पंक्चरलो काहीसे.. फुलोंकीघाटी, हेमकुंड (३)

Submitted by रैना on 28 August, 2011 - 14:41

http://www.maayboli.com/node/28283 - भाग २

पिपलकोटी ते गोविंदघाट, गोविंदघाट ते घांघरिया

आजचा दिवस फार महत्त्वाचा होता. पहिली चढण आज होती. पण काय झाले होते कळले नाही. हे पुरेसे माझ्या मेंदूत घूसले नव्हते का काय ते आठवत नाही .. कार्यक्रमाची रूपरेषा दहावेळा वाचूनही त्याचे गांभिर्य लक्षात आले नव्हते. असो. तर त्यामुळेच की काय मजेत होते. पंचपंच उषःकाली अप्रतिम देखावा होता, घाटीमध्येच राहिलोहोतो. उजाडायला सुरवात झाली होती, समोर छोट्याश्या सुरेख देवळात घंटानाद आणि काकड आरती सुरु होती. रस्किन बाँड लिहीतात ना, तेच पहाड समोर होते, डोंगरमाथ्यावर उभी पाईनची झाडे मनिमाऊच्या मिशांसारखी फिस्कारली होती. दिवस चोरपावलांनी थबकत चढत होता निवांत. नुसता दिवस चढताना पहायला पूर्णवेळ तिथेच बसावेसे वाटत होते. धुके होते, आल्हाददायक शिरशिरी होति. पहिला (पक्षी) ब्लू व्हिसलिंग थ्रश दिसला. साहेबांनी नाव सांगीतले.
पहिलून पाहणार्‍याला कावळाच वाटावा. पण चोच पिवळी आणि काळपट निळा रंग. शेकड्याने हाच पक्षी दिसत होता नंतर सगळीकडे. आवाजही गोड.
Pine.JPG

दरम्यान शैलजाताईंच्या कॅमेर्‍याच्या बॅटरीने चार्ज व्हायला नकार दिला. काय ते कळेना. आदल्या रात्रीच्या थांब्यावर विनासायास गरम पाणी मिळल्यामुळे जगात बर्‍याच ठिकाणी गरम पाणी मिळते अशा गोड गैरसमजात मी. नेमके इथे खूप गार पाणी, त्यामुळे अंघोळीला कल्टी मारावी लागली. काही दिवस केस धुतले नाही तर जीव जात नाही कोणाचा, पण 'सिव्हीलियन' गृहितकं भोवली. तेल लावले केसांना आणि मग सकाळी ते चेहर्‍यावर ओघळले अर्थातच. अवतार पांडुरंग (रखुमाई. टु बी प्रीसाईज) झाला होता. स्वातीला हा विनोद खूप दिवस पुरला. त्यावरून नंतर सर्व मुलींने योग्य तो बोध घेतला. जनकल्याणासाठी कोणा ना कोणाला तरी प्रथम प्रयोग करुन पहावा लागतो, त्याचे काहीच नाही. असो.

आज चालायला सुरवात करायची होती, वरच्या सॅकमध्ये जरुरी सामान भरले आणि बाकीचे कोंबले. 'कध्धी एकदा चालायला सुरवात करणार' हा आगाऊ खयालही नंतर पुन्हा कधीही आला नाही. चक्क काही पावलांवरच्या टपरीत चहा मिळाला. निशांतच्या पी.जेंना बहार आली होती. 'पिपलकोटी'जोक्स सुरु होते. तिथला माणूस म्हणे काहीही मागीतले म्हणजे प्यायचे पाणी, अंघोळीला गरम पाणी , उशी वगैरे.. काहीही मागीतले की 'ये यहाँ कहा मिलेगा' असेच उत्तर देई. अत्यंत तेलकट सुरात 'ये यहाँ कहा मिलेगा' ही पंचलाईन होऊन बसली.

सामान पुन्हा टपावर बांधून (यावेळेसमात्र शेकडो प्लॅस्टिकपिशव्यांमध्ये सामान काळजीपुर्वक बांधले होते सर्वांनी होता होईतो. देवामाझीहिंदूभिजूदेऊनको.) पुढे प्रवास सुरु केला होता. जेमतेम बसथांब्यापर्यंत गेलो तर लोकांच्या हाळ्या.. विरुद्ध बाजूने येणार्‍या गाड्या येत नव्हत्या म्हणजे पुढे कुठेतरी ढलन असणार. तिथेच थांबावे की पुढे जावे?
साहेब म्हणले चला पुढे जाऊन पाहु आणि एका अफाट ठिकाणापाशी आम्ही थांबलो.

गरुडगंगा.
गरूडाचे छोटेसे मंदिर, शेजारी गंगामाईची एक धमनी अलकनंदा आणि अलकनंदेला जाऊन मिळणारा एक छोटा पण, भलताच जोरदार रौद्र प्रवाह गरुडगंगेचा, त्यावर छोटासा पूल, दूरवर दिसणारी मेघदूतांने झाकलेली बर्फाच्छादित शिखरे, निवांत गांजा फुकित बसलेले साधू (as long as they were not driving or bothering others काहीही करा), दोनेक टपर्‍या, तिथे खाल्लेली पहिली चविष्ट कोबी घातलेली मॅगी. (चविष्ट मात्र पहिली आणि शेवटचीच. यानंतर खालेल्या सगळ्या मॅग्या महाबोर होत्या.)
इथे घेतलेला एक फोटो आहे माझ्याकडे. सगळेजणं एवढे प्रसन्न दिसतायेत टेबलाभोवती बसलेले की पहात रहावे.

गरुडगंगेविषयी एक आख्यायिका अशी आहे की भगवान बद्री (विष्णु) आपले वाहन गरूड इथे सोडुन (पार्क करुन की काय) पुढे गेले. आणि अजून एक अशी की इथे गरूडाने विष्णुचे वाहन होण्यासाठी तपश्चर्या केली. त्या प्रवाहासमोर बसले होते तो डोक्यातील विचार सुद्धा ऐकु येईनात एवढा त्या प्रवाहाचा रौद्र नाद. पाय बुडवले तर डोक्याला सरसरुन शॉट लागला, एवढे थंडगार पाणी. डोळे वटारुन पाहणारी ती गरूड देवाची मूर्ती. जगाच्या अंतापर्यंत तिथेच बसावेसे वाटत होते. 'या- इथे- लक्ष्मणा -बांध- कुटी' जागा होती ती. फार सुंदर आणि गूढ. सौंदर्य पाहुन विषण्णता कशीकाय येऊ शकते ते एक तो गरूडदेवच जाणे. त्यात त्या कानठळ्या बसवणार्‍या आणि डोके बधिर करणार्‍या नदीच्या नादाचा फार मोठा भाग होता निश्चित.
Loka.JPG

शैलजाच्या कॅमेराबॅटरीने शेवटचा श्वास घेतला आणि ती निपचीत पडली. (बॅटरी !!!). हाडाच्या फोटोग्राफरच्या हातात कॅमेरा नसावा याचे फार वाईट सगळ्यांनाच वाटले. शैलजाच्या चेहर्‍याकडे पाहवेना.
TrafficJam.JPG
पुढे निघालो. पुन्हा वाहनांच्या रांगेत अडकलो. पुन्हा रस्त्यांवर वाळणार्‍या साड्या. (नायलॉनच्या साड्यांमध्ये आयुष्य कसे काढतात बायका हा प्रश्न नेहमी पीडतो. अर्थात सुती कपड्यांचे इस्त्रीचोचले परवडत नसणार सगळ्यांना या देशात, पण हे काय वस्त्र आहे!! काय लाही होते अंगाची या देशात या सिंथेटिक कपड्याने...) इथे महानगराच्या तुंबलेल्या वाहतूकीत जन्म जातो म्हणून प्रचंड दु:स्वास करणारी मी पण इथे या तुंबलेल्या वाहतुकीत थांबायला आनंद वाटला. आणि महानगरतील तुंबलेल्या वाहतुकीत जे भीषण नजारे दिसतात त्याबद्दल काय म्हणणे आहे मिलॉर्ड ?
... पाणी डोईवर घेतलेल्या स्त्रियांचे चित्र पाहुन जे.आर.डी काय म्हणाले होते ते आठवले. नुसते रंग टिपुन घ्यायचे सुद्धा 'निर्व्याज' सुख नाही या देशात. त्या मागील विषमता दिसायलाच हवी का?(खंडेराव, Let me be !). आणि शिवाय इथे आपण एखाद दिवस आहोत म्हणून कौतुक. तेरड्याचा रंग तिन दिवस. इथले आयुष्य किती कष्टाचे आहे ते ठायीठायी जाणवत होतेच.

पुढे जोशीमठाकडे निघालो. भयानक रस्त्याने आणि डायवर बाबुंच्या वाहन हाकण्याच्या कौशल्याने फेफरे आले होते. यापुढील भारताची grand prix entry हेच डायवरसाहेब. काय find होती. वा! जी टरकले ती पुन्हा कधीही त्या पहिल्या शीटवर बसले नाही नंतर. फारच चांगला व्ह्यू मिळुन बोबडी वळली होती. शेजारी बसलेल्या दुर्गेशशी गप्पा मारल्या म्हणुन नाहीतर खरे नव्हते काही. लहान पोरं असलेल्या अल्पसंख्याक पब्लिकपैकी आम्ही असल्यामुळे संसारी गप्पा रंगल्या. गंगेला जाऊन मिळणार्‍या असंख्य झर्‍यांचा प्रवाह कधी उजवीकडे, कधी डावीकडे सतत प्रवासात साथसोबत करत होता, दिसत होता. दोन क्षण जरी दिसेनासा झाला तरी अस्वस्थ वाटायला लागते पाहणार्‍याला. मध्येच भातशेतीचे पोपटी रंगांचे तुकडे आणि तेही डोंगरात. माझ्या डोळ्यांना शेवटपर्यंत याची सवय झाली नाही. पहाड, रस्ते, ढलन, पाईनवृक्ष, एखादा 'हायड्रोइलेक्ट्रिसीटी प्रोजेक्ट' आणि मध्येच एखादा भातशेतीचा तुकडा, त्याभोवतीची पोपटी आभा.. शेवटपर्यंत याचे एकही चांगले छायाचित्र मिळाले नाही. तसेच ठिकठिकाणी हेमकुंडाला जाणार्‍या तरुण शीख मुलांच्या केशरी पगड्या, अविर्भाव आणि मोटारसायकली यांचेही नाही.
अरे हो,
'आभा' वरून आठवले, हृषिकेश ते पिपलकोटीच्या रस्त्यांवर पंचप्रयागांच्या जवळ, गंगेच्या प्रवाहाला समांतर असा प्रकाश सतत दिसत होता. ते नक्की काय होते ते कळले नाही, पण प्रवाहाची समांतर आभा असल्यासारखा अद्भूत प्रकाशाचा दिव्य खेळ दिसत होता हे अगदी नक्की. प्रवाहाच्या चढाच्या कोनामुळे, गंगेच्या पाण्याच्या अतिथंड तापमानामुळे की काय तसे दिसत होते बहुतेक.

जोशीमठ (ज्योतिर्मठ)
शैलजा आमच्या ग्रुपच्या स्थानिक वाटाड्यांसोबत जाऊन बॅटरी शोधुन आली. तिला काही मिळाले नाही, मग रमण्या काहीतरी घ्यायला गेल्या. 'आधीच जायचे ना मग' वगैरे कुरकुर झाली. त्या येईतो अजून उशीर. मग खरे तर इथे काहीही पाहण्यासाठी थांबायला वेळ नव्हता पण पुन्हा नशीब जोरावर होते. 'गेट' प्रकरण- चिंचोळ्या रस्त्यांमुळे एकातासात एकाच दिशेची वाहने सोडतात. अनायसे अडकलो होतो तो मंदिरात आणि मठात गेलो.
Math.JPG
इथेही आणि बद्रीनाथलाही पुढे निळ्यालाल रंगसंगतीमुळे पहिला पोत बुद्धिस्ट monastery चा वाटतो. हा जो झगझगीत
निळा चिंतामणीच्या जवळ जाणारा रंग आहे तो इथे कुठुन आला? की हा अलिकडच्या काळाचा प्रभाव आहे?. शंकराचार्यांचा काय संबंध या निळ्यारंगाशी?
'निळे हे व्योम, निळे हे सप्रेम'?
आणि निळ्या रंगाची लगीनगाठ बौद्धमठांशी कशी काय बांधली गेली आणि कधी यावर माहिती वाचायला मनाशी खूणगाठ बांधली . जोशीमठाचे प्रवेशद्वार आणि नरसिंहाचे मंदिर नेहमीचे हिंदु, मग आतील शंकराचार्यांच्या मठीचा पोत असा का? असो. तिथे एक साधु मार्जारासनात होता आणि येणार्‍याजाणार्‍यांवर वचक ठेवून होता. खाष्ट म्हातार्‍या पुजेला बसून कशा सुनांवर नजर ठेवून खेकसून सुचना देत असतात तसा त्याचा आविर्भाव होता.
jyotirmath 1.JPG
नरसिंहमंदिर

जोशीमठ तसे बर्‍यापैकी आब राखुन असलेले वाटले. थोडेसे 'आम्ही कोण म्हणोनि काय पुसता' अश्या आविर्भावात झोकात होते. थबथब श्रीमंती उतू जात नव्हती किंवा माझे लक्ष नव्हते.

तिथे शंकराचार्यांच्या मूर्तीमागे पसायदान आणि ज्ञानेश्वरांचा फोटु दोन्ही विराजमान होते. फोटु काय्ये? शिल्प का नाही ठेवले? अजब वाटत होते त्यामुळे. एवढी जुनी वास्तु, तर मग काहीही काय आणुन ठेवतात ? एकीकडे ज्ञानेश्वर दिसल्याने फार बरे वाटले आणि एकीकडे 'फोटु' आणि कापडी ताग्यावरचे पसायदान अगदीच विसंगत वाटु लागले. (शेकडो वर्षाच्या धूळवडीनंतर कोणीतरी खंडेराव चारदोन थियर्‍या मांडुन ज्ञानेश्वरांनाच शंकराचार्याचा अवतार म्हणुन खपवेल बघा !)
Shankaracharya chart_0.JPG
हा तक्ता कोणाला रस असला तर.

asech.JPG
मठीतून बाहेर दिसणारे हे एक घर. मला फार आवडले. उगाचच. एखादा शतकभर तिथेच असल्यासारखे वाटत होते.

शंकराचार्यांची गादी दुसरीकडे होती. काहीजण ती पाहुन आले. आमची हुकली. पुढे जाताना गादी ही खरी की खोटी हा वाद रंगला होता बसमध्ये. शालीची खरेदी झाली. सुजयने घासाघिस करुन दिली. गालिचे/रजया वगैरे फार सुरेख होते पण घरातल्या जमवलेल्या भारूडात आणखी ओतायचा जीव होईना. मुंबईतल्या रम्य मौसमात काय करायच्या आहेत काय या वस्तु नाहीतरी? बसमध्ये पोचेस्तोवर बर्‍याच जणांची शालखरेदी झाली होती. अधिभौतिक आणि भौतिक यांची सांगड ज्या मंदिरांसमोर गचगच बाजारस्वरूपात नसते ना तीच बरी वाटतात एकुणात. मग ती छोटी रस्त्याकाठची बिनवलयांकित अहिल्येच्या शीळेप्रमाणे वाट पहात असलेली 'बिचारी' का असेना.
Sadhu.JPG

पुढे निघालो.आता मात्रं भयंकर वळणे सुरु होती. कडेलोट होऊन पार चुरा झालेली एखादी चुकार गाडी हटकून दिसत होती. आणि वरुन कधी मोठे कधी छोटे दगड टपटप पडत होते. प्रत्येक ठिकाणी हिमालाय 'इरेस पडलो जर बच्चमजी' अशा धमक्या दगडस्वरुपात भिरकवायला मागेपुढे पहात नव्हता. एका ठिकाणी वरचा अवाढव्य दगड अश्या कोनात होता की खाली पडला, तर ज्या गाडीवर पडला त्याची पूर्ण सपाट धातूची पट्टी व्हायला वेळ लागला नसता. अत्यंत अतार्किक विचार.. इथून आता लवकर चला पुढे. जणू काही लोक तिथे रेंगाळतीलच...

अखेर गोविंदघाटला पोचलो. बॅगा टपावरुन निघाल्या. कोरड्या होत्या. नवीन घेतलेल्या सर्व शाली पब्लिकने बसमध्ये ठेवल्या. तेवढ्यासाठी बॅगा उघडणे कोणालाच परवडणारे नव्हते. बस थांबली तिथुन गुरुद्वार्‍यापर्यंतच्या (जिथुन चालणे सुरु होते) अंतराचे मोजमाप नंतर आम्ही आपापल्या वकुबानुसार आणि वैतागानुसार लावले नंतर. पण तरी ते आठशे मीटर तरी असावे. सर्व सामान पाठीवर घेऊन ते तेवढेही बरेच होते. पण आम्ही काही लोकांनी तात्पुरती सोय केली एका 'पिथ्थु' मध्ये मोठ्ठे अवजड सामान टाकुन. (पिथ्थु: मोठ्ठी वेताची टोपली. यात सामान किंवा माणसे भरून स्थानिक लोक ती वाहून वर नेतात.) सामान देताना पुन्हा अपराधीपणाचा सर्पदंश होतोच, पण तसे न केल्यास आणि नंतरची अवघड चढण निभावण्याचा आत्मविश्वास नसल्यास अडचण येऊ शकते.

सभोवताली प्रचंड म्हणजे प्रचंड अवाढव्य डोंगर आणि त्यावर मुंग्यांसारखे चढणारे लोकं दिसत होते. 'आपल्याला तिकडे जायचे आहे का?' असे कोणीतरी भाबडेपणाने विचारलेच आणि आपण नक्की कशासाठी नाव नोंदवले हे मला पहिल्यांदा नीट कळले. आवंढा गिळला.

प्रथमाग्रासे मक्षिकापात. पहिल्या फटक्यात पहिल्याच ओढ्यात जोडे आणि मोजे ओले झाले. आता हे वर जाईपर्यंत न वाळल्यास आणि तिकडे अतोनात थंडी असल्यास काय होईल? काय होईल ते होवो. कोरडे मोजे चक्क हाताशी ठेवले होते (है शाब्बास!) ते नंतर गरज पडल्यास पाहू म्हणून ठेवले. दुपारचे साडेबारा-एक तरी वाजले होते. भूकही लागली होती. प्रचंड मोठ्ठ्या आवाजात आणि भयानक कोलाहली संगीत वाजत असलेल्या बाजारातून वाट काढतकाढत गुरुद्वारा.

बॅगला 'बरसाती' (एक पातळ प्लॅस्टिकचा रेनकोट) मध्ये लपेटले. त्याने काय उजेड पडणार होता माहित नाही. पण मानसिक समाधान ! सगळ्या ग्रुपचे सामान मिळुन तिनेक खेचरांवर लादले गेले.. पूल.. खाली प्रचंड आवेगाने वाहणारी अलकनंदा. पुलापासून चढण अधिकृतरीत्या सुरु होते.

खेचरांच्या लिदीचा वास जो काय नाकात घुसला तो पूर्ण विसरायला जन्म लागेल. खेचरे आणि त्यांचे मालक, एका बाजूला उतरणारे यात्रेकरू/ ट्रेकर्स, एका बाजूला चढणारे, दगडी पायवाट, फारशी रूंद नाही की फारशी अरुंद नाही, मध्येमध्ये चिखल आणि एका बाजूला धडकी भरवणार्‍या Himalayan Foothills. Foothills, mind you.. पायाशी रांगणारे बाळ असते तशा या हिमालयाच्या पायाशी रांगणार्‍या काही बाळटेकड्या. (टेकड्या In a manner of speaking केवळ आकार समजावे म्हणून हा शब्द. त्याची तुलना 'पर्वती' शी करण्याचा मोह झालाच तर तो टाळावा.) आपण चाललो आहोत घांघरियाला. अंतर केवळ १३ किमी. (ते आधीचे आठशे मीटर आणि नंतरही गावाच्या सीमेपासून न मोजलेले विसरू नका तेवढे). वाकड ते वाशी कसे लोकं दोन तासात पोचतात आणि मग पुणे मुंबई ही दोन शहरे फक्त दोन तास अंतरावर आहे हा अपप्रचार कसा करतात, तोच प्रकार थोडक्यात.

पहिल्याच किलोमीटरात फाफलले.. किती अप्रतिम सुंदर सभोवताल आहे त्याची जाणीव झाली. पहिले दहा थ्रश मोजले आणि मग सोडुन दिले. अंगावरचे जॅकेट कमरेला गुंडाळले, हातातले कॅमेरे बॅगेत म्यानबद्ध, घशाला कोरड पडली, घड्याळ पाहुन चक्कर आली. पाऊण तास..... ऊन मी म्हणत होते आणि जागोजागी टपर्‍या असतात, वाटेत खाऊयात हा गोड गैरसमजही धुळीला मिळाला. (होत्या पुढे जागोजागी खरंच).
एका ठिकाणी बसले तो अगदी नशीबाने मला काठी पडलेली दिसली. बर्‍याचजणांनी खालीच विकत घेतली होती. मी न घेण्याचा महामूर्खपणा का केला होता हे अजूनही कळले नाही. तर...ती वाटेत पडलेली काठी चालायला घेतली.. मी, शैलजा आणि थोडीशी पुढे स्वाती आणि निवांत चढत येणारा ट्रेकलीडर एवढेच उरलो होतो. ग्रुपमधले इतर लोक आता नजरेच्याही टप्प्यात उरले नव्हते. आम्ही हाश हुश.. करत एखादेदुसरे वळण चढलो की मागाहुन आरामात फोटोबिटो काढून, निवांतपणे पक्षी पाहून अगदी सहज चढून हजर होणारा हा मुलगा कधीच कॅचअप करायचा. 'ए अरे, मी थांबलो की तुम्ही थांबू नका. चालत रहा..' आणि वर 'पक्षी दिसले की नाही'? 'नाही' <'इथे जीव जायचा बाकी राहिलाय' हे वाक्य मी गिळले.>
त्याच्या कॅमेर्‍यात Yellow Breasted Greenfinch चा एक सुरेख फोटो पाहिला. व्हीयुफाईंडरवरची धूळ पाहुनच कॅमेरा मालकासोबत बराच प्रवास करुन आला आहे ते लगेच कळत होते.

दुसर्‍या किलोमीटरात काहीतरी प्यायला मिळाले (टपरी दिसली). थोडा जिवातजीव आला. Clutching the stitches in one's side, याचा अर्थ पुन्हा नव्याने कळत होता. मर्फीच्या नियमानुसार चढणारे लोक फार कमी आणि उतरणारे टनावारी दिसत होते. आणि उतरणारे भाविक आमचे फोटोजेनिक चेहरे आणि अवस्था पाहुन अर्थातच हटकून म्हणत.. 'जल्दी करो. बहुत देर हो गयी.. आगे बहुत लंबा रास्ता है. रात हो जायेगी'..
ए अरे काय..छळु नका उगीच, आणि आता मला वाटतय बहुधा मी बसलेलीच दिसायचे दम खात, तर भाविकांनी विचारून हैराण केले की चढताय की उतरताय...

अचानक.. एका आजींना प्रेमाचे भरते आले मला पाहून. त्या चांगल्या उतरत होत्या बरं विरुद्ध बाजूने, मी सवयीने औपचारिक हसले बहुतेक, तर एकदम माझ्याजवळ येऊन माझ्या गालावरुन हात फिरवत 'बेटी'.. म्हणल्या. मी चढायच्या तंद्रीत होते, लक्ष नव्हते.. आधी मला वाटले म्हातारीचे डोके फिरले आणि वार करते आहे की काय, हातात काठी. प्रतिक्षिप्त क्रिया एकदम घाबरून मागे सरकले.. तर बाई पुन्हा माझ्या गालावरुन डोक्यावरुन हात फिरवायला लागल्या. 'प्यार कर रही हूं बेटी.. कुछ नही.. कुछ नही..' एकदम अंगचटीला येऊन अनोळखी व्यक्तिंचे गालगुच्चे घेण्यासारखे म्हातारीला काय झाले ते मला कळेना. शैलजाला हा 'शीन' पाहुन हसावे की नाही ते कळत नसावे बहुतेक पण ती बिचारी मला 'अगं अगं.काही करत नाहीयेत त्या' म्हणाली. लीडरही तेच म्हणाला. आणि ते दोघंही सोबत होते आणि मला तिथेच सोडुन पुढे जाणार नाही याची खात्री पटली म्हणुन थोडासा धीर आला. आणि आज्जीबाईंना मी अगदी टीनेज पोरं आयांनी लाड केले की कशी अंग आक्रसून नाईलाजाने 'लवकराआटपालतरबरेकोणीपहाततरनाहीना' छाप लाड करु देतात तसे करु दिले. हे बरोबर नाही हे त्याक्षणीही कळत होते, पण वळत नव्हते. ' अगं पण.. मला कसं कळणार.. शहरात कधी ...' वगैरे क्षीण फालतू कारणे मी ओशाळी पुढे केली.
हा प्रसंग मला थोडा जिव्हारी लागला. नुसता स्नेहही स्वीकारायला स्वीकारायलाही जड जावे.. माझ्या मुलीला असे प्रामाणिकपणे वाटते जगातील सगळ्या व्यक्ति तिचेच लाड करण्यासाठी असतात, ते आठवले. आता लिहीताना असे वाटतेय की काय हा आपला कर्मदरिद्रीपणा. पण तेव्हा भीती नाही बाजूला सारु शकले हे मात्रं तितकेच खरे. पुन्हा कधी घडल्यासही यापेक्षा वेगळी वागू शकेनच याची अजिबात खात्री नाही. आता मला फक्त त्या बाईंचा प्रेमळ चेहरा आठवतो. त्यांच्या स्पर्शाचा पोत काही आठवत नाही....
साहेबांनी नंतर हा किस्सा पसरवण्यात फारच हातभार लावला.

शीख भाविक.. सलवारकमीझात, पायात स्लीपर, अंगावर एखादीच शाल असली तर असली, हातात काठी. एवढ्याच जामजिम्यात बायका चढतउतरत होत्या. स्वतःच्या सर्व सरंजामाचीही लाज वाटावी. पुरुषही नेहमीच्याच कपड्यात, हातात एखादा पाण्याचा कॅन असला तर असला. फक्त जत्थाप्रमुखांचा गणवेश वेगळा वाटत होता. काहींचा गडदनिळा डगला, आणि काहींचा पांढरा. गडद निळेडगलेवाले विलक्षण उग्र लढवय्ये भासत होते. कपडे काही असो, तोंडाने सर्वच 'जो बोलेऽ सो निहाल, सऽतश्रियाकालऽ..' यांचा खणखणीत गजर करीत. 'वाहेगुरुजीका खालसा, वाहेगुरूजी की फतेह फतेह' धापा टाकत या ओळी जागवत, चालीत गुणगुणत. फारच उर्जा असेल तिथे भजनं म्हणत त्यांची मार्गक्रमणा सुरु होती. आपल्याला डोंगरासारखे डोंगर आणि किलोमीटराचे बोर्ड आणि ग्रेडियंट दिसतो. यांना काय दिसत असेल नक्की हे त्यांच्यापैकी कोणाला तरी विचारायचे राहिलेच.
आपल्याकडे नाही का वारीला, नर्मदा परिक्रमेला जाणारे भाविक यांचा कुठे शाही सरंजाम असतो ? साधेच असतात की. I dunno whether faith can move mountains, but it certainly can help you climb them.

वाटेत एक शीख तरुण मुलगा धाडकन चक्कर येऊन पडलेला दिसला. त्याच्यासोबत काही लोकं होते नशीब.उन्हामुळे आणि चढण्याच्या श्रमामुळे चक्कर आली असावी. नाही म्हणले तरी भीती वाटली. आमच्या ट्रेकलीडरने आम्हाला पुढे पिटाळुन त्यांना बरीच मदत केली. त्या मुलाचे पुढे काय झाले असावे ही रुखरुख लागली.
पावणेतिन किलोमीटरच्या आसपास एका टपरीत आम्ही मॅगी खाल्ली, अलकनंदेचे थंडगार पाणी प्यायला मिळाले. भोवताली निळसर माश्या घोंघावत होत्या. वरती चांगलेच ऊन. डोक्यावर प्लॅस्टिकची शेड. तिथे एक भाविक कुटुंब आले. आजोबांना नात चहा थंड करुन देऊ लागली. १२-१३ वर्षांचीच असेल. गोड छोकरी होती. तिला काही खायलाप्यायला मिळाले की नाही हे मला पहायचे होते पण आम्हाला ऊशीर होत होता.

'तुझा देवावर विश्वास आहे?' आँ? माझ्याहुन काही वर्षे लहान असणार्‍या मुलाकडुन हा प्रश्न अपेक्षीतच नव्हता. आम्ही आपापले मुद्दे मजेत मांडत चढ चढत होतो. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' चा विषय निघाला..आता मात्र बोलायचा मोह टाळला. उन्हाने वाट लागली होती, श्वास आता फारच त्रास देऊ लागला..त्या चक्कर आलेल्या मुलासारखी आपली गत झाली तर काय करणार अशी भिती वाटली. इथेच एकाच वेळी चढणे आणि बोलणे आपण करायला नको हे मला समजले. पुढच्या सर्व चढणीत हा नियम मी घालून घेतला. खरे तर उतरतानाही (आणि उतरल्यावरही) बोलायला नको होते, पण तेवढे जमले नाही.
आख्ख्या रस्त्यात मैलोगणति आवाज फक्त वाहणार्‍या लक्ष्मणगंगेचा, विविध पक्ष्यांचा, भाविकांच्या आरोळ्यांचा, वृद्धांना वाहुन नेणार्‍या पालख्यांच्या भोयांच्या एका लयीतील पुटपुटण्याचा, खेचरांच्या गळ्यातील घुंघरांच्या नादाचा, कधी चुकार खेचरांवर वसकन ओरडणार्‍या एखाद्या मालकाचा, टपर्‍यांमधील टीव्ही किंवा रेडियोचा एखाददोन मिनिटापुरता.

एकाबाजूला टेकडी, एका बाजूला खाई. पहाडातून दिसणारे झरे/ धबधबे. Rhododendron ची झाडे, त्यांच्या हाताच्या बोटांसारखी पंचपानांची कळीसारखी रचना, फुलं मात्र पहायला मिळाली नाहीत किंवा लक्ष नव्हते, Apricots ची झाडे, भांगेची झुडपं, असंख्य पहाडी फुलं, फळं.. जांभळी छोटी कमालीची मोहक फुलपाखरे, निळ्यापाठीच्या माशा पहात, नजारे रिचवत जरा कष्टानेच चढणे सुरु होते. उतरणारे भाविक आता फारच धोक्याचा इशारा वारंवार द्यायला लागले आणि आत्मविश्वास कमी व्हायला लागला. सुमारे पावणेचार किमीच्या आसपास खोकला आणि धाप वाढायला लागली, तेव्हा मात्र साहेब म्हणाला की 'खेचर घ्यायचे आहे का? आत्ता ठरवा. उशीर कितीही झाला तरी माझी हरकत नाही, पण नंतर मध्येच काही वाहन मिळणार नाही. अजून बरेच चढायचे आहे आणि तुमच्या गतीने चढायला आपल्याला बरीच रात्र होईल.' तोपर्यंत मला श्वास घ्यायला रीतसर त्रास सुरु झाला होता आणि नर्व्हस झाल्यामुळे अजून खोकला वाढायला सुरवात झाली होती.
'तुला काय वाटतं, मी खेचर घ्यावं का? '
' तुला काय होतय नक्की?'
' मी थकले नाहीये, पायही दुखत नाहीयेत, पण श्वास घ्यायला त्रास होतो आहे'
'मग तू खेचराने जा, कारण आत्ताच खोकला सुरु झाला आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय तर वरपर्यंत...' वेळ आणि कमी होत होणारा उजेड आणि आपल्यामुळे इतरांना होणारा अनाठायी त्रास पाहता मी त्याक्षणी खेचरावरून जायचे ठरवले. खेचर मिळाले, तो अर्थातच पैसे कमी करायला तयार होईना. शेवटी ते घेतले. शैलजा, स्वाती यांचा फेरविचार सुरु होता. शैलजाने सामान तेवढे दिले माझ्याकडे आणि मी पुढे निघाले.

काय हे!!!!! चालायला आलो इतक्या दूर एवढे मुलीला घरी सोडुन, आतामीमुलीलाकायसांगू, आणि आता खेचर. अश्रूबिश्रू. मग त्याने अजूनच श्वास कोंडला आणि माझे डोके ताळ्यावर आले. खेचर गोड होते. नाव आता आठवत नाहीये पण काहीतरी स्त्रीलिंगी बॉलिवुडी नाव होते, मालकाचे नाव 'गणेश'. एका गतीने आरामात चालले होते. सगळी चढण असल्याकारणाने खेचरावर बसायलाही काही त्रास नव्हता. गणेशशी गप्पा सुरु होत्या. त्याला पानंफुलंझाडंपक्ष्यांबद्दल शून्य माहिती होती. मग त्याच्याचबद्दल आणि खेचराबद्दल गप्पा मारल्या.
'आपको आदत नही है, साँस फुल गयी है..बस खाईके तरफ मत देखना. आरामसे बैठो' (मत देखना म्हणजे काय? ती खाई मी नीट पहावी असा खेचराचा इरादा दिसत होता. काठाकाठाने जाण्यात खेचराचा हात <रादर पाय> कोणी धरणार नाही)
'आप यही पें रहते है?' 'हाँजी.'
'कितनी बार चढाई करते है? दिन में एकही बार.'
त्या खेचराच्या वेगाने मालकाने चढायचे म्हणजे खायचे काम नव्हते.
वाटेत लोकं अतीव दयेने, करुणेने किंवा अतीव त्रासलेले असे तुच्छ कटाक्ष फेकत होते असे भास होत होते.

खेचरसवारीच्या पहिल्या थांब्यापर्यंत पोचेपर्यंत पाय थि ज ले होते. ते हलेचनात. उतरायला टपरीमालकाने मदत केली. गरम चहा (साखरेचा पाक अक्षरश:) नरड्यात गेला तशी पायातली संवेदना परत आली, गणेशभौंना चहा पाजला. पक्षी पाहिले. श्वासाचे काय करायचे याचा विचार केला. टपरीमालक गप्पा मारायला आले. ' आप कहा सें है'.. 'मुंबई'. 'ओहो. मै वहा कईसाल था. नेव्हीनगर में काम करता था. बहोत सुंदर है..समंदर...' (काय सुंदर आहे? मुंबई? असे किंचाळणार तेवढ्यात नेव्हीनगर हे शब्द उशीराने मेंदूत शिरले) 'रिटायर होने के बादसे यहाँ हूं.. सात साल हो गये' ' लगता नही है आपको देखके'.. कैसे लगता है यहाँ. ? 'बस ठिक है. बहुत शांती है. आप घाँगरिया पहुचतेही डाक्टर को दिखाईये. कुछ ठिक नही लग रहा' .. वहा पे डाक्टर है? हाँ एक है..

तेवढ्यात चहा आणणारा मुलगा म्हणला ''माझ्याकडे एक जालिम औषध आहे, पिऊन पहा.' कसले? 'माहित नाही'.. तू पिलेस का? 'नाही..' मग नको म्हणले.. एक शीख जत्था तिथे चहा पीत होता. त्यातले निळाडगलावाले काका 'ओऽहो जनानियोंको यहाँ पे बहुत तकलीफ होती है.. कोई नही जी. वायगुरु पे भरोसा रख्खो. पहुंच ही जाओगे' असे मत प्रदर्शीत करुन गेले. Superb!Just the thing I wanted to hear. कर्मा..

पुन्हा चढण. संधिप्रकाश, थंडी, मधुनच बर्फातून वाट काढत जाणे.. तिथे बर्फाच्या एका पॅचजवळ पांढरीशुभ्रं रोंरावत जाणारी लक्ष्मणगंगा, पायाखाली चिखल आणि बर्फ, वर काळेनिळे आकाश, 'गर्दसभोवतीरानसाजणी', दिवसाचा शेवटचा प्रकाश आणि काही अंतरावर पिवळीधम्मक फुले. इतके सुंदर दृश्य पाहुनच भरुन यावे ! I felt truly humbled and overwhelmed! तुमच्या मनात एकाच वेळेस धडकी भरवून, त्याच वेळेस अफाट बेछुट सौंदर्याने हृदय काबीज करावे ते हिमालयानेच. जगातल्या कुठल्याही कॅमेर्‍यात ते दृश्य आणि ती नादमय गूढ शांतता बद्ध होणे शक्य नाही. I could literally feel stillness and cold ascending. खर्जातील रियाजासारखी धीरगंभीर शांतता पसरत चालली होती. पक्ष्यांचे कूजनही कमी झाले होते. मनावर एक विचित्र 'घनव्याकुळ' तवंग पसरत चालला होता. जणू मावळत्या दिवसासोबत आपण आता अगदी एकटे असणार आहोत पृथ्वीतलावर. त्या भावनेवर अंकुश ठेवायचा म्हणला तरी ठेवता आला नसता. त्याक्षणी आपण आलो त्या शहराची आपल्या सोबत नकळत एवढा प्रवास करत आलेली प्रतिमा खळकन भंगते. प्रत्येकासाठी ती सम गाठण्याची वेळ वेगळी असणार. माझ्यासाठी हाच तो क्षण होता एवढेच मला आता आठवते.

मधूनच उतार.. उतार असला की पाठीचा सत्यानाश (आपल्याला मणका आणि vertebrae आहेत दुर्दैवाने ते समजले) आणि परतताना इथे चढणअसेलतेव्हाकायकरणार असले निराशादायी विचार.. वृक्षसंपदा, प्रकाश, दगड आणि वातावरण सगळेच बदलत चालले होते. थंडी हाडात शिरायला लागली. रिकीबीचा धातू पोटरीत रुतून तिथे काळेनिळे डाग पडू लागले, मधूनच रिकीबीतील पाय निघून जात होता.. वाटेत सगळी मित्रमंडळी दिसली. सगळ्यांचीच हालत थोडीफार टाईट होती. पण निदान ते चढत होते. पुढच्या थांब्याला मला फारच ढास लागली होती. नशीबाने निशांत आणि दुर्गेश तिथे होते. त्यांनी खेचरावरून उतरायला मदत केली आणि मला बरे वाटेपर्यंत ते दोघं थांबले. 'मोनाल' दिसला, फोटो काढला, चहातसाखरआहेकीकायआहे हे द्रावण, कोणकोण कुठपर्यंत पोचले, वगैरे म्हणत होते.
ढास आटोक्यात आली तसे मी त्यांना 'तुम्ही निघा आता पुढे' असे म्हणले. त्यांना अजून चढायचे होते बरेच. वेळ घालवून चालणार नव्हते. 'तू ठिक आहेस ना नक्की', 'हो, तुम्ही दोघं जा पुढे. थोड्यावेळात बरं वाटलं की मी निघेन. '
या टपरीवाल्याने फारच अनमोल सल्ला दिला. तो म्हणाला की घाँघरियात वर बाजारात आलं विकत घ्या आणि चोखत रहा. त्याने आराम पडेल. याने नंतर खरंच फार बरं वाटलं.

शेवटचा टप्पा फारच खतरनाक होता. Extremely steep climb. खेचर आणि गणेश दोघेही श्वास घ्यायला थांबले तेव्हा मला ते चांगलेच जाणवले. खेचर बिचारं फुरफुरत दम खात होतं. त्याच्या छातीचे ठोके त्या खोगीरातूनही जाणवल्यासारखे भासले. घांघरियाँच्या वेशीपाशी हेलिपॅड दिसले. गाव सुरु झाले, तरी ते आमचे राहण्याचे ठिकाण तिथूनही दूर. तिथे गणेशभौंने पोचवून दिले, पैसे दिले, आभार मानले. आमच्या टीमपैकी फक्त रोमिला येऊन पोचली होती. साडेचार तासात ती पंचविशीची मुलगी चढली होती. मला आदरअचंबामिश्रीत बरेच काही वाटले ते ऐकुन. त्या निळ्याडगलेवाल्या शीखकाकांना ही 'जनानि' दाखवायला हवी होती !!!!

एका खोलीत सर्वांचे सामान कोंबले होते. रोमिलाने बॅग शोधायला मदत केली, तिच्याकडची 'कंठील' आणुन दिली. एक वाक्य बोलले तरी तिन मिनीट खोकला अशी हालत झाली होती. रोमिला सांगत होती तेते मी मुकाट करत होते. ओले मोजे काढले आणि तिच्या खोलीत गेले. तर ती किंचाळली 'अनवाणी फिरु नकोस, तू पहिले पायात काहीतरी घाल.' माझ्या सपाता शहाणपणाने सॅकच्या बाहेरच्या खिशात ठेवल्या होत्या (का? का?), त्या गायब होत्या. पडल्या तरी असणार रस्त्यात किंवा चोरीला गेल्या असणार. ते ओले बुट काही घालवत नव्हते. रोमिला बिचारी मला सांगत होती की 'हे पहा, मलाही अवघड गेले, सोपी नव्हती ती चढण आणि मी डायव्हर आहे. माझा स्टॅमिना जास्त आहे. But I was proud that I did this distance in this time.' I was also very proud of her !
मी हताश होऊन खोलीत येऊन बसले होते, मेंदू गोठला होता. वरणभात मागवून कसातरी खाल्ला, एकेक घास गिळला जात नव्हता आणि आता नक्की कुठले औषध घ्यावे आणि आता यांना नक्की किती वेळ लागेल यायला याचाच विचार करत होते. तेवढ्यात स्वाती आणि शैलजा आल्याच.
मी खेचर केल्यावर थोड्याच वेळात त्यांनीही केले होते. मला हजार रुपये लागले होते, त्यांना सहाशे. खोलीवर आल्याआल्या शैलजाच्या डोळ्यात पाणी आणि गादीवर बसकण मारुन ती हमसाहमशी रडायला लागली. मीच कसेबसे अश्रु रोखले होते तो मलाही रडायला यायला लागले. सामान शोधुन स्वाती आली, तो आम्ही अगदी sincerely रडतोय. तिला हसू आवरेना. 'अगं काय सामूहिक कार्यक्रम आहे की काय रडायचा. आणि घोड्यावर कसली मजा आली. रडताय काय..' त्याने एकदम ताण निवळला. विनोदबुद्धी जागृत होण्याइतपत मेंदू डीफ्रॉस्ट झाला होता. हसण्याचा एक लोट कोसळला. रडुन आणि हसुन पुन्हा श्वास कोंडला आणि खोकला. तेवढ्यात आलं,गरमपाणी आणि कोरेक्सकफसीरप मागवले होते ते घेऊन 'मोहनबाबू' (स्थानिक मॅनेजर,वेटर,स्वैपाकी,हरकाम्या इसम) आले. मोहनबाबूंना प्रत्येक गोष्टीची तिनदा खात्री करुन घ्यायची वाईट्टं सवय होती. म्हणजे एकदा 'पानी मिलेगा ?' ' क्यों नही जी.. पानी'.. पुन्हा ' पानी मंगवाया ना आपने'? मग पुन्हा.. 'ओहो आपको तो पानी चाहिये था'; असे त्याचे सुरु होते.. त्यामुळे सारखे खोलीचे दार उघडावे लागत होते, नाहीतर तो बाहेरुन जोराजोरात ओरडत असे. स्वाती-शैलजालाही मळमळणे वगैरे त्रास सुरुच झाला होता. एकंदरित Altitude sickness ने सगळ्यांनाच थोडाफार प्रसाद दिला होता.
स्वाती आणि शैलजाच्या खेचरांचे किस्से ऐकत हसत बसलो होतो. त्यांचा घोडेवाला मध्येच थांबुन दारु पीत होता म्हणे. (नंतर लीडर म्हणाला 'आता त्या वेगाने चालायचे म्हणजे त्याला त्याची सोय करायला नको का?') जे काय हसलोय.

शैलजा घरी फोन करायला खोलीबाहेर पडली. दोनदा जावे लागले तिला. दहा वाजता वीज जाणार होती. तिने माझ्याही घरी निरोप दिला. श्रीकृष्णांचा कृपाप्रसाद तिलाही लाभला. आता फोनवर काय सांगणार कप्प्पाळ म्हणुन 'तिने सगळे ठिक आहे. पोचलो.' एवढाच निरोप दिला तर नवरा म्हणे 'फोटो काढले ना व्यवस्थित' ?. ती हसतच खोलीवर आली. 'बायको जिवंत आहे की नाही त्याची फिकीर नाही. फोटोची पडलिये'...पुन्हा हसणे.. पुन्हा त्रास. खोकून्खोकून छातीत दुखायला लागले होते. एकेक करुन सगळेजणं सुखरुप येऊन पोचल्याच्या खबरा येत होत्या. प्राची बेनाड्रील घेऊन आली. तेही प्यायले.
'तू रडलीस की काय. अगं शेवटच्या टप्प्यात बराच त्रास झाला सगळ्यांनाच. प्राचीला डोली करावी लागली. तिला होईनाच गं शेवटचा टप्पा.'
इकडे आम्ही आउटडोअर्सचा सल्ला शिरोधार्य मानुन पायांना मालिश करुन घेत होतो. (आउटडोअर्स ने सांगीतले होते की घांघरियाला पोचल्यावर न लाजता पायांना मालिश करुन घ्या. दुसर्‍या दिवशी चालायला मदत होईल.) मग पुन्हा आपण चाललोही नाही पूर्ण अंतर आणि पायांनामालिश कसली करणार डोंबल. अगं तिने 'पूर्ण चालल्यावर' असे सांगीतले होते. 'न चालताच' असे नाही, असे एकेक दिव्य डिस्कशन करत हसत शेवटी.. एकुणात महान गोंधळ सुरु होता आणि धाप आणि खोकला वाढत होता.

ट्रेकलीडर पोचला बिचारा. तो मजेत होता. 'तुम्ही खेचरं घेतली ते बरे केलेत नाहीतर बारा वाजले असते आपल्याला. मी दोन तासांत चढुन आलो' वगैरे बोलणे झाले. या मुलाचे आभार मानावे तितके थोडे होते. त्याचा निर्णय अगदी योग्य वेळेला झाला होता.
मला उठून बसवतही नव्हते. तर तो ' पडून काय राहिलीस. उठून चाल जरा बाहेर. उठ लवकर. . Acclimatisation..' म्हणाला. स्वातीने आउटडोअर्सच्या लेखाची पाचदा तरी आठवण काढली तेवढ्यात. तिनेही तेच लिहीले होते की झोपून राहु नका वगैरे. मला त्या दोघांच्याही डोक्यात बत्ता घालावसा वाट्त होता पण त्यासाठी हात तरी उचलावा लागला असता. तेवढे कष्ट करण्यासारखी परिस्थिती नव्हती. 'होऽहोऽ, पाचमिनीटात उठते' असे दहावेळा म्हणून मी पुन्हा धारातीर्थी पडले.

आमच्या खोलीतल्या बाथरुमचा बल्ब ढिश्क्यांव.. शैलजाताईंचा टॉर्च आणि स्वातीताईंच्या चपला कामात आल्या. रात्री दहाला वीज गेली. उद्या पुन्हा साडेचारला उठायचे. गरम पाण्याच्या बादल्या विकत मिळत होत्या, त्या आणायला सांगीतल्या होत्या आणि उद्या सहाला घाटीकडे चालायला लागायचे होते.
It seemed like an incredibly longwinded day and although very tired and battle weary, did not regret it for a moment. यातच काय ते आले.

मुशोसाठी आभार: नीधप

गुलमोहर: 

मस्तच. मजा आली वाचताना. एकदम तुझ्याबरोबर प्रवास करायला गेल्यासारखं वाटलं >>> सावलीला अनुमोदन. अशीच अखंड लिहित रहा........ Happy

हा भाग खुपच सुरेख झाला आहे. मस्तच. Happy फोटोकरता त्या मुरलीधरासारखीच लापी. Happy बर तो मोनल म्हणजे काय स्पष्ट कर.

रैना, गुंगवून टाकते आहेस अगदी. सारं चित्र (आणि तेथील थंडी, वारा, ऊन सगळं) डोळ्यांसमोर येत जातं तुझं वर्णन वाचताना....

< 'या- इथे- लक्ष्मणा -बांध- कुटी' जागा होती ती. फार सुंदर आणि गूढ. सौंदर्य पाहुन विषण्णता कशीकाय येऊ शकते ते एक तो गरूडदेवच जाणे. त्यात त्या कानठळ्या बसवणार्‍या आणि डोके बधिर करणार्‍या नदीच्या नादाचा फार मोठा भाग होता निश्चित. >>

<< अधिभौतिक आणि भौतिक यांची सांगड ज्या मंदिरांसमोर गचगच बाजारस्वरूपात नसते ना तीच बरी वाटतात एकुणात. मग ती छोटी रस्त्याकाठची बिनवलयांकित अहिल्येच्या शीळेप्रमाणे वाट पहात असलेली 'बिचारी' का असेना.>>

<< खर्जातील रियाजासारखी धीरगंभीर शांतता पसरत चालली होती. पक्ष्यांचे कूजनही कमी झाले होते. मनावर एक विचित्र 'घनव्याकुळ' तवंग पसरत चालला होता. जणू मावळत्या दिवसासोबत आपण आता अगदी एकटे असणार आहोत पृथ्वीतलावर. त्या भावनेवर अंकुश ठेवायचा म्हणला तरी ठेवता आला नसता. त्याक्षणी आपण आलो त्या शहराची आपल्या सोबत नकळत एवढा प्रवास करत आलेली प्रतिमा खळकन भंगते. प्रत्येकासाठी ती सम गाठण्याची वेळ वेगळी असणार. माझ्यासाठी हाच तो क्षण होता एवढेच मला आता आठवते. >>

हे सर्व क्लाऽस झाले आहे. पुन्हा पुन्हा वाचत रहावे असे.

आजीबाईंच्या प्रेमाचा किस्सा भारीये. त्यावरची तुझी प्रतिक्रियाही समजून येण्यासारखी. शहरांमध्ये राहून आपण स्वतःला अशा अनुभवांपासून किती बाजूला राखतो नै.... (मला वाटलं असतं, ह्या म्हातारबाई त्यांचं प्रेमाचं भरतं ओसरलं की काहीतरी मागणार माझ्याकडे.... किती तो अविश्वास असतो मनात!)

खूप छान! मस्त वर्णन....

>>>कितीही दिवस लागले तरी चालतील पण सगळा प्रवास हा असाच डीट्टेलवार लिहून काढ
अगदी अगदी.

ललित+१ मला अ‍ॅवोमीनची पाकिटच्या पाकिटं रिचवावी लागतील अशाने.

मी इथे इमॅजिनलं मी आणि सानु इन घाटी आणि वाटलं आधी तिला घरी ठेवूनच जाऊन यावं मग जमलं तर तिलाही न्यावं.

आज पहिल्यांदाच मला "क्रमशः" हवंसं वाटतंय!
हे सगळं वाचताना "शूरा मी वंदिले" हा पुलंचा लेख, आणि "रारंगढांग" मधली वर्णनंही आठवतायत..
मस्त चालू आहे! पहिले दोन लेखही न थांबता, हावर्‍या हावर्‍या वाचून काढले.

असंच लिहा अजून खूप खूप. इतकं छान चालू आहे, की आयुष्यात एकदा तरी इथे जावंच, त्याशिवाय "त्याने" बोलावू नये वर, असं मागणं त्याच्याकडे मागावंसं वाटतंय!

वाट बघतेय पुढच्या लेखाची.

हा भाग पण एकदम जबरी झालाय आणि खर्‍या अर्थाने आता प्रवासवर्णनाला सुरुवात झाली आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

"तुमच्या मनात एकाच वेळेस धडकी भरवून, त्याच वेळेस अफाट बेछुट सौंदर्याने हृदय काबीज करावे ते हिमालयानेच".......,"गर्दसभोवतीरानसाजणी","घनव्याकुळ"....
सुरेख लिहिते आहेस,लिही भरपूर..वाचतेय.

http://www.treklens.com/gallery/photo269614.htm
केप्या, हा (मेल) मोनाल. मोरासारखे अप्रतिम रंग असतात. हिमालयात आढळतो. उत्तराखण्डचा राज्याचा
स्टेट बर्ड आणि नेपाळचा राष्ट्रीय पक्षी.
त्या दोघांना वाटले की त्यांनी ज्या पक्ष्याचा फोटो काढला तो मोनाल होता. पण नंतर ट्रेकलीडर म्हणाला की तो मॅगपाय असावा.

आडो- हो नेक्ष्ट टायमाला सकाळीच चढायला सुरवात करणार. Proud

फदि- आपल्या 'रानफुले' ची आठवण मला बर्‍याचदा आली या प्रवासात.

धन्यवाद लोकहो.

रैना मस्तच लिहिलयस एकदम, मजा आली वाचालया
ललीता ला मोदक, तुम्हाला वाहन लागत नाहीत म्हणजे तुम्ही खरच लकी आहात खुपच.
बस दिसली तरी मळमळण्याच्या भावनेला सुरवात होते प्रवास सुरु झाला 'हे राम' परत बसच लागते अस नाही कुठली ही गाडी लागते.

मस्त! जबरी वर्णन. एकदम गुंगून जायला होते वाचताना. आणि श्वासाचा त्रास वाचताना काळजीही वाटली.
पुढे एव्हढा त्रास झाला नसेल अशी आशा..

अगदी तुझ्याबरोबर चालतेय असेच वाटले.
हिमालयात तशी थोडीशीच फिरलेय त्यामुळे चित्र डोळ्यासमोर येतेय.

खूपच छान. संपवायची अजिबात घाई नकोय. Happy

रैना, वा... ह्या भागात सर्वात जास्त गुंगले वाचताना. fantastic!
श्वासाचा त्रास झाल्यावर कापूर नाही का हुंगलास? कारण त्याचसाठी तुम्ही तो घेतला होता असे वाचल्याचे आठवते आहे.
चढायची प्रॅक्टीस केली होती का ट्रेक च्या काही दिवस/महिने आधी? तो पक्षी काय अप्रतिम आहे!!!
मला १ किलो मोशन सिकनेस च्या गोळ्या घेउन जावे लागेल अशा प्रवासासाठी. तरी हल्ली खुप कमी झालाय.

अधाशासारखा वाचला लेख ऑफीसमध्ये बसून.
पुढचा भाग कधी?
मन भरत नाहीये वाचून, हावरटपणा वाढतोच आहे.

रैना, खूप छान लिहीलं आहेस. काय काय आवडलं त्याचे संदर्भ द्यायचे झाले तर सगळा तुझा लेखच प्रतिसादात उतरवावा लागेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

वॉव.. आज शेवटी वेळ मिळाला आणी तिन्ही भाग एका दमात वाचून काढले. कसली मजा आली वाचायला.. सुप्पर्ब वर्णन केलंयस.. तिसरा भाग वाचून.'पंक्चरलो'चा अर्थ बरोब्बर समजला Lol
अश्शीच अजून लिव!!!

Pages