गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

Submitted by अविकुमार on 26 August, 2011 - 04:47

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

----------------------------------------

टीप: खालील वृत्तांतात कुणाचा उल्लेख राहून गेल्यास तो अनुल्लेखाचा प्रयत्न नसून मा.बु.दो.स.
कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत लिखाणास अक्षम्य उशिर झाला आहे याची मला जाणीव आहे. तरिही 'आपलेच' मायबोलीकर समजून घेतील अशी आशा.
---------------------------------------------

रविवारी भल्या पहाटे ८:३० ला ’रविवार ब्रेकफास्ट गटग’ साठी नाव नोंदणी करावी की करु नये अशा द्विधा मन:स्थितीत बराच वेळ काढल्यानंतर शेवटी एकदाचा मनाचा हिय्या करुन उपस्थिती नोंदवून टाकली. तरिसुद्धा मनामध्ये शंका-कुशंका चालूच होत्या. एकीकडे प्रथमच पुण्यातल्या गटगला मायबोलीकरांना भेटण्याची उत्सुकता तर दुसरीकडे इतक्या भल्या पहाटेची वेळ गाठता येईल ना, गाठली तरी नियमित भेटणार्‍या पुणेकर मायबोलीकरांमध्ये उपरा तर ठरणार नाही ना अशा शंका. शेवटी काही का होईना, सकाळचा ब्रेकफास्ट तरी करून येऊ इतकीच माफक अपेक्षा मनात ठेऊन पहाटे ७ चा गजर लावून शनिवारी मुद्दाम लवकर झोपलो. पण हाय रे दैवा, सकाळी सौ. प्रितीच्या जोरजोरात आवाजाने जाग आली. पहातो तर काय ७:१५ झालेले. तरी बरं की नोंदणी केल्याच्या दिवसापासून रोज ’गटगला जायचंय’ असा आमचा जप आमच्यापेक्षा आमच्या ’उत्तमार्धांगांनीच’ सिरीयसली घेतला होता आणि बहु प्रयत्नांती आमच्या ’चिरनिद्रेत’ व्यवधान उत्पन्न करण्याचे साहस त्यांनी केले होते. आधीच जरासा उशीर झाल्यामूळे आजच्या सुट्टीच्या दिवशी अंघोळीलाही सुट्टी द्यावी का, हे आमचे स्वगत ऐकून ’सौं’नी तीव्र निषेधाचा पवित्रा घेतल्याने आम्ही भर पहाटे पांढरे निशाण फडकवत विनाशर्थ माघार घेतली आणि मायबोलीकर माझ्या विनाअंघोळीच्या पवित्र व मनोहारी ’अवतारा’ला मुकले! Happy

बरोब्बर ८ वाजता साग्रसंगीत तयार होऊन हडपसरहून दुचाकीला टाच मारून आमचे वारू दौडत ’गंधर्व’च्या दिशेने निघाले सुद्धा. पुण्यात अभावानेच दिसणाया मस्त मोकळ्या रस्तांचा मनापासून आनंद घेत बालगंधर्वला पोहोचलो आणि फार उशीर तर झाला नाही ना असे वाटून घड्याळाकडे पाहीले आणि विश्वासच बसेना.... घड्याळ चक्क ८:१० ची वेळ दाखवत होते. स्वत:च्या दुचाकीचालनकौशल्याबद्दल उर एकदम भरुन आला. गाडी ’गंधर्व’ समोर लावून टाकली आणि पुढचा वेळ कसा काढावा या विवंचनेत बालगंधर्वला दिसणाया गर्दिकडे वळलो. जरा जवळ जाऊन पहाताच खुप मोठा स्त्रियांचा घोळका बालगंधर्वच्या प्रवेशद्वारावर रांगेत उभा होता आणि एकदम भूत पाहिल्यासारखा माझ्याकडेच पहात होता. बायांच्या घोळक्यात एकदम हा बाप्या कुठून आला असा भाव त्यांच्या चेहयावर दिसल्याने ’ही गर्दी कशासाठी’ हा मनात आलेला आगाऊ प्रश्न मनातच ठेवून तिथून काढता पाय घेतला आणि ’गंधर्व’च्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर उभा राहून त्याच्या प्रवेशद्वारावर चालणाया घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून बसलो.

८:२५...८:३०...८:३२..................८:३३.......बरोब्बर ८:३४ वाजता गंधर्वच्या प्रवेशद्वाराजवळ एक ४/५ जणांचा ग्रुप दिसला तसा तिथे जाऊन घाबरत घाबरत ’मायबोली’ का? असे विचारले आणि सर्वांनी हसत होकार दिल्यावर मग मीही पुढे होऊन ओळख करुन दिली...’मी अविकुमार’ (नाम तो सुना ही होगा...हे मी मनातल्या मनात म्हटलं!). केदार, मनिष, फार-एन्ड, मयुरेश अशी नावे सांगत सगळ्यांनी हस्तांदोलन केले. तेवढ्यात त्या सर्वांच्या तोंडावर आश्चर्यमिश्रित भाव उमटल्याचे पाहून त्या कारणाकडे नजर वळवली तर २ व्यक्ती हसतमुख मुद्रेने आमच्याकडेच चालत येत होत्या. तर अशा प्रकारे अनिलभाई यांनी या गटगला धावती भेट देऊन आश्चर्यचकीत केले. त्यांच्याबरोबरील दुसरी व्यक्ती म्हणजे मायबोलीकर श्री. विवेक देसाई असल्याचे समजले. तेवढ्यात एक दुचाकी आमच्या पुढ्यात येऊन थांबली आणि त्यावरील मुलीने आमच्याकडे हात हलवीत ’हाय’ केले. परंतू तोंडाला ’खास पुणे इश्टाईल’ने रुमाल बांधला असल्याने कुणालाच ओळख पटेना आणि सगळे गोंधळून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. गडबड लक्षात आल्याने तिने झटकन तोंडावरील रुमाल बाजूला सारला आणि ’नीधप’ कार्यक्रम स्थळी अवतरल्या. तेवढ्या वेळात अनिलभाई झटकन आपल्या कार मधे जाऊन नवीन मायबोलीचा चहासदरा घालून अवतरले. पुन्हा ओळखीचा कार्यक्रम झाला आणि खास अनिलभाईंच्या विनंतीवरून एक लहानसे ’फोटोशूट’ही तिथल्यातिथे पार पडले.

नीधप ने आदल्या दिवशीच गंधर्वमधली २० आसने राखीव करुन ठेवल्याने आसनांसाठी धावाधाव करावी लागली नाही आणि सर्व जण एक एक करीत स्थानापन्न झाले. मी केदार आनी कांदापोहेच्या (मधल्या काळात केप्याचे वाजतगाजत आगमन झाले होतेच) मधली अशी मोक्याची जागा पटकावली जेणेकरून सर्व चर्चांमधे शाब्दिक नसला तरी ’ऐकीव’ सहभाग घेता येईल. हळू हळू एक एक मायबोलीकर कार्यक्रमस्थळी अवतरू लागला तसतसा ओळखपरेड आणि गप्पांना रंग चढू लागला. मी सुध्द्धा आपल्या वकूबाप्रमाणे मधूनच गप्पांमधे उगाच एखादं वाक्य टाकून हिःही हसत होतो. मधेच माझ्या ऊसगावातून कायमस्वरुपी परतल्यानंतरचे अनुभव याविषयीच्या एका वाक्याने केदार बिथरला आणि पुन्हा असं घाबरवू नकोस अशी विनंती करून मोकळा झाला. मी मात्र मनातल्या मनात कसं फसवलं म्हणत हसत बसलो. तेवढ्या वेळात तिथे शैलजा, स्वाती व देव, रूमा, श्यामली, हिम्सकूल, किरू, आनंदसुजु, आनंदमैत्री, बागुलबुवा, देवा सुध्द्धा येऊन पोहोचले होते आणि जोरदार कल्ला चालू झाला होता. नीलवेद, इंद्रा, कौतुक शिरोडकर हे सुध्द्दा आल्याचे कळाले पण नक्की कोण आणि कुठे होते ते मला शेवटपर्यंत कळाले नाही हो. आणि याची रुखरुख अजूनही मनात आहे.

तेवढ्यात देवा आणि केदार हे साईडप्रोफाईलने सारखेच दिसतात असं कोण तरी म्हणाले म्हणुन मग आधी देवा कोण हे शोधून काढ, मग उगाच त्याच्याकडे ’तो साईड प्रोफाईल’ कधी देतोय याची वाट बघ, मग केदार चा साईड प्रोफाईल बघ, मग ’अरे हो..खरंच की’ याचा साक्षात्कार होऊन खूश हो असे उद्योग मी ’उपमा’ खाता खाता चालू ठेवले. बागूलबूवाचे फोटोसेशन सुद्धा जोरदार चालू होते. ते फोटॊ काढायला लागले की हातातला तोंडापर्यंत नेलेला उपम्याचा चमचा पटकन खाली कर, केप्याने मागवलेल्या उडिदवडयाला कुणीही वाली नसल्याचे पाहून त्या उडिदवड्याला ’उडवा’यचा प्लॆन कर आणि केपीराव तेवढ्यात तेथे उगवल्याने (किंवा कडमडल्याने म्हणा) उडदाऐवजी मूग गिळून गप्प बस असे उद्योगही गप्पा ऐकत असताना माझे एकीकडे चालूच होते.

गप्पांचे विषयही अहाहा...काय वर्णावे..... अगदी वैश्विक..... बाराकरांचे गटग, झक्की, औरंगाबादचे गेस्ट हाऊस आणि त्यातील एकंदरित (अ)सुविधा, वैभवाचा आदल्या दिवशीचा गझल कार्यक्रम ’शब्द झाले मायबाप’, त्या कार्यक्रमानंतरचे कार्यकर्त्यांचे गटग, शिकागो अधिवेशन आणि तेथल्या घडा’मोडी’!, ऊसगावातून भारतात आणण्याजोग्या वस्तू, मायबोलीवरील काही मायबोलीकर आणि त्यांच्या लिखाणाचा दर्जा ई. ई. अशा प्रकारच्या आणि इतरही अनेक विषय माझ्या ’ग्यान’ सागरात भरच घालून जात होत्या. ’नीधप’नी आणि ’केदार’नी एव्हाना गप्पांची वरची पट्टी पकडली होती आणी या सर्वांचा कळसासाध्याय म्हणजे उशिराने उगवलेल्या ’ललीता-प्रीती’. त्या अगदी थोड्या काळासाठी तिथे आल्या आणि सर्वांना आपल्या दर्शनाने पुनीत करून रवाना झाल्याही. आम्ही आपले पहातच राहीलो.

एव्हाना अनिलभाईंना पुढे गोव्याला जायचे असल्याने ते सर्वात आधी सटकले होते. त्यानंतर थोड्यावेळाने मुंबईला जाणारे ’पुणेकर’ निघाले. मग हळूहळू एकेक जण सटकू लागला. तितक्यात आम्हा सर्वांचा विरोध न जुमानता केदारने संपूर्ण उपहाराचे बील अदा केले. आणि घड्याळातले १०:३० बघत आम्हाला पण निघायचे वेध लागले. पुन्हा एकदा ’गंधर्व’ बाहेर एक उर्वरीत लोकांची लहानशी मैफल उभ्या उभ्या जमवून साधारन ११:०० वाजता आम्ही सर्व जण पुन्हा भेटन्याचे ठरवत एकमेकांचा निरोप घेतला.
---

क्षणचित्रे:
१. नीधपने इतक्या मोठ्याप्रमाणावर मायबोलीकरांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल तिचे हार्दिक आभार.
२. नीधपला एके ठिकाणी तीचा एक लेख वाचल्याची मी आठवण करुन दिली आणि उपनिर्दिष्ट लेख फार चांगला असल्याबद्दल मी तीला सांगताच ’केदार’ मात्र ’कशी जिरली ’नी’ ची’ अशा अविर्भावात खूश झाला. Happy
३. केदार आणि मी एकाच कारखान्यात पाट्या टाकत असल्याचे निदर्शनास आले.
४. मंजात्या हे पुण्यातलं फार लाडकं व्यक्तीमत्व असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक थोड्या वेळाने त्यांच्या नावाचा उद्घोष चालू होता.
५. केदार हे बर्याचशा आर्थिक बाबीतले उत्कृष्ट जाणकार व सल्लागार आहेत. आणि फुकटात सल्ला देण्यासही ते नेहमी तयार असतात...आणि फुकटात ’खिलवण्यासही!’
६. गंधर्व मधील ’कटलेटस’ फारसे न आवडल्याने त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आले आहे.
७. माझ्या मायबोलीवरील एकंदरीत ७ वर्षाच्या कारकिर्दित(!)ला हा देशातला पहिला गटग आणि एकंदरीत दुसरा गटग होता. (हे फक्त क्षणचित्रांची एकूण संख्या वाढवण्याच्या दृष्टीने लिहिले आहे, यावर कोणत्याही खवट/खारट/तिखट प्रतिक्रियांना अनुल्लेखाने मारण्यात येईल!) Happy
८. बर्‍याचशा गप्पा आणि त्यांचे विषय माझ्या कानांच्या टप्प्यांतून आणि बुद्धीच्या कुवतीतून राहून गेले आहेत याची मला खात्री आहेच. तरी उपस्थित मान्यवर ते सर्व इथे नक्कीच टंकतील याची खात्री मज पामरास असल्याने इतक्या उशिरानेसुद्धा वृत्तांत टाकण्याचे धाडस करीत आहे!

गुलमोहर: 

<<<<३. केदार आणि मी एकाच कारखान्यात पाट्या टाकत असल्याचे निदर्शनास आले.>>>>

Lol

भारी!

माझ्याबरोबरीने उल्लेख केलेले माबोकर कित्ती उशीरा आलेले! तुमचं बाहेर फोटोसेशन सुरु होतं तेह्वाच मी पोहोचले होते तिथे! निषेध! Proud

मस्त जमला आहे वृ Happy ष्टाईल आवडली लिहायची अविकुमार, आता टेक्सास मधलेही वृ वाचले पाहिजेत.

८:२५...८:३०...८:३२..................८:३३.>> मला आधी वाटले लोकल्स च्या वेळा कशाला लिहीत आहेस Happy

उडदाऐवजी मूग गिळून गप्प बस>>>
नाम तो सुना ही होगा>>> Lol

बिल केदार ने दिले की मयुरेश ने का मनीष ने? हॉटेलवाला नंतर धावत मागे आला नाही म्हणजे कोणीतरी नक्कीच दिले Happy

बिल केदार ने दिले की मयुरेश ने का मनीष ने? हॉटेलवाला नंतर धावत मागे आला नाही म्हणजे कोणीतरी नक्कीच दिले >>> ९०% बील केदारनेच भरले. आम्ही त्या नंतर ऊरलेल्या रकमेत खारीचा वाटा उचलला! Happy

वा वा.. अखेर वृत्तांत आला की... एका आठवड्याच्या आत आला.. हेही असे थोडके... आणि जमलाय.. रच्याकने.. निधप झालय ते नीधप कर जमल्यास...

माझं नाव का नाहीये यात? प्राची, मा.बु.दो.स.!!! Happy आता तुम्हीपण शैलजा सारखं 'वोक्के' म्हणूनच टाका बघू! Happy

रच्याकने.. निधप झालय ते नीधप कर जमल्यास... चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद हिम्स्कूल! दुरुस्त केली आहे. Happy

नी Proud

अविकुमार...
छान, सुंदर, मस्त... इ.इ....

'ग-ट-ग'ला उपस्थीत असलेल्या प्रत्येकाचे चेहरे माझ्या लक्षात राहिलेत, पण काही मेंबर वगळता बहुतेकांची नावं आणि चेहरे यांची 'जोड्या-जुळवा' प्रॅक्टीस अजून सुरु आहे... माफ करा, पण खरोखरच सांगतो मी तुमचा चेहरा पार विसरून गेलोय. बाहेर पडताना एका महिला मेंबर (मायबोलीकर- सिंहगड रस्ता निवासी), सोबत ओळख झाली. त्या परदेसाईना ओळखतात असे म्हणाल्या. पण माझ्या सवयी प्रमाणे मी त्यांच्या नावाची गफलत केलीय. त्यांचे नाव 'स्वाती' की 'स्वप्ना' काहीच आठवत नाहीय. कृपया 'ग-ट-ग उपस्थीत महिला वर्गा'ने मला समजून घेऊन मदत करावी, ही आग्रहाची विनंती... :फिदी:...

<खुप मोठा स्त्रियांचा घोळका बालगंधर्वच्या प्रवेशद्वारावर रांगेत उभा होता आणि एकदम भूत पाहिल्यासारखा माझ्याकडेच पहात होता. बायांच्या घोळक्यात एकदम हा बाप्या कुठून आला असा भाव त्यांच्या चेहयावर दिसल्याने ’ही गर्दी कशासाठी’ हा मनात आलेला आगाऊ प्रश्न मनातच ठेवून तिथून काढता पाय घेतला>:हाहा:

मास्तर, स्वाती आणि स्वप्ना या दोन्ही नावाचं कुणीच नव्हतं की.. Happy
(त्यावेळेला न जाहीर झालेल्या) मुसंबा होत्या.

अरे हो.. बघ ना स्वाती होती की.. Happy

नी...
कठीण आहे... फक्त त्यांचा चेहरा लक्षात आहे माझ्या...
असो, कदाचीत त्या स्वतःच याचा 'रहस्य-भेद' करतील... Happy ...

ती नव्हती गटगला.. >> अर्रर्र... अशी फिरकी घेतली होय....लक्षातच नाही आलं. तरी मी नीधपनी प्रसिद्ध केलेली यादी परत वाचली आणि त्यातही नव्हतं नाव..त्यामूळे मी तो नी.बु.दो.समजलो पण पुन्हा तो मा.बु.दो.!!!

मा.बु.दो.स.!!! >>> अविकुमार, हे उत्तर झक्कास आहे >>> अश्विनी के, अहो आमचं पांढर निशाण सगळीकडे विनाशर्थ फडकतंच असतं..वृत्तांताच्या पहिल्या पॅरा मधून एव्हाना तुमच्या लक्षात यायला हवं होतं..असो.. त्याबाबतीत एवढं काही वाईट वाटून घेऊ नका....हाही मा.बु.दो.स. ... काय? Happy

नाही हो अविकुमार. मी मनापासूनच सांगतेय की हे उत्तर झक्कास आहे Happy याने वाद टळतात.

साधारण बसण्याची रचना...

-------------- आनंदमैत्री, नीलवेद, केपीकाका, अविकुमार, केदार, किर्‍या, मास्तर, हिम्या, स्वाती, देव
अनिलभाई --------------------------------------------------------------------------------------------------------
-------------- कौतुक, आनंदसुजु, इंद्रा, फारेंड, मनीष, मया, नीधप, शैलजा, रूमा, मुसंबा

अशी होती.

बाब्या फोटु काढत फिरत होता..

मग वाटलं काय तुला..
आलीसबसलीसइडलीखाल्लीसगेलीस
केवढी ती घाई..

माफ करा, पण खरोखरच सांगतो मी तुमचा चेहरा पार विसरून गेलोय.>>विवेकजी, काही हरकत नाही. माझा चेहरा तसा लक्षात रहाण्यासारखा नाहीच आहे, एकदम चारचौघांसारखा आहे. Happy पण मला आहे बरं तुमचा चेहरा लक्षात! तरी सुध्दा आठवण देण्याचा प्रयत्न. शब्द झाले मायबाप चा पुढचा कार्यक्रम पुन्हा केव्हा? असा प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि तुम्ही मुंबईकडे बोट दाखवलेत....! Happy

Pages