अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक

Submitted by अभय आर्वीकर on 6 September, 2011 - 03:08

अस्तित्व दान केले - लोकमत दिवाळी अंक २०११

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा "अभय" भुकेला, धारिष्ट्यवान केले

                                        - गंगाधर मुटे
------------------------------------------------
              लोकमत दिवाळी विशेषांक

              

             मध्ये प्रकाशीत कविता/ गझल

------------------------------------------------

गुलमोहर: 

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले>>> मतला समजला नाही

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले>>> छान शेर!! Happy

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले>>> दोन मिसर्‍यांत संबंध असला तरी(म्हणजे हळवा, अश्रू, हुंदका वगैरे) हा शेरही समजला नाही

पुढच्या शेरांत दोन मिसर्‍यांतला संबंधच लक्षात आला नाही.

सडेतोड प्रतिसादाचा राग आला असल्यास क्षमस्व!!

सडेतोड प्रतिसादाचा राग आला असल्यास क्षमस्व!!

हा प्रतिसाद सडेतोड नाहीच आहे. केवळ काही बाबी समजल्या नाहीत, एवढेच म्हटले आहे. त्यात कसला राग?

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले....
हा एक शेर नीट नाही समजला...
बाकी गजल मस्त जमलेय.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. Happy

कुमारी, मतला समजल्याबद्दल अभिनंदन.
मतला अनेकांना कळला आहे.

मात्र मक्ता कुणालाच कळला नाही, असे दिसते. मांडणीत काहीतरी गडबड झाली असावी.

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले>>> दोन्ही शेर आवडले!

मतलापण सुरेख आहे.

देदीप्यमान शब्द आहे की दैदीप्यमान?

              लोकमत दिवाळी विशेषांक

              

             मध्ये प्रकाशीत झाली आहे.

------------------------------------------------