत आली आहेत. अनेक अनुवाद उपलब्ध होत आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषांतलं नवीन साहित्य आहेच, पण ह्या तिन्ही भाषांत यापूर्वी प्रकाशित झालेल्या पण वाचायच्या राहून गेलेल्या पुस्तकांचा डोंगरही 'अजून किती वाचायचं बाकी आहे' ह्या भावनेने छाती दडपून टाकणारा आहे. दुर्दैवाने यातली काही पुस्तकं वाचकांपर्यंत म्हणावी तशी पोहोचू शकत नाहीत. मर्यादित वेळेत जी वाचणं शक्य होतं, त्यातली काही वाचून पदरी निराशा येते. चांगलं लेखन म्हणजे काय, हे समजण्यासाठी जरी अधूनमधून असले धक्के सोसणं गरजेचं असलं तरी एखादा खंदा मार्गदर्शक असला तर बराच फरक पडू शकतो. अगदी अरुण टिकेकरांसारख्या साक्षेपी वाचकानेही 'हाती जे आलं ते चाळून, वाचून, वाङ्मयीन खाचखळग्यांतून स्वतःची स्वतः सुटका करून घेत मार्गक्रमण करावं लागलं. बरंच आयुष्य त्यामुळे वाया गेलं, अस मला आज वाटतं. एखादा वाचनगुरू मिळाला असता तर ते अधिक सत्कारणी लागलं असतं' अशी खंत व्यक्त केली आहे. 'योजकस्तत्र दुर्लभ:' ह्या न्यायाने असा योग्य वाचनगुरू लाभणं विरळाच. हे पुस्तक ती भूमिका पूर्णपणे पार पाडतं, हे म्हणणं धार्ष्ट्याचं होईल. मात्र ती वाट कशी असावी, ह्याची जाण मात्र करून देतं.

हे सारे लेखन स्तंभलेखांच्या स्वरूपात असल्यामुळे त्याला काही अंगभूत मर्यादा आहेत. 'शाश्वताचे रंग' सारख्या दीर्घलेखांच्या पुस्तकात जसं विस्ताराने एखाद्या पुस्तकाबद्दल लिहिता येतं, परभाषेतलं असेल तर त्यातली सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करता येते आणि आपल्या आवडीनिवडींच्या तपशिलांचा हवा तसा विस्तृत पट रेखाटता येतो, तसं लेखन 'वाचणार्‍याच्या रोजनिशी'मध्ये शक्य नाही. असं असलं, तरी नेमक्या शब्दांत त्यांचं मर्म वाचकापर्यंत पोचवण्याचं कसब काळसेकरांकडे आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी एखादं जर वाचलेलं असेल, त्याची वैशिष्ट्यं मनात पुन्हा जागी होतात आणि जी वाचायची राहिली आहेत, ती अर्थातच वाचावीशी वाटतात.

निव्वळ वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या यादीपेक्षाही ह्या लेखांतून सतत जागं असणारं त्यांचं कुतूहल आणि उदार, प्रवाही वाङ्मयीन दृष्टीचं येणारं प्रत्यंतर मला अधिक मोलाचं वाटतं. काळसेकर ज्या कालखंडात वाढले, तेव्हा इंटरनेट सोडाच पण दूरध्वनीही दुर्मीळ होते. माहिती मिळवण्याची साधनं मोजकी होती. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. हवी ती माहिती चुटकीसरशी उपलब्ध आहे. तरीही (किंवा त्यामुळेच) ज्याला 'कन्फर्मेशन बायस' म्हणतात, ती केवळ आपल्याच मताला पुष्टी देणारं वाचन करावं (किंवा संगीत ऐकावं/ राजकीय बातम्या देणार्‍या वाहिन्या पहाव्यात/ वृत्तपत्रं वाचावीत) ही वृत्ती वाढत चालली आहे. शिवाय हे केवळ वैयक्तिक पातळीवर अवलंबून नाही. अमेझॉन.कॉम सारखे संकेतस्थळ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट लेखकाची वा साहित्यप्रकारातली काही पुस्तकं घेतलीत, तर त्याच धाटणीची वा लेखकाची पुस्तकं तुम्हाला आवडतील म्हणून सुचवतं. न्यू यॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रातही तुमच्या वाचनाच्या पूर्वेतिहासावरून तुम्हाला रोचक वाटतील अशा लेखांच्या वा बातम्यांच्या सुचवण्या येतात. वरवर पाहता हे कदाचित तितके गंभीर वाटणार नाही. मात्र हळूहळू यातून विरोधी दृष्टिकोन समजूनच न घेण्याचा हटवादीपणा उद्भवू शकतो.

अभिजन, उच्चभ्रू वर्गाला जे आवडतं तेच चांगलं; इतर सारं थिल्लर हे एक टोक झालं. 'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक. आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. ती संपूर्णपणे आपण अंगी बाणवली आहे, असा दावाही कुणी करू नये. मात्र निव्वळ साहित्याचाच नव्हे तर कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, तिची जाणीव जागी असणं महत्त्वाचं आहे. सतीश काळसेकरांची 'वाचणार्‍याची रोजनिशी' वाचत असताना पदोपदी हे जाणवत राहतं. बोरकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं तर 'मुळी तटस्थ राहून शाखापर्णीं कंप भोगणार्‍या, भुजाबाहूंनी स्वैर वारे कवळणार्‍या झाडासारखी' ही जागृत जाणीव हा एक श्रीमंत करणारा अनुभव आहे.

----------------------------------------------------------------

पुस्तकाचे नाव - वाचणार्‍याची रोजनिशी
लेखक - सतीश काळसेकर
प्रकाशक - लोकवाङ्मय गृह
प्रथम आवृत्ती - जुलै २०१०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार वर्षापूर्वी "जत्रे"तून हरवलेल्या मित्राची खबरबात समजावी असे मला 'सतीश काळसेकर" यांच्याबद्दल इतके भारावून लिहिलेला लेख वाचल्यानंतर वाटले. नंदन थॅन्क्स.

'सत्यकथा' प्रवाहापासून फटकून राहून स्वतःच्या [बंडखोरीसदृश्य] मतांना खुले व्यासपीठ मिळाले पाहिजे यासाठी समविचारी मित्रांनी चालविलेली ती 'लिटल मॅगेझिन्स' ची चळवळ आणि त्यातील त्या शहाणे, चित्रे, नेमाडे, पाध्ये सदृश्य मशाली, त्या तेजात स्वतःचे अस्तित्व राखणारे सतीश काळसेकर यानी त्या काळात 'मस्ट' मानली जाणारी रंजकतेची वाट टाळून त्या पिढीच्या मनात ठसठसणार्‍या उद्रेकाला जी वाट करून दिली त्यामुळे खर्‍या अर्थाने वाचक मऊ मऊ चॉकोलेट चवीतून बाहेर पडला आणि प्रखर अशा सत्याला सामोरे जाऊ लागला. [पु.लं. नी "He caught us napping असे या चळवळीतील नेमाडे यांच्याबद्दल म्हटले होते] या सर्वांच्या विचाराला सतीश काळसेकर यानी सातत्याने जागृत ठेवले आहे, हे श्री.नंदन यांच्या लेखावरून स्पष्ट होतेच. काळसेकरांचे मार्क्सवादी चळवळीतील पक्षीय पातळीवरील कार्यही त्या पक्षाच्या धुरिणांना भावते आहे.

'एस्टॅब्लिशमेन्ट' च्या प्रवाहात स्वतःला झोकून देणे काहीच अवघड नसते कारण तीत तुम्ही काही वेगळे करत आहात असे काठावर मासेमारी करणार्‍याला काहीच वाटत नाही. पण 'अँटि-एस्टॅब्लिशमेन्ट अ‍ॅटिट्यूड' ही काही सरळसाधी सोपी गोष्ट नव्हे. ६० वर्षापूर्वीची 'कोसला' अजून पचनी पडत नाही हे वारंवार होत असलेल्या चर्चातून समोर येतेच, मग अशावेळी साहित्यात आणि जगण्यात जी काही तफावत आहे ती सातत्याने आपल्या मगदुरीप्रमाणे लोकांसमोर आणीत राहणे हे फार दुर्धर असे कार्य आहे आणि सतीश काळसेकर ते कार्य आजही करीत आहेत हे वाचून फार समाधान वाटले.

मी त्यांचे फुटकळ लेखन इथेतिथे वाचत असतोच पण आता या आवडत्या लेखकाची 'रोजनिशी' पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्याचे इथे माहीत करून दिल्याबद्दल श्री.नंदन याना जितके धन्यवाद द्यावे तितके ते कमीच म्हटले पाहिजे.

[पुस्तक परीक्षण तर 'नजर लागेल' असेच झाले आहे, हे सांगणेदेखील महत्वाचे आहे.]

अशोक पाटील

नंदन, सुरेखच लिहिले आहेस. तुझे परीक्षण वाचून पुस्तक घेईन आता.

>आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. ती संपूर्णपणे आपण अंगी बाणवली आहे, असा दावाही कुणी करू नये. मात्र निव्वळ साहित्याचाच नव्हे तर कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, तिची जाणीव जागी असणं महत्त्वाचं आहे. >> अगदी नेमकं.

ह्या पुस्तकाचे नाव वाचून मला मी वाचलेल्या Ex Libris: Confessions of a Common Reader ह्या पुस्तकाची आठवण झाली. मी हे प्रस्तूत पुस्तक वाचले नसल्यामुळे किती साम्य (विषयाचे) आहे ते माहिती नाही (पुस्तकांच्या नावाविषयी वरवर साम्य वाटते) पण ह्या पुस्तकातून अनेक नवीन नावे सुचतील त्यामुळे हे पुस्तक वाचेल.

नंदन,
तुझ्याशिवाय (आणि टण्याशिवाय) रसग्रहण हा विषयच अपुरा वाटतो बघ.
Do you know how much we (the readers) have thanked you over the years ?

सुरेख नेहमीप्रमाणेच.

नंदन,
तुझ्याशिवाय (आणि टण्याशिवाय) रसग्रहण हा विषयच अपुरा वाटतो बघ.
>>>
नाय गं! मी नंदन एव्हडे सुटसुटीत, सुस्पष्ट आणि अवतरणांनी युक्त नाही लिहू शकत. त्यानेच वर लिहिल्याप्रमाणे माझे स्वतःचे 'आकस' खूप आहेत. असो.

ह्या रसग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आलेल्या इतर संदर्भांमुळे केवळ ह्या पुस्तकाची माहिती, त्याची सौंदर्यस्थळे-उणीवा इतक्यापुरतेच ते मर्यादित न राहता ते इतर पुस्तकांची ओझरती ओळख करते तसेच नंदनच्या स्वत:च्या (पण पुस्तकाच्या विषयाशी संबंधित) भुमिकेने आपल्याला विचारास प्रवृत्त करते (प्रवृत्त करते हे महत्त्वाचे, चमच्याने भरवत नाही).

अभिजन, उच्चभ्रू वर्गाला जे आवडतं तेच चांगलं; इतर सारं थिल्लर हे एक टोक झालं. 'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक. >>

अरारा , इतरांचं प्याकेज ठरवणार्‍या / ओळखणार्‍यांची गोची केलीत की Wink

सुरेख पुस्तक अन सुरेख परिक्षण .
अमेरिकेतल्या कोणाकडे आहे का हे ? मला वाचायला पाठवाल का ?

नंदन, टण्या, स्वाती, रैना, केदार, ट्यू, इत्यादींनी असे पुस्तक / कलाकृती परिचयात्मक , 'जे जे आपणासि ठावे' प्रकारचे लेखन सातत्याने केले पाहिजे. या स्पर्धे निमित्ताने तरी ते सर्व जण ही मागणी मनावर घेतील काय ?

अ प्र ति म! अ प्र ति म!
शेवटचे दोन परिच्छेद खूप आवडले. पुरेपूर पटले.

आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. ती संपूर्णपणे आपण अंगी बाणवली आहे, असा दावाही कुणी करू नये. मात्र निव्वळ साहित्याचाच नव्हे तर कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, तिची जाणीव जागी असणं महत्त्वाचं आहे.

>>> याचा जिवंत अनुभव मी नुकताच आनंद भाटेचं गाणं प्रत्यक्ष ऐकताना घेतला. नाट्यसंगीताबद्दलचे माझे अनेक ग्रह बघता बघता कोसळले. ते कोसळताना जे वाटलं ते तू म्हटल्याप्रमाणे बावनकशी होतं. Happy

रैनाला प्रचंड अनुमोदन.

मेधा Lol

खूपच सुंदर, नेटकं परिक्षण नंदन! आपण वाचून झाल्यावर खरंच किती कमी विचार करतो काय मिळालय ह्या वाचण्यातून याचा हे वाचणार्‍याची रोजनिशी वाचून जाणवल्यावर मला तर काही दिवस न्यूनगंडानेच घेरुन टाकलेलं.

नंदन, वाचनीय आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे चिंतनीय. नेहमीप्रमाणेच. Happy

(शोनू, तुला मिळालं की मलाही पाठव. :P)

ह्या रसग्रहणाचे रसग्रहण व्हावे असे वाटायला लावणारे रसग्रहण. अगदी पहिल्या उद्गारांपासूनच मनाची पकड घेतं आणि ती पकड शेवटपर्यंत जराही न सैल करता पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवतं.
वाचून झाल्यावर मात्र वाटले की स्पर्धेकरता असणारी शब्दमर्यादा नसती तर आणखी मजा आली असती. अर्थात हा माझा स्वार्थ झाला तुझ्या लेखाचा दोष नाही Happy

खूपच सुंदर, नेटकं परिक्षण नंदन! आपण वाचून झाल्यावर खरंच किती कमी विचार करतो काय मिळालय ह्या वाचण्यातून याचा हे वाचणार्‍याची रोजनिशी वाचून जाणवल्यावर मला तर काही दिवस न्यूनगंडानेच घेरुन टाकलेलं.>>> अगदी!

नंदन, थँक्स!!!

नंदनजी सतीश काळसेकर यांना वाचणा-याची रोजनिशीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. एका बातमीसाठी मी तुमच्या वरील लेखातील काही मजकूर घेतला आहे. आधी तुमची परवानगी घेऊ शकलो नाही त्यासाठी क्षमस्व...

श्री. सतीश काळसेकर यांना वाचणा-याची रोजनिशीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. >>> हे वर्तमानपत्रातून कळल्यामुळे अशा प्रकारचे लिखाण "माबो" वर असणार याची खात्री होतीच ....

नंदन - अप्रतिम परीक्षण.. शेवटचे दोन परिच्छेद केवळ सुंदर....
मनापासून धन्यवाद ...

नंदन - अप्रतिम परीक्षण.. शेवटचे दोन परिच्छेद केवळ सुंदर....
मनापासून धन्यवाद ...
>>>+१

काल आणलंय हे पुस्तक, एक वर्ष झालं वाचून, मस्तच आहे, आवडतंय Happy