हितगुज दिवाळी अंक २०११ - घोषणा

Submitted by संपादक on 7 September, 2011 - 04:41

hda2011_newimage_ghoshana_firework.jpg

रसिकहो, सप्रेम नमस्कार!
प्रत्येक दीपावली सृजनाचा नवा प्रकाश, नवा आविष्कार घेऊन येते. म्हणूनच कवी गोविंदाग्रज म्हणतात . . .

ही जुनी दिवाळी नव्या दमाने आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गाली।

गणेशोत्सव सरता सरता देशातील, तसेच जगभर विखुरलेल्या साहित्यरसिक मराठी सुजनांना दिवाळी अंकाचे वेध लागतात. आपल्या सुजाण, अभिरुचीसंपन्न मायबोली परिवारात "हितगुज दिवाळी अंकाचे" अनन्यसाधारण महत्व आहे.

नवा विषय, नवा सकारात्मक दृष्टिकोन, तसेच आविष्कार व सादरीकरणातील नाविन्यामुळे मायबोलीचा "हितगुज दिवाळी अंक" नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.

हितगुज दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्रकाशित होणा-या वार्षिक अंकातून मराठी साहित्यातील "जे जे उत्तम उदात्त उन्नत" ते ते आपल्या चिकित्सक वाचकांपर्यंत पोचवावे, ही हितगुजच्या मागील अनेक दिवाळी अंकांची उदात्त परंपरा आहे.

मायबोली परिवारातील अनेक अनुभवी तसेच होतकरू लेखक आपले दर्जेदार साहित्य हितगुज दिवाळी अंकासाठी राखून ठेवतात हा आजवरचा अनुभव!

यास्तव, हितगुज दिवाळी अंक २०११ ही अधिकृत घोषणा सानंदे सादर करीत आहोत!

आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख, बालसाहित्य, विनोदी लेख, चुटके, दिवाळी संवाद(मुलाखती), शब्दकोडं, चित्रकला, हस्तकला, व्यंगचित्रं इ. लिखित किंवा/आणि दृक्-श्राव्य अलंकारांनी नटलेल्या साहित्याची आम्ही मन:पूर्वक प्रतीक्षा करीत आहोत.

हितगुज दिवाळी अंकाच्या मागील काही अंकांप्रमाणे यंदाच्या अंकातही "एक विभाग" विशेष संकल्पनेवर आधारीत साहित्यासाठी असणार आहे. नातेसंबधावर असलेली ही विशेष संकल्पना आहे, "थांग अथांग"!

नात्यांच्या अथांगतेचा थांग लागणे कठीण असते. आयुष्यात काही नाती तात्पुरत्या सावलीसारखी सुखावून जातात आणि काही उन्हासारखी पोळून . . .

रक्ताच्या नात्यापलिकडचे ऋणानुबंध कसे जुळतात, कसे बहरतात? काही ऋणानुबंध एका क्षणात का दुरावतात? अशा अथांग नात्यांचा थांग लावता येईल का?

आपल्या आयुष्यातील कुठल्याही "नात्याबद्दल" आम्हाला लिहून पाठवा. आपली शब्दफुले आम्हाला या दुव्यावर पाठवा.

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०११.
काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हाला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-पत्र पाठवून जरूर विचारा.

आपल्या संदर्भाकरीता खालील दुव्यांवर असलेली माहिती नक्कीच वाचनीय आहे.
१. हितगुज दिवाळी अंक २०११ नियमावली
२. मालकीहक्क (Copyright)
३. शुद्धलेखनासंबंधी नियमावली

दिवाळी संवाद/मुलाखती साधण्याआधी संपादक मंडळाशी विचारविनिमय करणे अनिवार्य आहे.

चला तर मग, विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे स्मरण करून कार्यारंभ करूया . . . लिहायला लागूया!

अवघाचि अंक, हितगुज करीन।
आनंदे भरीन "मायबोली"॥

आपले नम्र,
हितगुज दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ

विषय: 

दिन दिन दिवाळी
गाईम्हशीओवाळी
गाईम्हशी कुणाच्या
लक्ष्मणाच्या!!!!!

Proud

यावषीदेखील दर्जेदार अंक मिळो ही शुभेच्छा.

अरे वा! झाली का घोषणा! Happy

अवघाचि अंक, हितगुज करीन।
आनंदे भरीन "मायबोली"॥ - सुंदर ओळी.

संकल्पनेचं शीर्षकही आवडलं.

संपादक महोदय, कृपया वरील चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ते सांगावेत अशी विनंती! अनेक टोलेजंग इमारती दिसत आहेत.

अंकाला खूप शुभेच्छा! Happy

-'बेफिकीर'!

संपादक महोदय, कृपया वरील चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ते सांगावेत अशी विनंती! अनेक टोलेजंग इमारती दिसत आहेत.>>>>>>>

सम्पादक मन्डळ बान्धील नाही! Happy

सुंदर चित्र .

"हितगुज दीपावली विशेषांकाचे" >> आपण नेहमी हितगुज दिवाळी अंक असे लिहितो ना ?
दैनिके/ मासिके दिवाळी निमित्त विशेषांक काढतात

अरे वा.. मुसंबा कवयित्री.. त्यामुळे एकदम काव्यमय घोषणा झालीये की.. Proud

छान घोषणा आणि चित्र.. "थांग अथांग" नाव आवडलं..
अंकाच्या प्रतिक्षेत... Happy

Pages