तुम्हे याद हो के न याद हो - १७

Submitted by बेफ़िकीर on 20 August, 2011 - 03:09

'धार्मिक दंगलीचा कट उघडकीस'

'जुनैद अख्तर या समाजकंटकाचा बुरखा पुणे पोलिसांनी टरकावला'

'मंडई गणपतीची विटंबना करण्याचा कट'

'समाजसेवेच्या मुखवट्यामागे अतिरेकी कारवाया'

'मुख्यमंत्र्यांकडून व नागरिकांकडून पोलिसांवर स्तुतीचा वर्षाव'

'आज होणार होती दंगल पुण्यात'

'नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन'

'कसबा पेठेतील रास्ते वाड्यातील एक हिंदू युवक कटात सामील'

'उमेश राईलकरने केलेली होती योजना'

'कटाचे सूत्रधार जुनैद अख्तर, उमेश राईलकर, विनीत गुजर'

'लष्करी पथकाची गरज नाही'

'दर्गा व प्रमुख मंदिरांपाशी सुरक्षा व्यवस्था'

'आरोपी क्रमांक दोन उमेश राईलकर निसटला'

'विविध संघटनांचे पोलिसांच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे'

'प्रियकर निघाला अतिरेकी'

===================================================

'पणदरे'!

या नावाचे गांव पुण्यापासून ९० एक किलोमीटरवर आहे आणि आपण तेथे पोचलो आहोत या व्यतिरिक्त काहीही माहिती उमेशला नव्हती. रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले होते. एका सुमार टपरीवर शेवटच्या बससाठी थांबून राहिलेल्या प्रवासांची सोय म्हणून केवळ चहा, जुनाट बिस्किटे आणि केव्हाच गार झालेली भजी होती. खिशात एक पैसाही नसल्यामुळे उमेशला ती भजी अप्राप्य वाटत होती. अंधारात एका दूरच्या कोपर्‍यात तो कुणालाही दिसणार अशा पद्धतीने नुसताच थांबून राहिला होता.

काल रात्री आपण जे साहस केले ते करण्यात काही अर्थच नाही आहे हे त्याला क्षणोक्षणी जाणवत होते. तो प्रसंग आठवला की अजूनही अंगावर शहारे येत होते.

चौकीसमोर जीप थांबली आणि रडवेले झालेले अप्पा आणि विनीत उतरू लागले तेव्हा आपण सगळ्यात आत बसलेलो होतो. आपल्याला आणि त्या दोघांना हुसकावून हुसकावून बाहेर काढण्यात आले आणि केवळ दहा ते बारा सेकंदांचा कालावधी असा मिळाला की हातात बेडी नाही, कोणीही धरलेले नाही. चौकीच्या आत एकदा पोचलो की आयुष्य बरबाद होणार हे जाणवतच होते. आजूबाजूला अंधार नसला तरी संध्याकाळसारखा उजेडही नव्हताच. काय करावे आणि काही करावे की करू नये याचा निर्णय घेण्याइतका वेळच नव्हता. एक मात्र समजत होते की एकदा आत गेलो की हा निर्णय घेण्याचा वावही राहणार नाहीच आहे.

आणि आपण सरळ..... सरळ धावच घेतली...

कुठे जायचे, किती धावायचे, काहीही माहीत नव्हते. मुळात आपण सापडणार नाही हा आत्मविश्वासही नव्हताच. फक्त इतकेच माहीत होते की आत्ता पळालो नाहीत तर कधीच पळू शकणार नाही.

केवळ एका तासात आयुष्याला अशी दिशा मिळाली होती की सगळे संपलेच होते. प्राधान्येच बदललेली होती सगळी!

आता निवेदिताचा विचार करणेही शक्य राहिलेले नव्हते. आता विचार फक्त एकच होता तो म्हणजे जमेल तितक्या कमी वेळात जमेल तितके जास्त अंतर कापून कोठेतरी लपून बसणे! भूक लागली आहे की तहान, आई रडत आहे की बाबा धास्तावले आहेत, खिशात पैसे आहेत की एक नाणेही नाही आहे... कसलाही विचार न करता केवळ धावत सुटायचे.

मागून शिट्या, जीप सुरू झाल्याचे वगैरे आवाज येणे कमी कमी झाले. कुणीतरी खूप गोंधळ झाल्यासारखे ओरडत होते तोही आवाज कमी झाला. जीप कोणत्या दिशेला गेली हे समजत नव्हते. आणि पळताना दोन भयानक प्रकार झाले.

पहिला प्रकार म्हणजे... विरुद्ध दिशेने काही वाहनांचे आवाज आल्याबरोब्बर उमेश एका दुकानामागे लपला आणि त्या सर्व दुचाक्या त्याच्या समोरूनच गेल्या. ते सगळे वाड्यातलेच लोक होते. त्यात त्याचे आई बाबा आणि क्षमाही होते. टच्चकन एक आसवांची रांग गालांवर ओघळतीय तोच... ती जीप नेमकी विरुद्ध बाजूने हळूहळू येत एकदम समोर आली. इतक्या वेगात माणूस पळू शकणे शक्यच नाही हे वाटून जीप ड्रायव्हरने योग्य डिसीजन घेऊन ती जीप विरुद्ध बाजूने आणलेली होती. पण त्यांचा पोपट असा झाला की हा दुकानामागे लपल्यामुळे आता कुठे शोधायचे हेच त्यांना समजेना! जीप पुन्हा तशीच चौकीच्या दिशेने गेली तेव्हा आधीपेक्षाही तुफान वेगात उमेश राईलकर मॉडर्न कॅफेच्या रस्यावरून धावत सुटलेले होते. आणि काय झाले कुणास ठाऊक! चौकात एक एस टी बस थांबलेली होती. बसच्या मागच्या बाजूने तीन माणसे, जी एकाच कुटुंबातील असावीत, ती बस पकडण्यासाठी लगबगीने बसजवळ येताना उमेशने पाहिले. बसवरची पाटी होती 'शिवाजीनगर - फलटण'! एक पैसाही नसताना आपल्याल कुणी येऊच देणार नाही हे लक्षात आल्याबरोब्बर त्याने बसच्या मागच्या शिडीचा बार धरला. आपण जे करतो आहोत ते आपण आयुष्यात कधी करू असे त्याला स्वतःलाही आत्ता वाटत नव्हते. पण पर्याय उरलेला नव्हता. आणि विश्वास बसला नाही कारण बस सुरू झाली तेव्हा कोणताही त्रास न होता तो शिडीला धरून वेगाने पुढे चाललेला होता. हे असे आपण किती अंतर जाणार असा विचार मनात आला पण हातांची रग सहन होईपर्यंत तरी जातच राहायचे आणि सहन झाले नाही की बस थोडी हळु झाली की उडी मारायची हे त्याने ठरवले.

पण दैव त्याच्या बाजूने होते. ती बस स्वारगेटच्या समोर चक्क पुन्हा थांबली.

बसच्या मागे असलेली इमर्जन्सीची खिडकी अलगद किलकिली करून उमेशने पाहिले. मगाशी धावत येऊन आत बसलेले कुटुंब तिथे बसलेले होते. दोन जाग्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे स्वारगेटवर चढणार्‍यांपैकी कुणीतरी तेथे येऊन बसू नये अशा उद्देशाने त्या कुटुंबातील एक स्त्री रिकाम्या जागेवर आडवी झाली.

गोंधळ असा झाला की बसमधील दिवे लागलेले होते आणि स्वारगेटवर उभे असणार्‍या इतरांना मागे लटकलेला उमेश सहज दिसत होता. त्या गर्दीतही एखादा पोलिस असू शकेल हे उमेशला सहज जाणवत होते. त्यामुळे त्याने नवीनच साहस केले. तो सरळ खाली उतरला आणि नवीन चढणार्‍या लोकांबरोबर आत चढून गेला.

बस सुरू झाल्यानंतर जवळपास दहा बारा मिनिटांनी कंडक्टरने त्याला तिकीट विचारले तेव्हा उमेशने नैसर्गीक नाटक केले.

"काका, अहो.. पाकिटच आणलं नाही मी... "

"कुठं जायचंय...??"

"फ... लटण"

"मंग कसं करणार??"

"उतर.. उतरतो"

"हडपसरला गाडी थांबंल... "

खरे तर कंडक्टरने लगेचच सिंगल बेल दाबून त्याला उतरवायला हवे होते. पण त्याला थोडा अधिक त्रास व्हावा या उद्देशाने कंडक्टरने 'हडपसर'चे नांव काढले. त्याला वाटले की पोरगा म्हणेल नको मला इथेच उतरवा. आणि मग नंतर दमात घेऊन सांगता येईल की बस अशी वाट्टेल तेथे थांबत नाही आणि आता चल हडपसरपर्यंत! पण उमेश तर चक्क 'बरं' म्हणाला! शेवटी कंडक्टरलाच वैताग आल्यामुळे त्याने त्याला टर्फ क्लबपाशी गाडी थांबवून उतरवले.

रात्रीची वेळ! एकट्या उमेशला उतरवण्यासाठी बसचे दिवे लावायचे गरज नव्हती. सोलापूर रोड तेव्हा अंधारातच असायचा. बसचे दारही मागच्या बाजूला होते.

उमेशा बसमधून उतरला आणि त्याला स्वतःलाही कधी विश्वास ठेवता आला नसता अशा हालचाली करत उमेश राईलकरने...

.... पुन्हा मागची शिडी पकडली. जवळपास वीस फुट दोन्ही पाय तसेच फरफटत गेल्यानंतर साहस करून त्याने हातांच्या जोरावर दोन्ही पाय वर उचलून शिडीवर टेकवले तेव्हा....

भैरोबा नाका पोलिस चौकीचा पोलिस नेमका विरुद्ध बाजूला बघत असल्याने.....

..... किमान सासवडपर्यंत तरी रग सहन केलीच पाहिजे हे उमेशला जाणवले.

मात्र! असे अधिक काळ उभे राहता येत नाही. आणि खरे तर असे पंधरा वीस मिनिटांपेक्षा अधिक काळही उभे राहता येत नाही.

पण पुन्हा सुदैव मदतीला आले.

फुरसुंगीपाशी चहा घ्यायला गाडी थांबली. अंधारात उमेश तसाच एका कोपर्‍यात बसून राहिला. हातांवर हात चोळून त्याने रग कमी केली. आणि मग खरे संकट जाणवले. दिवे घाटातून वाट्टेल तशी वळत गाडी जेव्हा जाऊ लागली तेव्हा नरकयातना होत होत्या त्याला. खरोखर उडी मारावीशी वाटत होती. पण पर्याय नव्हता. मधेच उडी मारली तर सणकून लागेल याची कल्पना होती. शरीराला अपाय होण्याची भीती ही सर्वात जलदगतीने मन व्यापणारी भीती असते.

अक्षरशः हात तुटायची वेळ आली तरी तस्साच उभा राहिला आणि सासवडपर्यंत पोचला. खरे तर एस टी च्या प्रवासात ड्रायव्हर कंडक्टरची ड्युटी सहा तासांनी संपते. पण ही जोडी सासवडच्याच डेपोची असल्याने आता फलटण डेपोच्या जोडीने गाडी घेतली. हा प्रकार व्हायला साधारणपणे पंधरा मिनिटे लागतात कारण चार्ज देताना सर्व हिशोबही द्यावा लागतो. पंधरा मिनिटे पुन्हा अंधारात विश्रांती मिळणे आणि एका नळावरचे पाणी प्यायला मिळणे या ताजातवाना करणार्‍या गोष्टी होत्या. कम्युनिकेशनची साधने आजपेक्षा कमी असल्याने अजून सर्वत्र बातमी पोचली नसेल असे त्याला वाटत होते.

"कुठे जायचं बे???"

अंधारातच खांद्यावर हात पडला आणि पाठोपाठ जरब बसवणार्‍या आवाजात हा प्रश्न पडला त्यामुळे शॉक्ड झालेला उमेश थरथरत त्या आकृतीकडे पाहात म्हणाला...

"फलटण"

"मग हित्त काय करतूयस??"

"सास... सासवडपर्यंतचंच... तिकीट... म्हणजे.. तेवढेच पैसे होते... "

"कोन तू??"

"पुण्याचा आहे... "

"असा रात्रीचा कस्काय भटकतूयस??"

"प.. घरातून .. पळालोय.. सावत्र असल्याने... छळतात..."

" मंग आता काय करनारेस?? फलटनला कोने???"

"मित्र आहे"

"हे घे ईस रुपये.... यड्यागत कुटंबी फिरत र्‍हाऊ नकूस"

"थॅन्क यू... थॅन्क यू... "

माणुस कोण होता, त्यने अशी मदत का केली याचा कसलाही विचार न करता उमेश तरातरा बसमध्ये जाऊन बसल्यावर त्याला पुण्यात पाहिलेले लोक चक्रावलेच! कंडक्टर मात्र चक्रावला नाही कारण तो त्या बसमध्ये येथेच जॉईन झाला होता. उमेशने तिकिट काढले तसा एक जण पचकलाचः

"होते होय पैसे???"

"अं?? नाही.. एकांनी दिले..."

"पण.. इथपर्यंत कसे काय आलात??"

"जीप... शेअर जीप मिळाली..."

"फुकट होय??"

"नाही.. त्यातल्याच एकाने जीपचे अन या प्रवासाचेही पैसे दिले... "

शंकाकुशंका संपल्या तेव्हा बस लाईट बंद करून महाराष्ट्राचे दैवत मल्हारी मार्तंड खंडोबाच्या जेजूरीकडे तुफान वेगाने चाललेली होती.

थकलेला असून झोप येत नव्हती. खिडकीच्या फटीतून येणारा वारा सुखद वाट्त होता.

आणि मनात तो विचार आला.

'फलटण???????'

फलटणला आपण काय करणार??

फलटण तर बर्‍यापैकी मोठे असेल. तिथे पोचल्या पोचल्याच धरतील आपल्याला! अंहं! फलटणला जाणे ह मूर्खपणा ठरेल.

आपण हे काय करतोय??

काय करतोय काय आपण??

आपली चूक काय आहे?? निवेदितावर प्रेम बसले आणि ते व्यक्त केले ही?

दारू सोडली ही?

मिळालेली पहिली नोकरी व्यवस्थितपणे करायची इच्छा होती ही??

आई बाबा, आजोबा आणि क्षमा काय करत असतील??? रडून अर्धमेले झालेले असतील. आपण कुठे आहोत या काळजीनेही आणि सापडलो तर काय होईल या काळजीनेही!

नालायक साला जुनैद अख्तर!

म्हणे 'ये दर्दका मौसम नही बदलनेका'!

या क्षणी सुद्धा गाडीत एखादा पोलिस असला तर नुसते आपल्या चेहर्‍यावरचे भाव पाहूनही चौकशी करेल. आणि आपण किती वेळ टिकू??

निवेदिता अशी कशी वागली? इतकी नालायक कशी काय निघाली?? आपण समाजकंटक आहोत हे समजल्यामुळे म्हणाली की आज आपण तिला जबरदस्तीने घेऊन गेलो होतो?? तिचा विश्वा बसल्या त्यावर?? की तिच्यावर प्रकरण शेकायची वेळ आली त्यामुळे ती असे म्हणाली??

तसे असेल किंवा कसेही असेल तरी हे कसले प्रेम??

आपण वाट्टेल तो धोका पत्करून आत्ता पळून चाललेलो आहोत. सापडलो की आपले काय होईल?? आणि ती सरळ आपल्यावर आणि विनीतवर आरोप करून मोक...ळी.. झा..

विन्या?????

त्या मध्यरात्रीच्या सुनसान आणि भरधाव प्रवासात असताना उमेशच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. विन्या यात अडकला. आपल्यामुळे! आपल्यासाठी! हमसून हमसून रडावेसे वाटत आहे. त्याला काय करत असतील??? मारत असतील का? काय ही मैत्री का काय?? जन्माला आल्यापासून मैत्री म्हणजे काय याचे धडे आपल्याला आप्पा, विन्या आणि राहुल्याने दिले. आणि आपण काय परतफेड केली?? त्यापेक्षा सरळ आपण पोलिसात स्वतःला सादर का करू नये??? वाट्टेल तितका मार खाऊ पण त्या दोघांना सोडवू! आप्पाही उगीचच अडकला. आता राहुलही मित्र आहे आणि एक दिवस अख्तरमियाँकडे आला होता कळल्यावर त्यालाही बोलावतीलच चौकीवर!

कसले आरोप असतील?? काय करत असतील सगळे??

यापुढच्या आयुष्याचे ध्येय एकच! निवेदिता आणि तिच्या घरच्यांची मनःशांती पूर्णपने नष्ट करायची. जन्माची अद्दल घडवायची त्या तिघांना! सौंदर्याच्या जोरावर वाट्टेल तशी वागतेस काय?? कुणाच्याही आयुष्याशी खेळतेस??? आता बघच, उमेश राईलकर हा काय प्रकार आहे ते!

आणि जेजूरी, निरा, लोणंद अशी स्थानके पार पाडत जेव्हाबस पुढे निघाली तेव्हा कुणीतरी कुणाला तरी विचारत होते...

"कसलं चेकिंग चाललंवत रे??"

"काहीतरी प्रकरण झालंय पुण्यात... दोन चार आरोपी पळून गेलेत त्यातले.. त्यामुळे चेकिंग आहे.."

"कसलं प्रकरण पण??"

"कायतरी बॉम्बबिंबचं"

दगडी पुतळ्यासारखा निश्चल झाला होता उमेश! ताडकन अचानक उठून उभा राहिला आणी म्हणाला..

"ओ.. गाडी थांबवा... माझा मित्र तिथेच होता... "

लोणंद स्थानकाला मागे टाकून गाडी अर्धा किलोमीटर पुढे आलेली होती. आत्ता कसा काय प्रकाश पडला याच्या डोक्यात या सर्व प्रवासी व चालक वाहक जोडीच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्हाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत अत्यंत दाट अंधारात आणि भीतीदायक ठिकाणी उमेश सरळ रस्त्यावर उतरला.

आणि खिडकीतून कंडक्टरचा प्रश्न ऐकू आला.

"ऐ.. कुठं चालला??"

"अं ??.. मित्र होता त्या स्टॅन्डवर..."

"आत्ता टुब पेटली होय??? चल बस आत..."

"नाही नाही.. मी त्याला भेटायला चाललोय.. तोच फलटणला राहतो..."

"भडव्या चौकीवर नेऊ काय?? ए उतरा रे... धरा त्याला... "

गाडीचा स्टॉप नसलेल्या ठिकाणी प्रवाश्याला उतरवणे हा कंडक्टरचा दोष ठरतो हे त्याला स्वतःलाच उमेश उतरल्यानंतर लक्षात आले असल्याने त्याने आता कर्तव्य बजावायची सुरुवात केली.

पुन्हा पळापळ!

उमेश काही सापडला नाही.

एका खड्यात उडी मारून लपून बसला. काहीसे खरचटले, खरे तर आतमध्ये काहीतरी चावलेही. पण ते सहन करून त्याने दहा मिनिटांनी निघून गेलेल्या एस टी चे दिवे दिसेनासे झाल्यावर खड्यातून वर येऊन लोणंदकडे पळ काढला. पण त्याही दिशेला प्रॉब्लेम होताच! लोणंद काही इतके लहान नव्हते. तेथेही गस्त असणार होती.

जीप!

उलट्या दिशेने जात असलेल्या एका जीपमध्ये त्याला घेतले आणि ती जीप मारामतीला चालल्याचे त्याला समजले.

'मला मधेच उतरायचे आहे, गावाचे नांव आठवत नाही पण गांव आले की मी सांगू शकेन' असे त्याने सांगितले. त्याला दोन प्रवाश्यांनी 'हे का, ते का, तिथे देऊळ आहे का, साखर कारखान्याचे गाव का, सोमेश्वर का, निंबुत का' असे हजार प्रश्न विचारून हैराण केले. आणि पणदारे गावात जीप पोचली तेव्हा तो म्हणाला...

"हां... हेच ते.. थांबा..."

तेथेच उतरण्याचे कारण हे होते की सर्व गाव आता निद्रिस्त असल्याचे दिसत होते. फक्त स्टॅन्डवर जाग होती. स्टॅन्डपासून शंभर एक मीटरवर त्याला उतरवल्यावर जीपवाला म्हणाला..

"सहा रुपये"

हा प्रॉब्लेम येणारच होता याही उमेशला कल्पना होतीच!

"म्हणजे... तुम्ही पैसे घेता का?? मला वाटले की लिफ्ट दिलीत..."

" सिटा घेतो हो... यवढ्या रातचं कोन बारामतीला जाईल??"

उमेश शहरी वाटत असल्यामुळे वयाने लहान असूनही त्याला अहो जाहो करत होता जीपवाला!

"पैसे नाहीच्चेत माझ्याकडे"

"म्हणजे???"

"मला काय माहीत तुम्ही पैसे घेता??"

"मग रस्त्यात कस्काय उभे व्हतात तवा??"

"अहो... मला वाटल लिफ्ट दिलीत तुम्ही..."

"बघितला का हा निराळा प्रकार??? आ??? आता काय करावं माणसानं ??"

जीपवाला आतल्या दोघांना म्हणाला.. त्यातल्य एकाने अक्कल सुचवायला सुरुवात केली.

"पहिल्यांदा आलायत तवा?? या रस्त्यावं जीपा शिटांवं चालतायत.. पुन्हा कधी जायचेत हितून??? तवा द्या"

"मी आता एकदम परवा दिवशी जाणार आहे पुन्हा उलटा"

"अहो पन हित्त कोनाकडं तर जानार असाल ना?? त्यांच्याकडून घेऊन उद्या द्या.. दोन वाजता जीप थांबल हित्त"

"ठीक आहे.. मी पण थांबेन दोन वाजता..."

"कुनाकडं चाललाय??"

"अं?? इथे एक पवार म्हणून राहतात"

"तो परिट काय??"

"नाही नाही... त्यांचं शेत आहे "

"शेत हितल्या वर्षाच्या पोराचंबी आसतं हो... कोनता पवार?? पंचायतीतला???"

"हां बरोबर... त्यांच्याचपैकी आहेत ते..."

" ठीक आहे.. उद्या र्‍हा उभे हितं"

"हो हो..."

जीप दिसेनाशी झाली तसे मागे वळून पाहिले तर स्टॅन्डवरचे किमान चार जण त्याच्याकडे अधून मधून पाहात होते.

त्यांना उत्तरे द्यायला लागू नयेत म्हणून तो सरळ जीपच्याच दिशेने जायला लागला.

तिकडे काहीच नसल्याने हा कुठे जात असावा यावर कुजबूज झालीच स्थानकावर! पण कुणाला इतका वेळ नव्हता की त्याच्यामागे जाऊन चौकश्या कराव्यात! पूर्ण अंधारात पोचल्यावर आणि स्थानकावरचे दिवे आता जेमतेम दिसत आहेत हे जाणवल्यावर उमेश बराच वेळ बसुन राहिला. त्यातच लांबून एक वाहन येताना दिसले. ही तीच जीप निघाली तर आणखीन प्रॉब्लेम व्हायचा असे वाटून तो गवतात शिरला. मगाशी किती खरचटले होते याचा अंदाज घेतला. खपली धरल्यासारखी वाटत होती. तहान लागलेली होती. भूक लागलेली होती. अंधारात खरच भीती वाटत होती. असे आपण जास्त दिवस पळत राहू शकणार नाही याची जाणीव क्षणोक्षणी तीव्र होऊ लागलेली होती. जखम झालेली होती. काहीतरी चावलेलेही होते. सतरा जण चौकश्या करत होते. पुण्यात काहीतरी प्रकरण झाले असल्याची कुणकुण येथपर्यंत व्यवस्थित पोचलेली होती.

हळूहळू गार वाराही झोंबूच लागला. असे थांबून राहणे शक्य नव्हते. एक तर अंधारात काहीहि दिसत नव्हते.

उमेश उठून उभा राहिला. त्यातच एक कुत्रे भुंकत आले. ते भुंकल्यावर आणखीन तीन चार कुत्री लांबून भुंकू लागली. हा एक निराळाच प्रकार होऊ शकेल याची जाणीव झाल्यावर उमेशने हाताला लागेल तो दगड आवाजाच्या दिशेने मारला. नशीब असे की शब्दवेधी असल्याप्रमाणे तो दगड कुत्र्यालाच लागला. क्षणात कुत्रे घाबरून पळत सुटले आणि आपोआपच इतर कुत्र्यांचे ओरडणे बंद झाले कारण जखमी कुत्र्याचा आवाज आता आक्रमक नसून विव्हळल्यासारखा येत होता. दगड बर्‍यापैकी मोठा असल्याने उमेशला खात्री पटली की आता श्वानजमात त्याच्यापासून बिचकून राहील.

अंधारातच चालत चालत स्थानकापासून काही अंतरावर आल्यावर उमेशने अंदाजाने एक अंधारातील कच्ची वाट पकडली व दिशेकडे लक्ष ठेवून तो हळूहळू एक एक पाऊल टाकू लागला. जवळपास वीस एक मिनिटांनी स्थानकाच्या मागे पोचला तेव्हा......

.... संपूर्ण पणदरे झोपलेले होते... कुत्री अजूनही भुंकत असली तरी उमेश आता एका सुरक्षित शेडमध्ये आलेला होता... आणि संपूर्ण स्थानकही झोपलेलेच होते...

जाग आली तेव्हा पहाट झालेली असावी. करायचे काय तेच समजत नव्हते. पुन्हा रस्त्यावर जाऊन अंधारात बसून राहिला. कित्येक युगांनी उजाडल्यासारखे वाटावे इतका वेळ तसाच बसलेला होता. इतक्या वेळात रस्त्यावरून एकही वाहन गेले नाही. मात्र उजाडल्यावर वाहने येऊ जाऊ लागली तसा लांब जाऊन पुन्हा गवतात बसून राहिला. निदान आता सगळे स्पष्ट दिसत तरी होते.

पाणी!

पाण्याची नितांत गरज होती आत्ता! थकलेल्या शरीरातील त्राण संपू लागलेले होते.

त्याला अंदाजाने जाणवले की आता साधारण सात साडेसात वाजलेले असावेत. गावाकडून एक म्हातारी डोक्यावर एक पाटी घेऊन येताना दिसत होती. काहीच झाले नाही अशा थाटात हा गवतात उठून उभा राहिला. कपडे झटकून रस्त्यावर आला. डोळ्यांची आग आग होत होती. म्हातारीला सामोरा जाण्याच्या हेतूने हळूहळू चालू लागला.

"आजी... फलटणला गाडी कुठून असते??"

"फलटण?? इकडं कुटं फलटण? फलटण तिकडं ... लोणंदहून जायचं"

"लोणंदला इथून काय मिळतं"

"मोप जीपा यतात हिकून... "

"बर बर... "

काही पावले चालून गेल्यावर पुन्हा मागे वळत हाक मारली..

"आजी... तुमच्याकडे पाणि आहे का हो??"

"पानी?? प्याचं व्हय?? न्हाय.. थितं मिलंल बघ.. "

निवेदितावरचे प्रेम, जुनैद अख्तरच्या नोकरीतून आलेला प्रश्न, वाड्यातून धरून नेले जाणे, बदनामी, पळुन जाणे, हाल हाल, ताण आणि रडकुंडीला येण्याची पाळी येणे...

सर्व सर्व गोष्टी निमिषार्धात विस्मृतीत गेल्या...

खूप लांब एक ओढा होता... दोन तीन बायका तेथे पाणी भरत होत्या...

पाण्याच्या अस्तित्वाने शरीराने एकच आरोळी ठोकली... भरधाव वेगाने फक्त तेथे पोच...

"स्टॅन्डवं नाय व्हय पानी तवा??"

त्या बायकांनी उपस्थित केलेल्या शंकेला कसनुसं हासून प्रत्युत्तर देत उमेश सटकला. चक्क एक प्लॅस्टिकची जुनाट बाटली मिळाली होती त्याला ! त्यात त्याने पाणी भरून घेतलेले होते. ते पाणी संपेपर्यंत तरी तो जगाचा राजा होता आता! आणि मग पोटाने भुकेची जाणीव करून दिली. पण पोटाला समजावून सांगायला लागले की बाबा रे आपण पळून गेलेले गुन्हेगार आहोत आता... असा हट्ट करून नाही चालणार बरं????

आयुष्यात असा वेळ त्याने कधीही घालवलेला नव्हता.

फक्त आणि फक्त गवतात लपून सूर्यनारायणाला पश्चिमेला धाडायचे!

शरीरातले त्राण संपू नयेत म्हणून तो अधिक हालचाली करत नव्हता. आता कुत्री त्याच्याकडे फिरकत नव्हती हे बरे होते. लांबवर रस्त्यावरच्या वाहतुकीचा आवाज येत होता. एका झाडाखाली झोपण्यात काय सुख असते हे त्याला समजले.

अंधार! अंधारासोबतच भूक! संपलेले पाणी! पुन्हा ओढा, कसाबसा! पुन्हा पाणी भरणे! आणि मग हळूच... अगदी हळूच... सगळीकडे लक्ष ठेवत.. स्थानकाच्या मागे जाऊन थांबणे!

एका भजी खाणार्‍या मुलाने बस आली म्हणून हातातला भजी असलेला कागद पटकन फेकून दिला आणि धावला.

अशी भजी फेकतात का, त्यापेक्षा बसमध्ये आणता आली नसती का असा प्रश्न विचारून त्याला त्याचा मोठा भाऊ रागावत बसमध्ये ढकलत होता. कोणाचेही लक्ष नाही असे पाहून उमेशने तो कागद उचलला. त्यात एकही भजे नव्हते. आजूबाजूला मात्र तीन भजी आणि काही मिरच्या पडलेल्या होत्या. कसलाही विचार न करता त्याने ती भजी अक्षरशः गिळली. अन्नाचे महत्व आज पटले त्याला! मिरच्याही कोंबल्या तोंडात ! मिरचीचा फायदा प्रथमच समजला त्याला! अती भूक लागलेली असताना मिरची खाल्ली की काही वेळ भुकेची जाणीव नष्ट होते. अजूनतरी त्याला कोणीही पाहिलेले नव्हते. चांगल्या कपड्यातला शहरी दिसणारा मुलगा असा भजी खात असेल हे कोणालाच पटले नसते.

आपण उघड व्हायचे की गुप्त राहायचे हेच त्याला समजत नव्हते.

एखादा वेडा भिकारी वगैरे बसतो तसा तो स्थानकाच्या एका भिंतीमागे नुसता बसून राहिला अंधारात! कुत्र्यांना पळवून लावण्याची कला जमलेली असल्याने ती भीतीच नव्हती. तेवढ्यात एक म्हातारा तेथे विधी उरकायला आला. त्याला पाहून उमेश आणखीनच लपला.

म्हातार्‍याने विधी उरकतानाच चंची काढून तंबाखू चोळली हातावर! उमेशने आयुष्यात केला नसता असा प्रकार केला. चंचीची पिशवी हळूच लांबवली आणिक त्यातल्या हाताला लागलेल्या नोटा खिशात टाकल्या आणि चंची पुन्हा तशीच ठेवली. आपल्या खिशात किती पैसे आहेत याची त्याला काहीही कल्पना नव्हती. पण इतकेच जाणवत होते की बराच मोठा गठ्ठा असावा. इतके पैसे बाळगणारा म्हातारा असा आडोश्याला का येत असेल हा विचार करण्याची त्याला आत्ता गरज वाटत नव्हती.

काही वेळाने खाकरत आणि थुंकत म्हातारा निघून गेला आणि तसाच पुन्हा तेथेच आला. बराच वेळ पायाने जमीन तपासत राहिला. घाईघाईने पुन्हा घराकडे धावला आणि पुन्ह थोड्या मिनिटांनि परत तेथेच आला. यावेळेस त्याच्याकडे चिमणी होती. चिमणीच्या प्रकाशात त्याने बराच वेळ शोधाशोध केली.

उमेश मगे मागे सरकत होता. उमेशला हे समजत नव्हते की म्हातारा बोंब का मारत नाही आहे. म्हातारा पुन्हा घराकडे धावला. मात्र धावताना दुसर्‍या एकाला आपल्या घरात बोलावून घेऊन गेला. नंतर मात्र बाहेर आला नाही.

दोन एस ट्या निघून गेल्यावर उमेश बिनदिक्कत स्टॅन्डवर आलस्टॅत्याला पाहणार्‍यांपैकि आता तेथे कोणीही नव्हते. कालचा जीपवाला, सकाळची म्हातारीकिंवा ओढ्यावरच्या बायका! त्याने सहा प्लेट भजी विकत घेतली. दोन प्लेट तेथेच खाल्ली आणि चार प्लेट बांधून घेतली. दोन कप चहा ढोसला. प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये पाणी विकत होते त्याच्या तीन पिशव्या घेतल्या आणि खिशात हात घातला...

भजीवाल्याला तो गठ्ठा दिसू नये म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवून त्याने खिशातील नोटा बाहेर काढल्या.

शंभराचे बंडल?????

दहा हज्जार रुपये?????

उभ्या उभ्याच घामाने नखशिखांत भिजला तो!

चोरी! दरोडा!

आपल्यावर आधीच इतके आरोप आहेत, त्यात हा आणखीन एक! पण विचार करायला अवधी नव्हता.

शंभराची एक नोट पटकन मोकळी करत भजीवाल्याला दिली. सुट्टे घेऊन स्टॅन्डवर असलेल्या मोफत वर्तमानपत्र मिळणार्‍या कट्यावर जाऊन सगळ्या पेपर्समधील बातम्या वाचल्या. एकेक बातमी डोळ्यामधून पाणी काढत होती.

आयुष्याची बरबादी झालेली होती. पूर्ण बरबादी!

अतिरेकी ठरला होता. त्यातच पोलिस अधिकार्‍याच्या मुलीशी संबंध असल्याचे म्हंटले होते. आई वडिलांचे नांव धुळीला मिळाले होते. क्षमाचे लग्न ठरने आता अशक्य होते. विनीत आणि आप्पा फुकट शिक्षा भोगणार होते.

सगळेच संपलेले होते.

हा मुलगा कोण आणि कुठेच न जाता इथे पेपर का वाचत बसलेला आहे याची शंका येऊन भजीवाल्याने दोस्तीखात्यात थोडी चौकशी केली. उद्या सकाळी चार मित्र येणार आहेत तोवर पणदर्‍यातच थांबणार आहे असे उमेशने सांगितले. कुठे राहणार या प्रश्नावर तो म्हणाला की तिकडे गाडी लावलेली आहे त्यातच झोपणार!

हा मुलगा काल मध्यरात्री याच स्थानकावर झोपला होता हे जर भजीवाल्याला समजले असते तर त्याने नक्कीच पटलाला सांगितले असते.

गाडीची दिशा भजीवाल्याला दाखवल्यामुळे आता तिकडे जाणे भाग होते. तिकडे चालत जाताना उमेश अंधारलेल्या डांबरी रस्त्याकडे बघून हमसून हमसून रडत होता. बराच मोठा वळसा घेऊन तो पुन्हा सुरक्षित जागी, म्हणजे स्थानकाच्या मागच्या भिंतीखाली आला. झाडांच्या गर्दीत तो आता कोणालाच दिसणार नव्हता. सर्व समसूम झाली की शेडमध्ये जाऊन झोपता येईल हा त्याचा हेतू होता.

आपल्या खिशातल्या नऊ हजार नऊशे पैकी अजून दोनशे रुपये काढून घेऊन बाकीचे बंडल तसेच टाकून द्यावे असे त्याच्या मनात आले.

बिचार्‍या म्हातार्‍याने कदाचित आयुष्यभराची पुंजी काही कारणाने जवळ ठेवली असेल. कदाचित मुलीचे लग्न असेल, जागा घ्यायची असेल. आपण हे काय केले??

उमेशने मोहाने दोन ऐवजी चार नोटा काढून घेतल्या आणि ते पुडके ठेवायला पुढे सरकला............ तोच.......

"अब क्या करेंगे??? यहां फसाद मचानेवास्ते दियेले थे मियाँने... अल्लाह का काम था.... रकम चली गयी... चोरी हुई या अल्ला रहम नही करना चाहता है.... कौन जाने... अब कल पोस्टर नही लगा पायेंगे.. स्साले काफिर.... जीते रहेंगे आरामसे... और हम अल्लाके बंदे... युंही मौतका इन्तजार करते रहेंगे... पणदरा जल के राख हो सकता था परसो सुबहातक.... कासिम... मियाँ तो पुनामे पकडे गये... जिम्मा हमारा तुम्हारा है अब... कहांसे पैसा लाओगे बताओ.. "

"मै कहांसे लाऊ चचा... काफिरोंसे मांगलेना... हरामियोंको नींद सुलायेंगे मौत की... उसी पैसेसे... "

"लेकिन आप जेबमे रखके क्यूं घुमरहे थे चचा???"

"तो घरमे रखता और किसीको दिखाई देता तो??? .... रहम कर खुदा... काफिरोंकी इस जन्नतको जहन्नुम बनानेवाले थे हम... वो भी सिर्फ तेरेही वास्ते...."

अंगावर सरसरून काटा आलेला उमेश श्वासांचाही आवाज येऊ देत नव्हता. मगाचचा म्हातारा त्याच कटात सामीत होता. जुनैद अख्तर मियाँ ही पोचलेली व्यक्ती होती हे उघड होते.

पुण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायचे मगाशीच ठरलेले होते उमेशचे.... परिस्थिती फरक फक्त इतकाच पडलेला होता... की...

.... आता तो ताठ मानेने जाणार होता....

आणि त्यातच त्या कासिमने म्हातार्‍याला सांगितले...

"और वो काफिर लौंडा नही पकडा गया मियाँके साथ???"

"हां..."

"उसकी मेहबूबाने जहर खालिया.... बच तो गयी है.... मगर इश्ककी हद तो देखिये चचा......"

===================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

उमेशच्या आयुष्यात प्रचंड आणि महत्त्वाच्या उलथा पालथ करणारा प्रसंग रेखाटण्यात अपेक्षित यश आले आहे या भागात भूषणराव...... Happy
(प्रवासा दरम्यान घडलेल्या सर्व प्रसंगातुन फारच मोलाचे अनुभव /पेक्षा मोलाची शिकवण उमेशला मिळाली असे दिसुन येते. उदा. एकटेच दिशाहीन पळणे, बिनछत झोपणे, भूक, पाण्याचे महत्त्व, चोरीचा प्रसंग्..वैगरे )

मध्यंतरी कथा आतंकवादी कारवायांवर आहे..सा फिल आला.....पण तुमच्या नेहमी च्या शेवटने कथा पुन्हा वळवली....छान वाटले. Happy

हा भाग मागच्या सर्व भागांहुन जास्त आवडला Happy

मस्त होता....................हा भाग...............
जरा वेगळेच वळण...................

ती जीप मारामतीला चालल्याचे त्याला समजले>>>>
माफ करा माबो वर १ वर्ष झाले नाही तरि प्रतिक्रिया देत आहे.
पण इथे मारामतीला ऐवजी बारामतीला असे हवे होते.

रच्याकने: माझही गाव पणदरेच आहे.

मस्त . . .
. . हा भाग मागच्या सर्व भागांपेक्षा जास्त आवडला.
सर्व अडचणीवर मात करुन शेवटी आपला नायक
खरा नायक ठरेल ना ?
पुढचा भाग लवकरात लवकर लिहा . . . .