माझ्या आतली धारावी शोधून पहाताना.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ज्यु.कॉलेजमधे असताना पहिल्यांदा धारावी मधे गेले होते. लेदरच्या वस्तू तिथे खूप छान आणि स्वस्त मिळतात हे ज्ञान नुकतंच झालं होतं. इरॉसच्या बाजूच्या क्रॉसमैदानाबाहेर एक जण लेदरच्या ऍक्सेसरीज घेऊन बसायचा. त्याच्या कडच्या देखण्या हॅन्डबॅग्जमधली एक चामड्याच्या बारिक पट्ट्या चटईसारख्या विणून केलेली मोठी गोल झोला स्टाईल बॅग खूपच आवडली होती पण किंमत तेव्हाच्या दोन महिन्यांच्या पॉकेटमनीइतकी होती.
म्हणून मग धारावी.
अर्थातच तोपर्यंत घरुन कोणकोणत्या गोष्टी करायला परवानगी मिळते हे ठाऊक झालेलं असल्याने मी धारावीला जाणार आहे हे घरच्यांच्या कोणाच्या कानावर मी घालायची शक्यताच नव्हती.
शिवाय धारावी तशी अनोळखी नव्हतीच. दादरहून पार्ल्याला येताना तेव्हा माहिमचा बायपास नसल्याने सायनवरुनच यायला लागायचे आणि मग तो तीव्र गंध नाकात शिरला की गाडीच्या काचा वर करायची धांदल उडायची. इतक्या तीव्र घाण वासात माणसं चोविस तास कशी राहू शकतात याचं कुतुहल वाटायचं.मग खूप नंतर तो वास तिथे चालणा-या टॅनिंगचा हे कळलं होतं पण त्यावेळचा तो विशिष्ट वास धाराविचा म्हणजेच झोपडपट्टीचा म्हणून नाकात बसलेला.
बंद काचांमधूनही धारावी दिसायचीच.
माहिमच्या कचरा डेपो आणि डंपिंग ग्राऊंडवर कचरा गोळा करणारी मुलं दिसायची. ती आपापसात सतत मारामा-या करत असायची. ती धारावीची हे माहित होतं. दुसरी कुठली असूच शकत नव्हती. आमच्या इथे अंगण झाडायला येणा-या तेलुगू लक्ष्मीअम्माचा मुलगा धारावीत भंगाराचं काम करतो आणि खूप पैसे मिळवतो असं ती अभिमानानं सांगायची. माझी आजी तिला आमचे जुने टिशर्ट्स वगैरे द्यायची. मग गाडीच्या बंद काचांमधून धाराविची ती मुलं पहात असताना त्यातला कोणता लक्ष्मीअम्माचा ते ओळखण्याचा अजूचा आणि माझा खेळ असायचा. ज्याच्या अंगावर आपला जुना टिशर्ट दिसेल तो तिचा मुलगा असलं काहीतरी. अर्थातच तो कधी ओळखता आला नव्हता कारण त्या मुलांच्या अंगावरच्या कपड्यांचा रंगच कधी दिसला नव्हता.
धारावीची मुलं लोकल ट्रेन्समधेही भेटायची. ट्रेनमधे विकायला येणारे चिप्स, सळया वगैरे खायचं नसतं कारण ते धारावीत बनवलेलं असतं, रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांमधले च्युईंगगम्स गोळ्या मागायच्या नाहित कारण ते धारावीत बनतं याची दहशत मनात नक्की कधीपासूनची ते आठवत नाही पण आठवत नव्हतं तेव्हांपासूनच धारावीला असं अंगाबाहेर ठेवायला आम्ही शिकलो होतो. कुणीच मुद्दामहून शिकवलं नव्हतं. पण आम्हा सगळ्याच मध्यमवर्गिय मुंबईकरांच्या ते जणू जन्मत:च रक्तात भिनल्यासारखं.

लेदरच्या वस्तू विकत घेण्यासाठी मग त्यादिवशी अख्खी दुपार धारावीत घालवली. भरपूर खरेदी झाली. चर्चगेटच्या त्या एका पर्सच्या किंमतीत इथे पर्स,सॅन्डल्स,वॉलेट,बेल्ट इतकी खरेदी झाली.अजूसाठी एक लेदर जॅकेट घ्यायचा विचार केलेला पण घासाघिसीची कमाल मर्यादा गाठूनही किंमत जास्त होती आणि तितके पैसे उरले नव्हते.
मग त्या टपरी दुकानातला एक छोटा मुलगा म्हणाला दिदि थोडा और अंदर चलो. उधर आधे दाम मे मिलेगा. खरेदीच्या नादात आजूबाजूला काही पाहिलच नव्हतं. त्याच्या सोबत थोडं आतपर्यन्त चालून गेले आणि सगळी धारावी संपूर्ण बकालपणासह अंगावर चालून आली. असुरक्षिततेच्या एका लाटेसह. मग वाटेतले वेडेवाकडे पत्रे,काचा ओलांडत ज्या वेगाने मी बाहेर पडले होते तो वेग अजून पावलांना जाणवतो.

झोपडपट्ट्या तशा मुंबईत काही कमी नव्हत्या. बांद्र्याचा फ़्लायओव्हर झाला नव्हता तेव्हा कलानगरचा झोपडपट्टयांचा समुद्र टाळून पुढे सरकताच यायचं नाही. बोरिवली नॅशनल पार्क बाहेर किंवा लांब कशाला तेव्हा जवळच्या एअरपोर्टपाशीही काही कमी झोपड्या नव्हत्या. शिवाय कुठे सोलापूर वगैरेजवळच्या दुष्काळामुळे मुंबईत जगायला आलेल्यांची पालं जोगेश्वरी किंवा अंधेरी फ़्लायओव्हरपाशी पडायची. त्याही झोपड्याच होत्या. पण धारावी जशी सतत भेटत गेली तसं इतर कोणीच नाही.

कॉलेजच्या लास्ट इयरला असताना एका प्रोजेक्टच्या निमित्ताने धारावीत पहिल्यांदा आत पाऊल ठेवलं. तिथल्या कुंभारवाड्यातली सुबक देखण्या पणत्यांनी भरुन गेलेली गोल वर्तुळं, रंगिबेरंगी पतंगांच्या माळा, लालभडक सुकवत टाकलेल्या मिर्च्यांच्या आणि पिवळ्याधमक गोल पापडांच्या रांगा यांचे आम्ही घेतलेले फोटोग्राफ्स इतके देखणे होते की आमच्या प्रोजेक्टला पहिलं बक्षिस मिळालं.
त्या प्रोजेक्टच्या वेळी दिल्लीहून शिकायला आलेली एक मैत्रिण हमारे यहां शहर के बिच नही रहति इतनी गंदगी म्हणत नाक मुरडताना पाहिली तेव्हां पहिल्यांदाच प्रचंड राग आला. म्हणजे गंदगी आहे हे माहितेय. पण तु कशाला बोलून दाखवतेस आणि वर नाक मुरडतेस आमच्या शहराला. जा दिल्लीतच जाऊन कर तुझा प्रोजेक्ट असं तेव्हाचं फ़िलिंग लख्ख आठवतय.
अजूचं लग्न झाल्यावर प्राचीला घेऊन मी एकदा परत लेदरच्या वस्तूंसाठी तिथे गेले तेव्हा आता सायन स्टेशनबाहेरच त्या लोकांनी आपली दुकानं आणलेली पाहिली. धाराविच्या आतपर्यन्त जायची गरज नव्हती. दुकानात चिक्कार फ़ॉरेनर्स होते. मधल्या काळात धारावी आणि धारावीत येणारी माणसं बरीच बदललेली दिसली. प्राची इंदोरची होती. धारावी बाहेरुनच बघूनही ती खूपच थक्क झाल्यासारखी दिसली पण तशी ती सेंटॉरच्या लॉबीतल्या शॉप्सना बघूनही झाली होती. मुंबईबाहेरुन आलेल्या कोणाचीही ती टिपिकल प्रतिक्रिया तोपर्यन्त ओळखिची झाली होती.
नंतरच्या काळात कधी माझ्यासोबत सुट्टीत कोणी परदेशी मित्रमैत्रिणी यायचे तेव्हा धारावीत गेले होते काही निमित्तांनी. एथनिक फोटोसाठी हमखास कुंभारवाड्यात नेलं की तिथली सुरेख भांडी भुरळ घालायचीच.

मग अनुपम माझ्यासोबत मुंबईला आला तेव्हा त्याने तिथे जाऊन कातडी कमावताना वापरात येणा-या रसायनांच्या आणि डंपिंग ग्राउन्डवरील घातक मेटल, पा-याच्या प्रदुषणावर एक मोठं शूट केलं तेव्हा त्याची एडिटेड प्रिन्ट पहिल्यावर जबर धक्का बसला. ते तिथे होतच आधीपासून! आपली किती सिलेक्टिव्ह साईटींग असते आणि बघायला आवडत नाही ते बघायचं आपण किती बेमालूम टाळतो हे जाणवून बसलेला तो धक्का होता. कॅमेरा काहिच लपवत नाही. लपवलं नव्हतंच. त्याने ही डॉक्यू तिकडे देऊ नये असं पहिल्यांदा तीव्रतेने वाटलं. तसं त्याला सांगितल्यावर तु धारावीच्या मातीची भांडी बनवणा-यांवर पंचवीस मिनिटांची फ़िल्म खर्च केलीस त्यापेक्षा माझी बारा मिनिटांची फ़िल्म जास्त महत्वाची आहे, त्या लोकांसाठी सुद्धा. या आर्ग्युमेन्टवर बोलण्यासारखं काही नव्हतंच आणि ते पटलही होतं. पण अस्वस्थ वाटायचं राहिलं नाही ज्या दिवशी स्क्रिनिंग होतं तेव्हा पाहिलीय मी आधी असं म्हणत त्या सगळ्या ’बाहेरच्या’ लोकांसोबत बसून बघायचंही टाळलं.

त्यानंतर आत्ता स्लमडॉगमधून परत एकदा धारावी दिसली.
अक्षरश: दिसली.
चित्रपटातून धारावी दिसणं खरंतर आता नविन राहिलं नव्हतं. चक्र पासून सलाम बॉम्बे, सत्या अगदी धारावी नावाच्या सिनेमातून सुद्धा माधुरी दिक्षितच्या पलिकडेही ती दिसली होती.

एसडिएम मधेही धारावी या सा-या फ़िल्म्सप्रमाणे स्क्रिप्टचा एक भाग म्हणून दिसली.
पण दिसली ती धारावीतल्या सगळ्या जीर्ण, खडतर, अभावग्रस्त बकालपणासकट संपूर्ण.

डंपिंग ग्राउन्डवरचं त्यांचं जगणं, लोकल ट्रेन्स मधून काहीबाही विकणं, चोरी करणं, टपावरुन प्रवास, उन्हातानात पावसाळ्यात जगण्यासाठी धडपड, हॉटेल कॉल सेन्टरमधल्या फ़ुटकळ नोक-या, एखाद्याला सेवा पुरवण्याची गरज, लहान मुलांना पळवून भिक मागायला तयार करणे, दंगल, जाळपोळ यासकट दाहकपणे धारावी समोर दिसली.

जशी मला आत्तापर्यन्त दिसली होती काचेआडून किंवा कडेकडेने बाहेरून ती आणि जी दिसली नव्हती कारण मी पहायचं टाळलं होतं ती सुद्धा.
फक्त मलाच नाही माझ्याबरोबर सा-या जगालाही दिसली.

तिने मनोरंजन केलं आणि (म्हणूनच) खिन्नही केलं.

मातीचे दिवे आणि रंगित पतंगां पलिकडची धारावी सगळ्या जगाने बघितली म्हणून मला काय वाटलं? आणि काय वाटायला हवं होतं?

सिनेमा पाहून झाल्यावर मी खूप दिवस विचार करायचंच टाळलं.

सिनेमा चांगला आहे. पण अगदी ’पहायलाच हवा’ असं तीव्रतेने दुस-याला सुचवावसं वाटेल इतका काही नाहीये, पाच स्टार जास्तच झाले तीन ठिक आहेत इतपतच सावध प्रतिक्रिया देत गप्प बसले.
पण तरीही कुठेतरी मनातल्या मनात घरातलं दारिद्र्य, कमीपणा घरातच रहायला हवं होतं, ते बाहेरच्यांना मुद्दाम का उघडं करुन दाखवावं ही इन्स्टन्ट मधयमवर्गिय प्रतिक्रिया माझीही होतीच.
पण मग बाहेरच्यांना आत्तापर्यन्त मी सुद्धा धारावी काय कमी दाखवलि होती? जशी आणि जितपत मला दिसली होती, झेपली होती ती धारावी मी माझ्या कुवतीनुसार बाहेरच्यांना नव्हती दाखवली?
धारावी मुंबईच इतकं एक अविभाज्य अंग की मुंबई दाखवताना ती दिसणं अपरिहार्यच हेही माहित होतं.

मला धारावी चित्रपटातून दिसल्याची लाज वाटली होती कां? नाही.
धारावीतली जगण्याची धडपड लाचार किंवा लाज वाटणारी कधीच नव्हती. गेटवेला परदेशी लोकांसमोर हात पसरुन भिक मागणा-या मुलांना एका रांगेत उभं करुन त्यांचे फोटो काढताना एका परदेशीला पाहून झालेला जिवाचा संताप, वाटलेली शरम आणि घृणा एसेमडि मधल्या धारावीला पाहून नक्कीच वाटली नाही.

झोपडपट्टी, गरिबीच्या दर्शनाने बदनामी झाली असं वाटलं कां?
पण मग गरिबीचे प्रदर्शन काय आत्त्ताच झालेय? संयुक्त राष्ट्रसंघाचे कित्येक अहवाल, भारतातील कुपोषण, बालमृत्यू, रोगराई, दारिद्यरेषेखालची कुटुंबे, भ्रष्टाचार यातून आपली गरिबी जगाला कधीच कळलेली होती.लाज वाटायचीच होती तर तिकडचे मिशनरीज, सेवाभावी संस्था इथे येऊन काम करतात, औषधे अन्न कपडे वाटतात ते घेताना, पहाताना लाज वाटायला हवी होती.
आपले हिंसाचार, पोलिसी अत्याचार, भ्रष्टाचाराने भरलेले देशी सिनेमे परदेशातही दाखवले जातात, ते गाजतात तेव्हाही बदनामी झाली असं वाटायला हवं होतं.

पण मग आत्ताच कां? काय वाटतय मला? आपल्याच शहरातल्या धारावीला आता जगासमोर उघडे केलेले पाहून?

मला माझ्या खूप आत डोकावत त्या धारावीला पाहून मला नक्की काय वाटतय ते शोधायलाच हवं होतं.
आणि ते समजलं. माझ्यापरिने मी ते समजून घेतलं.

माझ्यात काही कॉम्प्लेक्सेस आहेत, काही न्य़ुनगंड आहेत. आणि ते कशामुळे आहेत, माझ्यातल्या कोणत्या उणिवांमुळे आहेत, किंबहुना ते आहेत याचा थांगपत्ताही कोणाला लागू न देता मी आत्तापर्यन्त जगले. तो लागलेला नाही या समजात जगले. तो न्यूनगंड लपवून इतर ब-याच माज करता येण्यासारख्या गोष्टींचा शो ऑफ़ करत सुखाने मस्तीत जगले.
आणि अचानक कोणीतरी त्यावर बोट टेकवलं, माझ्यातला तो आत्तपर्यन्त मी लपवलाय असा वाटलेला कॉम्प्लेक्स अचानक त्याने उघडा पाडला. मी दुखावले. मी संकोचले.
मी हे विसरले की त्या उणिवा होत्याच. माझा एक भाग म्हणूनच होत्या. आहेत.
माज करायचा, शो ऑफ़ करायचा तर त्या उणिवांसकटच करायला हवा नां?
लोकांसमोर इतर गोष्टी मिरवल्या अभिमानाने त्यात ती का लपवायची? माझाच एक भाग असलेली ती उणिव.
माझ्या शहरातली धारावी.
कसली लाज आणि कशाला राग.
तिच्यासकटच मी आहे.
ति आहे आणि तरी इतरही मी आहेच.

विषय: 
प्रकार: 

अगदी माझ्या मनातली धारावी उतरल्या सारख वाटल वाचुन.

तिने मनोरंजन केलं आणि (म्हणूनच) खिन्नही केलं. >
ज्या वेगाने मी बाहेर पडले होते तो वेग अजून पावलांना जाणवतो.>
ट्यु, खूप छान लिहिलयस ...

-----------------------------------------
सह्हीच !

छान लिहील आहेस, अगदी आतल.. खिन्न वाटलं.. ज्यांना सगळ्या सुखसोयी मिळूनसुध्दा जे कुरकुर करतात त्यांनी बघावीच एकदा धारावी.. Sad स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी मुलभूत गरजा कोणतेही सरकार पूरवू शकत नाहीत नागरिकांच्या .. धिक्कार असो आपल्या सगळ्यांचाच.. Sad

<<पण तरीही कुठेतरी मनातल्या मनात घरातलं दारिद्र्य, कमीपणा घरातच रहायला हवं होतं, ते बाहेरच्यांना मुद्दाम का उघडं करुन दाखवावं>> ह्म्म्म्म!! खरं आहे तुझं.. झाकली मुठ झाकलेलीच राहिली तर ठीक असतं.. मला खरच ते स्लमडॉग च कौतुक नाहि आवडलं.. अप्रत्यक्षरित्या भारतातली गरीबीच दाखवण्याचा प्रयत्न अन त्याचं हे असं भांडवल..
तुझा लेख मनात खुप खोलवर गेला.. छानच लिहिलयेस.

माझाच एक भाग असलेली ती उणिव.
माझ्या शहरातली धारावी.
कसली लाज आणि कशाला राग.
तिच्यासकटच मी आहे.
ति आहे आणि तरी इतरही मी आहेच.
<<<

...!

ट्युलिप, स्फुट आवडले.

सुरेख लिहिलं आहे Happy

आपले हिंसाचार, पोलिसी अत्याचार, भ्रष्टाचाराने भरलेले देशी सिनेमे परदेशातही दाखवले जातात, ते गाजतात तेव्हाही बदनामी झाली असं वाटायला हवं होतं. >>>>>>>

खरच आहे अगदी !! Sad

अंतर्मुख करायला लावणारा लेख आहे ! Sad

सुरेख !
>>> तिच्यासकटच मी आहे. ति आहे आणि तरी इतरही मी आहेच.
अगदी.
आतलं ठसठसणारं स्वच्छ सूर्यप्रकाशात बाहेर आलं तर ठसठस कमी होतेच असे नाही, पण तिच्याकडे तसे पाहिल्याने ती आतली न राहता आपली होते.

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    ट्यु धाराविची कैफियत योग्य शब्दात मांडली आहेस...

    मार्केटिंगसाठी धारावि एरिया म्हणजे फुल बिजनेस्... पण या धाराविचे वरिलप्रमाणे जेव्हा मार्केटिंग होते तेव्हा फार वाईट वाटते... Sad

    ट्यु, मस्त लिहिलंस . नेहमीप्रमाणेच. माझ्या मनात सुद्धा हेच द्वंद्व चालू होते . माझ्या परीने मी काढलेला अर्थ असा ...
    पहिल्यांदा सिनेमा पाहिला तेव्हा मला खरं म्हणजे ह्या सिनेमाला ईतके ऑस्कर्स मुद्दाम दिलेत , असे वाटले . भारताच्या गरिबीचे प्रदर्शन करणार्‍यांचा उदो उदो केला ,म्हणून चीड आली.
    पण नंतर असं जाणवलं , आपल्या ( समाजाच्या आणि स्वत च्या ) [ विसर्ग काढता येत नाहीये Sad ] उणिवांचे दर्शन आपण सहन करु शकत नाही. मात्र अशा उणिवांचा पाश्चात्य देशांमध्ये अगदी सहज स्वीकार केला जातो .
    हेच खरे कारण आहे , स्लमडॉग सिनेमा बघा असं माझ्या पाश्चिमात्य मित्र मैत्रिणींना न सांगण्याचे .
    हे द्वंद्व मात्र अजूनही संपलेले नाही. Happy

    गेटवेला परदेशी लोकांसमोर हात पसरुन भिक मागणा-या मुलांना एका रांगेत उभं करुन त्यांचे फोटो काढताना एका परदेशीला पाहून झालेला जिवाचा संताप, वाटलेली शरम आणि घृणा...>>
    तिने मनोरंजन केलं आणि (म्हणूनच) खिन्नही केलं.>>
    खरंच छान लिहिलंय. Sad
    --
    Come on you raver, you seer of visions,
    come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!

    आरशासमोर उभे राहून स्वत:च्या विचारांचे प्रतिबिंब पाहिल्यासारखे वाटले.
    खूप छान लिहिले आहे.

    ट्युलिप, छान लिहिलं आहेस.

    आपले हिंसाचार, पोलिसी अत्याचार, भ्रष्टाचाराने भरलेले देशी सिनेमे परदेशातही दाखवले जातात, ते गाजतात तेव्हाही बदनामी झाली असं वाटायला हवं होतं. >>>>>>> यातच खूप काही आलं! _________________________
    -Impossible is often untried.

    ट्यु, नेहमीप्रमाणेच मस्त. आमच्याकडून बांद्र्याला जाताना धारावीहूनच जावं लागतं पण तिथे उतरुन धारावीला एवढ्या जवळून बघायची वेळ अजून आलेली नाही. आम्हीही काचा बंद करुन 'काय ती घाण' अशा मख्ख कमेंटस पास करुन पुढे निघून जातो.

    स्लमडॉग बद्दल तुझ्यासारखीच रिअ‍ॅक्शन ऐकायला मिळाली, बर्‍याच जणांची. मी अजून पाहिलेला नाही तेव्हा आवडेल न आवडेल माहित नाही. पण तुझ्यासारखंच वाटेल आतून अशी खात्री आहे.

    तुझा हा पॅटर्न आता ओळखीचा झालाय. मधेच गायब व्हायचं १,२ आठवडे. पार्ल्यात काहीतरी खरडायचं, परत गायब व्हायचं आणि मग एक छानसं ललित लिहून पुन्हा अज्ञातवासात. Wink

    छान लिहिलंयस ट्यु...

    फार छान लिहीलय! खूप आवडलं!

    सुरेख लिहिलंयस ट्युलिप!

    मस्त नि एकदम अचूक लिहिलयस ......

    ट्यू, ब्लॉगवर आधी वाचलं, त्यामुळे तिथे अभिप्राय दिला होता.
    अगदी नेमकं लिहिलं आहेस. Happy

    खूप मस्त! तुझ्यात आणि इतरांच्यात फरक हा आहे टयु की तू चित्रपट नुसते पाहात नाहीस तर त्यांचा एक भाग होऊन जातेस किंवा ते तुझा भाग होऊन जातात. जोधा अकबर पण तुझ्या नजरेतून पाहिल्यामूळे जास्त भावला. असेच चित्रपट पाहात राहा आणि लिहीत राहा.

    नेमक ते सांगितलयस्...छानच लिहलयस

    खूप सुंदर लेख. अन्तर्मुख करणारा . स्लमडॉग पेक्शा कितीतरी चांगले चित्रपट येऊन गेले पण ऑस्कर खिशात घातले स्लमडॉग ने. तेव्हाच असं वाटलं की आपली झोपड्पट्टी बघायला आवडते . आणि खरच कित्येक अभारतीयांना आवड्लाच आहे हा सिनेमा. आपल्याला मात्र हूरहुर वाटत रहाते. सगळ्यांच्या मनातल्या भावना अत्यंत योग्य शब्दात मांडल्या आहेस. अभिनंदन !

    ................................................................
    मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.....केव्हा तरी पहाटे !

    ट्युलिप, हा मूव्ही बघण्यापूर्वी, नंतर नक्की काय वाटलं ते मनातल्या मनातही कळत नव्हतं... मोठ्ठ्याने शब्दांत तर शक्यच नाही...
    आज कळलं... मला नक्की काय वाटत होतं. भारतातून बाहेर पडून १८ वर्षं झाली ... ही तडफड थांबत नाही. ऑफिसात वगैरे सरळ सरळ भांडणं होतात... अगदी देसी कलीग्जशीसुद्धा. मग कशाला आलात ते सोडून इथे?... असलं विचारलं की... अजून उत्तर सुचलेलं नाही... तूच देशील कधीतरी माझ्या डोक्यातल्या त्याही प्र्शनाचं उत्तर, बहुतेक.

    असं कुठेतरी "बाहेरच्यात" सुरूवात करून "आतल्यात" संपवणं... तुझी खासियत आहे. ट्युलिप, मनापासून तुझं कौतुक वाटतं.... बहरू दे!

    नेमकं लिखाण!
    चेंबूर ते बांद्रा माझा शाळेचा प्रवास आठवला. ...

    >>>म्हणजे गंदगी आहे हे माहितेय. पण तु कशाला बोलून दाखवतेस आणि वर नाक मुरडतेस आमच्या शहराला. जा दिल्लीतच जाऊन कर तुझा प्रोजेक्ट असं तेव्हाचं फ़िलिंग लख्ख आठवतय. <<<

    बाकी मुंबईबाहेरून येणार्‍यां लोकांच्या प्रतिक्रिया ह्या नाक मुरडणार्‍याच असतात. मुंबई नवीन लोकांना सामावून घेते, नवीन जीवन देते, पैसा कमवायची संधी देते तरी मुंबईतील 'बाहेरच्यांना' फक्त घाणच दिसत असते आणि इथे तिथे फक्त मुंबई कशी घाण आहे, किती वाईट आहे,लोक कशी वाईट आहेत असेच बोलतील. मग त्यांना असे विचारावेसे वाटते की का नाही मग आपल्याच गावातच राहून मिरवत का दिवे लावत? शेवटी अश्या कृतघ्न लोकांकडून काय अपेक्षा? हा त्यांचा इन्फेरिऑरीटी कॉम्प्लेक्स ते इथून तिथून व्यक्त करतात कारण त्यांच्या गावात मुंबईसारखी संधी मिळत नाही ना त्यांना. असो.

    सुं -- द -- र!!
    हे आहे हे असं आहे, माझा देश हा असा आहे, मुंबई ही अशी आहे ही सत्यता स्वीकारावी हे उत्तम.
    (एस.डी.एम. वर टीका करणारे एकता कपूरच्या बिनडोक टी.व्ही. सिरीयल्स मुळे आपल्या देशाची कुठली काल्पनिक संस्कृती परदेशात पोचतीये त्याचा विचार करत नाहीत. दाहक वास्तवता बॉलिवूडच्या प्रेक्षकांना रुचत नाही हे तर अनेकदा सिध्द झालंय.)

    ~~~
    पकाक पॅक पॅक पॅक पॅक

    माफ कर ट्यु तुझ्या सुंदर लेखाच्या इथे वाद सुरू होतोय त्याबद्दल.

    पण मुंबईमधील काही लोकांचा हा जो अ‍ॅटीट्यूड आहे जो मनुच्या या खालच्या पोस्टमधे आहे तोही धारावीइतका घाणेरडा आणि अतिशय अपमानास्पद आहे.
    >>बाकी मुंबईबाहेरून येणार्‍यां लोकांच्या प्रतिक्रिया ह्या नाक मुरडणार्‍याच असतात. मुंबई नवीन लोकांना सामावून घेते, नवीन जीवन देते, पैसा कमवायची संधी देते तरी मुंबईतील 'बाहेरच्यांना' फक्त घाणच दिसत असते आणि इथे तिथे फक्त मुंबई कशी घाण आहे, किती वाईट आहे,लोक कशी वाईट आहेत असेच बोलतील. मग त्यांना असे विचारावेसे वाटते की का नाही मग आपल्याच गावातच राहून मिरवत का दिवे लावत? शेवटी अश्या कृतघ्न लोकांकडून काय अपेक्षा? हा त्यांचा इन्फेरिऑरीटी कॉम्प्लेक्स ते इथून तिथून व्यक्त करतात कारण त्यांच्या गावात मुंबईसारखी संधी मिळत नाही ना त्यांना. असो.<<
    मनुस्विनी,
    मुंबईमधे विविध संधी निर्माण होण्यामधे तुझं कवडीभरही कर्तुत्व नाही. तेव्हा तुला मुंबईत संधी आहेत याचा सुपिरीअ‍ॅरिटी कॉम्प्लेक्स(स्पष्ट शब्दात दंभ) असायचं कारणच नाही. दुसरं म्हणजे मुंबईत रहाणारा प्रत्येक जण ही घाण निर्माण करत असतो आणि ती वाढायला मदत करत असतो. तुम्ही पहिल्यापासून (आदीम काळापासून बहुतेक!) रहाता म्हणजे त्यातली तुमची कॉन्ट्रिब्युशन जास्त. तसेच मुंबईच्या बाहेरून येऊन अनेक लोकांसाठी विविध संधी निर्माण करणारे, स्वतःच्या कर्तुत्वाने मुंबईचं नाव वाढवणारे, मुंबईला कर्मभूमी मानणारे भरपूर लोक आहेत मुंबईत. तू यातलं काय केलंस मुंबईसाठी की तुला या सगळ्या लोकांना कृतघ्न म्हणण्याचा अधिकार मिळतो? तू उठून दुसर्‍या ठिकाणी जाऊन काम करतेसच ना? तिथले अनेक दोष दिसत असतील तुला त्याबद्दल बोलतेस तेव्हा तुझ्यावरही हाच कृतघ्न पणाचा शिक्का लागतोच. इतरांना एक नियम आणि तुला एक नियम असं नाही.
    तुझी विधानं अतिशय अपमानास्पद आणि एकांगी आहेत. त्याची खरी बाजू दाखवायचा हा प्रयत्न. राग आला तुला तर तुझा प्रॉब्लेम.

    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    मला राग येण्यापेक्षा तुला खूप झोंबली आहे पोस्ट हेच दिसून येते. त्याचे कारण तूच शोधले तर बरे. कारण मी फक्त वरती मुंबईबाहेर लोकांवरील जे वरती वाक्या आलेय त्या वाक्यावर लिहिले आहे. पण तूला उगाच आपल्या मर्जीनुसार अर्थ लावून तळतळाट करून घ्यायची नी ओरडाओरड करायची सवय आहे जी सर्व ज्ञात आहे त्याल कोण काय करणार? तेव्हा तू आता ह्याच्यानंतर पण कर तुझा तळतळाट त्यातच तुझी स्वताची वृती दिसून येते. मला गरज नाही वाटणार आणखी पोस्ट लिहून माझा वेळ घालवायची आणि नको तो वाद सूरू करायची नको तिथे.

    Pages