मोरपिसे भाग ५

Submitted by नंदिनी on 19 August, 2011 - 07:04

हा सर्व महिना कसा गेला मला समजलंच नाही. बाबाना त्या दिवशी अ‍ॅम्ब्युलन्स्मधून घरी आणलं ते पार अगदी त्यांची राख होइपर्यंत रेहान आमच्या घरीच होता. प्रसाद अगदीच लहान. पाचवीला. त्याला काय समजत होतं आणि काय नाही ते माहित नाही. पण त्याने तरी हे सर्व निभावलं. यासर्वदरम्यान हमीद अंकलनी आणि आंटीनी आम्हाला जी काही मदत केली ती खरंच खूप होती.

तसे गावात आमचे भरपूर नातेवाईक होते, पण एखाद वेळेला येऊन जाण्यापलिकडे त्यानी काहीच केलं नाही. करून करून करणार तरी काय होते? माझे बाबा काय करोडपती नव्हते की ज्याच्याकडून काही इस्टेटीच्या वाटण्या होतील. आणि जिवंत असताना त्यानी इतर नातेवाईकाचा कायम अपमानच केलेला... आईचं थोडंफार सोनं आणि चांदी, हे घर जवळ जवळ वीस वर्षापूर्वी बांधलेलं. नाही म्हणायला हा प्लॉट मोठा होता, आज ना उद्या इथे बंगला बांधू या आशेने कधी काळी घेतलेला. बंगला तर कधी बांधून झालाच नाही... त्याच्या आधीच बाबा गेले.

एखादं माणूस घरात आहे म्हणेम्हणेपर्यंत जगातूनच निघून गेलेला असतो, किती कठिण वाटतं ना? मला माझ्या बाबांचा खूप राग यायचा. अगदी हा माणूस आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठी अडचण आहे हे वाटण्याइतकं. पण तरीही त्यानी अशाप्रकारे आयुष्यातून निघून जावं असं कधीच वाटलं नव्हतं. काही झालं तरी त्यांच्याशी रक्ताचं नातं होतं. लहानपणापासून आतापर्यंत त्यानी एकदाही मला जवळ घेऊन कधी माझे लाड केले नाहीत, कसलंच कौतुक केलं नाही. वर्गात पहिला नंबर येऊन्सुद्धा कधी दोन पैशाचं चॉकोलेट आणंलं नाही. आमच्या साध्यासुध्या हौशी पुरवायला त्यांच्याकडे कधीच पैसे असायचे नाहीत, दारूसाठी पाकिट कायम फुल्ल असायचे.

मला दिवसभर राहून राहून त्यांचे काही काही प्रसंग आठवायचे. मी सहलीसाठी आणलेला फॉर्म त्यानी कसा फाडून फेकून दिला होता, मला वाचनालयाची वर्गणी हवी होती तेव्हा त्यानी मला कसं चपलेने मारलं होतं.. चप्पल नव्हे, प्रसादचा शाळेत घालून जायचा बूट होता बहुतेक. असलंच काहीतरी आठवायचं, एकदा वाटलं बरं झालं मेले. नाहीतरी जगून काय करत होते?

आज ना उद्या ते जाणारच होते. त्यांचे लिव्हर खराब होत आलेले होते. पण तरी... गेले त्याचं मला भरपूर दु:ख झाले. आणि खरं सांगू? अगदी खरं खुरं? त्याच्या जाण्याने माझ्या वाटेमधे अजूनच प्रॉब्लेम्स तयार झाले होते. मला बारावीनंतर हे गाव सोडायचे होते. आता अजून अकरावीची परीक्षा झाली नाही तितक्यात हे असं होऊन बसलं होतं. मला डोळ्यासमोर नुसता आता अंधार दिसत होता.

माझी आई काही जास्त शिकलेली नव्हती. भाऊ बहिण लहान. अशा परिस्थितीत मलाच घर संभाळायला हवं होतं. गेली दोन वर्षं घरच्याघरी शिकवण्या घेत घेत मी थोडीफार आर्थिक गरज संभाळलेली होती. पण आता सर्वच गणितं बदललेली होती.

रेहान जरी सर्व काळ आमच्याच घरी असलातरी सरबानी मात्र चुकूनदेखील आमच्या घरी फिरकली नव्हती, किमान आशी बातमी समजल्यावर तरी ती येइल असे मला वाटले होतं. पण नाही आली ते एका अर्थाने बरंच झालं. प्रीतम एकदा तिच्या आईसोबत मला "हाक मारायला"म्हणून आली होती. रेहानला घरामधे बघून तिचा चेहराच काळवंडला. रेहान इथे कसा काय? हा प्रश्न मला विचारण्यासाठी सारखी संधी शोधत होती.

पण तिच्या आईची आणि माझ्या आईची बडबड काही थांबेना, आणि मी काही माझ्या आईच्या बाजूने उठेना. बिच्चारी प्रीतम. तिच्याच आईसमोर तिला काही बोलता देखील येइना. शेवटी रेहाननेच तिच्या आईशी ओळख करून घेतली.

"रेहान का? वा वा.. तुम्ही एकाच वर्गात आहात का?"

"होय, काकी. मी प्रिया आणि प्रीतम एकाच वर्गामधे"

आता प्रीतमच्या आईला "हा मुसलमान मुलगा इथे काय करतोय?" हा प्रश्न विचारायचा होता. पण नेमकं विचारणार कसं?

शेवटी माझी आईच म्हणाली "लहानपणापासून येतो आमच्याकडे. प्रियाचे बाबा आणि याचे बाबा एकत्र काम करायचे" हे बोलतानासुद्धा आईच्या डोळ्यातून पाणी आलं. तसंही गेल्या कित्येक दिवसात तिच्या डोळ्यातलं पाणी खळलं नव्हतं. पूजा आणि प्रसाद पण अधून मधून रडायचे. कोरडे डोळे होते ते फक्त माझे.

प्रीतमच्या चेहर्‍यावर आता प्रचंड राग स्पष्ट दिसत होता, मी तिच्याशी खोटं बोलले हे तिला समजलंच होतं. आणि त्याहूनही जास्त रेहानदेखील तिच्याशी खोटं बोलला याचा बहुतेक तिला जास्त राग आला होता..

असो,सध्या माझ्यासाठी ही वेळ असल्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष देण्याची नव्हती. पुढे काय करायचं हे मला आजपासून ठरवणं भाग होतं..... रेहान, प्रीतम आणि सरबानी याना त्या भविष्यात कुठेही जागा असणार नव्हती.

गुलमोहर: